सामाजिक कार्यकर्त्यां मीनाक्षी जनार्दन आपटे यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रसंगी त्यांचे नातेवाईक, चाहते, कार्यकर्ते आणि विद्यार्थीवर्ग यांनी लिहिलेल्या स्मरणलेखांची शृंखला म्हणजे ‘समर्पिता’ हे पुस्तक. या पुस्तकात तेहतीस लेख मराठी आणि अठरा लेख इंग्रजी आहेत. ‘समर्पिता’ या समर्पक शीर्षकाखाली हे पुस्तक मीनाक्षीताईंच्या प्रथम पुण्यदिनी- म्हणजे १४ मार्च १९१५ रोजी ‘स्वाधार, पुणे’ या संस्थेने प्रसिद्ध करून औचित्य साधले आहे. लेखांच्या संपादनाची जबाबदारी एखादे संपादक मंडळ वा व्यक्तीकडे सोपवलेली नाही, तर ती ‘स्वाधार, पुणे’ संस्थेने घेतली आहे. त्याद्वारे एक नवा पायंडा ‘स्वाधार’ने पाडला आहे.
या पुस्तकात अपर्णा केळकर यांनी पहिल्या तीस पानांत मीनाक्षीताईंचे चरित्र लिहिले आहे. हे चरित्र म्हणजे पुस्तकाचा गाभा आहे. मीनाक्षीताईंच्या जन्मापासून त्या पदवीधर होईपर्यंतच्या जीवनाचा सुरेख आढावा त्यात घेतलेला आहे. मीनाक्षीताईंच्या उपजत सामाजिक प्रवृत्तीला एकत्र कुटुंबातील संस्कारांची जोड मिळाली. त्यातूनच पुढे त्यांच्यातल्या सामाजिक जाणिवांना आकार मिळत गेला, हे स्पष्ट होते. गवताच्या गंजीला आग लागल्याचे कळल्याबरोबर घरात कुणालाही न सांगता घरातली पाण्याने भरलेली बादली नेऊन नऊ-दहा वर्षांची मुलगी आग विझवण्याचा प्रयत्न करते, किंवा बाजाराच्या दिवशी रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या खेडुतांना पाणी पाजते, हा मीनाक्षीताईंच्या आयुष्यातील मनाला भिडणारा पहिला महत्त्वाचा टप्पा होय. एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे त्यांना सर्वाशी मिळूनमिसळून राहण्याची आणि कौटुंबिक शिस्तीची आपोआपच सवय लागते. केळकरांच्या घरातील परिस्थितीही अशीच होती. त्यामुळे ही शिस्त अंगी बाणतच त्या घडत गेल्या. जातिभेद अमान्य असलेल्या या घरातील वातावरणाचा पुढे मीनाक्षीताईंच्या सामाजिक कार्यात त्यांना कसा उपयोग झाला, ते अपर्णा केळकर यांनी त्याचे अकारण स्तोम न माजवता खुबीने सांगितले आहे.
मीनाक्षीताईंचे पती ज. स. आपटे आणि एकूणच सर्व आपटे परिवार पुरोगामी होते, हे त्या कुटुंबातील व्यक्तींनी लिहिलेल्या आठवणींत स्पष्ट होते. केळकर व आपटे कुटुंबाचे हे पुरोगामित्व मीनाक्षीताईंच्या व्यक्तित्वविकासाला व त्यांच्या सामाजिक कार्यातील मोठमोठय़ा जबाबदाऱ्या उचलण्यास पूरक ठरले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्या मुलींची संख्या झपाटय़ाने वाढली. पण लग्न ठरले की मुलींना नोकरी सोडावी लागे. नोकरी चालू असली आणि बदली झाली, मुले झाली की नोकरी सोडणे हा अलिखित नियमच होता जणू. घरसंसार, लहान मुले आणि वडील मंडळींची जबाबदारी, नोकरी आणि नोकरीत आवश्यक असणारे पदव्युत्तर शिक्षण अशी तारेवरची कसरत करणाऱ्या मुलींची संख्या तेव्हा देशातही नगण्यच होती. मीनाक्षीताई या त्यापैकी एक. समाजशास्त्रात एम. ए. पदवी परीक्षा पहिल्या वर्गात पास होऊन त्यांनी विक्रम केला.
समाजकार्य करावयाचेच म्हटले तर ते एखाद्या दमदार संस्थेत केले तर सर्व प्रकारच्या सुविधा मिळून कामाची व्याप्ती वाढते. पण हे करण्यासाठी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेची सामाजिक कार्यातील पदव्युत्तर पदवी लागते. त्यासाठी त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्था या जगन्मान्य संस्थेतून ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’ (एमएसडब्ल्यू) ही पदवी घेतली. उत्तम अभ्यास व कामाबद्दल निष्ठेने केलेल्या कृतीचे फळ याच संस्थेत प्राध्यापकाची नेमणूक होऊन त्यांना मिळाले. त्याकाळी अंधेरी ते चेंबूर हा प्रवासही सोपा नव्हता. त्यांचा मुलगा शशिकांत हाही तेव्हा अगदीच लहान होता. परंतु कोणतीही जबाबदारी न टाळताही पुढे जाता येते, याचा वस्तुपाठच मीनाक्षीताईंनी सतत तक्रार करणाऱ्या आजच्या आधुनिक मुलींना घालून दिला आहे.
पदवी घेतल्यानंतर शिकवताना आणि सामाजिक विषयावर काम करत असताना पदवीची पोथीनिष्ठता उपयोगाची नसते. अभ्यासातील सामाजिक सिद्धान्त हे प्रत्यक्ष काम करत असलेल्या कामाशी पडताळून पाहून ते सामाजिक जीवनाशी कितपत सुसंगत असतात, प्रत्यक्ष कामाशी ते कसे जोडावे लागतात, याचे भान मीनाक्षीताईंना होते. त्यामुळेच त्यांचे अध्ययन सखोल आणि विश्लेषण अत्यंत सुस्पष्ट व सुगम असे. याची साक्ष लक्ष्मी नारायण, वंदना चक्रवर्ती, सीमा कुलकर्णी, सुचित्रा दाते यांच्या आठवणींतून व्यक्त होते. तोंडी परीक्षेच्या वेळी परीक्षक मंडळात मीनाक्षीताई असल्या की विद्यार्थ्यांची भीती व दडपण पळून जात असे, असे त्यांचे अनेक विद्यार्थी लिहितात. हिंदीभाषक राकेश तिवारी या विद्यार्थ्यांने त्यांचे ममत्व आणि अध्यापन याबद्दल लिहिलेली सुंदर कविता याची प्रचीती देते.
मीनाक्षीताईंच्या समाजकार्यात त्यांच्या सहकारी कालिंदी मुजुमदार यांनी पाकिस्तानातील स्त्रियांच्या दर्जाचा व तिथल्या घटस्फोटांच्या प्रकरणांचा अभ्यास त्यांच्यासमवेत पाकिस्तानात जाऊन केल्याच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये काही सामाजिक, तर काही अध्यापन क्षेत्रातील आहेत. मृणाल गोरे, कालिंदी मुजुमदार आणि मीनाक्षीताई या मुंबईतील सामाजिक कार्यामध्ये सहकारी होत्या. ‘स्वाधार’ची कल्पना जरी मृणालताई आणि पोलीस आयुक्तांची असली, तरी ती प्रत्यक्षात उतरवून त्याचे पुणे आणि गोरेगाव या दोन्ही ठिकाणी काम उभे करण्याचे संपूर्ण श्रेय मृणालताई मीनाक्षीताईंनाच देत असत. सामाजिक संस्थांमधील त्यांची नि:स्वार्थी आणि झोकून देणाऱ्या कामाची पद्धती कालिंदी मुजुमदार, सुजला नित्सुरे, रेखा लेले, सुवर्णा दामले, जयंती देशपांडे, सुमा चिटणीस, अंजली बापट, अन्वर खान, मेघना देवधर अशा अनेकांनी नोंदवली आहे.
पोलीस चौकीवर स्त्री-पोलीस असणे, पोलिसांनी स्त्रियांचे पोलीस चौकीतले प्रश्न हाताळण्याबाबतची प्रशिक्षण शिबिरे या सगळ्याची कल्पना आणि अंमलबजावणी हे मीनाक्षीताईंचेच काम. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच विवाहविषयक समुपदेशन हा कुटुंब न्यायालयाचा एक अविभाज्य घटक झाला. कुटुंब न्यायालयासाठी मीनाक्षीताईंनी ध्यास घेतला आणि भारतभर ती अस्तित्वात आली. पोलीस स्टेशनमध्ये ‘स्पेशल सेल फॉर वुमेन अँड चिल्ड्रेन इन डिस्ट्रेस’च्या त्या जननी होत. कैदी स्त्रिया आणि त्यांची मुले, त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा याबाबतीत त्यांनी केलेला पाठपुरावा.. या सर्व गोष्टींची माहिती त्यांचे सहकारी व विद्यार्थीवर्गाच्या लेखांतून वाचायला मिळते.
‘समर्पिता’ या पुस्तकाची मदत घेऊन मीनाक्षीताईंचे प्रेरणादायी चरित्र लिहिले जावे असे ते वाचून संपवताना वाटते. गांधीवादी, लोकशाही समाजवादाची विचारसरणी जन्मभर निष्ठेने आचरणारी, मृदु स्वभावाने सर्वाची मने जिंकणारी, धीरोदात्त, अथक परिश्रम करणारी, अधू पायांना मनोवेगाने चालायला लावणारी ही ‘समर्पिता’ लेखांतून नेटकी उभी राहते आणि आपण तिच्यापुढे नतमस्तक होतो. खरे समाजकार्य किती बिकट आहे, तसेच त्यातील अडचणी जाणून घेण्यासाठी या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरावे. ‘अहो, आम्हाला काम करायला आवडेल, पण घरातून वेळच मिळत नाही,’ असे म्हणणाऱ्या स्त्रियांनी हे पुस्तक जरूर वाचलेच पाहिजे असे आहे.
‘समर्पिता’
प्रकाशक- स्वाधार, पुणे,
पृष्ठे- १७०,
किंमत- १५० रुपये
रोहिणी गवाणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा