डॉ. उज्ज्वला दळवी यांचं ‘जेनेटिक्स कशाशी खातात?’ हे पुस्तक जेनेटिक्ससारख्या गुंतागुंतीच्या विषयावर अगदी सोप्या पद्धतीने कसं लिहावं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणावा असं आहे. जेनेटिक्स म्हटलं की आपल्याला मेंडेलचा वाटाणा, क्लोन करण्यात आलेली डॉली मेंढी आणि जिनोम प्रकल्प एवढंच माहीत असतं. अर्थात आजकाल एखाद्या विषयाची माहिती करून घ्यायची तर इंटरनेटवर गेलं की एका क्लिकवर भरपूर माहिती उपलब्ध असते. तशी जेनेटिक्सबद्दलही ती आहे, पण या विषयावर तिथे एवढा प्रचंड पसारा आहे की त्यातलं नेमकं काय वाचायचं आणि कसं समजून घ्यायचं हा प्रश्न पडतो. त्यामुळे जेनेटिक्ससारख्या विषयावर मराठीत आणि त्या विषयाचा मोठा आवाका कवेत घेणारं आणि सहज समजू शकेल असं पुस्तक उपलब्ध आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे. हा विषय सोपा करून सांगताना लेखिकेने भरपूर कष्ट घेतले आहेत.
अनुवांशिक गुण, गुणसूत्रं, रंगसूत्रं याबरोबरच डार्विन, मेंडेल, गेराड, मॉर्गन, कोसेल, रोझालिन्ड, वॉटसन, क्रीक, खोराना यांच्या प्रयोगांबद्दल आपण वाचत जातो आणि एकदम आपल्या लक्षात येतं की आपल्यासमोर एक अद्भुत आणि तितकीच रहस्यमय दुनिया उभी आहे. पूर्वापार लाखो वर्षांपासून एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत आलेले आपल्या सगळ्या अस्तित्वाचा इतिहास- भूगोल ठरवणारे अदृश्य धागे आपल्याला एका अनादि अशा इतिहासाचा आणि अपरिहार्य अशा भविष्याचा भाग बनवत असतात. आपल्या आतमध्येच असलेलं त्यासंदर्भातलं हे विज्ञान आपल्या पिढीतल्या संशोधक- शास्त्रज्ञांच्या आकलनाच्या टप्प्यात आलेलं आहे आणि हे आकलनच पुढच्या पिढय़ांचं सगळं जगणं बदलून टाकणारं आहे आणि त्या सगळ्या बदलाच्या उंबरठय़ावर आपण आहोत ही जाणीव हे पुस्तक करून देतं.. ती थरारून टाकणारी आहे.
जिनोम प्रकल्प म्हणजे काय, जनुकलेख म्हणजे काय, तो कसा असतो, कुठे असतो, त्याचं काम कसं चालतं, पेशींची रचना कशी असते, त्या कशा काम करतात अशी माहिती सोप्या भाषेत, वेगवेगळी उदाहरणं देत हे पुस्तक पुढे जातं. डीएनए म्हणजे काय आणि तो कसा असतो, तो आपल्या आयुष्याचा धर्मग्रंथ कसा आहे, तो नेमकं कसं काम करतो, जनुकभाषा म्हणजे काय, त्याची लिपी कशी वाचली जाते, जनुककोशाचं काम कसं चालतं हे सगळं एखाद्या रहस्यमय कादंबरीसारखंच आहे. मुख्य म्हणजे ही रहस्यमय कादंबरी रोजच्या रोज आपल्या शरीरात घडत असते.
जेनेटिक इंजिनीअरिंगच्या माध्यमातून पिकं, औषधं यांच्या क्षेत्रातही मोठा बदल अपेक्षित आहे. उदाहरणच द्यायचं तर एससीआयडी नावाच्या एका अनुवांशिक आजारात रोग्याच्या शरीरात एका जनुकात थोडी उणीव राहिलेली असते. त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती अगदी कमी झालेली असते. या मुलांची स्थिती नाजूक असते. शास्त्रज्ञांनी त्यांच्या जनुकातला नेमका दोष शोधून काढला. त्याचं एका रेट्रोव्हायरस विषाणूच्या जनुकाला ठिगळ लावलं. एका आजारी मुलीच्या पांढऱ्या रक्तपेशी काढून त्यात तो विषाणू सोडला. त्या पेशी पुन्हा इंजेक्शननं तिच्या शरीरात सोडल्या. या सगळ्या प्रक्रियेत त्या मुलीच्या रक्तातल्या उणिवा भरून काढल्या गेल्या. तिच्या जनुकांमधली त्रुटी भरून निघाली. तिची प्रतिकारक शक्ती वाढली. त्यानंतर या आजाराच्या सतरा मुलांवर हा प्रयोग झाला. त्यांच्या एससीआयडी या आजारावरही सकारात्मक परिणाम झाला. पण त्यांच्यातल्या काहीजणांमध्ये शरीरात सोडलेलं हे औपचारिक जनुक कॅन्सरशी निगडित जनुकाशेजारी पोहोचलं. परिणामी त्या काही मुलांना ल्युकेमिया झाला. पण शास्त्रज्ञ आता या उपचारात ल्युकेमिया कसा टाळायचा यावर काम करत आहेत. याच पद्धतीने गिनिपिग्जमधला बहिरेपणा कमी केला गेला आहे. उंदराच्या रक्तातले दोष नाहीसे करणं जमायला लागलं आहे. हेच उपाय नंतर माणसावरही करता येतील. पिकांच्या बाबतीतही निदरेष आणि भरपूर उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करण्यासाठी जेनेटिक इंजिनीअरिंगने मोठा हातभार लावलेला आहे. लेखिका म्हणतात त्याप्रमाणे विषाणू आता विषाणू राहिलेले नाहीत, ते ज्ञानसागराच्या सफरीत संशोधकांच्या नौकेतले सुकाणू झाले आहेत.
डॉ. उज्ज्वला दळवी यांची लेखनशैली ही या पुस्तकाची एक महत्त्वाची जमेची बाजू आहे. एखादा मुद्दा समजावून सांगताना त्या जाता जाता जी उदाहरणं देतात किंवा तुलना करतात ती अगदी मोहवून टाकणारी, विषय पटकन उलगडून दाखणारी आहे. पण एकच  गोष्ट खटकणारी आहे आणि ती म्हणजे या पुस्तकाचं मुखपृष्ठ. माहितीच्या पातळीवर इंग्रजीच्या तोडीच्या असलेल्या या पुस्तकाचं मुखपृष्ठ बाळबोध या शब्दापेक्षाही बाळबोध आहे. भविष्यात जे शास्त्र आपल्या पुढच्या पिढय़ांच्या जगण्याची सगळी गणितंच बदलवून टाकणार आहे, त्याविषयी सांगणारं हे नितांतसुंदर पुस्तक वाचलंच पाहिजे.
‘जेनेटिक्स कशाशी खातात?’ – डॉ. उज्ज्वला दळवी, ग्रंथाली, पृष्ठे- २२८, मूल्य- २५० रुपये.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Story img Loader