फ. मुं. शिंदे यांच्या अकरा कवितासंग्रहांतील निवडक कवितांचा ‘मी सामील समूहात’ हा संग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. या निवडक कविता सामाजिक आशयाच्या आहेत. ‘गौतम – एक चिंतन’, ‘छ. शिवाजी महाराज’, ‘म. जोतिराव फुले’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या कविता वरच्या दर्जाच्या आहेत. परंतु चरित्रनायकाचे चरित्र अगर व्यक्तिमत्त्व फमुं उभे करत नाहीत. त्यांच्या अचाट, अफाट, अद्वितीय कामगिरीवर फमुं भाष्यही करत नाहीत. केवळ त्यांचे कार्य आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी पंगू झालेल्या समाजमनाशी दुवा जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. व्यंगाचा शोध घेऊन फमुं उद्विग्नता घालवण्याकरता संवाद साधतात. असा संवाद वरील महापुरुषांशी त्यांनी साधला आहे. या चार कविता वाचताना विंदा करंदीकर यांच्या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ‘अष्टदर्शने’ या रचनेचे स्मरण होते. ‘अष्टदर्शने’मध्ये दार्शनिकांच्या तत्त्वाचे, विचारांचे प्रकटन आहे. परंतु फमुं गौतम बुद्ध, छ. शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रकट करत नाहीत, तर संवेदनशीलतेने, हळवेपणाने संवाद साधतात. यातून कवी म्हणून असणारे स्वातंत्र्य फमुं घेतात, पण त्यांची तरल संवेदना प्रकट करतात.
‘मी सामील समूहात’मध्ये समाजाची अगतिक अवस्था प्रकट झाली आहे. या कवितांत शून्यता आणि बेफिकिरी नाही, ही चांगली गोष्ट आहे. फमुंची वाणी रसिकांच्या समुदायाला हसवणारी आहे, तशीच ती सामाजिक कळवळा येणारीही आहे. कवी म्हणून फमुं राजकीय, सामाजिक घटितांवर सरळपणे काव्यविधान करतात. या संग्रहात अनेक दीर्घकविता आहेत. तीच कवीची जमेची बाजू आहे.
या संग्रहाला गंगाधर पानतावणे यांची प्रस्तावना आहे. ती एरवी प्रस्तावना असते तशीच आहे. संग्रहातील कवितांची निवड स्वत: फमुंनीच केलेली आहे. संपादनही त्यांनीच केले असावे. निवडक साहित्य हा कोणी अभ्यासकाने संपादित करण्याचा संकेत आहे. त्यायोगे साहित्यिकाचा, वाङ्मयीन कालखंडाचा आणि लेखकाच्या वाङ्मयीन जाणिवांचा आढावा घेतला जातो. यामुळे लेखकाला काही अंशी न्याय दिला जातो. त्या संपादनाला एक शिस्तशीर प्रस्तावना असते. त्यामध्ये लेखकाची वाङ्मयीन वाटचाल, अंतर्गत-बहिर्गत ऊर्मी, प्रेरणा आणि एकंदर जीवनालेख लेखकाच्या संवेदनस्वभावासह निवडक साहित्याच्या प्रस्तावनेत अपेक्षित असते. फमुंनी स्वत: आपल्या निवडक कवितांचे संपादन केल्याने हे सारे राहून गेले. त्यांच्या लोकप्रियतेची चिकित्साही निवडक कवितांच्या निमित्ताने करता आली असती, तेही झालेले नाही. याच संग्रहात नव्हे तर अशा स्वरूपाच्या निवडक संपादनात व नियतकालिकांच्या विशेषांकांत शिस्तबद्धतेचा अभाव गेल्या वीसेक वर्षांपासून दिसून येत आहे.
‘मी सामील समूहात’ – फ. मुं. शिंदे, सुरेश एजन्सी, पुणे, पृष्ठे – ११०, मूल्य – १२० रुपये.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi book review mee samil samuhat