|| दीपा भंडारे
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून येथील संतपरंपरेनं धर्माचा मूळ गाभा- माणुसकी आणि भूतदया- प्रत्यक्ष आचरणात आणून ती समाजात रुजवायचा अखंड प्रयत्न केला. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायातील ‘ज्ञानोबा ते निळोबा’ या संतपरंपरेत समाजातील अठरापगड जातींतील संतांची मांदियाळी उदयाला आली. या सर्व संतांनी सत्य, अहिंसा, समता, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव आणि विश्वबंधुत्व या नीतीमूल्यांना विठ्ठलभक्तीची जोड देऊन समाज घडवण्याचं अमूल्य कार्य केलं.
‘मराठी मन’ खऱ्या अर्थाने घडवणाऱ्या या वारकरी संतांच्या कार्यकर्तृत्वाचा सर्वागीण परिचय करून देणारा ‘संतदर्शन चरित्रग्रंथ संच’ हा १३ पुस्तकांचा संच नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वारकरी संप्रदायातील सुमारे ३२ संतांच्या चरित्र आणि काव्यसंपदेचा चिकित्सक दृष्टिकोनातून या १३ पुस्तकांत आढावा घेतला आहे. या चरित्रमालेचे संपादन संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे व अभय टिळक यांनी केलं आहे.
वारकरी सांप्रदायातील संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ या चार संतांच्या लोकोत्तर कार्याचा परिचय बहुधा सगळ्यांना असतो. पण त्यांच्याच जोडीने संत चोखामेळा, सोयराबाई, कर्ममेळा, राका कुंभार, सेना न्हावी, नरहरि सोनार, शेख महंमद, बहिणाबाई, जनाबाई आदी अल्पज्ञात संतांच्या चरित्र आणि कवित्वाचाही सर्वंकष परिचय ही चरित्रमाला घडवते. परंपरेचा योग्य मान राखत या संतबोधाची आजच्या आधुनिक जीवनाशी सुसंवादी वैचारिक सांगड घालणं आणि पुरेशा तर्कनिष्ठपणे विश्लेषण करणं, संत विचारांमधील शाश्वत जीवनमूल्यांचं मोल नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं, असा या ग्रंथप्रकल्पामागील हेतू पूर्णपणे यशस्वी झाला आहे.
संतांनी जीवनात केलेला संघर्ष, समाज परिवर्तनासाठी लावलेला हातभार, प्रस्थापित चौकटीला उभं केलेलं आव्हान आणि हे करताना समाज व्यवस्थेची घडी जातीय आणि धार्मिक विद्वेषाने विस्कळीत होऊ नये यासाठी केलेले प्रयत्न या सर्वाचं समन्वयात्मक दर्शन घडवणारी ही १३ पुस्तकांची ग्रंथमाला आहे.
या ग्रंथसंचातील पहिलं पुस्तक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांवर आधारित ‘चार भावंडे’ हे डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिले आहे. यात या चार अलौकिक संतांच्या कार्यकर्तृत्वाचं विस्तृत आणि मूलगामी चिंतन डॉ. मोरे यांनी मांडलं आहे. ज्ञानदेवांच्या काळातील राजकीय, सामाजिक परिस्थिती, धर्मकारण, प्रथा परंपरा, लोकव्यवहार, अन्य उपासना, संप्रदाय, त्यांच्यातील अनुबंध, वादविवाद, आक्षेप यांचा चिकित्सक आढावा डॉ. मोरेंनी घेतला आहेच; शिवाय त्यांच्या जीवन चरित्रांतील प्रत्येक घटनेचं विश्लेषण करताना अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचा संदर्भ देत अनेक वादग्रस्त मुद्दय़ांचे तर्कशुद्ध खंडनही केलं आहे. त्यांचे हे सारभूत लेखन वाचकांचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करणारा आहे.
संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित एकूण तीन पुस्तकं या ग्रंथमालेत समाविष्ट करण्यात आली आहेत. यात अभय टिळक यांनी ‘भाग्य आम्ही तुका देखियला’, रूपाली शिंदे यांनी तुकाराम महाराजांच्या प्रमुख शिष्या संत बहिणाबाई यांच्या चरित्रावर आधारित ‘बहिणी फडकती ध्वजा’ आणि शोभा घोलप यांनी ‘तुकाराम महाराजांचा शिष्यपरिवार’ अशी विस्तृत चरित्रे लिहिली आहेत. तुकाराम महाराजांच्या कार्याविषयी समकालीन लेखनसंदर्भ अगदीच त्रोटक असल्याने तुकोबांची अभंग गाथा हीच प्रमाण मानून या अभंगांद्वारेच त्यांचे चरित्र कार्य जाणून घ्यायचा प्रयत्न अभय टिळक यांनी केला आहे. तुकोबांना प्रत्यक्ष जीवनात करावा लागलेला लौकिक संघर्ष, त्यांची आध्यात्मिक जडणघडण, साधक अवस्थेतील तळमळ, सिद्धावस्थेतील तृप्ती यांचं अत्यंत चिकित्सक पण प्रत्ययकारी चित्रण टिळक यांनी केलं आहे.
वारकरी संप्रदायात संत बहिणाबाईंचं कार्य तसं दुर्लक्षितच राहिलं. मात्र, रूपाली शिंदे या तरुण लेखिकेनं ‘बहिणी फडकती ध्वजा’ या पुस्तकात त्यांच्याविषयी सविस्तर लिहिलं आहे. तत्कालीन सामाजिक बंधनं आणि रूढींना टक्कर देत परमार्थ साधताना स्त्री म्हणून करावा लागलेला संघर्ष बहिणाबाईंच्या आत्मचरित्रपर अभंगांत दिसून येतो. त्याचा अभ्यासू आढावा यात आहे.
तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष गुरू म्हणून कोणालाच उपदेश केला नसला, तरी त्यांना गुरू मानणाऱ्या संत बहिणाबाई व संत निळोबाराय वगळता इतर शिष्यांच्या चरित्र आणि काव्याबद्दल विशेष अभ्यास झाला नव्हता. या पाश्र्वभूमीवर तुकोबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडून त्यांच्या वाङ्मयाचं जीवावर उदार होऊन जतन करणाऱ्या संताजी जगनाडे, तुकयाबंधू कान्होबा, श्रीसंत नारायण महाराज, कचेश्वर ब्रrो आणि रामेश्वरभट वाघोलीकर यांच्या चरित्र व काव्याबद्दलची दुर्मीळ माहिती शोभा घोलप यांनी ‘तुकाराम महाराजांचा शिष्यपरिवार’ या पुस्तकात दिली आहे.
‘विष्णुमय जग। वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम। अमंगळ।।’ अशी शिकवण असणाऱ्या वारकरी संत परंपरेत शेख महंमदांसारखे मुस्लीम संतही झाले. भागवत धर्म आणि मुस्लीम सूफी तत्त्वज्ञान यांचा महासमन्वय घडवून आणण्याचं लोकोत्तर कार्य धर्मातीत झालेल्या ज्ञानयोगी शेख महंमदांनी केलं. त्यांची काव्यसंपदा ही अत्यंत प्रतिभासंपन्न आणि विठ्ठलभक्तीने ओतप्रोत आहे. त्यांचं असामान्य कार्य आणि काव्यरचनांचा विस्तृत आढावा अनिल सहस्रबुद्धे यांनी ‘संत शेख महंमद महाराज’ या ग्रंथात घेतला आहे. शेख महंमदांनी भागवत परंपरेतील भक्तीचा प्रसार करण्यासाठी स्वीकारलेला कीर्तनाचा मार्ग, त्यासाठी केलेली भ्रमंती, अभंग आणि लोकरुपकांची रचना यांविषयीची पुस्तकातील माहिती कुतूहल जागवणारी आहे.
याशिवाय या ग्रंथमालेत वारकरी संत परंपरेशी नातं असणाऱ्या, पण उत्तर भारतातील संत परंपरेत श्रेष्ठ स्थान असणाऱ्या संत कबीर यांच्यावरील ‘काळजयी कबीर’ हा अंशुमनी दुनाखे यांनी लिहिलेला चरित्रग्रंथ आणि संत मीराबाईंवरील ‘प्रेमयोगिनी मीरा’ हा सुरेखा मोरे लिखित ग्रंथही महत्त्वाचा आहे.
‘मंगळवेढय़ाची मांदियाळी’ या अप्पासाहेब पुजारी लिखित चरित्रग्रंथात संत कान्होपात्रा, कर्ममेळा, निर्मळा, बंका, दामाजीपंत यांच्या दुर्मीळ चरित्र-काव्याचा परिचय विस्तृतपणे होतो. तर शिवाजीराव मोहिते लिखित ‘नामदेवांची प्रभावळ’ या पुस्तकातही संत गोरा कुंभार, राका कुंभार, परिसा भागवत, नरहरि सोनार, जोगा परमानंद, जगन्मित्र नागा नामदेवांच्या कुटुंबातील सदस्य यांच्या चरित्र आणि अभंग संपदेविषयीची दुर्मीळ माहिती मिळते.
एकुणात, सध्याच्या भौतिकतावादी जगात नीतीमूल्यांचा झपाटय़ानं ऱ्हास होत असताना तरुण पिढीला मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची प्रेरणा या चरित्रमालेतून नक्कीच मिळू शकेल!
‘संतदर्शन चरित्रग्रंथ संच’ संपादन- डॉ. सदानंद मोरे, अभय टिळक, श्री गंधर्ववेद प्रकाशन, पुणे,
संचाचे मूल्य – ३९३० रुपये