डॉ. आनंद नाडकर्णी

मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे ‘वादळाचे किनारे’ हे पंचविसावे पुस्तक उद्या (२६ जून) प्रकाशित होत आहे- निमित्त आहे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दिन! व्यसनाधीनता आणि व्यसनमुक्ती या विषयांकडे मुलांच्या दृष्टिकोनातून रचलेल्या कथांचा हा संग्रह. यानिमित्ताने गेल्या चार दशकांतील स्वत:च्या साहित्यनिर्मितीचा लेखकाने घेतलेला हा धावता आढावा.

book review pen america best debut short stories 2017 best debut short stories 2024
बुकमार्क : ‘नव्या हेमिंग्वे’च्या शोधातला कथाप्रकल्प…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
cancer patient died cancer treatment family hospital
कर्करोगग्रस्त पत्नीची डायरी…
Devendra Fadnavis Marathwada BJP maratha reservation suresh dhas
मराठवाड्यात देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आता ‘नायक’ करण्यावर भर
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Loksatta book mark Patriot Alexei Navalny Russian security forces
बुकमार्क: अकाली मावळलेला झुंजार तारा
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?

प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर, लेखक म्हणून स्वत:चे नाव पाहताना अलीकडे असे वाटते की, समाजसंमत संकेत म्हणून ते बरोबर आहे, पण अन्यथा मी स्वत:ला ‘लेखक’ म्हणवून घेण्याचे कारण नाही. मिरवण्याचे तर नाहीच नाही. आत्ता या लिखाणाचे शीर्षक लिहितानासुद्धा ताल जुळावा म्हणून ‘ग्रंथ’ असा शब्द वापरला. त्या शब्दात असलेली ज्ञानशक्ती माझ्या लिखाणात आहेच असा दावा करता येणार नाही. दोन गोष्टी मात्र अनुभवसिद्ध आहेत. हजारो वाचकांनी त्यांच्या त्यांच्या जगण्यामध्ये या लिखाणाचा सकारात्मक वापर करून घेतला आहे. प्रत्यक्ष भेटी, लेखी निरोप-पत्रे यांच्याद्वारे कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपण लिहितो त्यातून मनोरंजनाच्या पलीकडे काही विचारात्मक बौद्धिक-भावनिक हालचाल रसिकमेंदूमध्ये होत असेल तर त्या प्रक्रियेमध्ये समाधान आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, प्रत्येक पुस्तकासोबतचा ‘निर्मिती’ अवस्थेमधला सहवास. मूळ कल्पनेच्या थेंबापासून ते त्या विचारांनी भिजून जाण्यापर्यंतचा असा तो प्रवास; त्यानिमित्ताने केलेल्या जोमदार वाचन-मननाचा असतो. वेदान्तविचारात एक छान शब्द आहे, ‘निदिध्यास’ झपाटलेपण असते ते वृत्तीचे. त्यानंतर प्रत्यक्ष लेखन. मी अजूनही कागद-पेनाचाच वापर करतो लिहायला. कविता मात्र बहुतेक वेळा स्क्रीनवर टाईप करतो. नंतरच्या संस्कारांमध्ये किती तरी जण येतात. पहिल्या फेरीतले वाचक-श्रोते, मुद्रणप्रत तयार करणारे सहकारी, संपादक, प्रकाशक, चित्रकार, मुद्रितशोधक.. आणि मग छापून सजलेले पुस्तक हातात येते. वाचक म्हणून मी ते वाचायला घेतो. साधारण तीन ते सहा महिन्यांमध्ये त्यातला ‘मी’ गळून पडतो. मी एक ‘वाचनीय’ पुस्तक म्हणून तेच पुस्तक वाचायला घेतो. प्रसंगी दाद देतो तर कधी त्रुटी काढतो. पुढची कल्पना डोक्यात येईपर्यंत हातातले, ‘मी’  लिहिलेले पुस्तक माझ्यासाठी ‘शेवट’चे असते.

आणि नवीन कल्पना आली की ‘पहिले’- पणाचा प्रवास पुन्हा सुरू. अशा प्रवासांची पंचविशी गाठली गेली आहे. वयाच्या पंचविशीमध्ये ‘वैद्यकसत्ता’ या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन आठवते आहे. रुपारेल महाविद्यालयाच्या परिसरातला हॉल होता. ‘ग्रंथाली’ने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाच्या प्रती त्या रात्री घरी जाऊन आई-वडिलांच्या हाती देऊन नमस्कार केला. ते पुस्तक त्यांनाच अर्पण केले होते. त्यांनी वाचनाची सवय लावली नसती तर पुढचा प्रवास घडला असता की नाही, काय ठाऊक! पुस्तक या वस्तूकडे, जिवलग मित्र होऊन पाहण्याची सवय त्यांच्यामुळे लागली. कसा कोण जाणे पण मी वयाच्या तिसऱ्या वर्षांच्या रेषेला स्पर्श करतानाच वाचायला लागलो होतो. संयुक्त चळवळीच्या काळात येणारा ‘मराठा’चा दैनिक अंक मला आठवतो. ‘म’ नावाचा शब्द तिथेच भेटला. घरात मोठे बहीण-भाऊ आणि त्यांच्यासाठी तयार झालेला उत्तम ग्रंथसंग्रह माझ्यासाठी वारसा म्हणून चालत आला होता. वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत या पुस्तकांच्या सोबत आम्ही राहत होतो त्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयातसुद्धा मी पुस्तके पाहत, वाचत फिरत असे. कारण आमचे घर जळगावच्या एम. जे. महाविद्यालयाच्या परिसरातच होते. शिवाय प्राध्यापक असलेले वडील, विद्यापीठातल्या कामासाठी पुण्याला गेले की खाऊ म्हणून पुस्तकेच मिळायची.

आनंदाने वाचले की वेगळे लक्षात ठेवायला लागत नाही हे आपोआप कळायला लागले. मुंबईमध्ये राहायला आल्यानंतर मी ‘स्वत:’ पुस्तके निवडायला लागलो. नाटकांच्या संहितांची पुस्तके वाचायचा नाद लागला. त्या काळात विलेपाल्र्यात आणि पुढे ठाण्याला राहायला आल्यावर तर नाटक पाहायचे आणि पुस्तक वाचायचे असा क्रमवार नादच लागला. त्याचा फायदा पुढे नाटय़-लिखाणाला झाला असणार. कवितांची पुस्तकेही आणायचो- त्या फार कळल्या नाहीत तरी. स्वत:ची लय लावून त्या कविता वाचायला घ्यायचो. कुसुमाग्रज, नारायण सुर्वे अशा मोठय़ांच्या कविता त्यांच्या तोंडून ऐकल्या शाळकरी वयात. पुढे त्यात भर पडत गेली विंदा, महानोर, पाडगावकर, बापट, नामदेव ढसाळ, ग्रेस, सुरेश भट अशा अनेकांची.

संस्कार स्वत:च करून घ्यायचे असतात मनातल्या मनात. पण तसे वातावरण वाटय़ाला येतेच असे नाही. त्या दृष्टीने माझे, जी. एस. मेडिकल कॉलेजला येणे हा सुवर्णयोगच म्हणायचा. डॉ. रवी बापट, डॉ. शरदिनी डहाणूकर या गुरूंमुळे लेखन, नाटक, संगीत क्षेत्रातील मंडळींना अगदी जवळून प्रत्यक्ष अनुभवता आले. ‘वैद्यकसत्ता’ या माझ्या पहिल्या पुस्तकाचे लिखाण पूर्ण झाले त्याचा बापटसरांना किती आनंद. ग्रंथालीचे दिनकर गांगल, कुमार केतकर आणि बापटसर यांनी इतक्या वेगवेगळय़ा जाणकारांसमोर या लिखाणाच्या वाचनाच्या बैठकी लावल्या की त्यातून सादरीकरणाची कला शिकायला मिळू लागली.

त्याच कालखंडात ग्रुप मिळाला ‘भरतशास्त्र’ या नाटय़विषयक मासिकाचा. विनायक पडवळचे परळमधले घर कॉलेजपासून हाकेच्या अंतरावर. तिकडे होणाऱ्या चर्चा, वादविवाद, नाटय़वाचने, तालमी आणि धमाल! आम्ही ‘स्पंदन’ नावाचा दिवाळी अंक काढायचो. यानिमित्ताने ‘हुकमी’ लिहिण्याचे कसबही अंगात येऊ लागले. त्याच सुमारास ‘दिनांक’ नावाचे साप्ताहिक सुरू होत होते. निखिल वागळे आणि विनायक पडवळ हे त्याच्या संपादनामध्ये होते. पण पाठिंबा होता तो भल्या भक्कम विचारवंतांचा. त्यात आम्ही अनेक जण (म्हणजे द्वारकानाथ संझगिरी, राजीव नाईक, संजीव साबडे) नियमित लिहायला लागलो. ‘किंचित्’ हे माझे ललित लिखाणाचे सदर नियमित प्रसिद्ध व्हायला लागले. त्याचे पुढे पुस्तक झाले आणि नवलेखक पुरस्कारही मिळाला. पुढे निखिलने दैनिक ‘महानगर’ सुरू केल्यावर चक्क १५० आठवडे सदर लिहीत होतो मी. या साऱ्याचा फायदा असा की लिखाणाला ‘वेळ-काळ-स्फूर्ती-शांती’ अशा कोणत्याही पूर्वअटी लावायच्या नाहीत ही सवय लागली. ‘वैद्यकसत्ता’ पुस्तकासाठी ‘अभ्यास’ केला होता. त्यातली ‘धमाल’ समजली होती. अजून पुस्तके वाचू, संदर्भ शोधू, मतांचा धांडोळा घेऊ अशी इच्छा होणे म्हणजे ‘धमाल.’ अभ्यासातल्या आनंदाची ही सवय अलीकडे लिहिलेल्या वेदान्त आणि बौद्ध तत्त्वज्ञानावरच्या पुस्तकांपर्यंत टिकून आहे.

‘वैद्यकसत्ता’ पुस्तकामध्ये जीवनाच्या ‘वैद्यकीकरणा’ची प्रक्रिया सांगितली होती. वैद्यकीय व्यावसायिकांच्या यंत्रणा (वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थासमवेत) आरोग्य विकासाला महत्त्व देत नाहीत. फक्त आजारांवर, त्यातल्या लक्षणांवरच उपचार करतात असा बोध त्यात होता. त्या व्यवस्थेला पर्यायी आकृतिबंध आहे, सर्वसमावेशक अर्थात् ‘बायो-सायको-सोशल’ दृष्टिकोनाचा. या रचनेवर आधारित नवीन पुस्तक लिहिले, ‘आरोग्याचा अर्थ.’ तेही ‘ग्रंथाली’ने प्रसिद्ध केले. (सध्या ही दोन्ही पुस्तके एकत्र उपलब्ध आहेत.) हा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्याची संधी मला मिळाली डॉ. विजय आजगावकर आणि डॉ. एल. पी. शहा या माझ्या शिक्षकांमुळे. आजगावकर सरांमुळे बालमधुमेही मुलांसोबत काम करायला मिळाले तर शहा सरांच्या आज्ञेनुसार व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात शिरलो. या अनुभवामुळेच इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ अर्थात् आय.पी.एच. आणि कालानुक्रमे त्याआधी, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा जन्म झाला. साधारणपणे १९८४ ते २०१० ही वाटचाल, ‘शहाण्याचा सायकिअ‍ॅट्रीस्ट’ या पुस्तकात शब्दबद्ध झाली. या पुस्तकाचे शीर्षक आणि मुखपृष्ठ ही कल्पना समकालीन प्रकाशाचे चित्रकार श्याम देशपांडेंची. माझी खासगी प्रॅक्टिस सुरू झाली २ ऑक्टोबर १९८६ रोजी. त्या सुमारास मी अनेक दिवाळी अंकांमध्ये लेख लिहायचो. मनोविकारशास्त्रातली मुशाफिरी सुरू झाली होतीच. ‘एका सायकिअ‍ॅट्रीस्टची डायरी’ हे पुस्तक या सर्व लेखांचा संग्रह. निखिल वागळे, मीना कर्णिक यांच्या ‘अक्षर प्रकाशना’चे ते नव्हाळीचे पुस्तक.

पुढे नव्वदीच्या दशकात, माझ्या जगण्यामध्ये, विवेकनिष्ठ मानसोपचार अर्थात् रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी ( फएइळ) ने प्रवेश केला. वैयक्तिक आणि संस्थात्मक आयुष्यामध्ये अत्यंत बिकट कालखंड होता तो. स्वत:च्या आयुष्याशी विवेकवादाची सांगड घालताना जन्माला आली, ‘स्वभाव-विभाव’ ही लेखमाला. साप्ताहिक सकाळचा संपादक सदा डुंबरे हा मित्र आणि सहसंपादक संध्या टांकसाळे. ही लेखमाला लोकप्रिय ठरली आणि ते पुस्तक काढले मॅजेस्टिकच्या अशोक कोठावळय़ांनी. खपाच्या दृष्टीने हे माझे आघाडीचे पुस्तक. २२ आवृत्त्या झाल्या आणि अजूनही होतच आहेत. या पुस्तकाचे मुखपृष्ठ केले यशोने म्हणजे यशोदा वाकणकरने. ते पंचविसाव्या आवृत्तीमध्ये तिनेच नव्याने करावे असा हट्ट मी धरला आहे.

‘स्वभाव-विभाव’च्या यशानंतर तणाव नियोजनावरचे ‘विषादयोग’, विवेकनिष्ठ मानसशास्त्र आणि संतसाहित्य यावरचे ‘मनोगती’ आणि मनआरोग्य आणि अध्यात्म यांचा सांधा जोडणारे ‘कर्मधर्मसंयोग’ अशी पुस्तके आली. विवेकनिष्ठ मानसशास्त्र आणि व्यसनमुक्ती यावरचे ‘मुक्तिपत्रे’ हे पुस्तक (अक्षर प्रकाशन) शांतपणे आवृत्त्या ओलांडत आहे. या पुस्तकावर व्यावसायिक नाटक आले- ‘गेट वेल सून.’

माझ्या हातून लिहिल्या गेलेल्या एकूण आठ व्यावसायिक नाटकांपैकी दोन नाटकांची पुस्तके आली. ‘जन्मरहस्य’ (ग्रंथाली) आणि ‘त्या तिघांची गोष्ट’ (मॅजेस्टिक). आपण लिहिलेल्या संहितेचे पुस्तक हाताळणे हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता.. कानेटकर, दळवी, तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकपुस्तकांना पहिला स्पर्श केला होता त्या आठवणी जाग्या झाल्या.

दोन्ही पायांना झालेल्या आजाराने घरीच खिळलेलो असताना ‘हेही दिवस जातील’ ही कादंबरी दिसायला लागली. मनोविकास प्रकाशाचे अरविंद पाटकर चौकशीला घरी आले होते. त्यांना गोष्ट सांगितली. त्यांना आवडली. या पुस्तकातली रेखाचित्रे मीच काढली. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित या पुस्तकाचे ऑडिओ बुकसुद्धा उमेश कामतच्या आवाजात उपलब्ध आहे. ललित लेख आणि रेखाचित्रे असलेले अजून एक वाचकप्रिय पुस्तक आहे ‘आकाशभाषिते’ (मॅजेस्टिक). त्याच प्रकारचे, ‘मितुले आणि रसाळ’ प्रकाशित केले अक्षर प्रकाशनाने.

‘जिज्ञासा’ आणि ‘मनोविकास’ ही रचलेली पुस्तके. ती आहेत मनआरोग्याशी संबंधित दोन प्रकल्पांविषयी. तरीही त्यांच्या आवृत्त्या निघत आहेत हे विशेष. आजवरच्या चोवीस पुस्तकांपैकी एकवीस पुस्तके आजही वाचन प्रवाहात आहेत हे नमूद करताना समाधान आहे. कोविडच्या काळामध्ये माझी लेखकी उत्पादकता ओसंडून वाहू लागली. त्या काळात ऑनलाइन आणि ऑफलाइन रुग्णसेवा देत होतो. शेकडो वेबिनार्समधून जगापर्यंत पोहोचत होतो. त्या काळातील लेखांचे पुस्तक, ‘करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस’ (मनोविकास), ‘अव्यक्ताचा आरसा’ आणि ‘तुझ्याचसाठी ऋतु हा’ हे काव्यसंग्रह (बुकगंगा), आकाशभाषिते (ललित) तर वेदान्त तत्त्वज्ञानावरचे मनमैत्रीच्या देशात (मॅजेस्टिक) आणि बुद्धांसोबत क्षणोक्षणी (मनोविकास) अशी पुस्तके आली. प्रत्येक पुस्तकाची स्वत:ची  अशी एक कहाणी असते. बुद्ध विचारांचा अभ्यास करताना टिपणे काढायला सुरुवात केली तर त्या टिपणांनी काव्याचे स्वरूप घेतले. एकशे एक कविता आणि त्यावरचे निरूपण याचे पुस्तक बनले.  विपश्यना आणि क्षणस्थता (माइंडफूलनेस) या ध्यानपद्धती वापरणारे अनेक जण मला सांगतात की या पुस्तकाची जोड त्यांच्या ध्यानसवयीला मिळाल्यावर जास्त लाभ झाला. कोविड काळामध्ये ‘वेदान्तविचार आणि व्यक्तित्व विकास’ ही यू-टय़ूब मालिका खूप पाहिली जाऊ लागली. म्हणून अधिक अभ्यास करताकरता चक्क पावणेचारशे पानांचे ‘मनमैत्रीच्या देशात’ हे पुस्तक बनले.

मी वयाची पासष्टी गाठली तरीही वाचकांमध्ये प्रिय असलेल्या ‘गद्धेपंचविशी’ला कसा विसरू? विद्याताई बाळ आणि संध्या टांकसाळेमुळे ही लेखमाला किर्लोस्कर-स्त्रीसाठी लिहिली आणि तिचे पुस्तक प्रथम डिंपल आणि नंतर मॅजेस्टिकने तयार केले. अजूनही ते पुस्तक वाचकांना खुणावते यात खूपच आनंद वाटतो. या पुस्तकामध्ये इतर लेखांसमवेत एकूण दोन दीर्घ लेख आहेत. एक आहे वैद्यकीय शिक्षणातील अनुभवांचा (थ्री चीयर्स फॉर हिप्पोक्रॅटीस) आणि दुसरा आहे, ‘प्लस नॉन प्लस.’ माझा जिवलग मित्र डॉ. महेश गोसावी एम.डी.च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला. त्या अपयशाचा मागोवा घेताना तो पोहोचला तत्कालीन मुख्यमंत्रींच्या मुलीच्या (बदललेल्या) निकालापर्यंत. या प्रकरणात एक मुख्यमंत्री, एक कुलगुरू आणि एक राज्यपाल यांना राजीनामा द्यावा लागला. हे कथन विजय तेंडुलकरांना इतके आवडले होते की ते त्यावर चित्रपट लिहिणार होते. त्यांच्या ‘आदित्य प्रोडक्शन’चा, ‘पेन मनी’चा चेक प्रियाने (तेंडुलकर) माझ्या हातात ठेवला होता. तो माझ्यासाठी अत्युच्च समाधानाचा क्षण होता. पुढे हा प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही, पण तेंडुलकरांनी माझ्या पहिल्यावहिल्या एकांकिकेवरून माझी अर्धा तास ‘व्हायव्हा’ घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर हे फारच ग्रेट होते माझ्यासाठी.

तर विविध साहित्यप्रकार आणि मनोरंजनातून ज्ञानरंजनाकडे जाणारा हा चाळीस वर्षांचा प्रवास घडला तरी कसा आपल्या हातून याचे मलाच आश्चर्य वाटते. ‘वादळाचे किनारे’ हे लेखन प्रवासातले रौप्य महोत्सवी पुस्तक, तर फेब्रुवारी ५ ते एप्रिल २० असे २०२३ सालच्या अडीच महिन्यात पूर्ण झाले. व्यसनाधीनता आणि व्यसनमुक्ती याकडे विविध वयोगटांतील मुलांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या ‘सचित्र’ गोष्टी असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. एके काळी मी लघुकथासुद्धा लिहायचो. ती शैली या लिखाणाने पुन्हा जागवली आहे.

या चाळीस वर्षांमध्ये रुग्णसेवा, संस्था संसार, सततचा प्रवास, भाषणे-परिसंवाद आणि वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार यासोबत हा लेखनप्रवास आणि त्यासाठी लागणारा अभ्यासही सुरू राहिला. किंबहुना या लेखनप्रवासामुळे जगण्याला, कल्पक मनाची डूब मिळाली असे म्हटले पाहिजे.. आपल्या हातात, न लिहिणे न थांबणे. मनातल्या वाटाडय़ाने खुणावले की त्या दिशेला जात राहणे.. पुस्तकसंख्या आणि खपाचे आकडे फारसे महत्त्वाचे नाहीत.. वाचकाच्या नजरेमधून पुस्तकाबद्दलचे प्रेम वाहत असते तो अनुभव लाख मोलाचा!

(‘मनापेनाची कहाणी’ या आगामी पुस्तकातून)

anandiph@gmail.com

Story img Loader