|| सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यास..

सदू धांदरफळेचा नमस्कार!

असं म्हणतात की, शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये आणि राजकारणात किंवा प्रेमात पडू नये. मी शहाणा आहे असं माझं स्वत:चं जरी म्हणणं असलं तरी माझं शहाणपण बालाकोटच्या हल्ल्याप्रमाणे असल्यानं त्याचे पुरावे देता येत नाहीत. पण ज्या अर्थी मला अजूनही कुणी कोर्टात खेचलं नाही, आमच्या खानदानात कुणी पवारफूल राजकारणी नसल्यानं निवडणुका लढवायला मी पात्र किंवा पार्थ ठरलो नाही, आणि कुणी माझ्या प्रेमात पडावं इतका मी सुदैवीही नाही, त्या अर्थी मी शहाणा असण्याची दाट शक्यता आहे. तूही माझ्यासारखाच राजकारणापासून दूर राहणारा शहाणा असशील असं मला वाटत होतं. पण कालच कुणीतरी तू सक्रिय राजकीय कार्यकर्ता असून निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केल्याची बातमी माझ्यापर्यंत पोहोचवली. कुरुक्षेत्रावरील बातम्या भुवया उडवत उडवत आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या सोशल मीडियारूपी संजयाची विश्वासार्हता शून्यावर आली असल्यामुळे म्हटलं, थेट तुलाच विचारून बातमी कन्फर्म करावी. दादू, खरंच तू पक्षांतर केलंस काय? ‘या वेळेस एकही योग्य उमेदवार नसल्याने नोटाचा पर्याय वापरावा लागणार..’ असं मागे तू म्हणाला होतास, त्याचा हा ‘अर्थ’ माझ्या लक्षातच आला नव्हता.

दादू, तुला म्हणून सांगतो, निवडणूक कुठलीही असो; मी मत दिलेला उमेदवार आजपर्यंत कधीच निवडून आला नाही, ही गोष्ट खरी आहे. आता हा केवळ योगायोग आहे की काय, हे कन्फर्म करण्यासाठी मी काय केलं? तर, सोशल मीडियावर आधीच जाहीर करून, सतत तीन टर्म मोठय़ा मताधिक्याने निवडून आलेल्या आणि सर्व मतदानपूर्व चाचण्यांनी शंभर टक्के निवडून येण्याची शक्यता वर्तविलेल्या एका कार्यक्षम उमेदवाराला मत न देता त्याच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एका सिनेकलाकाराला मी मत

दिले. आणि चमत्कारिकरीत्या तो सिनेकलाकार निवडून आला! तेव्हापासून माझ्यातील या अदृश्य शक्तीचा सगळीकडे बराच बोलबाला झाला. एका स्थानिक टीव्ही चॅनेलने तर माझी तुलना फुटबॉल वर्ल्डकपचे भाकीत करणाऱ्या ‘पॉल द ऑक्टोपस’बरोबरही केली होती. हे इथपर्यंत सगळं खरं असलं तरी काल युतीच्या उमेदवाराने मला फोन करून आघाडीला मत द्यायला सांगितले आणि आघाडीच्या उमेदवाराने फोन करून मला युतीला मत द्यायला सांगितले. हा कुणीतरी माझी बदनामी करण्यासाठी केलेला कल्पनाविलास आहे!  राखी सावंतसारखाच माझ्या या बदनामीबद्दल मीदेखील (आपल्या औकातीप्रमाणे) २५ पशांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. असो.

सिनेमा आणि खेळाची झळाळी उतरली की राजकारणात जायचे, हे फॅड सेलेब्रिटी लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढू लागले आहे. या सेलेब्रिटींनी राजकारणात जाऊन काही दिवे लावायचे सोडूनच द्या; साधं लोकप्रतिनिधीगृहाच्या अधिवेशनांना हजर राहायलाही त्यांना वेळ नसतो. मागे एकदा राज्यसभेत खासदार नरेश अग्रवाल यांनी सिनेतारका रेखा आणि सचिन तेंडुलकर यांच्या गरहजेरीवर प्रचंड आक्षेप घेतला होता. आणि राज्यसभेत यायचं नसेल तर या दोघांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली होती. काही दिवसांनी कुठेतरी वाचल्यावर मला कळलं की, रेखा नजरेसमोरून दूर झाली की तिचा लाडका कुत्रा रडून-भुंकून हलकल्लोळ माजवतो म्हणून ती त्याला सोडून संसदेत यायचं टाळते. दादू मी म्हणतो, असं असेल तर तिने तिच्या कुत्र्याला घेऊन संसदेत जायला काय हरकत आहे? इमानदार प्राण्यांनी संसदेत जाऊच नये असा काही नियम आहे काय?

दादू, तू आता सक्रिय राजकारणात पडलाच आहेस- आणि राजकारणी माणसाकडे निवडणुकीच्या काळाशिवाय इतर वेळी सामान्य माणसांचं ऐकायला वेळ आणि इच्छा नसते याची पूर्ण कल्पना असल्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने मी तुला काही सल्ला देऊ इच्छितो. पहिली गोष्ट तुला माहिती आहेच की, राजकारणात स्वत:च्या बापावरही भरवसा ठेवता येत नाही. आज तू स्वत:ला ज्या नेत्याच्या देवघरातला शाळीग्राम समजतो, तो नेता तुला आपल्या गोफणीचा गोटा कधी बनवील हे तुझ्याही लक्षात यायचं नाही. म्हणून सावध राहा. दुसरी गोष्ट- आपल्या नेत्यांना आणि नेते होऊ पाहणाऱ्या तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, की तुम्ही कृपया वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाविषयी बोला. इतिहासाचं जे काही व्हायचं होतं ते ऑलरेडी झालेलं आहे. तुम्ही जुना इतिहास नव्याने घडवू नका. इतिहासातून तुम्हाला काही घ्यायचंच असेल तर  झाशीच्या राणीचा तो फेमस डायलॉग थोडासा मॉडिफाय करून घ्या.. ‘मैं झाँसी नहीं दूँगा!’ अरे, निवडणूक असली म्हणून काय झाले? किती ती खोटीनाटी स्वप्नांची गाजरं दाखवायची याला काही मर्यादा आहे की नाही? तुला सांगतो दादू, परवा मी दातांची साफसफाई करण्यासाठी डेंटिस्टकडे गेलो होतो. प्राथमिक तपासणी केल्यावर डॉक्टर म्हणाले, ‘‘इथे येण्याआधी निवडणुकीच्या प्रचारसभेला जाऊन आलात काय?’’ यांना कसे काय कळले म्हणून मी आश्चर्यचकित होऊन आधीच उघडलेला आ अधिकच मोठा केला. तेव्हा डॉक्टर म्हणाले, ‘‘दातांच्या फटीत गाजराचे कण अडकलेले आहेत!’’

हे बघ दादू, मला राजकारणात फारसा रस नसला तरी निवडणुकीचा हंगाम मला मनापासून आवडतो. मला तर असे वाटते, की ग्रामपंचायतीची, झेडपीची, पंचायत समितीची, विधानसभेची, लोकसभेची, गेलाबाजार सहकारी पतपेढीची- कसली न कसली तरी निवडणूक दरवर्षी यावी म्हणजे उमेदवारीचा शेंदूर लावलेले गावोगावचे ‘दगड’ बारमाही मोहोरलेले राहतील. त्यांच्या सलावलेल्या हाताने रस्ते-गटारांची कामे होत राहतील, चॅरिटेबल ट्रस्ट उभे राहतील, मेळावे भरत राहतील, मेजवान्या झडत राहतील, रुग्णवाहिका धावू लागतील. कारण निवडणुका हा एकमेव असा सीझन आहे, जेव्हा पशाला गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होतो आणि तो वरून खाली वाहू लागतो.

दादू, तुला तर माहीतच आहे की, कुणाचेही पाय खेचायची संधी मिळाली की मी हात धुऊन घेतो. मागच्या निवडणुकीत मलाही राजकारणात येण्याची आमच्याकडील स्थानिक नेत्याने ऑफर दिली होती. पण मी म्हटलं की, मला सारखी सारखी माझी मतं, पक्ष आणि नेते बदलता येत नाहीत. नेत्याने खुर्चीसाठी किंवा पशासाठी पक्षांतर केले म्हणून मला पक्षांतर करता येत नाही. दुसऱ्याची अक्कल काढून मला स्वत:चे मोठेपण सिद्ध करता येत नाही. माझ्या नाकत्रेपणाचा दोष मला पन्नास वर्षांपूर्वीच्या नेतृत्वावर ढकलता येत नाही. कुणीतरी सांगितलं म्हणून रोज खांद्यावरचा झेंडा मला बदलता येत नाही. एरिया पाहून मराठी, अमराठी, सेमी मराठी असे रंग बदलता येत नाहीत. म्हणून मी कधीच राजकारणात येऊ शकत नाही. कुणाच्या तरी ओंजळीने पाणी पिण्यापेक्षा मी माझं स्वत:चं मत असलेला स्वतंत्र मतदार आहे तो बरा आहे. सत्ताधारी असो की विरोधक- आपल्याला जे पटत, रुचत नाही त्यावर कुणाला काय वाटेल याची पर्वा न करता बेधडक बोलता येण्याचं माझं स्वातंत्र्य मला अधिक प्यारं आहे. अरे, टीका करणं हा आपला राष्ट्रीय छंद आहे आणि हा छंद जोपासायला मला आवडतं. सरकार कुणाचेही असले तरी मी टीका करतो, तक्रार करतो. पण दादू तुला सांगतो, कधी कधी मला अशी भीती वाटते की, आपल्या या टीकेने उद्या सगळेच पक्ष रुसले आणि म्हणाले, ‘आम्ही नाही सरकार चालवत ज्जा. आता तुझं तूच चालव सरकार!’ तर झेपणार आहे का हे मला? कधी कधी मला असेही वाटते की, उद्या सरकारनेच सांगितले की, ही जनता आमच्या मागण्या पूर्ण करू शकत नाही, आम्हाला समजून घेत नाही. आम्हाला ही जनता बदलून द्या.. तर काय घ्या!

आपल्या राज्यकर्त्यांविषयी मी जरा जास्तच कडवट बोलतो असं माझ्या काही मित्रांचं म्हणणं आहे. पण तू मला सांग, अब्राहम लिंकनला अभिप्रेत असलेली लोकशाही लोकाभिमुख राज्यव्यवस्था आज आपण भूलथापांच्या मशीनने, ईव्हीएम मशीनद्वारे, पशाच्या मशीनसाठी अशी यंत्राभिमुख करून टाकलेली आहे. जगभर पाण्याच्या वाफेवर इंजिन चालतात आणि इथे आम्ही तोंडाच्या वाफेवर अख्खा देश चालवतोय. कित्येक सरकारं बदलली, पक्ष बदलले, नेते बदलले, पण वर्षांनुवष्रे दिली जाणारी आश्वासने तीच आहेत. टाळ्या वाजवणारे आणि मत देणारे आम्ही मतदार तेच आणि तिथेच आहोत. आम्हाला प्रश्न पडत नाहीत, आम्ही प्रश्न विचारीत नाही. आमच्या ब्रेन-डेड प्रेतांच्या झुंडीच्या झुंडी तीच ती आश्वासने वर्षांनुवर्षे पुन:पुन्हा ऐकण्यासाठी प्रचारसभेला गर्दी करीत आहेत. मागच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत त्यांनी स्मशान बांधून देऊ सांगितलं, तेव्हा आम्ही टाळ्या वाजवल्या होत्या. ते प्रेतांचीही सोय करतील असं वाटलं नव्हतं!

तुझा (मतदार यादीतून

नाव गायब झालेला) मित्र..

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com