सुप्रिया देवस्थळी

एखाद्या वाघिणीवर पूर्ण पुस्तक- तेही मराठीत लिहिलं जाऊ शकतं यावर माझा विश्वास बसला नसता. पण एका वाघिणीवर लिहिलं गेलेलं आणि हातात घेतल्यावर पूर्ण वाचल्याशिवाय बाजूला ठेवावंसं न वाटणारं एक पुस्तक अलीकडेच वाचलं. अनंत सोनवणे यांचं ‘एक होती माया’ महाराष्ट्रातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची अनभिषिक्त राणी माया या वाघिणीची जीवनकहाणी आहे. आपल्यापैकी अनेकांनी ताडोबा अभयारण्यातल्या माया या वाघिणीबद्दल ऐकलं असेल आणि अनेकांनी तिला ताडोबामध्ये मनसोक्त पाहिलंही असेल. या मायाची अद्भुत जीवनकहाणी लेखकाने या पुस्तकात चितारली आहे. जंगलातल्या कहाण्या रोमहर्षक असतातच त्यातही वाघाच्या कहाण्या म्हणजे काय विचारायलाच नको. या पुस्तकात लेखकाने मायाची आई लीला हिच्या व्यक्तिमत्त्वापासून सुरुवात केल्यामुळे मायामध्ये आईचे गुण कसे उतरले आणि आईच्या अकाली मृत्यूनंतर मायाने तिच्या साम्राज्यावर स्वत:ची निरंकुश सत्ता कशी स्थापन केली हे वाचायला खूप मजा येते. मायाचा प्रदेश खूप मोठा आणि समृद्ध होता. त्याचं रक्षण करणं आणि तेही १० वर्षं हा मायाचा आव्हानात्मक आणि संघर्षमय प्रवास वाचलाच पाहिजे. माया ही साहसी वाघीण होतीच, पण ती धोरणी होती आणि म्हणूनच ती आपला प्रदेश जास्त हाणामाऱ्या न करता टिकवू शकली हे मायाच्या व्यक्तिमत्त्वाचं चित्रण महत्त्वाचं आहे. आपल्या कोवळ्या पिल्लांना जपण्यासाठी एकाच वेळी एकापेक्षा जास्त नरांशी संबंध ठेवणं किंवा मटकासुराच्या आक्रमकतेला काबूत आणण्यासाठी गब्बर या आपल्या पूर्वीच्या प्रियकराला जवळ करणं… या सगळ्यातून मायाची स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट स्किल्स दिसतात, हे अनंत सोनवणे आपल्याला छान समजावतात. मायानं जे नरबळी घेतले त्याबद्दलचं विवेचन प्रत्यक्षात वाचलं पाहिजे. मायावर नितांत प्रेम करणाऱ्यांनाही तिच्याकडून मनुष्य प्राणी मारले गेले तेव्हा धक्काच बसला होता. पण ते तिने मनुष्याच्या रक्ताची चटक लागल्याने केलेले वध नव्हते किंवा ऊठसूट मनुष्य प्राण्यांवर हल्ला करण्याच्या वृत्तीतून केलेले नव्हते.

loksatta lokrang Andhra Pradesh and Telangana have a rich tradition of chess
आदर्श घ्यावा असा…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Dommaraju Gukesh Ding Liren World Chess Championship Match Entertainment news
दक्षिणी दिग्विजयाचा अर्थ…
Cabinet Portfolio Allocation
Cabinet Portfolio Allocation : मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; कोणतं खातं कोणाकडे? वाचा संपूर्ण यादी
Loksatta lokrang Hindustani Classical Music Zakir Hussain Music Tabla Playing 
झाकीरभाई…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Lokstta lokrang Journalism Law Director Documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले:  कॅमेरा अँगल आणि जंपकट्स पलीकडले…
nexus book author noah harari interview
हवे आहेत बोअरिंग राजकारणी आणि बोअरिंग बातम्या…!

वाघिणीच्या जीवनावरचं पुस्तक म्हणजे त्यात वाघिणीचे फोटो असणार यात काहीच नवल नाही. पण वाघिणीचे शिकार करतानाचे फोटो, आपल्या पिल्लाबरोबर लडिवाळपणे खेळतानाचे फोटो ही वाचकांसाठी पर्वणी आहे. वाघ हा जंगल परिसंस्थेच्या सर्वोच्च स्थानी असतो. त्याचे जंगलातल्या इतर प्राण्यांशी असणारे व्यवहार, माणूस आणि जंगल यांच्यातल्या संघर्षाचा वाघांच्या वागण्यावर होणारा परिणाम याबद्दलही मायाच्या निमित्ताने अतिशय संयत विवेचन या पुस्तकात आलं आहे. पुस्तकातल्या वेगवेगळ्या गोष्टींना जी शीर्षकं दिली आहेत तीही बोलकी आहेत. ‘दिसली का?’, ‘सैरभैर’, ‘काळा दिवस’, ‘खोडकर’ ही काही उदाहरणं. पण सर्वांत उत्तम शीर्षक आहे ‘गायब’. साधारणत: ऑक्टोबर २०२३ नंतर माया कोणालाच दिसली नाही. तिच्या मृत्यूचेही काही पुरावे नाहीत. त्यामुळे ‘गायब’ हेच समर्पक शीर्षक.

मायाने अनेक पर्यटकांना दर्शन दिलं, अनेक छायाचित्रकारांना तिच्या फोटोंमुळे अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली, पण यापुढे जाऊन मायाने ताडोबामधल्या पर्यटनाला चालना दिली हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या पुस्तकात आलेला आहे. हे पुस्तक वाचल्यावर वाघांबद्दल ममत्व वाटेलच, पण जंगलाबद्दल आणि तिथल्या मौलिक ठेव्याबद्दलही आस्था वाटेल हे नक्की. या पुस्तकाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक जितेंद्र रामगावकर यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रस्तावनेतून त्यांची जंगल आणि जंगल परिसंस्थेबद्दलची आस्था आणि कळकळ जाणवते.

‘एक होती माया’, – अनंत सोनावणे, रेणुका पब्लिकेशन्स, पाने- १५६, किंमत- ४५० रुपये.

supsdk@gmail.com

Story img Loader