एखाद्या वाघिणीवर पूर्ण पुस्तक- तेही मराठीत लिहिलं जाऊ शकतं यावर माझा विश्वास बसला नसता. पण एका वाघिणीवर लिहिलं गेलेलं आणि हातात घेतल्यावर पूर्ण वाचल्याशिवाय बाजूला ठेवावंसं न वाटणारं एक पुस्तक अलीकडेच वाचलं. अनंत सोनवणे यांचं ‘एक होती माया’ महाराष्ट्रातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची अनभिषिक्त राणी माया या वाघिणीची जीवनकहाणी आहे. आपल्यापैकी अनेकांनी ताडोबा अभयारण्यातल्या माया या वाघिणीबद्दल ऐकलं असेल आणि अनेकांनी तिला ताडोबामध्ये मनसोक्त पाहिलंही असेल. या मायाची अद्भुत जीवनकहाणी लेखकाने या पुस्तकात चितारली आहे. जंगलातल्या कहाण्या रोमहर्षक असतातच त्यातही वाघाच्या कहाण्या म्हणजे काय विचारायलाच नको. या पुस्तकात लेखकाने मायाची आई लीला हिच्या व्यक्तिमत्त्वापासून सुरुवात केल्यामुळे मायामध्ये आईचे गुण कसे उतरले आणि आईच्या अकाली मृत्यूनंतर मायाने तिच्या साम्राज्यावर स्वत:ची निरंकुश सत्ता कशी स्थापन केली हे वाचायला खूप मजा येते. मायाचा प्रदेश खूप मोठा आणि समृद्ध होता. त्याचं रक्षण करणं आणि तेही १० वर्षं हा मायाचा आव्हानात्मक आणि संघर्षमय प्रवास वाचलाच पाहिजे. माया ही साहसी वाघीण होतीच, पण ती धोरणी होती आणि म्हणूनच ती आपला प्रदेश जास्त हाणामाऱ्या न करता टिकवू शकली हे मायाच्या व्यक्तिमत्त्वाचं चित्रण महत्त्वाचं आहे. आपल्या कोवळ्या पिल्लांना जपण्यासाठी एकाच वेळी एकापेक्षा जास्त नरांशी संबंध ठेवणं किंवा मटकासुराच्या आक्रमकतेला काबूत आणण्यासाठी गब्बर या आपल्या पूर्वीच्या प्रियकराला जवळ करणं… या सगळ्यातून मायाची स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट स्किल्स दिसतात, हे अनंत सोनवणे आपल्याला छान समजावतात. मायानं जे नरबळी घेतले त्याबद्दलचं विवेचन प्रत्यक्षात वाचलं पाहिजे. मायावर नितांत प्रेम करणाऱ्यांनाही तिच्याकडून मनुष्य प्राणी मारले गेले तेव्हा धक्काच बसला होता. पण ते तिने मनुष्याच्या रक्ताची चटक लागल्याने केलेले वध नव्हते किंवा ऊठसूट मनुष्य प्राण्यांवर हल्ला करण्याच्या वृत्तीतून केलेले नव्हते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा