मानसिक स्वास्थ्य लाभावे यासाठी आपण झटत असतो. मानसिक आरोग्याच्या भावनिक पैलूचा जास्त विचार झालेला आढळून येतो. एखादी कृती, घटना किंवा नातेसंबंधामुळे आपल्याला बरे वाटले की आपल्याला वाटते- आपले मानसिक आरोग्य सुदृढ आहे. हे जरी खरे असले, तरीही मानसिक आरोग्य ही स्थिर बाब नाही. वेगवेगळ्या कारणांनी (व्यक्ती व परिस्थितीजन्य) त्यात नियमित बदल होत राहतात. त्याचे स्वरूप व दर्जा यांत फेरफार होत राहतात. मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय? त्यात कोणकोणत्या बाबींचा, प्रक्रियांचा समावेश असतो? मानसिक सुदृढता व स्वास्थ्य का महत्त्वाचे असते? या प्रश्नांची उत्तरे जीवनविषयक योग्य पर्यायांची निवड करण्यासाठी प्रेरक ठरतील.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्याख्येप्रमाणे ‘आरोग्य म्हणजे केवळ आजाराचा किंवा दुर्बलतेचा अभाव नव्हे, तर त्याजोडीने शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्याची पूर्णस्वरूप स्थिती असणे होय.’ या व्याख्येत केलेल्या मानसिक आरोग्याच्या समावेशावरून त्याचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल. WHO ने केलेली मानसिक आरोग्याची व्याख्याही या बाबीवर प्रकाश टाकते. या व्याख्येप्रमाणे ‘मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्वास्थ्यस्थिती- ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्यातील क्षमता ओळखून त्याजोगे पुरेपूर वागू शकेल, दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करू शकेल, सुफल व उत्पादनक्षमरीत्या कार्यरत राहील व समाजाप्रति योगदान देऊ शकेल.’ या समर्पक व्याख्येत व्यक्तीच्या जीवनातील मानसिक स्वास्थ्याचे अविभाज्य अस्तित्व आणि त्याचा सखोल व दूरगामी प्रभाव दिसून येतो.
या व्याख्येतले घटक व प्रक्रियांकडे लक्षपूर्वक पाहता असे जाणवते, की यावर आनुवंशिक व परिस्थितीजन्य बाबींचा प्रभाव स्वाभाविकच असणार. याबरोबरच व्यक्तिमत्त्वाचे विशिष्ट पैलूही आपली छाप पाडत असतात. त्यातील विचार, भावना व वर्तन या त्रिसूत्रीची भलीमोठी कसरत होत असते. या तिन्ही घटकांचा परस्परांशी निकटचा संबंध आहे. किंबहुना, हे तिन्ही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. एका घटकाचा इतर दोन्हीवर नियमित परिणाम होत असतो. हे त्रिसूत्री चक्र सतत कार्यरत असते आणि आपले मानसिक आरोग्य व त्याची सुदृढता ठरवीत असते.
मानसशास्त्रांतर्गत निरनिराळ्या विचारधारांप्रमाणे- मन, मानसिकता आणि ‘विचार-भावना-वर्तन’ या त्रिसूत्रीकडे पाहण्याचे दृष्टिकोन ‘मानसिक आरोग्य’ ही संकल्पना समजून घेण्यास उपयुक्त ठरतात. ‘मन’ या संकल्पनेवर भाष्य करणारे अनेक मानसशास्त्रज्ञ होऊन गेले आणि अजूनही या संकल्पनेवर संशोधन सुरूच आहे.
आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांच्या मते, माणसाचे मन हिमनगासारखे असते. या तुलनेप्रमाणे आपल्या मनाचा काहीसाच भाग आपल्याला ज्ञात असतो व उरलेला बराचसा अज्ञात. त्यांनी ‘इड’, ‘इगो’ व ‘सुपर इगो’ या संकल्पनाही मांडल्या. इडमध्ये बेलगाम इच्छा, उत्तेजक शक्ती यांचा समावेश होतो. ‘इगो’ हा सत्यतेच्या तत्त्वावर कार्यरत असतो, विवेकवादी असतो. त्यामुळे ‘इगो’ ‘इड’वर सतत लगाम ठेवून असतो. मनाचा तिसरा थर ‘सुपर इगो’ म्हणजे नीतिमत्ता, आदर्श, सामाजिक बंधने इत्यादींचा समावेश. ‘इड’ व ‘सुपर इगो’च्या थरांमध्ये विवेकी समतोल राखण्याचे काम ‘इगो’चे असते. मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हा विचार मौलिक आहे. जडणघडणीवर भाष्य करताना अल्फ्रेड अ‍ॅडलर यांनी कौटुंबिक स्थिती व त्यातील स्थान, सामाजिक पैलू व समावेशाचे स्वरूप यांसारख्या घटकांना महत्त्व दिले आहे. कार्ल युंग यांचेही ‘मन’ व ‘व्यक्तिमत्त्व’ यासंदर्भातील वैचारिक योगदान मोलाचे आहे. ‘इंट्रोव्हर्ट’ व ‘एक्स्ट्रोव्हर्ट’ हे व्यक्तिमत्त्वाचे दोन पैलू असून, मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वावर त्याला लाभलेल्या पालकत्वाचा, समाज, संदर्भ, काळ, इतिहास, धर्म व कला यांचा प्रभाव पडतो असे त्यांचे मानणे होते.
प्रत्येक मानसिक प्रक्रियेचे काहीतरी प्रयोजन व कार्य असून, मानसिक जीवन आणि वर्तन हे व्यक्तीच्या सक्रियरीत्या जुळवून घेण्याशी निगडित आहे, असे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ विलियम जेम्स यांचे मानणे होते. बाह्य़ वर्तनाद्वारे ‘मानसिकतेचा अभ्यास’ यावर भर देणारे मानसशास्त्रज्ञ व्ॉटसन यांचा एखाद्या कृतीला मिळणाऱ्या प्रतिसादाच्या स्वरूपावरून कृती घडेल की नाही व ती कशा स्वरूपाची असेल, यावरील अभ्यास महत्त्वाचा आहे. या विचारधारेवर आधारित व त्याला नवे स्वरूप देणारे बी. एफ. स्कीनर यांनी विचार, भावना आणि अंतर्गत मानसिक प्रक्रिया यांची चर्चा केलेली आढळते. जेस्टॉल्ट मानसशास्त्राचा भर पूर्णतत्त्वाच्या अनुभवावर आहे. या विचारधारेचे संशोधन करणारे मॅक्स वर्दायमर यांच्या मते, विचारप्रक्रिया ही दोन प्रकारे होते. एक तर कोणत्याही समस्येचे नवीन पद्धतीने निवारण करणे व दुसरी म्हणजे एखाद्या समस्येचे पूर्वसंचयातील ज्ञात अनुभवांवरून! डेव्हलपमेंटल मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांच्या मनोसामाजिक दृष्टिकोनातून स्पष्ट होते की, प्रत्येक मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या प्रगतीच्या आठ स्तरांशी त्याची मानसिकता जोडलेली असते. प्रत्येक स्तरावरील संघर्षांला यशस्वीरीत्या सामोरे जाऊन, त्या- त्या स्तरातील सद्गुण/ मूल्य संपादन करता येते; ज्यायोगे मानसिकता सुदृढ होते. कार्ल रॉजर्स यांचा व्यक्तिसदृश दृष्टिकोन, ‘मनुष्य मूलत: चांगल्या प्रवृत्तीचाच असतो’ हा ठाम विश्वास, त्याची मानवतावादी मूल्ये व धोरणे यावर भर होता. सकारात्मक भावना या मानसिकतेवर विशेष प्रभाव पाडतात आणि विचार व कृतीला चालना देण्याचे काम करतात, असे ते मानत. छळछावणीत विलक्षण यातना भोगूनही जगण्याचा अर्थ शोधणारे डॉ. व्हिक्टर फ्रँकेल यांच्या विचार व लेखनातून स्पष्ट होते की, अत्यंत कठीण परिस्थितीतही एखादा मनुष्य जीवनाचा अर्थ शोधून विलक्षण आशावादाच्या जोरावर आपले मानसिक स्वास्थ्य जपू शकतो.
मेंदूतील प्रक्रिया, शरीर व मानसिकता यावर वेगाने संशोधन सुरू आहे व त्यातून महत्त्वाचे निष्कर्षही निघताना दिसतात. ‘भावनिक बुद्धिमत्ता’, ‘सामाजिक (परस्परांतील नातेसंबंधांविषयी) बुद्धिमत्ता’ यांतून डॅनियल गोलमन आपल्याला मानसिकतेच्या विचार-भावना-कृती यांचे सखोल दर्शन घडवतात. व्यक्तिमत्त्व हे कोणत्या बाबींचा संच आहे व त्यातील घटकांचा व मूलभूत गरजांचा काय परिणाम होतो, याबद्दलही व्यक्तिमत्त्व मानसशास्त्रज्ञ गॉर्डन ऑलपोर्ट, आर. बी. कॅटल व हेन्री मरे यांच्यासारख्या दिग्गजांनी अभ्यास केलेला आहे. आपले विचार व त्यांचे स्वरूप हे भावना व वर्तनावर परिणाम करतात. आणि हे विचार आपोआपच स्वाभाविकरीत्या मनात येत असून जीवनाची वाटचाल करत असतात असे अ‍ॅरोन बेक व अल्बर्ट एलीस यांसारख्या कॉग्निटिव्ह मानसशास्त्रज्ञांचे मानणे आहे. हे विचार जितके आग्रही तितक्या तीव्र भावना व वर्तन- असे काहीसे समीकरण अनुभवास येते. अलीकडच्या काळात उगम पावलेल्या सकारात्मक मानसशास्त्राच्या विचारधारेचा मानसिक स्वास्थ्याप्रति दृष्टिकोन हा आशावाद, क्षमाशीलता, जीवनाचा अर्थ शोधणे, जागरूक जीवन जगणे, कृतज्ञता यांसारख्या सकारात्मक मूल्यांवर आधारित आहे. ही मूल्ये (ज्यांचा उगम व उल्लेख आपल्या सांस्कृतिक वारशात दिसतो.) मानसिकता सुदृढ करण्यासाठी अतीव उपयुक्त आहेत असे या विचारधारेचे मानणे आहे.
याबरोबरच इतर मानसशास्त्रीय विचारधारांचेही विशेष योगदान आढळते. परंतु येथे उल्लेखिलेल्या विचारधारांवरून लक्षात येते की, मेंदूचे घटक व प्रक्रिया, शारीरिक बाबी, आनुवंशिकता, व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप, आजूबाजूची सामाजिक, आर्थिक, नैतिक, राजनैतिक, कौटुंबिक परिस्थिती आणि अनुभव यांचा दूरव्यापी परिणाम आपल्या मानसिकतेवर, विचार-भावना-कृती चक्रावर, दृष्टिकोनावर पडत असतो. या घटकांवरून व WHO च्या व्याख्येप्रमाणे मानसिक आरोग्याबद्दलचे काही ठोकताळे आपल्याला बांधता येऊ शकतात. हे घटक यशस्वीपणे कार्यरत असणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य लाभणे असे म्हणणे ठीक राहील. त्यामुळे आपली जीवनविषयक ध्येये या बाबींभोवती विणलेली असल्यास फायदेशीर ठरेल.
सुरुवात हे स्वीकारण्यापासून करावी की, प्रत्येक व्यक्ती एका जीवनवर्तुळाचा भाग असते; ज्यात या बाबींचा स्पष्टपणे प्रभाव दिसून येतो. या बाबींच्या आधारे आपण आपले विचार-भावना-कृती चक्र चालवत असतो. किंबहुना, ते चालवले जात असते. काही बाबी नियंत्रणकक्षेत असतात, तर काहींवर नियंत्रण ठेवता येणे कठीण. आणि ही स्थितीसुद्धा बदलत असते. ‘बदल अनिवार्य असतो’ या धारणेचा स्वीकार मानसिक स्वास्थ्याला पोषक ठरतो. वरील घटक व त्यांचे अस्तित्व आणि बदलते स्वरूप व्यक्ती-व्यक्तीतील भिन्नतेचे मूलभूत कारण ठरते. त्यामुळे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे खरे मानून त्याचा स्वीकार जितक्या जास्त प्रमाणात कराल, तितके ते मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम, हे खरे! ही भिन्नता व बदल जितक्या सहजतेने, सातत्याने, धैर्याने आणि धीराने स्वीकारले जातील, तितके आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वीकाराची ही गुरुकिल्ली नकारात्मक भावना व ताणतणावाची परिस्थिती, अनुभव व प्रसंगांतही समर्पक ठरू शकते.
या सर्व प्रक्रियांप्रति सजगताही महत्त्वाची. त्याचबरोबर आपल्या विचार-आचाराकडे नियमित जाणीवपूर्वक आत्मपरीक्षणात्मक लक्ष देऊन, वेळोवेळी त्याची डागडुजी करून जीवनविषयक योग्य पर्यायांची जबाबदारीने निवड करणे हे सुदृढ मानसिक स्वास्थ्यासाठी साजेसे धोरण ठरेल.
मानसिक स्वास्थ्याला पोषक ठरणाऱ्या बाबींमध्ये आपली इच्छाशक्ती, सकारात्मक व नकारात्मक भावनांचा अनुभव-स्वीकार-व्यक्त करण्याची व योग्य नियोजन करण्याची क्षमता, इतरांबरोबर सशक्त नातेसंबंध जोडण्याचे कौशल्य, ज्ञान मिळवण्याकडे कल, बदल आणि अशाश्वततेशी जुळवून घेण्याची तयारी यांचा समावेश असतो. यावरून हे लक्षात येते की, केवळ मानसिक आजार नसणे किंवा तो असल्यास त्यावर उपाय करणे म्हणजेच फक्त मानसिक स्वास्थ्य जोपासणे नव्हे; तर दैनंदिन जीवन व्यतीत करत असताना मनोबलाप्रति उचललेली जाणीवपूर्वक पावलेही महत्त्वाचे योगदान करतात. केवळ आनंदच नव्हे, तर आजूबाजूच्या जगाप्रति वाटणारी प्रतिबद्धता, आत्मविश्वास, ‘स्व’त्वाच्या कल्पना व आपण तणावस्थितीवर यशस्वीपणे मात करू शकू, ही निष्ठा कोणाकडे मागून न मिळणारी, परंतु स्वत: जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास साध्य होऊ शकणारी बाब म्हणजे मानसिक स्वास्थ्य. मानसिक स्वास्थ्याला पोषक व धोकादायक गोष्टींचा विचार सातत्याने करत त्यानुसार पर्यायांची निवड करावी व निर्णय घ्यावेत.
शोषणविरहित आयुष्य जगून मानसिक स्वास्थ्याचा अवलंब हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. प्रत्येकाने तो स्वत: व इतरांप्रति वागताना जपावा. हा अधिकार प्रत्येकाकडून व प्रत्येकासाठी जपला जाईल यासाठी विशेष पावले उचलावी. अशाने एक सशक्त, जबाबदार व सहिष्णु समाज तयार करणे सहजशक्य होईल. नियमित आत्मपरीक्षण, आजूबाजूच्या परिस्थितीचे अवलोकन व त्यातून घेतलेले सशक्त निर्णय म्हणजे स्वत:चे व इतरांचे मानसिक स्वास्थ्य जपण्याचा व त्यायोगे सामाजिक संपन्नता जपण्याचा, वृद्धिंगत करण्याचा राजमार्ग ठरेल यात वाद नाही.
केतकी गद्रे  ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

अध्यात्म आणि मानसिक स्वास्थ्य
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Dhananjay Powar wife and mother expressed displeasure accusing of Bigg Boss marathi
Video: धनंजय पोवारच्या पत्नी व आईने ‘बिग बॉस’वर आरोप करत व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या, “त्याला दाखवतंच नाहीये काय भानगड…”
Yograj Singh Statement on Kapil Dev
Yograj Singh on Kapil Dev: “मी कपिल देवला सांगितलेलं, तुझी अशी अवस्था करेन…”, युवराजचे वडिल योगराज सिंगांचं धक्कादायक वक्तव्य
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Badlapur School case
Badlapur Sexual Assault Case : “बदलापूरमधील त्या शाळेच्या संचालक मंडळावर भाजपा पदाधिकारी”, ठाकरेंच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले…
greta thunberg arrested
Greta Thunberg Arrested: ग्रेटा थनबर्गला अटक, कोपनहेगन पोलिसांची कारवाई; स्वत: Video पोस्ट करून दिली माहिती!
Blood Test
Blood Test : ‘या’ ५ रक्ताच्या चाचण्यांमुळे होतो हार्ट अटॅक, कॅन्सरसह अनेक गंभीर आजारांचे निदान
Malaria Causes, Symptoms and Precautions in Marathi This monsoon, use these practical safety tips when travelling to malaria-endemic areas
पावसाळ्यात फिरायला जाताय? मलेरिया होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी अन् ॲडमिट होण्याचा धोका टाळा