|| अतुल पेठे
‘आटपाट देशातल्या गोष्टी’ ही संग्राम गायकवाड लिखित नवी कादंबरी मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. मराठी वाचनविश्वात अपरिचित विषयाला या कादंबरीने हात घातला आहे. लेखक संग्राम गायकवाड हे आयकर आयुक्त आहेत. अनेक वर्षांचा त्यांचा या खात्यातील अनुभव आहे. आयकर विभागाचे जग त्यांना अनेक स्तरांवर दिसलेले आहे. अत्यंत व्यामिश्र घटनांचे आणि भावनांचे कल्लोळ त्यांना काम करताना अनुभवास आलेले आहेत. या सगळ्याचा परिपाक म्हणजे ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ ही कादंबरी होय!
समाजाचे आर्थिक स्तर हे नैतिक अस्तरांशी कसे जोडलेले असतात, याचे विचार करायला लावणारे दर्शन इथे घडते. कादंबरीचा नायक निवृत्ती हा विलक्षण अंतर्मुख आहे. वर्षांनुवर्षे अस्तित्वात असलेल्या (आणि बसलेल्या) सरकारी यंत्रणेत आत घुसून तिला दिशा देण्याचा प्रयत्न त्याच्या परीने तो करू पाहतो आहे. ओळखीपाळखीचे अमर्याद जाळे पसरलेल्या आणि एकमेकांचे स्वार्थ सांभाळणाऱ्या या लबाड समाजव्यवस्थेचे रोखठोक ‘सीसीटीव्ही कॅमेरा’ चित्रण निवृत्ती सतत घडवत राहतो आणि वाचकासमोर प्रश्न उभे करत जातो. व्यक्ती आणि समष्टीच्या ताणतणावांतून आजच्या समकालीन जगाचे नैतिक-अनैतिक कथन त्यातून उभे ठाकते. त्यामुळेच नेहमीच्या दृष्टिकोनापेक्षा अधिक प्रगल्भ वाटेने ही कादंबरी जाते. आयकर विभाग म्हणजे धाड टाकणे- इतपतच मर्यादित माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली असते. मात्र, आपल्या या माहितीच्या चौकटी मोडून ही कादंबरी खोलवर वाचकाला अंतर्मुख करते.
धाड टाकायची, वसुली करायची आणि भ्रष्टाचाराची छाननी करायची ही सारी व्यवस्था कादंबरीचा नायक निवृत्तीच्या मते आदिम आहे. त्याच्या मते, ‘एखादं जुनं, नामशेष होत असलेलं हिंस्र जनावर सांभाळावं तशी सांभाळून ठेवली आहे आपण आपल्या सरकारी कार्यालयांमध्ये साहेबांची जुनी कार्यसंस्कृती, मायबाप सरकार असल्याची’! या कार्यपद्धतीतून तयार होणारे प्रश्न कमालीचे गुंतागुंतीचे असतात आणि अशा प्रश्नांना एकच उत्तर कधीच नसते, हे निवृत्तीचे मत! न्याय्य आणि अन्याय्य या दोन महत्त्वाच्या विषयांना इथे सतत स्पर्श होत राहतो. न्यायदान, मूल्यव्यवस्था, कायद्याचे राज्य आणि इको-सिस्टीम हे निवृत्तीच्या आस्थेचे विषय आहेत. ‘आधी एकतर सगळं वातावरणच चळ भरावा अशा गोष्टींनी भारून टाकायचे, आणि मग कोणी विचलित झाला की त्याच्यावर कुऱ्हाड चालवायची’ ही स्थिती निवृत्तीला त्रासदायक वाटते. अनेकरेषीय कोनांतून भ्रष्ट आचाराचे वर्तन, समर्थन आणि दर्शन होत असताना एकरेषीय व्यवस्था निवृत्तीला जोखडात अडकल्यासारखी वाटते. स्वत:चे दाते एकमेकांत अडकलेले एक अवाढव्य यंत्र गाळात रुतून राहिले आहे अशी त्याची भावना होते. त्यातून विलक्षण मानसिक घुसमट तयार होते. अशा अवस्थेत निवृत्तीला वेगळेच ध्वनी मनात उमटू लागतात. कागदावरचे नियम काहीही असोत, पण प्रत्यक्ष वापरातल्या पद्धती मात्र भाडोत्री, सुटय़ा आणि व्यक्तिसापेक्ष कशा असतात याचा अनुभव तो मांडतो. यात जुनाट राज्यव्यवस्था आणि रुतलेली अर्थव्यवस्था यांच्या तिठय़ावर सारा समाज ताटकळत उभा असलेला दिसतो.
‘या प्रांतात काहीतरी सडका वास भरून राहिलाय’ अशी अस्वस्थ जाणीव कादंबरीत आहे. या पाश्र्वभूमीवर नैतिकतेने जगता येते का, हा सार्वकालिक सवाल ही कादंबरी उपस्थित करते. भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यांमधील या भूमीत रुतलेल्या मुळांतील अस्सल असण्याचे ते आव्हान आणि आवाहन इथे दृग्गोचर होते.
ही कादंबरी मुख्यत्वे तीन स्तरांवरची आहे. पहिला स्तर अर्थातच आयकर विभाग आहे. दुसरा- निवृत्तीचा कुटुंब हा आहे, तर तिसरा- निवृत्तीच्या मल्हार आणि माधव या मित्रांचा आहे. कादंबरीमध्ये हे तिन्ही स्तर एकमेकांना छेदत जातात. आयकर विभागातील स्तरामध्ये शहरातील श्रीमंत आणि नामवंत व्यक्तींवरील धाडीचे प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये माणसांचे विविध नमुने दिसतात. मग्रूर आणि क्रूर चेहरे प्रसंगी हतबल आणि केविलवाणे होताना दिसतात. लपवलेली संपत्ती जशी बाहेर येते तशीच अनैतिकताही फसफसून वर येते. समाजातल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे लागेबांधे त्यातून प्रकट होतात. भ्रष्टाचार आणि समाज हा व्यापक पट वाचकासमोर त्यातून उभा राहतो. वानगीदाखल पुढील परिच्छेद वाचा :
‘मोहरेनं या वंगणाची महती पुरेपूर ओळखली होती. कवी मंडळी जसं टोपणनाव घेतात, तशी पद्धत उद्योगपतींमध्ये असती तर श्रीयुत विजय मोहरे यांनी त्यांचे टोपणनाव नक्कीच ‘परमवंगणक’ असं काही ठेवलं असतं. वंगण घालून हवं ते करून घेण्यात परमतज्ज्ञ असा तो परमवंगणक. वंगणाचे समस्त गुणधर्म श्रीयुत विजय मोहरेना नेमके माहीत होते. त्यांना माहीत होतं, वंगणाचा चिकट थर हा सगळ्या देशव्यापी व्यवस्थांच्या यंत्रांच्या आपल्या छोटय़ा छोटय़ा चक्रांच्या दाताऱ्यांवर कीड पसरावी तसा पसरून राहिलेला आहे. पिवळ्याजर्द रंगाचा त्याचा द्रवरूप सुळसुळीत प्रवाह यंत्रांच्या टाइप दैत्याकारी खोल्या भरून ओसंडत असतो. अत्यंत लवचीक. कुठेही शिरू शकतो. फिरवण्यात वाक्बगार. चक्र त्याच्याशिवाय फिरत नाहीत. जणू गुलामच याची. चक्रांच्या आणि यंत्रांच्या मस्तिष्कावर जणू काही ताबा आहे त्याचा. अशा या सर्वगुणी वंगणाचे अक्षय साठे मोहरे बाळगून होते.’
कौटुंबिक स्तरावर निवृत्ती हा गावाकडचा आहे. गावपातळीवरील जातव्यवस्था, गावकी, भावकी आणि आर्थिक गुंतागुंत त्याला जाणवत आहे. अत्यंत अडाणीपणाने व रासवटपणाने तिथेही भरलेली भ्रष्टाचाराची आणि अनैतिकतेची विविध रूपे त्याला जाणवत राहतात. त्यातून एक विलक्षण तुटलेपण त्याच्या अंतरी घोंगावत राहते. अशीच अवस्था जवळच्या मित्रांबाबत होत राहते. यातून दिसत नसलेल्या ध्रुव ताऱ्याचा निवृत्ती वेध घेत राहतो.
या कादंबरीचा विशेष म्हणजे लेखकाला आपला अनुभव सांगण्याची गरज उत्कटपणे वाटते आहे. तो उपरा नाही. आणि तो प्रभावमुक्तही आहे. हे सारे कथन सहज आहे. त्यात अभिनिवेश नाही. याचबरोबर कादंबरीतील नावेही वेगळी आहेत; जसे की- आटपाट देश, धेनुकाकट, परमवंगणक, इत्यादी.
व्यक्ती आणि समाज यांचा उभा-आडवा छेद घेत ही कादंबरी नीतिमत्तेचा वेध घेण्याचा प्रयत्न करते. अशी दखलपात्र कादंबरी मराठीत येणे याला आजच्या काळात वेगळेच महत्त्व आहे.
‘आटपाट देशातल्या गोष्टी’ – संग्राम गायकवाड,
मनोविकास प्रकाशन, पृष्ठे – २६७,
मूल्य – ३५० रुपये