|| गिरीश कुबेर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐंशीच्या दशकात, पहिल्याच भेटीत अरेतुरेत बोलणारा, १९९४ साली आमदार आणि विरोधी पक्षनेता झालेला मनोहर पुढे मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री झाला. विरोधी पक्षात असताना जपलेला साधेपणा सत्तेतही कायम राखणं जमलं त्याला.. मुलं एकटी असतील म्हणून दररोज घरी जाणारा मनोहर पुढे दिल्लीत एकटा राहिला. आजाराची बातमी कळली.. त्याचा हळवेपणा, मानीपणा, त्याचं व्याकुळ होणं.. हे त्याचं खासगी व्यक्तिमत्त्व अधिक आठवत राहिलं..

पत्रकारिता आणि राजकारणाच्या समांतर प्रवासात तीन प्रकारचे संबंध जुळतात. एक नुसते व्यावसायिक. दुसरे एकमेकांच्या आवडीनिवडी जुळतात म्हणून. आणि आवडीनिवडी जुळतील न जुळतील, पण स्वभावसमीकरणं जुळतात आणि ज्यांची वाटचाल समांतर असते ते तिसरे.

मनोहरशी असलेले संबंध दुसऱ्या-तिसऱ्याचं मिश्रण होते.

१९८८ साली माझी गोव्यात बदली झाली. बातमीदारीसाठी. मनोहर पर्रिकर त्याच सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून पूर्णवेळ राजकारणासाठी भाजपात येऊ घातले होते. पहिली काही पावलं त्यांनी टाकली होती. तो काळ भाजपसाठीही चाचपडण्याचा होता. प्रमोद महाजनांकडे गोव्याची जबाबदारी होती. ते, गोपीनाथ मुंडे वगरे राष्ट्रीय / राज्य स्तरावर मोठे नेते म्हणून उदयाला यायचे होते. त्यावेळी गोव्यात हे सगळेच वारंवार यायचे. बडेजाव, सुरक्षा वगरे काही प्रकारच नव्हता. मी मुंबईतनं गोव्यात गेलेला. त्यामुळे ही मंडळी गोव्यात आली, की अगदी शोधून भेटणं व्हायचं. हेच असे नाही, तर भाजपचे अनेक नेते यायचे. त्यात प्रकाश जावडेकर होते. शरद कुलकर्णी होते. पुढच्या दमाचे कार्यकत्रे, सूत्रसंचालकात हल्ली ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’चा मुख्य असलेला रवींद्र साठे होता. पत्रकारितेची सुरुवात माझी पुण्यात झालेली. प्रकाश जावडेकरांशी तेव्हापासूनचे चांगले संबंध. अजूनही आहेत. त्यामुळे मी गोव्यात गेल्यावर यातलं कोणीही तिकडे आलं, की हमखास गप्पांचे फड रंगायचे. गोव्यात तसंही तेव्हा अंधार पडला की शांतता असायची. विमानंही कमी होती. एक एअर इंडिया/ इंडियन एअरलाइन्सचं विमान होतं. दमानिया, ईस्ट-वेस्ट वगरेंच्या सेवा नंतर सुरू झाल्या. दिवसभराची कामं आटोपल्यावर या सगळ्यांना दुसऱ्या दिवसापर्यंत थांबायला लागायचं. त्यामुळे गप्पा मारत बसण्याखेरीज तसा पर्याय नव्हता. हे सगळेच तेव्हा मान्यवर वगरे व्हायचे होते. त्यामुळे सहज घरीसुद्धा येणं होत असे.

तेव्हा भाजपची सक्रीय मंडळी मोजकीच होती पणजीत. त्यांच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मालकीचं हॉटेल होतं तिथे. महालक्ष्मी देवळापासून जवळच. बहुतेकदा सगळे भाजप नेते याच हॉटेलात मुक्कामाला असायचे. त्याच्या बरोबर समोर तेव्हा माझं ऑफिस. त्यामुळेही भेटीगाठी जास्त व्हायच्या. अशाच एका पत्रकार परिषदोत्तर गप्पांत महाजनांनी ओळख करून दिली.

‘‘हे मनोहर पर्रिकर..’’शुद्ध मराठीत महाजन म्हणाले.

पण गोव्याच्या कोंकणी भाषाशैलीत अहोजाहो नाही.

‘‘किदें म्हंटा.. तू गोंयचो?’’ मनोहरनं विचारलं.

मग कोणकुठला वगरे झालं. गप्पा झाल्या आणि पांगायची वेळ झाली. महाजन, जावडेकर तिथेच राहणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं मुंबईचं विमान होतं. आमच्यात दिलीप देशपांडे होता. तो तिथला आकाशवाणीचा वृत्तविभाग प्रमुख. तो जवळच राहायचा. दुसरा होता प्रकाश कामत. तो तिथे मागेच अल्तिनोवर राहायचा. त्यातल्या त्यात लांबचा मीच. पर्वरीत राहत होतो. ‘‘तूं खंय चल्ला..’’मनोहरनं विचारलं. सांगितलं, ‘‘पर्वरीत.’’

‘‘हांव सोड्ट्ता तुका.’’ मनोहर म्हणाला. त्याचं घर म्हापशात होतं. आम्ही बरोबर निघालो. पहिल्याच भेटीची सुरुवात ही अशी अरेतुरेत झाली आणि शेवटपर्यंत ती तशीच राहिली. वयानं माझ्यापेक्षा तो नऊएक वर्षांनी मोठा. पण तरुण वाटायचा. त्यात त्यानं कधी वयाचं अंतर जाणवू दिलं नाही. त्याच्या वयाचे भाजपच्या, संघातल्या अनेकांशी त्याही वेळी उत्तम संबंध होते. पण औपचारिक गप्पांत संघसंस्कारांचा भाग म्हणून ते सर्व अहोजाहो करायचे. गोव्याची मोकळी पार्श्वभूमी असल्यामुळे असेल, पण मनोहरनं आमच्या अख्ख्या ग्रुपशी कधीही अहोजाहो केलं नाही आणि त्यालाही कोणी ‘अहो पर्रिकर’ असं म्हणालं नाही.

सगळ्यांसाठीच तो मनोहर होता. मनोहरकडे त्यावेळी मोटार होती. बहुतेक ११८ एनई प्रीमिअर कंपनीची. स्वत:च चालवायचा. त्यावेळी मांडवी पूल नव्हता. फेरीतनं नदी ओलांडावी लागायची. त्यामुळे प्रवास जरा लांबायचा. पहिल्याच भेटीत तो आणखी लांबला. एक-दोन फेऱ्या सोडाव्या लागल्या गर्दीमुळे. मनोहरनं जाताना घरापाशी सोडलं. ‘घरी येतोस का?’ विचारल्यावर ‘नको’ म्हणाला- ‘नंतर नक्की येतो.’

त्यानंतर गोव्याच्या वास्तव्यात असंख्य भेटी झाल्या. मनोहर अधिकाधिक कळत गेला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे रमाकांत खलप हे त्यावेळी तिथे आघाडीवर होते. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि ‘मगो’ही फुटला. तेव्हा गोव्यात किरकोळीत सरकारं पडायची. तिथल्या पाच वर्षांच्या वास्तव्यात सात मुख्यमंत्री त्यावेळी पाहिले. काँग्रेस काही प्रमाणात ख्रिस्ती समाजाशीच जोडली गेली होती आणि मगो अस्ताला चाललेला. भाजपच्या वाढीसाठी ती चांगली संधी होती. त्या काळात मनोहर अयोध्येतल्या राम मंदिर आंदोलनात सक्रीय होता. भाजपचं उत्तर गोव्यातलं काम तो पाहायचा. उद्योगपती अशोक चौगुले विश्व हिंदू परिषदेचे राम जन्मभूमी आंदोलनाचे तिथले सूत्रधार होते. ते मडगावला. त्यांच्याकडे मनोहरचं जाणं-येणं होतं. मीही त्याच्याबरोबर अनेकदा चौगुल्यांच्याकडे गप्पा मारायला गेल्याचं आठवतंय. माझ्याकडे त्यावेळी मोटार वगरे असण्याची शक्यता नव्हती. तेव्हा मनोहरची मोटार हेच वाहन. मी त्याला पणजीत भेटायचो आणि येताना मला पर्वरीला सोडून तो पुढे म्हापशाला जायचा. लवकर परतलो तर कधी घरी कॉफी प्यायला यायचा. घरच्यांशी सहज गप्पा व्हायच्या.

बाहेर आमचे विषय असत ते रामजन्मभूमी आंदोलन, आयआयटीतला असूनही मनोहरची या कामावरची निष्ठा. वैयक्तिक आयुष्यात मी इतका धार्मिक नाही.. पण सध्या सामाजिक वातावरणात धार्मिक भूमिका घेणं कसं आवश्यक आहे हे किंवा उच्चशिक्षितांनीच उलट राजकारणात कसं यायला हवं वगरे असं त्याचं म्हणणं. कधी मी म्हापशात गेलो तर तिकडे भेट व्हायची. त्याच्या तेव्हा छोटय़ाशा कारखान्यातही जाणं व्हायचं. हळूहळू मनोहर उत्तर गोव्यात उद्याचा नेता म्हणून स्थिरावत होता.

पण गंमत अशी की, उत्तर गोव्याचाच भाग असलेल्या पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपला उमेदवार नव्हता. भाजपचा जो काही हॉटेलमालक नेता होता, तो तितकंसं अंग मोडून काम करत नाही अशी प्रमोद महाजन यांची शंका होती. ते त्यावेळी आले की अनेकांशी पणजीतला संभाव्य उमेदवार कोण, अशी अनौपचारिक चर्चा करत. या सर्वाकडनं एकाच नावाची शिफारस व्हायची- मनोहर पर्रिकर!

आणि मनोहरला पणजीतनं उमेदवारी मिळाली. १९९४ साली तो आमदार झाला. पहिल्याच फेरीत तो विरोधी पक्षनेता बनला. राजकारणी म्हणून मुळातच त्याचा स्वभाव आक्रमक. त्यामुळे त्यानं सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं. बघता बघता गोवा भाजपचा तो अनभिषिक्त नेता बनला. १९९६ साली माझं गोवा सुटलं. परत मुंबईत आलो. पण गोव्याशी आणि त्यातल्या दोन राजकारण्यांशी संबंध मुंबईत आल्यावरही राहिले. रमाकांत खलप आणि मनोहर पर्रिकर. खलप केंद्रात मंत्री झाले, तेव्हाही मुंबईत आले की किंवा मी गोव्यात वा दिल्लीत गेलो की त्यांची भेट व्हायची. आणि मनोहर मुंबईत आला, की हमखास गप्पा व्हायच्याच व्हायच्या. कधी दादरला स्वामी नारायण मंदिराजवळच्या हॉटेलात. कधी उत्तनला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत किंवा दक्षिण मुंबईत. घरीही यायचा कधी. आला की बायकोला त्याचा पहिला प्रश्न असायचा- ‘‘गोंयात मिळता तशें निस्ते अंगा मिळेना मुगो..’’ ( गोव्यासारखे मासे इथे मिळत नसतील ना तुला?) बायकोमुलींशी तो कोकणीतनंच बोलायचा. माझ्याशी कोंकणी ढंगाच्या मराठीत. आमदार झाला तेव्हाही पहिल्यासारखाच होता. घरच्यांनी त्याच्या साधेपणाचं कौतुक केलं तर तो म्हणाला, ‘‘विरोधी पक्षात असताना साधेपणा सहज जमतो.. सत्ता मिळाल्यावर तो जमायला हवा.’’

त्याला तो जमला. त्यासाठी त्यानं ठरवून प्रयत्न केले. २००० साली तो मुख्यमंत्री झाला, तेव्हा मुद्दाम त्याला भेटायला गेलो. सगळाच जुना ग्रुप त्यावेळी जमला. हे पद आपल्याला मिळायला हवं यासाठी त्यानं आखून प्रयत्न केले. तो योग्य होताच त्यासाठी.

पण पुढच्याच वर्षी त्याची पत्नी गेली. त्यानंतर मनोहरच्या स्वभावातली व्याकुळता राजकारण्यातलं माणूसपण दाखवणारी होती. तेव्हा कुठेही असला तरी रात्री तो घरी गोव्यात परत जायचा म्हणजे जायचाच. मुलांना एकटं वाटू नये म्हणून..

यामुळेही असेल, पण नंतर नंतर त्याच्यातला आग्रहीपणा वाढू लागल्याचं जाणवत गेलं. मित्रमंडळींशी तो पूर्वीसारखाच वागायचा. पण राजकारण्यांशी त्याचं वागणं वेगळं असायचं. विशेषत: कनिष्ठांशी. मुळातला तो प्रभू पर्रिकर. म्हणजे सारस्वत. त्यात आयआयटीतला. प्रचंड अभ्यासू. त्यामुळे अभ्यास नसलेल्यांना तो मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना वागवतात तसा वागवायचा. पत्रकारांतही नवे, बिनअभ्यासू वगरेंना तो शब्दश: कस्पटासमान लेखायचा. अप्रत्यक्षपणे त्याची अशी एक दहशत तयार झाली. त्याला ती आवडायची. जनतेशी एकदम सलोखा. लग्नकार्यात आला की वधू-वरांना भेटायला रांगेतनंच यायचा. एकदा तर मुख्यमंत्री असतानाही तो रिक्षानं उत्तनला निघाला. हे असं वागणं त्याला आवडायचं. आणि त्याच वेळी समव्यावसायिकांशी काहीसं फटकून वागणं. पक्षातले काही त्यामुळे त्यालाच नाही, तर पक्षालाही सोडून गेले. त्याला फिकीर नव्हती. कारण जनता आपल्यावर पुन्हा विश्वास दाखवेल याची त्याला खात्री होती.

ती खोटी ठरली नाही. जनता त्याच्यापाठीशी ठाम होती. त्यामुळे कोणत्याही टीकेची फिकीर करायची गरज नसते, असंच त्याच्या मनानं घेतलं. यावरनं कधी छेडलं तर, ‘‘तू कशाला काळजी करतो.. लोक माझ्या पाठीशी आहेत.’’ कोणत्याही निर्णयासाठी अन्य कोणाशीही चर्चा करायची गरज त्याला कधी वाटायची नाही. त्याचा अभ्यास पक्का असायचा. आणि आत्मविश्वासही. याला बहुधा एकच अपवाद असावा.

२०१४ साली दिल्लीचं निमंत्रण आलं तेव्हा. मुळात गोव्यातल्या नेत्यांना दिल्ली फारशी आवडत नाही. राजीव गांधी पंतप्रधान असताना प्रतापसिंग राणे यांनाही दिल्लीत मंत्रिपद मिळणार होतं; पण ते त्यांनी कसं टाळलं, याच्या कहाण्या तिकडे ऐकल्या होत्या. मनोहरही साशंक होता. पण भाजपच्या गोव्यातल्या अधिवेशनात त्यानं अडवाणींविरोधात तोफ डागली होती. तेव्हा त्यानं दिल्लीत यावं यासाठी पक्षातनं आग्रह होता. मनोहरलाच खात्री नव्हती. तो काहींशी बोलला या संदर्भात. त्याचा आग्रही स्वभाव आणि स्वकेंद्री नेतृत्व याला दिल्लीत काम करताना कशी मुरड घालावी लागेल, असं काहींनी सांगितलं त्याला.

ते भाकीत खरं झालं. दिल्लीत तो एकटा पडला. गोव्यातल्यासारखं मोकळेपणानं वागता येईना त्याला. सुरेश प्रभूंशेजारचा बंगला त्याचा. अगदी लागून. उमा सुरेश प्रभूंचं माहेर गोव्याचं. त्यामुळे त्या घरात तेवढं त्याचं जाणं-येणं असे. जवळचे कोणी एकाकडे गेले की दुसऱ्याकडे डोकावायचेच. एवढय़ा मोठय़ा बंगल्यात मनोहर एकटा असायचा. दिल्लीत भेट झाली की हमखास हे सगळे संदर्भ निघायचे. आणि मनातलं ओठातनं बाहेर काढायची सवय असल्यानं अन्य बोलणंही होत असे. मुंबईतही भेट व्हायची कधी.

दिल्लीतली त्याची अस्वस्थता हळूहळू वाढत गेली. त्यामागे काही कारणं आणि घटनाही असाव्यात. तिथनं त्याचं मन उडालं. पण भाजपातल्या काही ज्येष्ठांनी त्याचं गोव्यास परतणं कसंबसं लांबवलं. पण विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मात्र तो थांबायला तयार नव्हता. तो गोव्यात परतला. पुन्हा मुख्यमंत्री म्हणून. आता त्याच्या वागण्यात थोडा चिडचिडपणाही आला. जराही कोणी सरकारी निर्णयाविरोधात बातमी दिलेली त्याला चालत नसे.

२०१७ साली १६ नोव्हेंबरला पत्रकारितेसंदर्भातल्या सरकारी कार्यक्रमासाठी मला पणजीत जायचं होतं. आदल्या दिवशी सायंकाळी आमचं भेटायचं ठरलं. एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. पण विमानाच्या गोंधळामुळे पोहोचेपर्यंत मध्यरात्र उलटून गेली. त्यामुळे भेटणं जमलं नाही. सकाळी सकाळी त्याचा फोन. ‘‘मी अध्यक्ष आहे, माहितीये ना तुझ्या कार्यक्रमाला?’’ त्यानं विचारलं. मग नेहमीप्रमाणे काहीबाही बोलणं झालं. फोन ठेवताना त्यानं विचारलं, ‘‘तू काय बोलणार?’’

संदर्भ होता त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या गोव्यातल्या खाणी, खनिज वाहतूक, प्रदूषण आणि दुसऱ्याच एका गाजू लागलेल्या विषयाचा. मनोहर त्यावर काही करत नाही, बोलत नाही अशी टीका होत होती. मनोहर नाराज होता. मी म्हटलं, ‘‘मी माझ्या व्यवसायधर्माला साजेसंच बोलणार.’’

कार्यक्रमस्थळी आल्यावर मनोहरनं त्याच्या अधिकाऱ्यांना सांगितल, ‘‘समारंभाचा अध्यक्ष असलो तरी मी आधी बोलेन, मला लवकर जायचंय.’’ भाषणात त्यानं माध्यमांवर, त्यांच्या नकारात्मक वृत्तीवर तोंडसुख घेतलं. नंतर मी म्हटलं, सरकारच्या.. मग ते कोणत्याही पक्षाचं असो.. त्रुटी दाखवून देणं हाच पत्रकारितेचा धर्म आहे. सत्ताधाऱ्यांच्या कृपाप्रसादाची तमा पत्रकारांनी कशी बाळगू नये वगरे वगरे.. ‘‘तू असं बोलणार म्हणूनच मी लवकर गेलो,’’ मनोहरनं लगेच फोन करून बोलून दाखवलं. मी विषय बदलायचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष भेट झाली असती तर ज्यावर बोलणार होतो, त्या विषयाकडे गाडी वळवून पाहिली. पण मनोहरला फारशी इच्छा नव्हती. त्याचा सूर पूर्वीसारखा मनोहर नव्हता.

नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच त्याच्या कर्करोगाची बातमी आली. चर्र झालं. पत्नीच्या कर्करोगानं व्याकुळ झालेला मनोहर सारखा आठवायचा. नंतरचं त्याचं वागणं त्याच्या स्वभावाचं द्योतक होतं. गोव्यातले मित्र त्याच्या आजारातल्या चढउताराच्या बातम्या द्यायचे. पण मनोहरशी बोलण्याचं राहून गेलं. इच्छा नव्हती असं नाही. पण तो बोलेल का नाही, बोलला तर काय बोलेल.. या प्रश्नांची काळजी जास्त होती. आणि या अशा आजारात समोर आलेलं त्याला आवडेल का.. असंही वाटायचं. त्याला भेटून आलेल्या राजकारण्यांकडनं त्याची अवस्था कळायची.

आता त्या सगळ्यातनं त्याची सुटका झाली. तीस वर्षांच्या मनोहर स्नेहसंबंधांचा शेवट मात्र तसा मनोहर झाला नाही.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi article in loksatta lokrang bygirish kuber