|| डॉ. केतकी गद्रे
मानसशास्त्रज्ञ मिशेल रॅड यांच्या मते, विश्वसनीय राजकीय नेता तो- जो न्याय आणि वस्तुस्थितीनिष्ठ असतो. जो स्वकेंद्री नसून, आपल्या वैयक्तिक मतांचा आणि भूमिकांचा हेका मागे सारून समाजकल्याणासाठी झटतो. सत्ता – मान – प्रसिद्धीच्या पलीकडे जाऊन समाजाभिमुख, सर्वसमावेशकतेच्या दिशेने वाटचाल करतो. वस्तुनिष्ठ आश्वासने देतो आणि त्यांची वेळेत व सुयोग्यरीतीने पूर्तता करतो आणि शब्दाचा पक्का असतो. स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी इतरांना पाण्यात पाहत नाही.
निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. नेतानिवडीत ‘नड’ आणि ‘निवड’ यांचा काहीसा जवळचा संबंध आहे. निवडणुकीचा हा इमला या दोन संकल्पनांवर उभा दिसतो. तो कसा, ते विस्ताराने पाहू या..
‘नड’ किंवा एखाद्या गोष्टीची आवश्यकता ही मनुष्याला ती गरज भागवण्याच्या दिशेने विशिष्ट ‘कृती’ची ‘निवड’ करण्यास आणि अवलंबण्यास उत्तेजित करते. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लो यांच्या ‘Hierarchy of needs’ या तात्त्विक मीमांसेत मानवी गरजा या पाच स्तरांत मांडल्या आहेत. सगळ्यात खालचा स्तर हा शारीरिक स्वरूपाच्या (Physiological) मूलभूत गरजांचा. त्यात अन्न, वस्त्र, निवारा आदींचा समावेश केलेला आढळतो. या स्तराच्या वरचा स्तर म्हणजे ‘सुरक्षितते’चा. मध्यावर प्रेम-जिव्हाळ्याची नातीगोती यांचा स्तर. या स्तराच्या वर मान, प्रतिष्ठा हा स्तर आणि अखेर सर्वोच्च स्थानी ‘self- actualization’ म्हणजेच स्वत्वाच्या कर्तृत्वक्षमतेचा गाठलेला सर्वोत्तम बिंदू. मानवी जीवन या गरज-स्तरांमध्ये मांडलेले आहे, असे मॅस्लो यांचे म्हणणे. त्यांच्या मते, साधारणत: खालील स्तरातील गरजा पूर्ण झाल्या, की तो मनुष्य त्या स्तराच्या वरील स्तरावरील गरज भागवण्याकडे आगेकूच करतो. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीला आत्मकर्तृत्वाची क्षमता पुरेपूर वापरून आत्मोन्नतीचा परमोच्च बिंदू गाठायचा असेल, तर त्याला या सर्व स्तरांतील गरजा किमान पातळीत तरी भागवाव्या लागतील. या सिद्धांताचा आपल्या निवडणुकीच्या संकल्पनेशी संबंध जोडला, तर रंजक चित्र उभे राहते.
आपण एक व्यक्ती म्हणून कोणत्या स्तरात आहोत, याचा प्रभाव आपण कोणता नेता निवडतो यावर काही प्रमाणात दिसून येतो. अन्न-वस्त्र-निवाऱ्याची अशाश्वतता असणाऱ्या व्यक्तींना या गरजा भागवण्याची हमी देणारा नेता भावतो. याउलट, जी व्यक्ती खालील स्तर पार करून अतिउच्च स्तराकडे मार्गक्रमण करते (थोडक्यात, मूलभूत गरजा पूर्णपणे भागल्या आहेत आणि पुढेही भागतील याची शाश्वती वाटते), तिला मूलभूत गरजांच्या चर्चेपलीकडे जाऊन तात्त्विक, वैचारिक, व्यापक दर्जाची चर्चा, विचारविनिमय आणि आश्वासने देणारा नेता अधिक भावतो.
हे ‘भावणे’ मतांमध्ये परिवर्तित होईल का, हा पुन्हा अभ्यासाचा विषय आहे. कारण एखादी व्यक्ती ‘मत’ देण्यासाठी कोणता नेता निवडते, हे बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे. एखाद्या व्यक्तीचा गरजेचा स्तर या महत्त्वपूर्ण आणि संभाव्य घटकाच्या प्रभावाव्यतिरिक्तवैयक्तिक, सामाजिक, राजकीय घटक प्रकट होऊन आपला प्रभाव प्रस्थापित करत असतात. आपण ज्या गरज-स्तरावर झगडत आहोत, त्यात मदतीचा हात पुढे करणारा नेता आपण निवडू हे शक्य आहे. परंतु ही बाब पुरेशी नाही.
‘नेतृत्व’ या संकल्पनेबाबत आपली वैयक्तिक विचारसरणी कशी आहे, यावरही आपली निवड अवलंबून आहे. आपल्या देशातील नागरिक आपल्या मताबाबात बऱ्याच अंशी सजग आणि सतर्क झाले आहेत, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. म्हणजेच मताचा अधिकार हा ‘informed choice’ या आत्मविश्वासाने बजावावा हा बहुसंख्य मतदारांचा मानस आहे, असा अंदाज लावता येऊ शकतो. हा अंदाज उचित आणि परिपूर्ण माहितीवर आपले मत बनवून ‘मत’ देणाऱ्या आजच्या नागरिकाची ‘मानसिकता’ अभ्यासणे गरजेचे ठरवतो. गरज-स्तरांचा उल्लेख हा या मानसिकतेचे चित्रण करतो. एखादा ‘नेता’ आणि त्याची नेतृत्वशैली ही प्रत्येक स्तराप्रति काय दृष्टिकोन बाळगते, कोणत्या स्तराला किती महत्त्व देते, कोणत्या स्तरातील गरजा भागवण्याकडे कल दिसून येतो आणि या सगळ्याचा आपल्या विचारसरणीशी आणि वैयक्तिक वस्तुस्थितीशी कितपत मेळ बसतो, यावरही आपली निवड अवलंबून असते, हे खरे!
म्हणूनच मग काहींना खात्यात पैसे जमा करणारा नेता भावतो, तर काहींना देशाची सुरक्षितता, एकजूटता आणि प्रगतीचा प्रचार करणारा नेता आवडतो. कोणाला नोकऱ्यांची हमी देणारा, तर कोणाला (कर्तृत्व असो वा नसो) उत्तम ‘वक्ता’ असलेला नेता भावतो. कोणाला केवळ एखाद्या पक्षाप्रति निष्ठा आहे म्हणून त्या पक्षाची उमेदवारी मिळालेला एखादा नेता रुचतो, तर कोणाला एखादा (कामगिरी असो/ नसो) उत्तम वस्त्र परिधान केलेला, well -groomed नेता जवळचा वाटतो. काही हिंसक प्रवृत्तीच्या नेत्याला पसंती देतात, तर काही नेत्याच्या (राजकीय) वरिष्ठतेला. काहींना एखादा नेता त्याच्या निस्सीम पक्षनिष्ठेमुळे भावतो!
आपली पसंती जरी भिन्न असली, तरीही प्रत्येकाच्या मनात ‘राष्ट्रहित’ ही भावना भिन्न प्रमाणात का होईना जागृत आहे, हे नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे निव्वळ ‘मनाला बरा वाटणारा’ नेता निवडण्यापेक्षा, नि:पक्षपणे राष्ट्रहिताच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नेत्याची निवड करणे ही विचारपूर्वक कृती ठरते.
उत्तम राजकीय नेता कसा ओळखावा, याचे काही ठोकताळे मानसशास्त्रज्ञ मिशेल रॅड यांनी मांडलेले आहेत. त्यांच्या मते, विश्वसनीय राजकीय नेता तो- जो न्याय आणि वस्तुस्थितीनिष्ठ असतो. जो स्वकेंद्री नसून, आपल्या वैयक्तिक मतांचा आणि भूमिकांचा हेका मागे सारून समाजकल्याणासाठी झटतो. सत्ता – मान – प्रसिद्धीच्या पलीकडे जाऊन समाजाभिमुख, सर्वसमावेशकतेच्या दिशेने वाटचाल करतो. रूपापेक्षा स्वरूपावर अधिक लक्ष केंद्रित करतो. ध्येयनिष्ठ असतो. इतर लोकांना जबाबदारीने वागण्यास उत्तेजित करतो. आपले अधिकार बजावताना आपली सामाजिक, राष्ट्रीय बांधिलकी कदापि न विसरण्यासाठी आग्रही असतो. वस्तुनिष्ठ आश्वासने देतो. त्यांची वेळेत व सुयोग्यरीतीने पूर्तता करतो आणि शब्दाचा पक्का असतो. त्याचे ‘स्वत्व’ इतके नम्र आणि निग्रही असते, की बा कुशक्तींमुळे तो डगमगत नाही. त्याच्याजवळ उत्तम विनोदबुद्धी, भावनिक – वैचारिक सामथ्र्य असते. जागतिक घटकांच्या, परिस्थितींच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रप्रगती आखतो आणि स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी इतरांना पाण्यात पाहत नाही. स्पर्धेपेक्षा सहकार्यावर त्याचा जोर असतो. वचनबद्धता, नियमित आत्मपरीक्षण, खुली मानसिकता, अनुभव आणि ज्ञान या स्वभाववैशिष्टय़ांद्वारे एखादी व्यक्ती उत्तम राजकीय नेता बनण्याकडे वाटचाल करू शकते.
जनसामान्यांच्या दृष्टिकोनातून ‘उत्तम राजकीय नेता’ कसा असावा, याचा आढावा काही मोजक्याच संशोधकांनी घेतलेला आहे. काही निवडक संशोधनपर लेखांमधून आणि तत्सम मतसदृश निबंधांवरून ‘उत्तम राजकीय नेता’ याचे काही व्यक्तिमत्त्व पैलू प्रामुख्याने उल्लेखलेले आढळतात.
‘Political leader in Kyrgyzstan’ या संशोधनपर लेखात जनसामान्यांना अपेक्षित असलेला राजकीय नेता आणि नेत्याचे व्यक्तिमत्त्व पैलू यावर प्रकाश टाकला आहे. संशोधकांनी या भागातील नागरिकांना सोपा- साधा प्रश्न विचारला- ‘एखाद्या उत्तम वा चांगल्या राजकीय नेत्याच्या अंगी असलेले गुण कोणते?’ या प्रश्नाचे उत्तर देताना नागरिकांनी अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक गुणांचा उल्लेख केला. बहुतांशी लोकांनी एकापेक्षा अधिक गुणांचा उल्लेख केला.
या उत्तरांचा सखोल अभ्यास करून संशोधक डायनारा मुझ्रेवा आणि पिनार अक्साईयांनी विश्लेषणपर नेमके १० गुण अधोरेखित केले आहेत. ते म्हणजे- राष्ट्रप्रेम, देशभक्ती, उत्तम शैक्षणिक पाश्र्वभूमी, प्रामाणिकपणा, राजकीय व्यावसायिक करिष्मा, बुद्धिमत्ता, जबाबदारी, सशक्त चारित्र्य (चारित्र्यसंपन्नता), लोकांप्रती सेवाभावी वृत्ती आणि शौर्य. याव्यतिरिक्त नेत्याने कडक शिस्तीचे, कणखर असावे, उत्तम वक्ता असावे हेही काही अपेक्षित गुण नमूद केले गेले.
ही लक्षणे अभ्यासून आता आपली पसंती आपण तपासून, पडताळून पाहावी. ही लक्षणे (होतकरू / प्रस्थापित) राजकीय नेत्यांच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने समप्रमाणात महत्त्वाची आहेत.
आपली निवड ही आपल्या स्वभाववृत्तीचे, मानसिक प्रगल्भतेचे आणि चारित्र्याचे प्रतिबिंब असते. आपल्या निवडीवर असंख्य घटकांचा- वैयक्तिक, कौटुंबिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, वैश्विक, इ. प्रभाव होत असतो. आपण व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून किती सजग आणि सतर्क आहोत, यावर आपली निवड अवलंबून असते. आपल्या आजूबाजूची राजकीय परिस्थिती कोणत्या स्वरूपाची आहे? ती पोषक आहे की घातक- आणि घातक असल्यास, त्यावर ठोस उपाययोजना करणारा नेता निवडणे हे त्यावरचे उत्तर ठरेल का? तात्पुरता फायदा पाहून दबावाखाली येऊन आपली निवड चुकत तर नाही ना? संख्येने आपले वा प्रत्येकाचे एकच मत जरी असले, तरीही त्याची व्यापकता मोठय़ा प्रमाणात आहे, याचे आपल्याला स्मरण आहे ना? आपली निवड पाचही गरज-स्तरांना समाविष्ट करणारी आहे का?.. असे काही आत्मपरीक्षणसदृश आणि परिस्थितीचे अवलोकन करणारे प्रश्न स्वत:ला विचारणे गरजेचे आहे.
राष्ट्रहिताची मानसिकता बाळगणे हे केवळ ‘निवडणुकी’च्या काळातच नव्हे तर प्रत्येक श्वासागणिक महत्त्वाचे आहे. हे म्हणण्याचे कारण हे की, राष्ट्रहिताच्या कक्षेतच प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक कुटुंबाचे हित दडलेले आहे. ‘राष्ट्रहित’ या संकल्पनेकडे व्यापकतेने, सतर्कतेने, निष्ठेने पाहणारा नेता निवडू देणे
हा आपला अधिकार आणि सर्वोच्च
जबाबदारी आहे. आपली निवड ही आपल्या चारित्र्याची ओळख आहे, हे विसरू नये. उत्तम शारीरिक – मानसिक – आर्थिक – भौगोलिक – राजकीय – सामाजिक स्वास्थ्य हे सुदृढ राष्ट्रातच प्रस्थापित करता येऊ शकते. त्यामुळे उत्तम मानसिकता घडवणे हे वैयक्तिक पातळीवर जितके महत्त्वाचे, तितकेच ती मानसिकता कोणत्या वातावरणात वा परिस्थितीत घडवली जात आहे, हेही तितकेच महत्त्वाचे. उत्तम राष्ट्रीय- राजकीय नेतृत्व हे आपल्या मनोसामाजिक (मानसिक + सामाजिक) स्वास्थासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वाभाविकच, या नेतृत्वाची निवड ही अभ्यासपूर्ण आणि गांभीर्याने व्हायला हवी, यात दुमत नसावे.
ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहेत.)