lr16कवाङ्मयगृहाने २००१ साली ‘आजची कविता’ या उपक्रमांतर्गत आठ नव्या, तेव्हा अपरिचित असलेल्या आणि समकालीन जाणिवा दमदारपणे व्यक्त करणाऱ्या कवींचे कवितासंग्रह प्रकाशित केले होते. तो उपक्रम लक्षवेधी ठरला होता.  आताही लोकवाङ्मयगृहाने काही नव्या आणि सकस कविता लिहिणाऱ्या कवींचे संग्रह ‘आरंभ कविता’ या उपक्रमांतर्गत प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेतील ‘जगण्याची गाथा’ हा सिंधुदुर्ग जिल्हय़ातील मोहन कुंभार या तरुण कवीचा एक अतिशय ताजा आणि दर्जेदार कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केला आहे.
मराठी कवितेत नव्वदोत्तर उत्तर-आधुनिक कवितेने एक नवा प्रवाह निर्माण केला आहे. नव्वदनंतरच्या कालखंडात खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाने साऱ्या जगाचा चेहरामोहराच बदलून lr14टाकला.  मानवी जीवनाचं वस्तूकरण, बाजारीकरण आणि व्यापारीकरण झालं. त्याचे मोठे आíथक, सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचे परिणाम समाजजीवनावर झाले. त्याचबरोबर इथल्या माणसांवर, मानवी संस्कृतीवर, मूल्यव्यवस्थेवरही त्याचे खोलवर व दूरगामी परिणाम होताना दिसत आहेत. चंगळवादी आणि माध्यमे-प्रभावित संस्कृतीने माणसाची नतिक बठकही काढून घेतली आहे. माणसा-माणसांमधला संवाद, आत्मीयता, परस्परआस्था व मानवता हिरावली गेली आहे. सर्वत्र आत्मकेंद्री, स्वार्थाध, संवेदनशून्य मानसिकता बोकाळली आहे. एकीकडे प्रचंड विकास, पसा आणि दुसरीकडे जीवनातला वाढता बकालपणा व एकटेपणा यांनी माणसाच्या जीवनातलं स्वास्थ्य हरपलं आहे. माणसं आजच्या सर्वाधिक गुंतागुंतीच्या काळात, मूल्यऱ्हासात त्याचा अर्थ न लावता आल्याने संभ्रमचित्त, हतबल आणि निराश झाली आहेत. या साऱ्याचे प्रतििबब नव्वदोत्तरी कवितेत पडलेले दिसते. त्यात महानगरी संवेदनेइतकेच ग्रामीण संवेदनही समर्थपणे उतरलेले आहे.
या साऱ्या नव्वदोत्तरी कवितेची लक्षणे मोहन कुंभार यांच्या कवितेत त्याच्या स्वतंत्र पद्धतीने दिसून येतात. ‘जगण्याची गाथा’ या संग्रहातील कविता खेडय़ापर्यंत, शेतापर्यंत, ग्रामीण भागातील माणसापर्यंत पोहोचलेल्या जागतिकीकरणाने बदललेले ग्रामीण वास्तव, कृषीसंस्कृती आणि तेथील मूल्ये अत्यंत तीव्रोत्कट पद्धतीने मांडतात.
मोहन कुंभार हा आज चाळिशीत असलेला कवी. त्याने स्वत: अनुभवलेले खेडे आणि तेथील जीवन हाच त्याच्या कवितेचा, त्यातील प्रमुख संवेदनविश्वाचा आधार आहे. त्यांच्या कवितेत बालपण, आई-बापाच्या, आजीच्या, शेताच्या भक्कम आधाराने गुजरलेल्या बालपणातील आईच्या हातच्या चुलीवरच्या नाचणीच्या भाकरीचे, शेताच्या बांधावर उभ्या असणाऱ्या आजोबांचे, त्यांनी लावलेल्या झाडामाडांचे, झोपाळ्यावर बसवून आजीच्या गाण्यांच्या आठवणींचे अत्यंत अप्रूप या मुलाला आहे.
त्याने तारुण्यात पदार्पण केलं तेच मुळी ‘खाउजा’च्या (खासगीकरण, उदारीकरण आणि  जागतिकीकरण) आरंभीच्या दशकात. त्यामुळे त्याचे बालपण आणि तारुण्य ‘खाउजा’पूर्व आणि ‘खाउजो’त्तर अशा दोन कालखंडांत विभागलं गेलं आहे. सहाजिकच तारुण्यात प्रवेश करता करताच त्याच्या नुकत्याच जाणत्या झालेल्या मनाला बदलत चाललेला भोवताल खुपतो आहे.. त्याच्या मनाला ठेच पोहोचवतो आहे.
ग्रामीण भागात जागतिकीकरण, यांत्रिकीकरण यामुळे जे भलेबुरे परिणाम होत आहेत ते पाहत पाहत त्याचे संवेदन विकसित होते आहे. गावात, शेतात, मातीत स्वत: साक्षीभावाने पाहिलेले जग त्याच्या नजरेतून, त्याच्या कवितेतून कॅमेऱ्यासारखं छायाचित्रित झालं आहे. परंतु ते केवळ यांत्रिक छायाचित्रण नाही, तर त्याला हरवलेल्या जगाविषयी वाटणाऱ्या हरपलेपणाचा हताश स्पर्श आहे.
या कवितांमध्ये अत्यंत उत्कटतेने मोहन कुंभार यांनी ग्रामवास्तव आणि ग्राम-मानसिकतेचा अन्वय शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. शेतीनिष्ठ जीवनात लहरी निसर्ग आणि स्वार्थाध राजकारणी यांनी दिलेली उद्ध्वस्तता आतडय़ांना पीळ पाडणारी आहे. जागतिकीकरणाचे फटके, झटके सोसत ग्रामजीवनाचा हतबल चेहरा या कवितेत उतरला आहे..
‘आता तर आपल्याला खूपच सावध राहावं लागेल
विषारी वारे घोंगावतायत,
गुदमरून चाललाय जीव..’
अशा शब्दांत हे  गुदमरलेपण व्यक्त झालंय.
या काळात राजकारणाने ग्रामीण भागातील माणसांना क्रूरपणे मातीत लोटले. तरुणवर्गाला राजकारणाचेच स्वप्न पडू लागले. सत्ता-संपत्तीच्या मुजोरीपुढे सामान्य माणसाची किंमत शून्य झाली. शेतीतील नव्या तंत्रज्ञानाने विकासाबरोबरच भकासपण आणलं. जातीधर्मात निष्कारण तेढ वाढू लागली. शेती नको असे वाटून माणसे शेतीपासून दूर जाऊ लागली. गावाचे शहरीकरण होताना त्यातल्या अनेक सुंदर गोष्टी नष्ट झाल्या, हे वास्तव मोहन कुंभार यांनी आपल्या कवितेत ज्या  पोटतिडकीने व्यक्त केले आहे, ते खरोखरच अंतर्मुख करणारे आहे. त्याचबरोबर गाव सोडून शहरात आलेल्या माणसांना येणारे न रमवणारे विपरित अनुभवही या कवितांमध्ये आहेत. आजच्या तंत्रज्ञानाने प्रभावित झालेल्या जीवनाचाही अन्वय लावण्याचा प्रयत्न ही कविता करते.
मी पडतोय बाहेर
घामेजल्या चेहऱ्यानं
आऊट आऊट साईन आऊट
क्लिक् होत नाही कर्सर
अडखळला माऊस
होतोय मी हँग..
अशी ती संगणकीय भाषेतून व्यक्त होते.
या संग्रहात व्यवस्थेच्या अपरिहार्यपणे बळी असलेल्या स्त्रिया ‘लिलू’, ‘मेघु’, ‘व्हंजी’सारख्या स्त्रियांच्या व्यक्तिचित्रणातून साकारल्या आहेत. त्या व्यवस्थेचे भयावह चित्र साकारतात. काही कोकणी बोलीतील कविताही यात आहेत, त्या कोकणातील जीवनाचा, तेथील माणसांचा, त्यांच्या मानसिकतेचा थेट प्रत्यय देतात.
अत्यंत ठाशीव आणि सहजपणे येणाऱ्या प्रत्ययकारी प्रतिमा कवितांतला आशय ठळक करतात. त्यातील कलात्मकता अजिबात अलंकारिक न होता सरळपणे आपल्यापर्यंत पोहोचते. ‘पहाडासकट वझर वाहू दे’, ‘झाडांना नकोसं झालंय जगणं’,  ‘कोळिष्टक बनत चाललेत मृत्यूचे सापळे’ यांसारख्या कविता त्याचं प्रत्यंतर देतात.
धनदांडग्यांच्या, राजकारण्यांच्या दहशतीखालचे जगणं या कवितेत येतं..
‘रेटत जाणाऱ्या या दिवसांमध्ये
आपण आपले राहिलो नाहीत
कोणत्याही क्षणी आपलं शरीर
जप्त होण्याची भीती आहे.’
स्वत:च्या  अनुभूतीशी अत्यंत प्रामाणिक, प्रांजळ, मनाचा पारदर्शक तळ दाखविणाऱ्या आणि सच्चेपणाने जगाकडे बघणाऱ्या या कविता आहेत. हा कवीचा पहिलावहिला कवितासंग्रह असला तरी त्यातील आविष्कार समकालीन किंवा पूर्वसुरींच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त आहे. आपल्या मनाचा तळ शोधण्यासाठी त्यांनी स्वतच्या अनुभवविश्वावर आणि सांगण्याच्या स्वतच्याच पद्धतीवर भिस्त ठेवली आहे, हे विशेष. एका दमदार कवीचे या संग्रहाच्या निमित्ताने मराठी कवितेत पाऊल पडले आहे.
‘जगण्याची गाथा’- मोहन कुंभार,
लोकवाङ्मयगृह  प्रकाशन,
पृष्ठे- ९६,  किंमत- १४० रुपये
अंजली कुलकर्णी

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई