|| बाळकृष्ण कवठेकर

नरेन्द्र चपळगावकर लिखित ‘आठवणीतले दिवस’ हे जीवनाच्या विविध क्षेत्रांत उत्साहाने आणि सामाजिक भान ठेवून वावरलेल्या कृतिशील व्यक्तीचे वाचनीय आत्मकथन आहे. चपळगावकर सर्वज्ञात आहेत ते महाराष्ट्रीय समाजजीवनातील विविध घटना-प्रसंग व नामवंत व्यक्ती यांच्याविषयी अभ्यासपूर्ण लेखन करणारे लेखक आणि निष्णात विधिज्ञ व नि:स्पृह (निवृत्त) न्यायमूर्ती म्हणून! ‘आठवणीतले दिवस’ वाचल्यानंतर त्यांनी किती विविध क्षेत्रांत उत्साहाने, विवेकीपणाने आणि सामाजिक भान ठेवून संचार केला आहे, ते उमगते. बहुपरिमाणात्मक जगण्याचे हे कथन अलीकडच्या काळातील एक उल्लेखनीय आत्मचरित्र म्हणून तर नोंदवले जाईलच; परंतु जुन्या हैदराबाद संस्थानातील राजकीय, सामाजिक, कौटुंबिक जीवनाविषयीचा अधिकृत दस्तऐवज म्हणूनही ओळखले जाईल.

चपळगावकर हे मराठवाडय़ातील ‘बीड’ या जिल्ह्य़ाच्या गावचे. या गावाचे १९३०-४० या काळातील स्वरूप व तिथल्या समाजजीवनाचे चपळगावकरांनी अत्यंत नेटकेपणाने केलेले चित्रण हे तत्कालीन मराठवाडय़ातील कोणत्याही तालुक्याच्या वा जिल्ह्य़ाच्या गावचे म्हणता येईल इतके प्रातिनिधिक आणि प्रत्ययकारी झाले आहे. ‘प्रत्ययकारी चित्रमयता’ हे या आत्मकथनाचे वर्णनवैशिष्टय़ म्हणता येईल.

चपळगावकरांचे वडील व्यवसायाने वकील; पण ते हैदराबादच्या मुक्तिसंग्रामातील एक प्रमुख नेतेही होते. देशभक्तीने प्रेरित होऊन नि:स्वार्थीपणे राजकारण करणाऱ्या जुन्या पिढीचे ते एक प्रतिनिधी. अशा नेत्यांची कुटुंबे कशाप्रकारचे जीवन जगत, हे या पुस्तकातील चपळगावकरांच्या कुटुंबचित्रणातून ध्यानात येईल. त्या काळातील अशा नेत्यांचे राजकारण हे खऱ्या अर्थाने नि:स्वार्थी देशकारण असल्यामुळे चपळगावकरांचे बालपण हे काटकसरीचे मध्यमवर्गीय जगणे म्हणता येईल असेच गेले. त्याचे चपळगावकरांनी केलेले वर्णनही मनोज्ञ झाले आहे. बेताचे उत्पन्न असणाऱ्या मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबाचे जगणेही कसे आनंदी आणि संस्मरणीय असे, याचे दर्शन चपळगावकरांनी या पुस्तकातील ‘वाडय़ातील जीवन’ या प्रकरणात घडवले आहे. याच प्रकरणात त्यांनी निझामी राजवटीतील समाजजीवन दहशतीने दबलेले कसे असे, याचेही चित्रण केले आहे. १९४८ च्या सप्टेंबरमध्ये भारतीय लष्कराने हैदराबादेत केलेल्या कारवाईच्या प्रसंगाचे आणि त्यानंतर सर्वानाच झालेल्या ‘मुक्ती’च्या आनंदाचेही वाचनीय वर्णन त्यांनी केले आहे.

मुक्ततेनंतर बदललेल्या वातावरणाचे वर्णन करताना त्यांनी, शाळा सुरू होताना सक्तीने म्हणाव्या लागणाऱ्या निझामस्तुतीपर प्रार्थनेतही लगेचच कसा बदल झाला, हे सांगितले आहे. तोपर्यंत दबून वागणारी हिंदू मुले शाळेच्या सर्वच कार्यक्रमांत मोकळेपणाने भाग घेऊ लागली, हे सांगून प्रारंभी भीतीने दबलेली मुसलमान मुलेही अल्पावधीतच मोकळेपणाने शाळेत येऊ लागल्याचेही ते नमूद करतात.

शाळेच्या दिवसांतच चपळगावकरांना स्वतंत्र भारतातील सुरुवातीच्या काळातील राजकारण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असणाऱ्या त्यांच्या वडिलांमुळे पाहायला/ अनुभवायला मिळाले. वडिलांनीही त्यांच्याबरोबर काँग्रेस कार्यालयात येणाऱ्या या मुलाला तेथे व घरीही होणाऱ्या चर्चा ऐकायला कधी विरोध केला नाही. त्यामुळे याच दिवसांत केवळ शाळेच्या अभ्यासात न अडकता इतर उपक्रमांतच ते अधिक सहभागी होऊ लागले. वार्तापत्र लिहिणे, काँग्रेसच्या सभांची कण्र्यातून गावभर जाहिरात करणे, काँग्रेस सेवादल चालवणे अशा कामांनाच ते अधिक वेळ देऊ लागले. अवांतर वाचनाची गोडीही त्यांना लागली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उत्साहीपणाची आणि समाजमनस्कतेची बीजे शालेय जीवनातच त्यांच्यात रुजली. १९५२ पर्यंत त्यांचे वडील काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय होते. वडिलांची ही सक्रियता चपळगावकरांच्या मनात रुजलेल्या या बीजांना अंकुरण्यास उत्तेजन देणारी ठरली.

मॅट्रिकनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते अमरावतीला गेले. तिथे डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या शिवाजी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. त्यांचे खोलीमित्र बहुजन समाजातीलच होते. १९५२ सालच्या वडिलांच्या हैदराबाद विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आणि अमरावतीच्या दोन वर्षांच्या शिक्षणकाळात ‘जात’ हा घटक आता समाजजीवनात सर्वत्र प्रभावी ठरू लागल्याची जाणीव चपळगावकरांना झाली. ही त्यांनी केलेली नोंद समाजजीवनातील स्थित्यंतराची दखल घेण्याची क्षमता आणि वृत्तिविशेष प्रकट करणारी आहे.

अमरावतीला इंटपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर चपळगावकरांनी औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. डॉ. आंबेडकरांच्या या महाविद्यालयात एकापेक्षा एक ज्ञानसंपन्न व गुणसंपन्न प्राध्यापक होते. प्रा. म. भि. चिटणीस हे बाबासाहेबांचे सहकारी तेथे प्राचार्य होते. ते स्वत: विद्वान तर होतेच, पण त्यांची सामाजिक जाणीव प्रखर होती आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखण्याची क्षमता व दृष्टी तीक्ष्ण होती. ‘मिलिंद’चे ग्रंथालय ग्रंथसंपन्न होते. मराठीचा डॉ. पिंगे यांचा तास चुकवून चपळगावकर या समृद्ध ग्रंथालयात वाचन करत बसतात, याची चिटणिसांनी नोंद घेतली होती. म्हणूनच डॉ. पिंगे यांनी त्यांच्याकडे चपळगावकरांची तक्रार केली तरी ते चिडले नाहीत; उलट हजेरी पुस्तिकेतील त्यांच्या अनुपस्थितीची नोंद खोडून चिटणिसांनी तिथे उपस्थितीची नोंद केली. ‘मिलिंद’मध्येच त्यांना वक्तृत्व, वादविवाद स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली.

अ‍ॅड. नावंदर, अनंतराव भालेराव, लड्डा या मंडळींचा सहवास त्यांना लाभला. मूळचाच समाजवादाकडे असलेला त्यांचा कल अधिकच दृढ झाला. पुढे चालून एम.ए. करत असताना एस. एम. जोशी, जॉर्ज फर्नाडिस या दिग्गज नेत्यांच्या ते औरंगाबादेत सभेच्या निमित्ताने आल्यावर चपळगावकरांच्या खोलीवरच निवासाची व्यवस्था केली जाऊ लागली. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील प्रभावी हत्यार ठरलेल्या ‘मराठवाडा’ या पुढे चालून दैनिक झालेल्या नियतकालिकाशी आणि त्याचे संपादक असणाऱ्या अनंतराव भालेराव यांच्याशी त्यांचे जन्मभराचे स्नेहसंबंध निर्माण झाले.

बी. ए.च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे चपळगावकरांना फेरपरीक्षा द्यावी लागली. ती उत्तीर्ण झाल्यावरही पुढील शिक्षणासाठी त्यांना काही काळ थांबावे लागणार होते. रिकामे बसून काय करायचे म्हणून (अर्थप्राप्तीसाठी नव्हे) बीडच्या ज्या शाळेत ते शिकले होते तिथेच शिक्षक म्हणून काम करू लागले. या कामातही ते आवडीने व उत्साहाने रमले. विविध जीवनक्षेत्रांचे अनुभव घेण्याचा उत्साह आणि तिथेही आवडीने व चोखपणे काम करणे हे चपळगावकरांचे स्वभावविशेष त्यांच्या अशा कृतीतून प्रकट होत असत.

पुढील शिक्षणासाठी थांबावे लागण्याचा कालावधी संपल्यानंतर शिक्षकीचा राजीनामा देऊन ते औरंगाबादला आले आणि त्यांनी एम.ए. मराठीला प्रवेश घेतला. एलएल.बी.लाही त्यांनी प्रवेश घेतला. लॉ कॉलेजमध्ये (पुढे परभणीला वकील म्हणून नावारूपाला आलेल्या) वसंत पाटील या संगीतप्रेमी वर्गमित्राशी त्यांची मैत्री झाली. त्यांच्या जाणत्या संगीतप्रेमामुळे चपळगावकरही संगीत श्रवणाकडे वळले. उत्तमोत्तम गायक त्यांना ऐकायला मिळाले. एलएल.बी.ला ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

एम.ए.ला प्रा. वा. ल. कुळकर्णी या श्रेष्ठ समीक्षकाच्या अध्यापनाने ते प्रभावित झाले. त्यांचे मूळचे साहित्यप्रेम वालंमुळे सुसंस्कारित झाले. त्यांना वालंकडून वाङ्मयीन दृष्टी मिळाली. एम.ए.ला ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. याच काळात चपळगावकर मराठी साहित्य संमेलनांना गेले. मिरज, मालवण, सांगली, औरंगाबाद, हैदराबाद येथील साहित्य संमेलने त्यांनी अनुभवली. याच काळात आणखी एका क्षेत्राकडे ते उत्साहीपणे वळले. प्रारंभी ‘सकाळ’, नंतर ‘लोकसत्ता’ व ‘इंडियन एक्सप्रेस’ या दैनिकांचे वार्ताहर म्हणून ते काम करू लागले.

दोन्ही परीक्षांत प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर आता वकिली की प्राध्यापैकी, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. त्यांच्या वाङ्मयप्रेमामुळे ते प्राध्यापैकीकडे वळले. लातूरला नव्यानेच सुरू झालेल्या दयानंद महाविद्यालयात त्यांनी वर्षभर प्राध्यापक म्हणून काम केले. इथेच त्यांनी समाजवादी सेवादलाचे काम केले. बीडला राजकारणातून पूर्णपणे निवृत्त होऊन केवळ वकिलीवर लक्ष केंद्रित केलेल्या त्यांच्या वडिलांनी त्या काळात एक निष्णात आणि प्रामाणिक वकील म्हणून लौकिक संपादन केला होता. त्यांच्याकडे कामही खूप मोठय़ा प्रमाणात येत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच चपळगावकरांनी बीडला वकिली सुरू केली. अल्पावधीतच त्यांचाही जम बसला. त्यांच्याकडेही भरपूर काम येऊ लागले. निष्णात, नि:स्पृह वकील म्हणून त्यांचे नाव झाले. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या कार्याचे काही अनुभवही त्यांनी नोंदवले आहेत. त्यांच्या बीडमधील वकिलीतील काही हृदयस्पर्शी अनुभवही त्यांनी नोंदवले आहेत. एका डॉक्टरांच्या कारच्या अपघातात एक पाय गमवावा लागलेल्या, कुबडय़ांच्या आधारे उभ्या राहिलेल्या मुलीकडे पाहून तिच्या उलट तपासणीत त्यांचे मन कसे लागू शकले नाही, तो अनुभव उल्लेखनीय आहे. चपळगावकरांनी वकिली कौशल्याने डॉक्टरांना वाचवले खरे, पण त्या कुबडय़ाच्या आधारे एका पायावरच उभे राहून तिने साक्ष दिली ते पाहून त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. बरेच दिवस ते दृश्य त्यांच्या मनातून गेले नाही. कायद्याच्या भावनारहित क्षेत्रात काम करूनही चपळगावकरांची सहृदयता कशी हरवली नव्हती, याचे दर्शन घडवणारा हा प्रसंग आहे.

याच काळात चपळगावकरांनी एक सार्वजनिक वाचनालय काही मित्रांच्या सहकार्याने सुरू केले. तेच बीडचे आजचे ‘वाडिया ग्रंथालय’ या नावाने नावारूपाला आलेले ग्रंथालय होय. याच काळात बीड नगरपालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून गेले. स्वार्थरहित राजकारणाचे घरातूनच संस्कार झालेल्या चपळगावकरांना नगरपालिकेतील स्वार्थसाधू राजकारण रुचले नाही.

१७ वर्षे बीडला यशस्वीपणे वकिली केल्यानंतर मुंबईला जाऊन उच्च न्यायालयात वकिली करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या वडिलांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला. ते मुंबईला आले. हळूहळू त्यांच्याकडे चांगल्यापैकी कामेही येऊ लागली. जम बसत असतानाच औरंगाबादला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि मग स्वाभाविकपणे चपळगावकरही औरंगाबादला आले.

चपळगावकरांना औरंगाबाद नवीन नव्हतेच आणि चपळगावकरही औरंगाबादकरांना. त्यामुळेच तिथे त्यांना अल्पावधीतच निष्णात वकील म्हणून ओळखले जाऊ लागले. वकिलीतल्या यशाबरोबरच औरंगाबादच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनातही त्यांनी महत्त्वाचे स्थान मिळवले. ‘दै. मराठवाडा’, ‘मराठवाडा साहित्य परिषद’ यांच्याशी त्यांचे नाते अधिकच दृढ झाले. अनंत भालेराव, भगवंत देशमुख या ज्येष्ठ मंडळींशी अगोदरपासूनच असणारा त्यांचा स्नेहही अधिकच घनिष्ट झाला. त्यांच्या साहित्यनिर्मितीला नवा बहर येऊ लागला. निष्णात अशा या वकिलाला शासनाने उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होण्याची विनंती केली. ती स्वीकारून ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. नि:स्पृह न्यायमूर्ती म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ते सन्मानाने निवृत्त झाले. औरंगाबादेतील वकिलीच्या आणि न्यायमूर्तिपदाच्या काळातील काही महत्त्वाच्या खटल्यांची नोंदही त्यांनी केली आहे. भगवंतराव, अनंतराव, सुधीर रसाळ इत्यादींची व्यक्तिचित्रे रेखाटून त्यांनी हे कथन रोचक केले आहे. चपळगावकरांच्या सुबोध, प्रवाही, अनंलकृत, पण अर्थवाही आणि रोचक भाषाशैलीमुळे त्यांचे हे ‘आठवणीतले दिवस’ अत्यंत वाचनीय झाले आहेत.

  • ‘आठवणीतले दिवस’- नरेन्द्र चपळगावकर,
  • मौज प्रकाशन गृह, मुंबई,
  • पृष्ठे – ३३४, मूल्य – ५०० रुपये