मराठी कवितेत नव्वदोत्तर उत्तर-आधुनिक कवितेने एक नवा प्रवाह निर्माण केला आहे. नव्वदनंतरच्या कालखंडात खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाने साऱ्या जगाचा चेहरामोहराच बदलून
या साऱ्या नव्वदोत्तरी कवितेची लक्षणे मोहन कुंभार यांच्या कवितेत त्याच्या स्वतंत्र पद्धतीने दिसून येतात. ‘जगण्याची गाथा’ या संग्रहातील कविता खेडय़ापर्यंत, शेतापर्यंत, ग्रामीण भागातील माणसापर्यंत पोहोचलेल्या जागतिकीकरणाने बदललेले ग्रामीण वास्तव, कृषीसंस्कृती आणि तेथील मूल्ये अत्यंत तीव्रोत्कट पद्धतीने मांडतात.
मोहन कुंभार हा आज चाळिशीत असलेला कवी. त्याने स्वत: अनुभवलेले खेडे आणि तेथील जीवन हाच त्याच्या कवितेचा, त्यातील प्रमुख संवेदनविश्वाचा आधार आहे. त्यांच्या कवितेत बालपण, आई-बापाच्या, आजीच्या, शेताच्या भक्कम आधाराने गुजरलेल्या बालपणातील आईच्या हातच्या चुलीवरच्या नाचणीच्या भाकरीचे, शेताच्या बांधावर उभ्या असणाऱ्या आजोबांचे, त्यांनी लावलेल्या झाडामाडांचे, झोपाळ्यावर बसवून आजीच्या गाण्यांच्या आठवणींचे अत्यंत अप्रूप या मुलाला आहे.
त्याने तारुण्यात पदार्पण केलं तेच मुळी ‘खाउजा’च्या (खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) आरंभीच्या दशकात. त्यामुळे त्याचे बालपण आणि तारुण्य ‘खाउजा’पूर्व आणि ‘खाउजो’त्तर अशा दोन कालखंडांत विभागलं गेलं आहे. सहाजिकच तारुण्यात प्रवेश करता करताच त्याच्या नुकत्याच जाणत्या झालेल्या मनाला बदलत चाललेला भोवताल खुपतो आहे.. त्याच्या मनाला ठेच पोहोचवतो आहे.
ग्रामीण भागात जागतिकीकरण, यांत्रिकीकरण यामुळे जे भलेबुरे परिणाम होत आहेत ते पाहत पाहत त्याचे संवेदन विकसित होते आहे. गावात, शेतात, मातीत स्वत: साक्षीभावाने पाहिलेले जग त्याच्या नजरेतून, त्याच्या कवितेतून कॅमेऱ्यासारखं छायाचित्रित झालं आहे. परंतु ते केवळ यांत्रिक छायाचित्रण नाही, तर त्याला हरवलेल्या जगाविषयी वाटणाऱ्या हरपलेपणाचा हताश स्पर्श आहे.
या कवितांमध्ये अत्यंत उत्कटतेने मोहन कुंभार यांनी ग्रामवास्तव आणि ग्राम-मानसिकतेचा अन्वय शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. शेतीनिष्ठ जीवनात लहरी निसर्ग आणि स्वार्थाध राजकारणी यांनी दिलेली उद्ध्वस्तता आतडय़ांना पीळ पाडणारी आहे. जागतिकीकरणाचे फटके, झटके सोसत ग्रामजीवनाचा हतबल चेहरा या कवितेत उतरला आहे..
‘आता तर आपल्याला खूपच सावध राहावं लागेल
विषारी वारे घोंगावतायत,
गुदमरून चाललाय जीव..’
अशा शब्दांत हे गुदमरलेपण व्यक्त झालंय.
या काळात राजकारणाने ग्रामीण भागातील माणसांना क्रूरपणे मातीत लोटले. तरुणवर्गाला राजकारणाचेच स्वप्न पडू लागले. सत्ता-संपत्तीच्या मुजोरीपुढे सामान्य माणसाची किंमत शून्य झाली. शेतीतील नव्या तंत्रज्ञानाने विकासाबरोबरच भकासपण आणलं. जातीधर्मात निष्कारण तेढ वाढू लागली. शेती नको असे वाटून माणसे शेतीपासून दूर जाऊ लागली. गावाचे शहरीकरण होताना त्यातल्या अनेक सुंदर गोष्टी नष्ट झाल्या, हे वास्तव मोहन कुंभार यांनी आपल्या कवितेत ज्या पोटतिडकीने व्यक्त केले आहे, ते खरोखरच अंतर्मुख करणारे आहे. त्याचबरोबर गाव सोडून शहरात आलेल्या माणसांना येणारे न रमवणारे विपरित अनुभवही या कवितांमध्ये आहेत. आजच्या तंत्रज्ञानाने प्रभावित झालेल्या जीवनाचाही अन्वय लावण्याचा प्रयत्न ही कविता करते.
मी पडतोय बाहेर
घामेजल्या चेहऱ्यानं
आऊट आऊट साईन आऊट
क्लिक् होत नाही कर्सर
अडखळला माऊस
होतोय मी हँग..
अशी ती संगणकीय भाषेतून व्यक्त होते.
या संग्रहात व्यवस्थेच्या अपरिहार्यपणे बळी असलेल्या स्त्रिया ‘लिलू’, ‘मेघु’, ‘व्हंजी’सारख्या स्त्रियांच्या व्यक्तिचित्रणातून साकारल्या आहेत. त्या व्यवस्थेचे भयावह चित्र साकारतात. काही कोकणी बोलीतील कविताही यात आहेत, त्या कोकणातील जीवनाचा, तेथील माणसांचा, त्यांच्या मानसिकतेचा थेट प्रत्यय देतात.
अत्यंत ठाशीव आणि सहजपणे येणाऱ्या प्रत्ययकारी प्रतिमा कवितांतला आशय ठळक करतात. त्यातील कलात्मकता अजिबात अलंकारिक न होता सरळपणे आपल्यापर्यंत पोहोचते. ‘पहाडासकट वझर वाहू दे’, ‘झाडांना नकोसं झालंय जगणं’, ‘कोळिष्टक बनत चाललेत मृत्यूचे सापळे’ यांसारख्या कविता त्याचं प्रत्यंतर देतात.
धनदांडग्यांच्या, राजकारण्यांच्या दहशतीखालचे जगणं या कवितेत येतं..
‘रेटत जाणाऱ्या या दिवसांमध्ये
आपण आपले राहिलो नाहीत
कोणत्याही क्षणी आपलं शरीर
जप्त होण्याची भीती आहे.’
स्वत:च्या अनुभूतीशी अत्यंत प्रामाणिक, प्रांजळ, मनाचा पारदर्शक तळ दाखविणाऱ्या आणि सच्चेपणाने जगाकडे बघणाऱ्या या कविता आहेत. हा कवीचा पहिलावहिला कवितासंग्रह असला तरी त्यातील आविष्कार समकालीन किंवा पूर्वसुरींच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त आहे. आपल्या मनाचा तळ शोधण्यासाठी त्यांनी स्वतच्या अनुभवविश्वावर आणि सांगण्याच्या स्वतच्याच पद्धतीवर भिस्त ठेवली आहे, हे विशेष. एका दमदार कवीचे या संग्रहाच्या निमित्ताने मराठी कवितेत पाऊल पडले आहे.
‘जगण्याची गाथा’- मोहन कुंभार,
लोकवाङ्मयगृह प्रकाशन,
पृष्ठे- ९६, किंमत- १४० रुपये
अंजली कुलकर्णी
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2015 रोजी प्रकाशित
हरपलेल्या ग्रामजीवनाचा हताश चेहरा
कवाङ्मयगृहाने २००१ साली ‘आजची कविता’ या उपक्रमांतर्गत आठ नव्या, तेव्हा अपरिचित असलेल्या आणि समकालीन जाणिवा दमदारपणे व्यक्त करणाऱ्या कवींचे कवितासंग्रह प्रकाशित केले होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 26-07-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi book review