भूषण कोरगांवकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठी राजभाषा दिनानिमित्ताने आपण नुसताच अस्मितेचा वार्षिक सोहळा साजरा करायचा की नदीच्या प्रवाहासारख्या बहरणाऱ्या आपल्या भाषेसाठी प्रत्यक्ष काही कृती करायची, हे मुद्दे उपस्थित करणारे दोन लेख. एक रोजच्या जगण्यातील व्यवहारांविषयीचा तर दुसरा वाचन व्यवहारात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नियतकालिकांच्या सद्य:स्थितीची थोडक्यात कल्पना आणून देणारा..

भाषेच्या विकासाबद्दल आणि भवितव्याबद्दल एक नियम असा की, जी भाषा बोलल्याने प्रेम, प्रतिष्ठा आणि पैसा मिळतो ती भाषा समृद्ध होत टिकून राहते.

‘मराठी असे आमुची मायबोली..’ माधव जूलियन यांनी महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या आधी लिहिलेली ही एक महत्त्वाची कविता. राजभाषा झाल्यास मराठीच्या दिव्य यशाची कवीला आशा होती. ती आज कितपत सत्यात उतरलेली दिसते? ती तशी उतरावी म्हणून मराठी भाषक लोक नक्की काय प्रयत्न करतायत? सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्टय़ा पुढारलेल्या लोकांच्या (आणि त्यांना श्रेष्ठ मानल्याने त्यांचं कळत नकळत अनुकरण करणाऱ्या इतरांच्या) वागण्यात मराठीच्या सर्वागीण विकासाला खीळ घालणाऱ्या काही गोष्टी आहेत का? या सगळय़ाचा हा थोडक्यात आढावा. 

‘.. हिला बैसवू वैभवाच्या शिरी’ – त्याच चुका करून?

कुठलीही भाषा जितकी वापरात राहील तितकी बहरते. तिचा वापर कमी करणाऱ्या या तीन प्रमुख गोष्टी, ज्या बदलणं आपल्या हातात आहे. 

१. घरी लहान मुलांशी इंग्रजीत बोलणं- मुलांना इंग्रजी माध्यमात घालण्याचं प्रमाण सर्वत्र वाढलेलं आहे. प्रत्यक्षात इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊनही मराठीशी नाळ जुळून राहू शकते; परंतु जर त्यांच्याशी फक्त इंग्रजीतच बोललं गेलं तर ती निश्चितपणे तुटून जाते. आणि ही गोष्ट करणारा एक मोठा गट शहरी भागातून दिसून येतो. अशा घरातल्या मुलांना मराठी धड बोलताही येत नाही, मग पुस्तकं वाचणं, नाटक-सिनेमे पाहणं दूरच राहिलं. या घरांमधून मराठीचा वापर लवकरच संपणार हे नक्की.

२. अमराठी लोकांच्या मराठी बोलायच्या प्रयत्नांना दाद न देणं- घराबाहेर पडल्यावर मराठी न वापरण्याचा कल आज मुंबईबाहेरही पसरलेला  दिसतो. महाराष्ट्रातल्या छोटय़ा छोटय़ा शहरांमध्ये, गावांमध्ये गेल्या पंधरा-एक वर्षांत हिंदीने मुक्त प्रवेश केलाय. हे काही अंशी अपरिहार्य आहे. म्हणजे बांधकामासाठी किंवा बदलीच्या नोकरीवर एक-दोन वर्षांसाठी आलेल्या लोकांना मराठी शिकायला पुरेसा वेळ नसतो; पण त्यातले काही जण जेव्हा ती बोलायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना आपण, विशेषत: मुंबईकर, कितपत प्रोत्साहन देतो? मराठीबद्दल वाटणाऱ्या लाजेमुळे, सगळय़ांनी आपल्या पद्धतीची मराठीच बोलली पाहिजे या अट्टहासामुळे किंवा समोरच्याला मराठी शिकवायच्या आळसामुळे  आपण त्यांना मराठीपासून दूर लोटतो का?

डॉ. मित्रु नावाच्या एका तेलुगू मुलाचा अनुभव बोलका आहे. भाषेची आवड असल्यामुळे अहमदनगरला पोिस्टग झाल्यावर तो लगेच मराठी शिकला; पण मुंबईत आला तेव्हा त्याच्यासोबत एकही व्यक्ती मराठीत बोलेना. ‘‘हॉस्पिटलमधल्या मावश्या आणि एक-दोन नर्स फक्त बोलायच्या. बाकीच्यांना सतत सांगूनबी काही फायदा झाला नाही. ते त्यांच्या-त्यांच्यात मराटी बोलायचे पन  माझ्यासंग इंग्लिश नाही तर हिंदीच.’’ मुंबईत मित्रुसारखा अनुभव अनेकांना येतो.

३. आपल्याहून वेगळय़ा ढंगाच्या मराठीला कमी लेखणं, चुका काढणं, हसणं आणि ती बोलणाऱ्यांचे कळत-नकळत अपमान करणं-  भाषेच्या बाबतीत घडणारी ही अजून एक गोष्ट. exclusive बनवून, तिच्या विशिष्ट स्वरूपालाच प्रतिष्ठा देण्याची वृत्ती. ती ‘शुद्ध’ करण्याच्या आणि ठेवण्याच्या नादात उलट ती अधिकाधिक पुस्तकी, एकसाची बनून आक्रसली जाते. मुंबई- पुण्यात राहणारे आणि प्रमाण मराठी बोलणारे लोक याबाबतीत कसे वागतात?  

 कुठल्याही ग्रामीण किंवा (इतर) शहरी भागांतून मुंबई-पुण्यात येणाऱ्यांची मराठीच्या बाबतीत एक मोठी पंचाईत होते. त्यांच्या भाषेला तिथल्या मातीचा गंध असतो. प्रमाण भाषेची कितीही अत्तरं फवारली तरी तो अधूनमधून जाणवतोच- जो इथल्या लोकांना जराही सहन होत नाही. मग पाठीमागून कुत्सित हसण्यापासून ते तोंडावर खिल्ली उडवण्यापर्यंत त्यांना खाली पाडण्याचे सगळे उपाय करून होतात.

‘‘पुण्या-मुंबईच्या लोकांनी भाषेवरनं, उच्चारांवरनं गंमत म्हणून केलेली थट्टा जिव्हारी लागायची. तोंडातून एकही शब्द काढणं नकोसं वाटायचं,’’ अभिनेत्री किरण खोजे सांगते. ‘‘प्रमाण भाषा अंगवळणी पडेपर्यंत तो एक मोठा स्ट्रेसच होऊन  बसला होता.’’

शहरात येऊनही आपला गावचा ढंग टिकवणारे उमेश जगताप, पूर्णानंदसारखे नट फार कमी आहेत. काही जणांना हे दोन्ही ढंग लीलया जमतात; पण कित्येक मुलं-मुली, एकदा शहरी भाषा शिकली की पुन्हा गावच्या ढंगात बोलायला लाजतात. काहींची सवय मोडते. यामुळे किती ढंग, किती बोली लोप पावल्या असतील याची गणतीच नाही आणि हे सगळं जर एका नैसर्गिक गतीने झालं तर ठीक; पण दुर्दैवाने बऱ्याच वेळेस ते असं दुसऱ्याला खिजवून होत असतं.

कितीही प्रयत्न केले तरी काही जणांना ‘ण’चा उच्चार नाहीच जमत. अर्थशास्त्रात डॉक्टरेट केलेली एका नामवंत कॉलेजमध्ये शिकवणारी सोनाली पवार त्यापैकीच एक. ‘‘आजकाल मी मराटी बोलतच नाही. ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांच्याशी हिंदी. एक वेळ घमंडी म्हनून घेनं परवडलं पन कुनी आपल्याला घाटी बोललं, आपली लायकी काढली की लई त्रास होतो.’’

उत्तम इंग्रजी बोलणारे असे अनेक सोनाली, मित्रु मराठीपासून दूर चाललेत.

‘..जरी भिन्न धर्मानुयायी असू’ – हे चित्र कधी बदललं?

मराठी भाषा ही (भारतातल्या इतर सर्व भाषांप्रमाणेच) सर्व धर्मीयांची भाषा आहे. हिंदू बहुसंख्य असले तरी इथले मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, जैन- जे जे मूळचे या मातीचे आहेत, त्यांची मातृभाषा मराठीच होती. 

‘‘आमचं गाव मुंबई, आमची भाषा मराठी हे आपल्या लोकांना अजूनपण माहिती नाही,’’ बोरिवलीचा बेंजामिन रॉड्रिग्स सांगतो, ‘‘आम्ही शुद्ध मराठीत बोलायला सुरुवात केली तरी आमची नावं ऐकताच समोरचे लोक लगेच इंग्रजीकडे वळतात. आम्हीही मराठीच आहोत हे सांगून सांगून थकलो आता.’’ अगदी गोवा, मंगलोर इथले कित्येक कॅथलिक लोकही उत्तम मराठी बोलतात. त्यांनासुद्धा हाच अनुभव येतो.

मुसलमानांची परिस्थिती तर अजूनच वेगळी. किनारपट्टीवरचे, विशेषत: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातले लोक पूर्वीपासून कोकणी बोलत आले आहेत. ही मराठीचीच एक बोली, गोंयची कोंकणी नव्हे. घाटावरचे, देशावरचे मुसलमान जरी उर्दू (दखनी) बोलत असले तरी त्या बोलीवरची मराठमोळी छाप उघडपणे दिसून येते. ही हिंदी-मराठी अशी मिश्र भाषाच खरं तर. त्यांच्या खाण्या-पिण्यावर, संस्कृतीवर असलेला मराठी शिक्का जाणवतो आणि तरीही मुसलमान म्हटलं की बहुसंख्य हिंदूंना ते ‘परके’ वाटतात. आज तर हा द्वेष शिगेला पोहोचलेला आहे. पूर्वी मुसलमान म्हणजे गावातल्या अठरापगड जातींतले एक होते. आता ते ‘परधर्मी’, ‘शत्रू’ झाले आहेत.

‘‘आम्ही मराठी मीडियममधून शिकलो. मराठी भाषा मला आवडते. आमचीच भाषा आहे ती; पण पाकिस्तान जिंकलं की, ‘तुम्ही’ लोक फटाके फोडता का, असं शाळेत कुणी विचारलं की तडफड व्हायची. महाराजांचा इतिहास शिकताना म्लेंच्छ शब्द आला की पोरं फिदीफिदी हसायची. नको नको व्हायायचं,’’ सरकारी नोकरदार समीर शेख सांगतो. ‘‘मुलांना शाळेत घालताना हा पण एक विचार करावा लागतो. इच्छा असूनही मराठी वातावरणातल्या शाळेत घालायला मन झालं नाही, कारण तिकडे असं रॅगिंग होण्याची शक्यता जास्त. इंटरनॅशनल स्कूल्समध्ये धर्मावरून पटकन कुणी बोलत नाही. त्यामुळे ते सेफ वाटलं.’’

‘Divide and rule’ ही इंग्रजांनी सुरू केलेली पॉलिसी भारतीय राजकारण्यांनी उचलून धरली आणि त्या झाडाला लागलेली फळं आज चांगलीच फोफावली आहेत. याबाबतीतला उत्तर प्रदेशातल्या एका शहरातला अनुभव आवर्जून सांगावासा वाटतो. तिथल्या महाराष्ट्र मंडळात वाजवी दरात मराठी भाषक लोकांच्या राहण्याची सोय केली जाते; पण तिथे सध्या फक्त हिंदू मराठी लोकांनाच प्रवेश आहे.

‘‘.. आमचा नवीन नियम कडक आहे हा,’’ तिथल्या व्यवस्थापक बाई सांगत होत्या, ‘‘मराठी बोलणारे मुसलमान, ख्रिश्चन प्रवासी बरेच येतात; पण आता आम्ही त्यांना सरळ नाही म्हणून सांगतो. खूप वाईट अनुभव आले. म्हणून हा नियम बनवला आम्ही.’’

बाईंनी त्यांचे अनुभव शेअर केले. ते खरंच भयंकर होते. घाण करणारी, पैसे बुडवणारी, गुन्हेगारी वृत्तीची बरीच माणसं तिथे राहून गेली होती. त्यामुळे आधार कार्ड मागणं, सगळे पैसे आधीच घेणं हे त्यांचे नवीन नियम योग्यच होते; पण फसवणाऱ्यांची सगळी नावं हिंदू मराठीच वाटली. त्यामुळे मी विचारून खात्री करून घेतली.  

‘‘हो, पण अहो, आपलेच लोक अशी निघतात मग परक्यांची खात्री कोण देणार?’’

‘‘चांगली गोष्ट आहे. फक्त मग मंडळाचं नाव बदलून ते ‘हिंदू मराठी मंडळ’ असं करा म्हणजे झालं.’’

‘‘त्याची काय गरज? मराठी म्हणजे हिंदूच!’’

या अज्ञानावर आणि आडमुठेपणावर काय बोलणार?

अजून एक अनुभव २०१७ साली नोकरीनिमित्त युरोपात स्थायिक झालेल्या सांगलीच्या एका मुसलमान मुलीचा आणि तिच्या भावाचा. तिकडे गेल्या गेल्या nostalgic होऊन त्यांनी तिथल्या महाराष्ट्र मंडळाला भेट दिली; पण नाव ऐकताच त्यांचं स्वागत अगदी कोरडं झालं. ‘हे’ इकडे कशाला आलेत? हा प्रश्न त्यांच्या वागण्यातून कधी हटलाच नाही. शेवटी त्यांनी मंडळात जाणं बंद केलं.

मागे फेसबुकवर कुणी तरी महाराष्ट्रातल्या एका सुप्रसिद्ध टीव्ही कार्यक्रमाबद्दल पोस्ट केली होती. या कार्यक्रमातले होस्ट लोकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारतात, छोटय़ा स्पर्धा घेऊन त्यांना बक्षिसं देतात. त्या पोस्टवर एका मुस्लीम मुलीने लिहिलं होतं की, तिच्या आईची खूप इच्छा असल्यामुळे तिने यात भाग घेण्यासाठी त्या चॅनलशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कित्येक दिवस काहीच ठोस रिस्पॉन्स मिळाला नाही. पण त्यांच्याच शेजारच्या सोसायटीतल्या हिंदू बाईच्या घरी मात्र पुढच्याच महिन्यात ती टीम येऊन गेली.

‘‘या चॅनलला मुस्लिम घरांची अ‍ॅलर्जी आहे का?’’ या तिच्या कमेन्टवर ठाण्याच्या एका मराठी ख्रिश्चन माणसाने, लातूरच्या एका बौद्ध माणसानेही असाच अनुभव आल्याचं नोंदवलं होतं. 

ही सगळी ‘परधर्मी’ मंडळी, त्यांची पुढची पिढी हळूहळू मराठी भाषेपासून, मराठी संस्कृतीपासून दूर झाली तर त्याचा दोष कोणाला द्यायचा?

धार्मिक तेढ तितकीच तीव्र असली तरी इतर राज्यांमधून मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मीयांची भाषिक अस्मिता ज्वलंत आहे. तिथल्या सिनेमांमधून, मालिकांमधून त्यांचं अस्तित्व दिसत राहतं. मग महाराष्ट्रातच हा भेद भाषिक पातळीपर्यंत का उतरावा?  

भाषा ही एकमेकांना जोडण्याचं माध्यम असते. ती तोडण्याचं कधीपासून झाली? अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर प्रयत्न केले तर बदल नक्कीच शक्य आहे.

‘प्रभावी हिचे रूप चापल्य देखा..’ – नवा जमाना, नवी आशा ..आणि हा बदल होतोय. सोशल मीडिया क्रांतीमुळे आज यूटय़ूब, इन्स्टाग्रामवरून महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशभरातली, जगभरातली मंडळी घराघरांत पोहोचतायत. त्यात प्रमाण मराठीतली चॅनल्स आहेत तशी वेगवेगळय़ा बोलीभाषेतलीही आहेत. यातली कित्येक चॅनल्स तुफान लोकप्रिय झालीयेत. काही चॅनल्सचा दर्जाही उत्तम आहे. 

यात अगदी इस्रायलमध्ये राहणाऱ्या ज्यू व्यक्तींपासून, तंजावरमधले, मैसूरमधले, भोपाळमधले, दिल्लीतले, अमेरिकेतले, युरोपातले असे सगळीकडचे मराठी आहेत. वसईच्या सामवेदी आणि वाडवळ ख्रिश्चन, हिंदू समाजापासून, कुल्र्याचे ईस्ट इंडियन, कोकणी मुस्लीम, आगरी, कोळी, कुणबी, आदिवासी, सारस्वत, सीकेपी, ब्राह्मण, क्षत्रिय, मराठा, शेतकरी, धनगर, माळी, सुतार, गोंधळी – असे बरेच आहेत. खानदेशी गाणी, नाटकं आहेत, तशी मालवणी, संगमेश्वरी, वऱ्हाडी, कोल्हापुरी, सोलापुरी – अगदी प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांची चॅनल्स आहेत. मुख्य म्हणजे यातली तरुण पिढी मोठय़ा सहजतेने आणि अभिमानाने स्वत:च्याच ढंगात बोलते, आपल्या बोलीभाषेची, विशिष्ट शब्दांची, खाण्या-पिण्याची, नाच-गाण्याची, कला-कसबीची, जवळच्या पर्यटनस्थळांची माहिती देते. या क्षेत्रात लोकप्रियता आली की पैसा येतो आणि म्हणूनच यातली बरीच मंडळी आज टिकून आहेत, नवीन नवीन प्रयोग करत आहेत. टीव्ही, सिनेमाच्या जोडीला आज ओटीटी प्लॅटफॉर्मवरसुद्धा अनेक प्रकारच्या बोलींना मागणी आहे. मराठीची मक्तेदारी मूठभर लोकांकडून समाजात दूरवर पसरल्याचं हे चित्र आशादायक आहे.

पण मराठीला या मूठभर लोकांचीही गरज आहे. कारण अशा अनेक मुठी मिळूनच समाज बनत असतो. इतकी वर्ष यातल्या दुबळय़ा मुठी झाकून ठेवून, चिरडून जे झालं ते आपण पाहतोच आहोत. आता सर्व मुठींनी गुण्यागोविंदाने एकत्र नांदायची गरज आहे.  

आपण आपली भाषा अधिकाधिक समृद्ध, सशक्त आणि सर्वसमावेशक करायचा निर्धार करू या. वेगळेपणाचं महत्त्व लक्षात घेऊन, थोडं सजग होऊन वागण्यात बदल केले आणि आपणच आपल्या भाषेला आणि भाषिकांना थोडं प्रेम, थोडी प्रतिष्ठा दिली तर हे सहज शक्य आहे. सर्वाना मराठी दिनाच्या अनेक शुभेच्छा!

 bhushank23@gmail.com