मा नवाच्या उत्क्रांतीमध्ये त्याचे द्विपाद होणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्याने लावलेल्या भाषांच्या शोधांचे महत्त्व आहे. आजपर्यंतच्या मानवी विकासामध्ये भाषेचा वाटा मोठा आहे. अशी ही भाषा अचानकपणे भाषा म्हणून आकारत असते. कोणतीही भाषा पूर्वी बोलीच्या रूपातच असते. मराठीला जरी आज भाषेचा दर्जा असला तरी पूर्वी तीही बोलीच्या रूपातच होती. कोणत्याही बोलीमध्ये जेव्हा राज्य कारभार, प्रशासन, वृत्तपत्रे, न्यायव्यवस्था कार्यरत होतात, तेव्हा त्या बोलीला भाषेचा दर्जा प्राप्त होत असतो. त्यामुळे कोणतीही भाषा ही मूळ असते हे जितके खरे आहे, तितकेच ती भाषा जो समाज वापरत असतो तीही बोलीभाषाच असते. कारण कोणतीही व्यक्ती लिहिते तसे भाषिक उच्चारण करत नाही. यासाठी आपण रेडिओ किंवा दूरदर्शनवरील कार्यक्रम बारकाईने ऐकले-पाहिले तर लक्षात येईल की, बोलताना भाषेला एक स्वाभाविक सहजता प्राप्त झालेली असते. तिथे लिखित रूप काही अंशी दुर्लक्षिले जाते. म्हणून बोलताना कोणत्याही प्रमाणभाषेला बोलीभाषेचे रूप प्राप्त झालेले असते.
महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करू लागलो तर खानदेशी, वऱ्हाडी, कोकणी, पुणेरी या मुख्य बोली म्हणून ओळखल्या जातात. कालांतराने पुणेरी म्हणजे मध्यवर्ती बोलीला मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला. पुढे-मागे कोकणीचेही तेच आहे. खानदेशी वगैरे बोली तशाच राहिल्या. या बोलींबरोबरच अलीकडे नागपुरी, झाडी, चंदगडी, मराठवाडी, कोल्हापुरी असे विविध बोलींचे संदर्भ पुढे येऊ लागले आहेत. या बोलींमधून साहित्य लिहिले जाऊ लागले तसेच त्यांचे संशोधनही सुरू झाले. डेक्कन येथील भाषा विभागाने पूर्वी बोलींचे संशोधन करून ठेवले आहे. अलीकडेच गणेश देवी यांनी महाराष्ट्रातल्या विविध बोलींच्या सर्वेक्षणाचा ग्रंथही प्रकाशित केला आहे. शासकीय स्तरावरही काही ग्रामीण-दलित बोलींच्या शब्दकोशांचे काम सुरू आहे. हे उपक्रम स्तुत्य आहेत. बोलींचे महत्त्व या उपक्रमामधून लक्षात येते.
परंतु सभोवताली नजर टाकली तर मात्र चित्र निराशाजनक आहे. इंग्रजीचे वाढते आक्रमण (खरं तर आक्रमण म्हणण्यात काहीच अर्थ नाही. ती आता ज्ञानभाषा आणि संपर्क भाषा झाल्यामुळे तिची अपरिहार्यता नाकारता येणार नाही.) आणि इंग्रजी शिक्षणाचा वाढता कल लक्षात घेता मराठी बोलींचे भवितव्य धोकादायक बनले आहे. इंग्रजीचे आक्रमण म्हणण्याचे कारण असे की, आपण इंग्रजीकडे एका आक्रमक, उच्चभ्रूच्या आणि दर्जाच्या दृष्टिकोनातून आजही पाहतो आहोत. इंग्रजीपेक्षा मराठी आणि मराठीपेक्षा तिच्या बोली कनिष्ठ अशीच इतरंड आजही आपल्या मनात पक्की आहे. ती जाईपर्यंत इंग्रजीच्या आक्रमणाची भीती आहेच. ती नाहीशी होणे गरजेचे आहे.
मुद्दा आहे तो बोलींचा. त्या टिकतील का? आणि त्या टिकवाव्यात का? तर याचे उत्तर आहे- त्या टिकतील पण मूळ स्वरूपात नाही. नव्या बोलींना किंवा भाषांना जन्म देऊन जुन्या बोली हळूहळू नष्ट होतील. काही छोटय़ा समूहांच्या बोली संपल्याही आहेत. हे बोली संपणे म्हणजे सांस्कृतिक विविधता नष्ट होणे. म्हणून बोली टिकवाव्यात का, असा जो दुसरा प्रश्न आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि त्याचे उत्तर त्या टिकवाव्यात असेच आहे. कारण कोणतीही बोली ही केवळ बोली नसते. तर ती त्या त्या समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक वारशाचे अविभाज्य अंग असते. समाजाच्या रूढी-परंपरा, त्यांनी जतन केलेले सांस्कृतिक संचित त्या त्या बोलींमध्येच समाविष्ट असते. तेव्हा एखादी बोली संपुष्टात येणे म्हणजे त्या समाजाची संस्कृती, जगण्याची रीती संपुष्टात येणे. इंग्रजांनी आपली संस्कृती लादताना आदिवासींची गोटुल परंपरा जशी संपुष्टात आणली तशी त्यांच्या बोलीभाषाही आजच्या जागतिकीकरणात संपुष्टात येऊ लागलेल्या आहेत. दुर्दैवाने असे झाले तर मग आपण आपल्याच एका समृद्ध आणि संपन्न वारशाला मुकणार आहोत. आणि हे उद्याच्या भारतासाठी किंवा महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे. आजच मराठीतले नातेवाचक शब्द संपुष्टात येऊ लागले आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की मराठी माणूस संकुचित बनू लागला आहे.
जगभरातले बहुतेक भाषातज्ज्ञ प्राथमिक शिक्षण त्या मुलाच्या मातृभाषेतूनच मिळायला हवे यावर ठाम आहेत. कारण त्यातूनच त्याचा भाषिक पिंड, विचार करण्याची क्षमता अधिक समृद्ध होत असते. असे असूनही आपण मुलांच्या समृद्ध होण्यालाच नकार देत आहोत. आणि ही समृद्धी संपली तर उद्या आपण नव्या गुलामीत असू. बोली संपणे याचा अर्थ मराठीची समृद्धी कमी करणे आहे. कोणतीही बोली त्या त्या भाषेला समृद्ध आणि संपन्न बनवण्याचे काम करत असते. ती प्रक्रियाच जर थांबली तर बोलींचे नष्टचर्य त्यांच्यापुरते न राहता ते मराठीच्या नाशालाही कारणीभूत ठरू शकते. मराठी धोक्यात येणे याचा अर्थ आपली सगळी अस्मिताच धोक्यात येणे, हे ध्यानात घेण्याची गरज आहे. बोलींच्या चिऱ्यांनी मराठीचा वाडा उभा आहे. एकेक चिरा ढासळला तर कडा ढासळायला वेळ लागणार नाही. वाडा ढासळला की आपले काय? तेव्हा घरात, स्वयंपाकघरात, गावात, अनौपचारिक गप्पांत तरी आपण आपल्या बोली जिवंत ठेवून मराठीला समृद्ध करणे आणि मराठी संस्कृती वृद्धिंगत करणे आपल्याला शक्य आहे. आणि हीच बोलीची खरी ‘भाषा’ आहे.
(समाप्त)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा