|| डॉ. आशुतोष जावडेकर

कडक ऊन. आतापावेस्तो रेंगाळणारी थंडी आता गायबच झाल्यासारखी वाटते आहे. अरीन उठतो. आज धुळवड. धमाल करायची. खरं लहानपणी तो रंगपंचमीच खेळायचा, पण बघता बघता धुळवडीला सुट्टी असते म्हणून किंवा मुंबईत अमराठी मित्रमत्रिणी जास्त होते म्हणून असेल, पण क्रमश: तो मोठा झाला तसा धुळवडीलाच रंग खेळू लागला. पण जोश तोच. कम्प्लिट दंगा. जोरदार पाणी. फुगे फोडणं. आज पहिलं सकाळी कॉलेजमध्ये आणि मग थोडा वेळ चक्क तेजसदाच्या घरी. त्यांच्या सोसायटीत खाली जोरदार डीजे वगैरे लावून रंग खेळतात म्हणे! शर्ट आज काळजीपूर्वक निवडायला हवा. काल त्याची कॉलेज सोबतीण इरा म्हणाली तसा भिजल्यावर अरीनची हेअरी चेस्ट सेक्सी दिसेल असा शर्ट. व्हाइट अ‍ॅण्ड ब्लू डेनिम. त्यापेक्षा जगात सुख असूच शकत नाही! आणि आज इराला रंग लावून आख्खं ओलं केलं, की जवळ घेऊन गच्च हग करायचं आहेच. अस्मित म्हणतोय, भांग ट्राय करू; पण नको. पुढे तेजसदाच्या इथे जायचंय..

माही झोपेतून निवांत उठते आहे. काल फार पकवलं तिच्या बॉसने. ऑफिसला सुट्टी असली तरी होळी पार्टी वेस्टिनला आहे, तिथे सगळे जाणारेत. पण माहीला नाही जायचं. तिला कंटाळा आला आहे. तिला नाही वाटत, की रंगाने आयुष्यात नवी चमक येईल. खूप रुटीन झालंय सगळ्याचं आणि रंग तर खेळले आहेत तिने लहानपणी, कॉलेजच्या वयात. आता नको. बोर होतं. का खेळायचं? कोणासाठी? काही अर्थ नसतो सणांमध्ये.. का याच स्पेसिफिक सणाचा राग येतोय? काल स्वप्नात मग पाण्याची पिचकारी मारत, फुगे फोडत तिच्या नववीतल्या दोस्तामागे ती का धावत गेलेली? तो अजून आठवतोय? पहिला क्रश? आणि का? बोअिरग आहे हे सगळं. आणि तितक्यात ग्रुपवर तेजसचा मेसेज. तेजसकडे रंग खेळायचेत. आणि ग्रेट म्हणजे, तो स्वत: खेळणार नाहीच आहे असं त्याने लिहून टाकलंय..

रेळेकाका गॅलरीतून बघत आहेत खाली. जोरदार तयारी सुरू आहे. दहा वाजता सगळे खाली येतील सोसायटीतले. रेळेकाका जुन्या रंगपंचमीच्या आठवणी आठवू पाहतात, पण काहीच आठवत नाही. वय वाढलं की स्पष्ट खरं दिसायला हवं. पण सगळं पुसटच होत जातं की काय! हां, पण एकदम त्यांना त्यांची आई आठवते. रेळेकाका मनाने सात वर्षांचे झाले आहेत. आई मायेने रंग खेळायला जाण्याआधी तेल लावते आहे. बस्स. बाकी काही आठवत नाही. नेमकी आईच कशी आठवते? तिच्या त्यावेळच्या लुगडय़ाच्या रंगासह?..

‘‘आई, मी खाली खेळतोय.’’ खालून तेजसचा मुलगा ओरडून टेरेसमध्ये उभ्या असलेल्या त्याच्या आईला सांगतोय. ही पोरं कुणासाठी न थांबता खेळायला लागणार रंग. तेजस मात्र निवांत कडक काळी कॉफी घेऊन झोपेनंतर राहिलेला कालचा शीण घालवतोय. ‘‘आजही तुझे ते ‘विशी तिशी’ मित्र येणार आहेत का तेजस इथे?’’ – तेजसची बायको विचारते. ‘‘तूही बोलाव तुझ्या लोकांना रंग खेळायला यार. मला काय सारखं विचारतेस,’’ तेजस वैतागून म्हणतो. तेजसची बायको चमकून बघते. किती गुंतत चालला आहे तिचा नवरा या नव्या ग्रुपमध्ये. तिने तिच्या मित्राशी चॅट केले रात्री तास-तास तर याला चालेल? तितक्यात तेजस मागून येत तिला मिठी मारत हळू आवाजात म्हणतो, ‘‘सॉरी. उगाच ओरडलो.’’ पुरुषाला स्पर्शातूनच सगळं व्यक्त करता येतं का? प्रेम? राग? माफी मागणं? असो. आज सोसायटीतल्या मत्रिणींच्या ग्रुपसोबत तेजसच्या बायकोला कल्ला करायचा आहे. आणि ती तेच करणार आहे. तिला भेंडी, दुधी, दालचिनी, नोकरीतल्या कटकटी, तेजस आणि तिचा मुलगा हे कुणीही काही काळ नको आहेत. बस्स- रंग, मागे गाणी, ती आणि नाचणं!

‘‘तू का साल्या खेळणार नाहीयेस म्हणे?’’ अरीन मागून येऊन बागेतल्या बाकडय़ावर निवांत बसलेल्या तेजसला विचारतोय. गोदावरीच्या काठावर रंग खेळताना तेजसचं मन कधी रमलं नाही. इतकी समोर सुंदर नदी वाहत असे, पण वाटे ही नदी अडकवते आहे आपल्याला या गावात. दूर जायला हवं. कॉलेजात तर रंग खेळणं नकोच वाटे. पुन्हा कपडे ते धूत बसा. खेरीज त्या शहरी पोरींची नकळत भीतीच वाटे. रंग लावायला डायरेक्ट समोर आल्या तर काय घ्या!

पण तितक्यात मागून ठणठण आवाज करत डीजे सुरू झालाय. ‘रंग बरसे भिगे चुनरिया’ गाणं सुरू होतं तसे सगळे ‘होरी है’ असं ओरडत रंग उधळत आहेत. पाण्याचा एक फुगा अरीनवर येऊन फुटतोय. तेजसच्या पोराने नेम धरून तो टाकला आहे! आणि मग तो पळ काढतोय. अरीन हसतो आणि एकदम कोरडा रंग तेजसच्या चेहऱ्याला लावून मोकळा होतो. ‘‘अबे साले’’ असं तेजस म्हणेपर्यंत मागून आलेल्या रेळेकाकांनी त्याच्या डोक्यावर रंग टाकलाय. ‘‘बरं झालं अरीन, तू याच्यावर रंग टाकलास, फार भाव खातो हा प्रत्येक वर्षी,’’ ते हसत म्हणत आहेत. तेजस एक क्षण बघतो दोघांकडे आणि मग काही कळायच्या आत तो शेजारच्या ताटातला रंग घेऊन अरीनचा चेहरा माखून टाकतोय. तोवर मागून माही येते आहे. अरीन तिला रंग लावण्याआधी विचारतोय, ‘‘लावू ना?’’ ती हसून होकार देते आहे. कितीही बोअर झालं तरी आता इथवर आल्यावर मागे सरण्यात काय पॉइंट आहे!

मागे डीजे पेटलाय. खास सीनियर सिटिझनच्या डिमांडसाठी त्याने ‘बागबान’ सिनेमातलं होळीचं गाणं लावलंय. सोसायटीतले कुणी सीनियर त्यांच्या बायकोसोबत अमिताभ-हेमामालिनीसारखे नाचत आहेत. तोवर माही सगळ्यांना ‘हाय- हॅलो’ करते आहे. तेजसच्या बायकोला शोधून ती भेटून येते. दोघी एकमेकांच्या कानातलं चांगलं असण्याची ग्वाही देतात. तेजस तोवर अरीनने ओतलेल्या बादलीने गच्च ओला झालाय. माही त्याच्याकडे हसत येते आणि त्याच्या चेहऱ्याला हलके लाल रंग लावते. तिचा स्पर्श धरून ठेवावा असा आहे.. पण तितक्यात मागून दीपिका पदुकोनचं ‘बलम पिचकारी’ हे गाणं सुरू होतंय आणि सगळे जोरदार नाचू लागत आहेत. माही तेजस आणि अरीनला नाचायला बोलवते, पण ते येत नाहीत. मग ती समोरच्या अनोळखी कंपूमधे बिनधास्त शिरते आणि नाचू लागते. तिथे तर रेनडान्स सुरू असतो. सगळे गच्च भिजले आहेत. माहीचा पांढरा टॉप अंगाला चिकटलाय. तो रंगाने माखून गेलाय. तेजसच्या खालीच राहणारा देखणा प्रशांत तोवर तिच्याजवळ येतो आहे, ओळख करून घेतो आणि मग ते एकत्र नाचत आहेत. तो कानात काहीतरी पुटपुटतो आहे आणि माही मग हसते आहे. तिला आता बोअर होत नाहीये. टोटल अनोळखी जगात ती रमली आहे.

तेजस लांबून ते बघतोय आणि त्या प्रशांतला उद्देशून शिवी पुटपुटतोय, तोवर तेजसची बायको मागून येते आहे आणि नाचतानाच त्याला एक ठुमका देते आहे. अरीन सगळं ओळखून मनोमन खो- खो हसतो आहे. कसे असतात हे येडे चाळिशीचे पुरुष यार! पण तेजस एकदम उठून नाचायला सरसावतो. माहीला खुणावून तिच्यासोबत बेदम नाचतो. गच्च ओला झाल्यावर तो वर्तुळाबाहेर येतो. अंगातला शर्ट सरळ काढून पिळतो आणि बनियनवर तसाच उभा राहतो. माही अजून नाचत असते. अरीनच्या कानात तेजस पुटपुटतो, ‘‘फक मॅन, माही काय हॉट दिसते आहे आत्ता.’’ अरीन डोळा मारत उत्तरतो, ‘‘ते आहेच. पण दा, तू चार्ज झाला आहेस आत्ता!’’ रेळेकाका ते संवाद ऐकून समोरून त्यांच्या दिशेने चालत येणाऱ्या माहीकडे बघत म्हणतात, ‘‘स्तनेषु गौरेषु विलासिनीभि:। आलिप्यते चन्दनमङ्ग्नाभि:..’’ कालिदासाच्या ‘ऋतुसंहारा’तल्या ओळी! विलासिनी स्त्रियांचे स्तनांवरचे चंदनाचे लेप.. मदनोत्सवाचा वसंतातील उन्मादक गंध.. एक आतुर, कामातुर चाहूल.. मागे डीजे गाणं लावतोय, ‘हलके हलके रंग छलके, जाने अब क्या होने को है!’

मग तेजस मनोमन म्हणतोय, ‘‘खरंच. बेधडक प्रसन्नतेचा हा रंगीत क्षण खरा. राहणार असतील ते रंग-लेप राहतील मना-तनावर. बाकी पुढचं पुढे यार!’’