|| मकरंद देशपांडे
प्रेम जर जीवनाची सरगम असेल, तर ताल वास्तवाची लय आहे. आणि लयबद्ध जगणं हे कलाकाराच्या स्वभावात शक्यतो नसतंच. त्यामुळे ‘ताल-बेताल जगणारा तो अस्सल कलाकार!’ असं कुणीतरी कुठेतरी लिहून ठेवलंय. किंवा कुणी गुणी-अवगुणी कलाकारानं ते कुणा हलक्या कानाच्या कलाकाराला दोन-तीन ग्लास पेय पिऊन सांगितलंय. आणि आता तेच कलाकारांच्या पोथीत (पिशवीत) नक्कीच सापडतं. असो!
‘बाजे ढोल’ या नाटकातली गोष्ट ही ‘बुधा’ नावाच्या देशातल्या लोकप्रिय ढोलवादकाच्या बेताल वर्तनाची आहे. त्याची पत्नी ‘चंडी’ ही त्याचं बेताल वर्तन सहन करते, कारण तो एक ‘अस्सल कलाकार’ आहे. पण बुधा जेव्हा आपल्या बेताल वर्तनाचं प्रात्यक्षिक अगदी नको त्या ठिकाणी करतो, तेव्हा त्याचं ते बेताल वर्तन त्याला एकाकी करतं. आणि नको तेवढी समजूतदार, सहनशील बायको आपल्या नावाला साजेशी चंडी बनते. हे झालं नाटकाचं सिनॉप्सिस.
भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला असला, तरी त्याची लोकशाहीवादी राज्यघटना २६ जानेवारी १९५० पासून अमलात आणली गेली. म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशाच्या राजधानीत- दिल्लीत ध्वजवंदन झाल्यावर राष्ट्रपतींना देशाच्या सगळ्या घटक राज्यांचे संस्कृती आणि वैभव दाखवणारे रथ सलामी देतात.
लोकशाही राज्य म्हणजे हे ‘लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी’ चालविलेलं राज्य आहे. लोकप्रिय ग्रामीण ढोलवादक बुधा हा आपल्या घटकराज्यातून ढोल वाजवणारा असतो. पण आदल्या रात्री बुधाचं डोकं फिरतं आणि तो म्हणतो की, ‘‘उद्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मी ढोल वाजवू शकणार नाही. कारण माझा ताल हरवलाय.’’ सरकारी माणूस- जो त्याचा इनचार्ज असतो- त्याला वाटतं की, उद्या ‘ड्राय डे’ आहे तर कलाकाराला.. बुधासारख्या ‘अस्सल कलाकारा’ला.. गळा ओला केल्याशिवाय आणि मेंदूला मोकळं केल्याशिवाय ताल सापडणार नाही. म्हणून तो बुधाला हवं ते पेयं आणून देतो. पण बुधा पेयं प्यायल्यावर आणखीनच हरवतो.
त्याचं म्हणणं पडतं की, ताल हा ऐकणाऱ्याच्या कानात असतो. आणि मला उद्या हे बघायचंय, की मी ढोल घेऊन उभा राहीन, पण वाजवणार नाही- तेव्हा राष्ट्रपती काय ऐकतील? त्यांना माहीत असलेला ताल, की मी न वाजवलेला ताल. झालं, बुधाचं डोकं एव्हाना पूर्ण फिरलेलं.
सरकारी माणूस हा कधीही उगाच कलाकारांच्या मागे लागून वेळ वाया घालवत नाही. तो लगेच त्याच्या बायकोला- चंडीला बाजूला नेतो आणि तिच्यापुढे प्रस्ताव ठेवतो की, ‘‘उद्या बुधाच्या ऐवजी तू उभी राहा. तू चांगलं नाचतेस आणि गातेसही. लग्नाआधी तुम्ही दोघं एकत्र कार्यक्रम करायचात. माझ्याकडे सगळी खबर आहे. तू असं समज की, उद्या तू राष्ट्रपतींसमोर पुन्हा आपल्यातल्या कलाकाराला घेऊन लोकांसमोर येणार आहेस. बुधाची काळजी करू नकोस; तो एवढा प्यायला आहे, की शक्यतो उद्या ड्राय डेला तो झोपूनच राहील.’’ चंडीला आधी हा प्रस्ताव पटकन मान्य होत नाही; पण पेयं पिऊन वेडा झालेला ‘अस्सल कलाकार’ बुधा चंडीला शिव्या घालतो, तिला मारायला धावतो. बस्स, सरकारी माणसाला तेच हवं असतं. चंडी रडत रडत लागलीच तयार होते. खरं तर सरकारी माणूस तिच्यातील चंडी जागी करतो. तिला एका नवीन भविष्याचा ताल देतो.
ती मध्यरात्री आपल्या गाण्याची आणि नाचाची तालीम करते. बुधा आधी तिला थांबवायचा प्रयत्न करतो; मात्र नंतर तिचं सुंदर नृत्य आणि गाणं ऐकून मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहतो. दुसऱ्या दिवशी- म्हणजे प्रजासत्ताकदिनी चंडी नटून थटून तयार होते. सरकारी माणूस जवळजवळ तिच्या प्रेमात पडतो. चंडीला सरकारी माणसाबद्दल खूपच आदर वाटतो, कारण तिच्यातील कलेला त्यानं पुन्हा जागं केलेलं असतं. बुधा आपल्या ‘अस्सल कलाकारा’च्या वेडातून सावरायचा प्रयत्न करत असतो; पण पेयाची आणि वेडाची मोहिनी काही पटकन उतरत नाही. मात्र, बुधा हे सगळं पाहत असतो.
लाऊडस्पीकरवर बुधाच्या ऐवजी चंडीचं नाव अनाऊन्स होतं. बुधा ओरडत राहतो की, ‘‘चंडी माझी बायको आहे!’’ पण कोणी ऐकत नाहीये हे बघून ढोल वाजवायला लागतो. त्याच्या ढोलवादनाची ताकद वेगळीच असते. सरकारी माणूस त्याला पटापट तयार करतो आणि राष्ट्रपतींसमोर बुधा आणि चंडी या जोडीचं अप्रतिम सादरीकरण होतं. टाळ्यांच्या गर्जनेत अंधार होतो. नाटक संपत.
के. के. मेननने बुधाची, तर मिता वसिष्ठने चंडीची भूमिका केली आणि सुधीर पांडे यांनी सरकारी माणसाची!
या नाटकाच्या तालमी साधारण रोज आठ ते चौदा तास केल्या. कारण दिवस कमी होते आणि नाटक लिहिता लिहिता बसवलं गेलं. केके म्हणायचा, ‘‘मॅक, आज कितने नये पन्ने तले हैं?’’ खरंच, रोज ताजं जेवण वाढावं तसं तालमीला नवीन पान वाढायचो!
मितासाठी हे सगळं नवीन होतं. पण गेल्या लेखात लिहिल्याप्रमाणे, तिलाही वेडेपणानं भुरळ घातली होती. त्यातून मितानं ‘कस्तुरी’ या नाटकाच्या इंग्रजी रूपांतरात ‘माया’ची भूमिका केली होती. त्यामुळे नाटक आठवडय़ावर आलंय, पण पूर्ण लिहिलेलं नाही असं असूनही तिला भीती नव्हती. किंबहुना, मिता एवढी छान नटी आहे, की तिनं तिची भीती मला कळू दिली नव्हती.
केकेनं सादर केलेला बुधा हा माझ्यासाठी अविस्मरणीय होता. बुधा या लोकप्रिय ढोलवादकातला टोकाचा वेडेपणा, स्वत:च्या कलेचा अहंकार आणि शेवटी स्वत:च्या अस्तित्वासाठी करावी लागलेली धडपड केकेनं लिहिलेल्या व्यक्तिरेखेपेक्षा खूपच वर नेली. केकेनं ढोल वाजवला तेव्हा असं वाटलं, की केकेला घेऊन ‘सखाराम बाइंडर’ करावा. कारण विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या सखारामने जर मृदुंग वाजवला नाही तर सखाराम जिवंत होत नाही, हे खरं. मिता वसिष्ठ ही खरं तर खूप शिस्तप्रिय (तत्त्वांबाबतीत); पण ती एक अशी अभिनेत्री आहे, की तिच्या उभं राहण्यात एक स्टेज प्रेझेन्स आहे. तिच्या हालचालींमध्ये एक बॅलन्स आहे. त्यामुळे ती कुठल्याही मुद्रेत आकर्षक वाटते. खासकरून जेव्हा तिच्यातील चंडी जागी होते आणि ती नाचायला लागते, तेव्हा तिच्याकडे मी पाहत बसायचो. तिचं आणि केकेचं नाटकातलं भांडण, मारामाऱ्या (खरोखरच्या शारीरिक) आणि प्रेम या प्रसंगांचं ब्लॉकिंग (हालचाली) बांधताना तालमीत विद्युतप्रवाहासारखी ऊर्जा असायची. दोघेही घामानं ओलेचिंब व्हायचे. कित्येक वेळा केकेला दोनदा टी-शर्ट बदलायला लागायचे. कधी एक्स्ट्रॉ टी-शर्ट आणला नसेल तर लंच टाइममध्ये टी-शर्ट धुऊन, उन्हात वाळवून पुन्हा तालीम सुरू!
सुधीर पांडे यांनी ‘सरकारी माणूस’ हे पात्र खूपच मिश्कीलपणे केलं. सरकारी माणसाचं काम असं असतं की, कसंही करून- शक्यतो गोड बोलून, प्रसंगी ताकद दाखवून किंवा आमिष दाखवून आपलं काम पूर्ण करून घ्यायचं. सुधीरभाईंनी आपल्या हसण्यानं, प्रसंगी गोड बोलून, तर कधी आपल्या रागातून अख्खी सरकारी यंत्रणा उभी केली.
सुधीरभाईंच्या हातात मी एक ब्रीफकेस दिली होती. का कुणास ठाऊक, पण मी त्या ब्रीफकेसमध्ये फक्त सरकारी समारंभात पूर्वी लोक जसे कापडी रंगीबेरंगी बॅजेस् लावून मिरवत असत तसे सरकारी बॅजेस् ठेवले होते. मला सुधीरभाई म्हणायचे की, ‘‘या बॅजेस्च्या बॅगमुळे मी नट म्हणून पटकन सरकारी माणूस बनून जातो!’’
ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की, नटाला पात्राकडे न्यायला एखादी प्रॉपर्टी, पोशाख किंवा मेक-अप उपयोगी पडतो. कधी कधी नेपथ्यसुद्धा! मला आठवतंय, एक दिवस तालमीत मी डेकोरेटरकडून खूप गाद्या आणल्या आणि त्यांचा ढीग उभा केला. वीस-पंचवीस लोड ठेवले. तीस खुर्च्याचे मनोरे तयार केले. केके म्हणाला, ‘‘समारंभाचं वातावरण समजलं आणि त्या दिवशी बुधा मला सापडला!’’
या नाटकाची आणखीन मजा वाढली, जेव्हा आम्ही एक प्रयोग एशियाटिक लायब्ररीसमोरील हॉर्निमन सर्कलच्या बागेत केला. तिथे असलेल्या झाडाखाली आणि हिरवळीवर जेव्हा नेपथ्य मांडलं गेलं तेव्हा बागेच्या बाहेरून चाललेल्या लोकांना वाटलं की, खरंच इथे एखादा समारंभ चालू आहे. आम्ही जवळजवळ अर्ध्या बागेला मंडपाचं रूप दिलं होतं. असं म्हणायला हरकत नाही की, ‘बाजे ढोल’ची नेपथ्यरचना टेडी मौर्यची, पण एक्जीक्युशन डेकोरेटरचं! माफ करा, नाव विसरलो पण प्रभाव नाही.
जय ताल. जय प्रजासत्ताक दिन. जय नाटक!
mvd248@gmail.com