|| कौस्तुभ केळकर- नगरवाला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिगरी मतर सदाभौ यांस..

दादासाहेब गावकरचा दंडवत.

तुम्चं पत्र गावलं. मजकूर बी ध्येनामंदी आला. विलेक्शनची हवा ममईला जोरामंदी हाई तर! येकंदर पत्रास कारन की- राजकारन म्हना की राव. समाजकारन, अर्थकारन बी इनाकारन येऊन ऱ्हायलंय त्येच्यासंगट. सदाभौ, तुमी आमास्नी धोबीपछाड देवून ऱ्हायलाय. राजकारन हा आमचा ईषय न्हाई. राजकारन आमाला न्हाई झेपत. आमास्नी फकस्त येवढंच ठाव हाये, की राज करायचं आसंल तर राजकारन जमायला हवं.

तुमास्नी म्हून सांगतू. थोडं थोडं पॉलिटिक्स आमास्नी बी जमून ऱ्हायलंय. आमच्या घरामंदीच फ्यामिली म्याटर झालेला. आमच्या घरी आईसाहेबांची सत्ता चालती. किराणा किती आनायचा? कुटनं घेयाचा? भाकर जेवारीची की बाजरीची? झुनका की वांग्याचं भरीत? समदं डिसीजन आईसाहेब घेत्यात. पाहुन्याकडचं लगीन, आहेर, कापडचोपड, दुधाचा रतीब, त्यातून आलेलं पकं, दिवाळीच्या टाईमाला कंचा दागिना करायचा? सम्दं आईसाहेब सांगत्याल तसंच हुतं. गेली तीस र्वस हा सिलसिला चालू हाय. मागच्या महिन्यात आईसाहेबांचा पासष्टावा बर्थडे शेलीब्रेट क्येला आमी. तुम्चं वैनीसायेब म्हन्लं, ‘आता त्येस्नी रिटायर्ड करा. सत्ता आम्च्या हाती द्या. आमी समदं सांभाळू.’

पन आईसाहेब तयार न्हाईत. दोगींचा अबोला. कंचा झेंडा घेवू हाती? टकुऱ्याचा भुगा झाल्ता. आईसाहेबांचा शबुद कदी खाली पडू दिला न्हाई आमी. तुम्च्या वैनीसायबांच्या डोळ्यात कदी आसू बगितले न्हवते. जबरजस्त क्रायशीस. सदाभौ, इस्वेस्वराच्या किरपेनं तुम्चं दोस्त खंबीर हाईत. आमी आईसाहेबांना म्हन्लं, ‘तुमी नवा ट्रेन्ड समजून घ्या. शिनीयर लोकान्ला टिकीट मिळत न्हाई आताशा. ह्य़े घर तुमच्या पुन्याईवर हुभं हाये.. ठाव हाये आमास्नी. आधे अधिकार तुम्च्या सूनबाईस्नी देवून टाका. तुमच्या अनुभवाची लश टोचल्याबिगर तेन्ला पुढं जाता येनार न्हाई. तुमी बी थोडं देवाधर्मात जीव गुतवा. शिनीयरपणाचा धर्म पाळला पायजे तुमी.’

तुम्च्या वैनीसायेबांला बी वेवस्थित समजावलं. ‘आईसाहेब, आधे अधिकार देवून ऱ्हायलेत तुमास्नी. त्येंचा मान ठेवलाच पायजेल. कंचा बी डिसीजन घेताना त्यांचं मत ईचारात घ्येवा. सबूरीनं घेवा. उद्या तुमास्नीच समदं संभाळायचं हाये. ध्येनात ठिवा- तुम्च्या दादाची बायकू तुम्चीच कापी मारती. तवा आपुन दोगं बी आपापल्या आयास्नी सांभाळू.’

कुटं शब्दाला शब्द न्हाई की वंगाळ आरोप न्हाईत. आम्च्या घरी राजकारन न्हाई, तर समाजकारन हाय फकस्त. जोडीला अर्थकारन बी सुधरून ऱ्हायलंय. लोकशाहीचा ईजय. आम्च्या आबासाहेबांनी दावलेल्या वाटंवरून जाऊन ऱ्हायलोय आमी. सदाभौ, तुमी याला घरानेशाही म्हन्लं तरी बी चालतंय की!

घराभायरचं राजकारन लई येगळं आसतंय. तुमी बरुबर बोलून ऱ्हायलाय. शहान्या मानसानं राजकारनात पडाया नगं. आमी तर म्हन्तो- सच्च्या, दिलदार, प्रामानिक मानसानं ही वाट धरूच नये. देवळामंदी जाताना आपुन चपला भाईर काडतू, तसंच हाये हे. राजकारनात शिरताना प्रामानिकपना, जनताजनार्दनाची काळजी, ईस्वास ह्य़े समदं ईसरून जायाचं. रेटून खोटं बोल्लं की जालं. किलू किलू आस्वासनं देयाची. आत्ताच्या घडीला मतासाटी हात पसरायचं. येकडाव निवडून आलं की येकदम राजापूरच्या गंगेवानी चार-पाच वर्सानीच दर्सन देयाचं. समदी शिश्टीम बसलेली हाई हिथं.

तुम्ची काय तरी गलतफैमी झालीया सदाभौ. आमी कुटं बी सक्रिय न्हाई. आक्षी घरात बी न्हाई. लोडाला टेकून आडकित्त्यानं सुपारीची फुलं काडत बसतू. टीवीवरचा विलेक्शनचा आरडाओरडा कान बंद करून ऐकतू. दोन-चार येळा थोबाड-पुस्तकावर हाजरी देतू. आम्चा दत्तूबरूबरचा फोटू बगितला आसशीला तुमी थोबाड-पुस्तकावर. आम्चं दत्तू बेपारी मानूस हाई. परत्येक टायमाला बिजीनेस आपार्च्यूनिटी शोधून ऱ्हायतं बेणं. आता बी प्रचार शाहित्याचं दुकान थाटलंय त्येनं. पंजा, घडय़ाळ, कमळ, धनुष्यबाण, हत्ती, सायकल.. समद्यांचं झेंडे, उपरणं, टोपी श्टॉकमंदी हाईत त्येच्याकडं. एखाद टायमाला तमाखू मळायला जातू आमी तिथं. तिथलाच शेल्फी टाकला हुता. दत्तूवानी आमास्नी समदे पक्ष सारकेच सदाभौ. खरा बिलंदर आमचा दत्तू हाय. समद्यांचा उपेग करून सौताचं खिसं भरून ऱ्हायलाय गडी.

आमी मत दिल्यालं उमेदवार निवडून आलं की न्हाई, ह्य़े शीक्रेट आमी तुमास्नी सांगनार न्हाई. आवं, गुप्त मतदान आसतंया ते. पर येक वोप्पन शीक्रेट सांगतु.. निवडून आलेल्या कंच्या बी उमेदवारानं आमास्नी लक्शात ठेवल्यालं न्हाई. कसंबसं काटावर पास हुईल ईतकंच काम केलंया त्येनी. कदी कदी आमाला बी वाटतं, नोटा वापरून टाकावा. तुम्च्या मनात पाप येवून ऱ्हायल्यालं दिसतंय सदाभौ. नोटा म्हंजी वरीलपकी कुनी बी न्हाई. पर त्यो नाद सोडून दिला आमी. चुकून नोटाचा टक्का वाडला तर फेरनिवडनूक लागंल. तेवडा खर्च न्हाई परवडायचा देसाला. आसं आपलं आम्चं मत हाई. हाये त्येचात बरा मानूस निवडायचा आन् बोटाला शाई लावायची.

शेलीब्रेटीन्ला राजकारनात यंट्री मारनं वाईच सोप्प आसतंय. पब्लीक त्येंच्यामागं पहिल्यापास्न आसतंया. चालतंय की! पर तेन्नी बी शंशदेत यंट्री मारताना शेलीब्रेटीपनाची ड्रेपरी भाईरच काडून ठेवाया हवी. तिथं तुमी आम पब्लीकला रिप्रेझेंट कराया हवं. बोलाया हवं. पिक्चरमंदी दावतात तसा अन्यायाईरूद आवाज ऊठवाया हवा. एखाद्या शिनेकलाकारानं एक्श्ट्रा आर्टश्टिांच्या अडचनी दूर कराया पायजेल. खेळाडूनं मदानाची सोय कराया हवी. चांगल्या खेळाडून्ला ट्रेनिंगची, खुराकाची सोय कराया पायजेल. शेलीब्रेटींनी सांगितलं की पब्लीक डोळं झाकून ऐकतंया. चार चांगली कामं पब्लीकच्या सपोर्टनं मार्गी लावली तर त्यांच्या शेलीब्रेटीपनाचा देसाला फायदाच हाये. असे कामकरी शेलीब्रेटी देसाला पायजेल की! आन् जमलं तर लाखोंनी गावणाऱ्या मानधनाला मोटय़ा मनानं न्हाई म्हनावं. अशा शेलीब्रेटीन्ला देवपण दिलं तरी बी हारकत न्हाई.

सदाभौ, आमचं कुलकर्नी मास्तर तुमास्नी ठाव हायेतच. आताशा रिटायर्ड जालं, पर टायर्ड न्हाई बरं का. लई तळमळीनं शिकवायचं मास्तर. आधं गाव त्येंचं ईद्यार्थी. गावात तेन्च्या शब्दाला लई मान हाई. राजकारन्यांच्या रडारवर मास्तर पहिल्यांदा आसायचं. मास्तरान्नी सांगितलं की गाव पाठीशी हुभं ऱ्हानार, ह्य़े चांगलं ठाव हाये तेस्नी. मागच्या टायमाला मास्तर भुललं. पर या टायमाला मास्तरान्नी जबराट होमवर्क केलंय. आम्चं मास्तर लई हुश्शार. आताशा कुनाला बी जवळ येवू देत न्हाईत.

तिकडं आयोगानं तारका डिक्लेर केल्या आन् मास्तरान्नी गावची शाळा घ्येतली. गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्य़ाचा डीप श्टडी हाये मास्तरांचा. रस्ते, रेल्वे, तीर्थक्षेत्रं, शेती अनुदान, खतपुरवटा, धरनं, बंदारे, शेतीपूरक उद्योग, दूधदुभतं, बाजारपेट, शबशीडी.. समद्या फील्डमदल्या अडचनी लिवून काढल्यात. कुटला रस्ता व्हायाला पायजेल, कुटं पान्याची टाकी हवी, कुटं एम. आय. डी. सी. व्हाया हवी, पाच वर्षांन्नी तुमाला कंच्या सोईसुविदा मिळाया हव्यात.. लोकल ते ग्लोबल समदं नालेज हाये तेस्नी. आपलं दोस्तराष्ट्र, शत्रू, दरडोई उत्पन्न, तंत्रज्ञान, संशोधन.. समद्यातलं बेशीक नालेज देवून ऱ्हायलंय मास्तर लोकान्ला. मतदारजागृती म्हना की राव. येका ईतवारी आख्ख्या गावाची शाळा घ्येत्ली. धा-धा पानी अपेक्षानामा स्वखर्चानं पब्लीकला दिला. हिकडं ऊमेदवार ठरल्येला नव्हता, पर मास्तरांचा अपेक्षानामा रेड्डी हुता. त्येंचं येक दिवसाचं ट्रेनिंग गावाला शहानं करून ऱ्हायलंय. उमेदवार मताची झोळी फिरवाया लागला की पब्लीक त्येत अपेक्षानामा टाकतंय. तुमी काय काम करनार? काय काम क्येलं? तुमाला आम्चं प्रश्न ठाव हाईत काय? पब्लीक समदं ईचारून ऱ्हायलंय बगा. जातपात, घराणेशाही, पक्ष, भावकी, पशाचं आमिश.. समदं ईसरायचं. कंच्या उमेदवाराचा अभ्यास चांग्ला हाई, कोन तुम्चा आवाज शंशदेत पोचवंल, याचा श्टडी करायचा. आपला आतला आवाज ऐकायचा आन् त्येला मत देयाचं. मास्तरांची लोकशाहीची साळा कुनी बी चुकवली न्हाई. कंचा बी उमेदवार गावात येतान्ना घरचा अभ्यास करून येतुया. परत्येकाच्या खिशात मास्तरांचा अपेक्षानामा आसतुया. आम्चं गाव लोकशाहीचं तीर्थक्षेत्र होवून ऱ्हायलंय गडय़ा. आमी मास्तरान्ला म्हन्लं, ‘तुमीच का न्हाई हुभं ऱ्हात निवडणुकीला?’

मास्तर काय म्हन्लं ठावं हाये?

‘गात्रं थकली आता आम्ची. पायाला भिंगरी लावून, तहानभूक ईसरून काम करनाऱ्या तरून रक्ताला चान्स गावला पायजेल. तुम्च्यापकी कुनी बी ऊमेदवारीचा इचार करा. पर पाच-धा र्वस रूट ल्येवलपास्नं काम कराया हवं. तळागाळापासून सुरवात करायची. लोकान्ची कामं करायची. अडचनी समजून घेयाच्या. मग पुढचा इचार. बाप्येच कशाला, बाया मान्सान्नी बी राजकारनात याया हवं.’

मास्तर म्हन्त्यात ते बरूबर हाय.

या वर्सी तेन्नी अपेक्षानामाला परगतीपुस्तक बी जोडलंय. निवडून येनाऱ्या शंशदपटूचं परगतीपुस्तक परत्येकानं दरसाली लिवायचं. अगदी शेऱ्यासकट. पक्षाकडं बगून मत द्या, न्हाईतर मान्साकडं बगून. पुढच्या येळी परगतीपुस्तक बगायचं आन् मगच मत देयाचं.

राजकारन वाईट, कारन त्यात सच्ची मान्सं कमी हाईती. चांगलं, शिकल्येलं मानूस राजकारनात गेल्याबिगर देश पुडं कसा जानार? राजकारन करिअर म्हणूनशान करनारं प्रोफेश्यनल, प्रामानिक ऊमेदवार जवा पुडं येतील तवाच लोकशाहीचा ईजय हुईल. आन् बोटाच्या शाईला खरा अर्थ गावंल.

मास्तरांचा ह्य़ो अपेक्षानामा सत्यात यायला हवा सदाभौ. न्हाईतर ‘आमी बीघडलो, तुमी बीघडा..’ यापरीस ‘दिल है छोटासा , छोटीसी आशा..’

ह्य़े बेश्ट हाई.

तुम्चं जीवाभावाचं दोस्त..

दादासाहेब गावकर

kaukenagarwala@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi article in loksatta lokrang by kaustubh kelkar nagarwala