कवितेचा काय किंवा एकंदर साहित्याचा विकास काय, वेगवेगळ्या लेखक-कवींनी व्यक्त केलेल्या जाणिवांमुळे होत असतो. त्यातल्या त्यात कवितेसारखी संवेदनशील रचना अधिक अंगाने विस्तारते. ‘मनातील ऋतूंच्या नोंदी’ हा वसंत वाहोकारांचा कवितासंग्रह असाच आहे. हा संग्रह कवितेची रचना, अभिरुचीची चौकट ओलांडणारा आहे. वाहोकार तीसेक वर्षे मनस्वीपणे कवितालेखन करत आहेत. त्यांचा हा दुसराच संग्रह आहे. ते रसिकांचा अनुनय न करता त्यांच्या विचारांवरच तुकारामांच्या शैलीत आघात करताना दिसतात. ते आपली भाषा, आपले स्वत्त्व, आपला आशय आणि आपली जीवनवासना अत्यंत कसोशीने सांभाळतात. शैलीशास्त्रीयदृष्टय़ा वाहोकार हा नीट समजून घ्यावा लागणारा कवी आहे. त्यांची भाषा सडेतोड आणि रांगडी आहे. ते पदांची मोडतोड करतात.
प्रस्तुत संग्रहात अनेक भावना आणि विचार प्रकट केले आहेत. यात बायका आणि हिजडे यांचे सलणारे दु:ख आहे. खेडय़ातली बाई तरुण काय नि म्हातारी काय तिचे दु:ख दारिद्रय़ाशी निगडित असते. तिच्या दु:खाची रांग पोटासाठी सुरू होऊन पुरुषाचे अंथरुण होईपर्यंत आहे. ‘बायका’, ‘डवकव’ या कविता विचार करावयास लावतात. स्त्रीला एका जन्मात अनेक नाती, अनेक रूपे, अनेक कर्मे असतात. पाठीला पोक आल्यानंतरही कर्मे सुटत नाहीत. ही स्त्रीची वैश्विक वेदना कवी प्रकट करतो.
कवीची अनुभूती ग्रामजीवनाशी निगडित आहे. ‘मरीमाय’, ‘विहीर’, ‘केव्हा तरी पाणवठय़ांना’, ‘दारिद्रय़’ या कविता खूप परिणामकारक झाल्या आहेत. वर्तमान जगातील अनेक गोष्टी खुलेपणाने मांडल्या आहेत. गरीब कुटुंबात जागेअभावी वयात येणाऱ्या मुला-मुलींना आई-वडिलांचा प्रणय पाहावा लागतो हे वास्तव सत्य कवी मांडतो. मुलांच्या अस्वस्थतेचे, त्यांच्या ऑटिझमचे, त्यांच्या अवेळ लैंगिक जागृतीचा कारणशोध कवीने घेतला आहे.
स्त्रियांविषयीची कणव कवीला असहाय करते. तीच त्याच्या चिंतनाचा विषय आहे. ती झिजते म्हणून मरत नाही. ती झिजताना तिच्या देहाला चंदनाचा गंध येतो. तिच्या झिजण्याची कवी महत्ता सांगतो. ‘दमयंती तुलाच’, ‘मोठं कुंकू’ या कवितांचे म्हणूनच अप्रूप वाटते. ‘लता टिपटाळेकर’, ‘शबाना आझमी होऊन’, या कलांवतांवरच्या कविता चांगल्या जमल्या आहेत. आपल्या आवडत्या वस्तूंची सुंदर चित्रणे वाहोकार अत्यंत बहारदार करतात. ‘ओ, मेरी जान तू’ ही सिगरेटवरची कविता त्यापैकीच आहे. ‘मनातील ऋतूंच्या नोंदी’ असे शीर्षक असले तरी यातील कविता या समाजिक जाणिवांच्या आहेत. कवीचा संवेदनस्वभाव स्त्रीच्या दु:खाने व्यथित होणारा, सामाजिक अन्याय सोसणाऱ्या वृत्तीचा प्रत्यंतर देणारा आहे.
‘मनातील ऋतूंच्या नोंदी’ – वसंत वाहोकार, विजय प्रकाशन, नागपूर, पृष्ठे – १००, मूल्य – १२५ रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा