|| आनंद हर्डीकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुष्यभर समाजहितैषी दृष्टीने लेखन करीत राहिलेले गेल्या शतकातील एक विचारवंत म्हणून रामचंद्र नारायण चव्हाण यांना महाराष्ट्र ओळखतो. त्यांचे निधन होऊन आता २५ वर्षांचा काळ उलटला असला, तरी त्यांचे उत्साही सुपुत्र रमेश चव्हाण यांनी रा.नां.चे विपुल साहित्य वेळोवेळी संकलित स्वरूपात पुनप्र्रकाशित केले आहे. रा.नां.चे लेखन खुद्द त्यांच्या हयातीत फार मोठय़ा प्रकाशझोतात आले नसले, तरी बदलत्या परिस्थितीत तरी ते उपेक्षित राहू नये, या सद्हेतूने रमेश चव्हाण यांनी पितृनिधनानंतर तब्बल ३६ पुस्तके प्रकाशित केली आहेत. रा.नां.चे साहित्य प्रकाशित करीत राहण्याच्या त्यांच्या ध्यासातून तयार झालेले ३७ वे अक्षर श्रद्धांजली पुष्प अलीकडेच प्रसिद्ध झालेले आहे. ‘हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन: एक प्रबोधनात्मक मंथन’ हे ते नवे पुस्तक!

‘बहुजन समाजहितवादी दृष्टी व स्वयंसेवक संघटना’ हा १९४५ साली बेळगावच्या ‘राष्ट्रवीर’मध्ये प्रसिद्ध झालेला छोटासा लेख हा या पुस्तकातला सर्वात जुना लेख आहे. त्याच ‘राष्ट्रवीर’मध्ये फेब्रुवारी, १९९३ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘अयोध्या-बाबरीच्या निमित्ताने : समाज प्रवाही असतो!’ या शीर्षकाचा लेख हा कालक्रमाने सर्वात शेवटचा लेख आहे. सुमारे ४८ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात रा. ना. चव्हाण यांनी ‘दीनबंधू’, ‘महाराष्ट्र मित्र’, ‘क्रांतियज्ञ’ ‘शिवनेर’ या साप्ताहिकांमधून, ‘मराठा जागृती’ या पाक्षिकातून, तसेच ‘अस्मितादर्श’, ‘पुरुषार्थ’, ‘नवभारत’ या मासिकांमधून वेळोवेळी लिहिलेले लेख रमेश चव्हाण यांनी मोठय़ा प्रयत्नांनी मिळवले आणि या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. ‘प्रभात’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘नवाकाळ’, ‘सकाळ’ या वृत्तपत्रांमधून व ‘साधना’ साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेली रा.नां.ची काही पत्रेसुद्धा या संग्रहात वाचायला मिळतात. आपल्या वडिलांचे साहित्य जुन्या नियतकालिकांमधून शोधण्यात रमेश चव्हाण यांनी दाखवलेली चिकाटी प्रशंसनीय आहे. शिवाय ‘हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन’ या गेली काही वर्षे अत्यंत ज्वलंत ठरलेल्या वादग्रस्त विषयावरील हे सर्व लेख संकलित स्वरूपात प्रकाशित करण्यामागचा त्यांचा हेतू ‘प्रबोधनात्मक मंथन’ घडवून आणण्याचा असल्यामुळे त्याचेसुद्धा स्वागतच करायला हवे.

या दृष्टीने विचार करता मात्र, हे संकलन काहीसे निराशाजनक स्वरूपात सादर झाले आहे असे खेदाने म्हणावे लागते. कोणत्याही प्रकारे संपादकीय संस्कार या लेखसंग्रहावर केले गेलेले नाहीत. रमेश चव्हाण यांनी लिहिलेल्या संपादकीय मनोगतापासून शेवटी दिलेल्या नऊ परिशिष्टांपर्यंत कोठेही सुसूत्र मांडणी आढळत नाही. लेखांची कालक्रमानुसार योजना नाही, की विषयानुसारही नाही. काही लेख अर्धवट अवस्थेतच समाविष्ट केलेले आहेत. कित्येक लेखांच्या शेवटी पानपूरके म्हणून रा.नां.च्याच पूर्वप्रकाशित पुस्तकांमधील काही मजकूर पुन्हा चौकटीत देण्यामागचे औचित्य पुरेसे स्पष्ट होत नाही. कारण ज्या लेखांच्या शेवटी शिल्लक उरलेल्या जागेत या चौकटी बसवण्यात आल्या आहेत, त्या लेखांच्या आशयाशी त्या मजकुराची सांधेजोड होत नाही. एकाच विषयावरील लेखही विखुरलेले आणि प्रसिद्धीच्या बाबतीत काळाचे विनाकारण हेलकावे खाणारे असल्यामुळे रा.नां.च्या प्रतिपादनामधील होत गेलेले बदल आणि विचारमंथनाला चालना देऊ शकणारे त्यांचे मुद्दे ठळकपणे स्पष्ट होत नाहीत. रा.नां.च्या लेखांत त्या-त्या वेळचे अनेक संदर्भ ओझरते आलेले आहेत, मात्र त्याबद्दलच्या संपादकीय टिपा अपेक्षित असूनही यात नाहीत.

सत्येन्द्रनाथ टागोर यांचे सातारा येथील ‘प्रार्थना समाजा’च्या प्रथम वार्षिकोत्सवात झालेले ‘धर्मवासना’ हे संपूर्ण भाषण किंवा राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या ‘ब्राह्मो समाजा’च्या शिकवणुकीचा आशय स्पष्ट करणारा कुणा अनामिकाचा ‘दीनबंधू’मधला लेख परिशिष्टे म्हणून छापले आहेत. रा.नां.च्या संग्रहात त्या भाषणाची पुस्तिका सापडली म्हणजे काही ती त्यांच्या लेखसंग्रहात समाविष्ट करायला हवीच होती, असे नाही. प्रत्येक लेख कुठे प्रकाशित झाला, हे त्या-त्या लेखाच्या शेवटी दिलेले असताना पुन्हा एकदा सर्व लेखांची शीर्षके व पूर्वप्रसिद्धीचे तपशील स्वतंत्र परिशिष्टात कशासाठी, ते लक्षात येत नाही. शिवाय सर्वात जुना लेख प्रकाशित झाल्याच्या १३ जून आणि १३ एप्रिल अशा दोन वेगवेगळय़ा तारखा (पृ. १५५ आणि २५७) दिलेल्या आढळतात. नेमकेपणाच्या अभावाचे हे एक साधे उदाहरण.

संपादकीय मांडणीतल्या विस्कळीतपणाकडे दुर्लक्ष करायचे ठरवले, तर खुद्द रा.नां.च्या लेखनात मात्र विचारमंथनाला चालना देऊ शकतील असे अनेक मुद्दे सहज आढळतात. प्रबोधनाच्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्याकडून ज्या वैचारिक सहिष्णुतेची अपेक्षा असते, ती रा.नां.च्या लेखनाचा स्थायिभाव आहे. हिंदू संघटनांवर – विशेषत: रा. स्व. संघावर व त्या संघटनांच्या नेत्यांनी वेळोवेळी मांडलेल्या मतांवर रा.नां.नी टीका केली आहे. त्यातून त्यांची मते, क्वचितप्रसंगी काही पूर्वग्रहसुद्धा स्पष्ट होतातच; परंतु तसे करताना ते त्या संघटनांना दूषणे देण्यात वा नेत्यांची कुचेष्टा करण्यातच धन्यता मानताना दिसत नाहीत. हिंदुत्वाच्या पुरस्कर्त्यांनी वेळोवेळी केलेल्या व्याख्यांबद्दलची त्यांची मते तौलनिक दृष्टिकोनातून न्याहाळण्यासारखी आहेत. डॉ. के. ब. हेडगेवारांपासून बाळासाहेब देवरसांपर्यंतचे रा. स्व. संघाचे सरसंघचालक आपापली मते मांडताना रा.ना. त्या मतांमधील बदल स्वागतार्ह मानतात आणि त्यानुसार आपले भाष्यसुद्धा बदलतात. आपण जी विचारसरणी आक्षेपार्ह मानतो आहोत, ती बदलल्यानंतरही आपले जुनेच आरोप उगाळत बसणारी विचारवंत मंडळी समाजात महत्त्वाची पदे भूषवीत आहेत, हे दिसत असतानासुद्धा रा. ना. चव्हाण त्याच मार्गाने जाण्याचा मोह टाळताना दिसतात. उलट साम्यवाद्यांसह सर्व डाव्यांना असे आवाहन करतात, की ही संघटना का वाढत चालली आहे, याचा अभ्यास करा!

धर्मातरासारख्या प्रश्नावर या पुस्तकात रा.नां.चे विचार ठिकठिकाणी विखुरले आहेत. एकीकडे सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारे, दुसरीकडे मुसलमान आणि ख्रिस्ती समाजांचा मूर्तिपूजेला असणारा विरोध हिंदू समाजाशी त्यांचे सख्य होण्याच्या आड येत असतो, या वास्तवाची दखल घेतानाही दिसतात. मीनाक्षीपूरमच्या धर्मातरामुळे संपूर्ण देशात जे विचारमंथन सुरू झाले, त्याची दखल घेणारे रा. ना. चव्हाण मुसलमान व ख्रिस्ती धर्मप्रचारकांना परदेशातून मिळणाऱ्या मदतीचा मुद्दा मांडून स्वस्थ बसत नाहीत, तर या संदर्भात आज ना उद्या कायदा करण्याचे पाऊल उचलावेच लागेल असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल जाते. ते जरी स्पष्टपणे म्हणत नसले, तरीही हिंदुत्ववादी संघटनांचे काही मुद्दे त्यांना पटत असल्याचेच त्यांच्या लेखनावरूनच सूचित होते. विश्व हिंदू परिषदेला मिळणाऱ्या वाढत्या अनुकूल प्रतिसादाचाही सकारात्मक विचार करायला ते तयार असल्याचे दिसते. ‘धर्मातर हा अतिरेकी विचार आहे. धर्मातर करणे म्हणजे या देशात राहून परकीय होणे होय’ असे रा.ना. म्हणतात, हे लक्षात घेण्यासारखे आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा सामुदायिक बदल अनुभवण्यासाठी धर्मातरे करणाऱ्यांचा कसा अपेक्षाभंग होतो, हे सोदाहरण सांगताना ते कोणतीही बाब हेतूत: लपवू इच्छित नाहीत. तेव्हा हिंदू समाजाचे सामर्थ्य वाढावे म्हणून जातिभेद आणि अस्पृश्यतेचे निर्मूलन झाले पाहिजे, हा त्यांचा आग्रह केवळ टीकेसाठी टीका करणाऱ्यांचा राहत नाही.

या दृष्टीने रा. स्व. संघाबद्दलची आपली मते बदलण्याइतकी आणि तो बदल जाहीरपणे मांडण्याइतकी सहिष्णुता रा. ना. चव्हाण यांनी कशी दाखवली, त्याचे उदाहरण मुद्दाम विचारात घेण्याजोगे आहे. ‘पेशवाई हेच आर.एस.एस.चे स्वत:चे उज्ज्वल ध्येय आहे! त्याने उभारलेला भगवा ध्वज म्हणजे सोवळेशाही स्थापन करणारे निशाण आहे’ असे स्पष्ट मत रा.नां.नी १९४५ साली ‘राष्ट्रवीर’मधील लेखात व्यक्त केले होते (पृ. १५५). परंतु १९८१ साली ‘महाराष्ट्र मित्र’मधून लिहिलेल्या चार लेखांकांमधून (पुस्तकात एकाच लेखाच्या स्वरूपात पृ. १७५ ते १९०) तेच रा.ना. असे मान्य करतात की, ‘आर.एस.एस. ही सर्व हिंदूंना एकत्र करणारी चळवळ आहे. ती एक अर्वाचीन संघटना आहे. सर्व विभक्तवादी लोकांना त्यांच्या धर्माची व देशाची जाणीव करून देऊन, त्यांचे राष्ट्रीयत्व त्यांना समजावून सांगण्यासाठी रा. स्व. संघाची गरज होती आणि आहे.’  हा वैचारिक दिलखुलासपणा या लेखसंग्रहात सर्वत्र भरून राहिला आहे, हे निश्चित.

असे विचारमंथनाला प्रवृत्त करणारे, प्रबोधन प्रक्रियेला चालना देणारे किमान दहा-बारा मुद्दे रा.नां.च्या या लेखसंग्रहात विखुरलेले आढळले. संघसमर्थकांनी ते अवश्य विचारात घ्यावेत. संघविरोधकांकडूनही अशाच स्वागतशील भूमिकेची अपेक्षा आहे; तथापि डॉ. अशोक चौसाळकर आणि प्रा. डॉ. प्रकाश पवार हे दोघे विचारवंत मात्र प्रस्तावनेत व ‘परामर्श’मध्ये रा. ना. चव्हाण यांच्या मतांच्या आधारे विस्तृत चिकित्सा करण्याऐवजी त्या निमित्ताने आपलेच पूर्वग्रह पुढे रेटण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांचा हा प्रयत्न प्रबोधनप्रक्रियेला पोषक ठरण्याची शक्यता कमीच!

‘हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन: एक प्रबोधनात्मक मंथन’ – रा. ना. चव्हाण,

संपादन : रमेश चव्हाण,

रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई,

पृष्ठे – ३१२, मूल्य – ४०० रुपये

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi article in loksatta lokrang by anand hardikar