या तीन पुस्तकांपैकी ‘श्रीपर्वताच्या छायेत’ या ग्रंथात शिवोपासनेविषयीचे लेखन एकत्र गठित केले आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर शिवोपासना प्राचीन काळापासून गाजत राहिली आहे आणि तिचा मूलस्रोत आंध्रातला श्रीपर्वत आहे. नागार्जुनाची जन्मभूमी विदर्भ; पण कर्मभूमी श्रीशैल पर्वत होती. महानुभाव पंथाचे श्रीचक्रधर यांनी श्रीपर्वतावर एकांतात एक तप काढले. श्रीचक्रधर, श्रीज्ञानदेव आणि श्रीमुकुंदराज या तिघांच्याही कार्य आणि विचारविश्वाशी श्रीपर्वताचा थेट संबंध असणे, याचा संबंध महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीशी आहे.
या गोष्टींचा संदर्भ लक्षात घेता डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या या ग्रंथाचे महत्त्व लक्षात येईल. श्रीपर्वत हे केवळ बारा ज्योतिर्लिगांपैकी एक लिंग म्हणून व शिवभक्तांचे श्रद्धास्थान आणि साधनास्थान म्हणून प्रसिद्ध असले तरी श्रीपर्वताची आणखीन काही वेगळी वैशिष्टय़े आहेत. बौद्धांच्या मंत्रयान आणि वज्रयान पंथांची ती जन्मभूमी आहे, तर शैव आणि शाक्त तांत्रिकांची प्रख्यात कर्मभूमी आहे. नाथपंथाचा उदयही येथूनच झाला. या पाश्र्वभूमीवर श्रीपर्वताचा महाराष्ट्राच्या शैव-विचारांवर, सांस्कृतिक आणि सामाजिक घटनांवर कोणता व कसा परिणाम झाला, हे जाणून घेणे महत्त्वाचे व आवश्यक ठरते. हे परिणाम नव्याने स्पष्ट करतानाच काही कूटरहस्यांचाही उलगडा यात केलेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा