‘सखाराम’कांड ओसरल्यावर आमचा गाडा पुन्हा एकदा रुळावर आला. एन्टरटेन्मेंट टॅक्स विभाग आता आमच्या अर्जाची त्वरेने दखल घेऊ लागला होता. तुम्ही केलेल्या कामगिरीपेक्षा कोणत्या मंत्र्याशी तुमची ओळख आहे यावरून तुमची पत ठरवली जाते, हे आम्हाला कळून चुकले. दुर्दैव!
निवडक मराठी नाटकांची हिंदीभाषिकांना ओळख करून देण्याचा वसा आम्ही घेतला होता. महेश एलकुंचवारचं ‘वासनाकांड’ माझ्या वाचनात आलं. एका निषिद्ध प्रांतात मानवी भावनांचा मागोवा घेणारे हळुवार आणि तितकेच समर्थ नाटक; किंवा ‘नाटय़रूपी काव्य’ म्हटलं तरी चालेल. दोनच पात्रं- बहीण आणि भाऊ. त्यांचे मनस्वी प्रेम. विषय रूढीला सोडून होता. तो हाताळताना कोणत्याही प्रकारे तो बीभत्स न वाटता त्यातली कोमलता हळुवारपणे उकलणे, हे दिग्दर्शकाला मोठे आव्हान होते. ते स्वीकारण्याचं मी ठरवलं.
कुसुम हैदरने नायिकेची भूमिका मोठय़ा उत्साहाने स्वीकारली. कुसुम असामान्य प्रतिभेची अभिनेत्री होती. दिल्लीला येण्याआधी तिने मुंबईला अल्काझींच्या हाताखाली मोठमोठय़ा वजनदार नाटकांमधून प्रमुख भूमिका केल्या होत्या. इब्सेनच्या ‘डॉल्स हाऊस’मधली नोरा, स्ट्रिंडबर्गची मिस् ज्यूली, लोर्काची कूस उजवत नाही म्हणून दु:खी असलेली येर्मा, शॉची जोन आणि आंवीची ‘अँटिगनी’.. या सगळ्याजणींना तिने स्टेजवर समूर्त केलं होतं. लहानखोऱ्या चणीची आणि या चणीला न साजणाऱ्या बुलंद आवाजाची कुसुम मंचावर अवतरली की नजर तिच्यावरच खिळून राही. तिच्या जोडीला निगम प्रकाशची निवड झाली. निगम हौस म्हणून किंवा सामाजिक विरंगुळा म्हणून नाटक करी. एरवी त्याची तेजस्वी कारकीर्द सुरू झाली होती. आमच्या तालमी सुरू झाल्या तेव्हा कार ची परीक्षा पास करून तो फॉरिन मिनिस्ट्रीमध्ये डेप्युटी सेक्रेटरीच्या हुद्दय़ावर होता. (पुढे तो पॅरिसमध्ये तीन वर्षे ‘डेप्युटी चीफ ऑफ मिशन’ होता. आणि नंतर अर्जेटिनामध्ये भारताचा अॅम्बॅसडर. दोन्ही ठिकाणी मी त्याचा छान पाहुणचार घेतला. अर्जेटिनामध्ये ब्यूरोज आयरीजला मी पाच दिवस त्याच्या घरी राहिले होते. २००० सालच्या सुमारास.) निगम नट म्हणून ठीकठाक होता. कुसुमच्या अभिव्यक्तीला नित्यनवीन धुमारे फुटत असत. निगम त्यामानाने एकसुरी होता. पण तल्लख बुद्धिमत्तेचा वापर करून तो एखादा पॉझ किंवा एखादा सूचक हावभाव असा करीत असे, की पाहणाऱ्याने चकित व्हावं.
नाटकाचे- किंबहुना कोणत्याही कलाकृतीचे अंतिम न्यायालय : जनता. ‘वासनाकांड’मधल्या निषिद्ध प्रेमकहाणीची साहजिकच भरपूर चर्चा झाली. आणि म्हणूनच की काय, नाटक पाह्य़ला मोठय़ा संख्येने प्रेक्षक आले. भारावल्यासारखे निश्चल बसून ते प्रयोग पाहत. पण नंतर मनमोकळी दाद द्यायला कचरत. ‘‘वा! छान.. अं.. म्हणजे प्रयोग.. अं.. मला खूपच आवडला.. पण.. अं.. सामान्य प्रेक्षकाला कितपत पचेल.. अं.. म्हणजे रुचेल.. अं.. शंका आहे..’ असं तोंडातल्या तोंडात काहीतरी वक्तव्य करून ते चालते होत. नाटक चाकोरीबाहेरचे असले की आपली नेमकी कशी प्रतिक्रिया झाली पाहिजे, याबद्दल संभ्रमात पडलेले शौकीन मला वरचेवर भेटले आहेत. थोडक्यात- खूप मेहनत घेऊन बसवलेल्या या नेटक्या प्रयोगाला दिलखुलास नव्हे, तर पुटपुटती दाद मिळाली. पण आम्हा सर्वाना हे नाटक बसवताना एका वेगळ्याच झपाटलेपणाचा अनुभव आला. कुसुमने आणि निगमनेदेखील एका उंच पातळीवर ते नेऊन स्थानापन्न केले. (या वर्षीच कुसुम हैदरला ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळाला. ती आणि निगम (आता निवृत्त) दोघे सध्या दिल्लीला असतात. माझे नवे नाटक ‘इवलेसे रोप’ याचा रेखा देशपांडेने केलेला सुरेख हिंदी अनुवाद ‘बिरवा’ मी नुकताच तीन-चार महिन्यांपूर्वी दिल्लीला वाचला. वाचनाचा हा कार्यक्रम साहित्य अकादमीतर्फे आयोजित केला गेला होता. आणि गंमत म्हणजे माझे हे दोन्ही कलाकार त्याला आवर्जून आले होते.) खूप नंतर.. अनेक वर्षांनी- म्हणजे दिल्ली सोडून मी मुंबईला स्थलांतर केल्यावर पुन्हा एकदा मी ‘वासनाकांड’ बसवले. कलाकार : स्मिता पाटील आणि ओम पुरी. पण पुढचं पुढे!
progressive dramatic Association मध्ये मी (लिंबूटिंबू) असताना व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘जाणार कुठे?’चं वाचन झालं होतं. नाटक सगळ्यांनाच खूप आवडलं. पण त्याचं नाव मात्र कुणालाच पसंत नव्हतं (माडगूळकरांसकट). कुणी कुरकुर केली की ते काहीसे त्रासून म्हणत, ‘मग चांगलं नाव तुम्ही सुचवा ना!’ पण कुणालाच काही सुचलं नाही. आणि त्या निष्प्रभ मथळ्यानेच तालमी सुरू झाल्या.
शंभरएक वर्षांपूर्वीचा काळ. एक निर्मळ, भाबडं खेडं. स्वत:मध्येच दंग. तृप्त. एका कुंभाराच्या परसदारात कथानक फुलते- आणि कोमेजतेही. कोंडी भला इसम आहे. रीतीला धरून वागणारा. सत्याची चाड बाळगणारा. अवघ्या गावाची गाडगीमडकी रांधून त्याची चांगली गुजराण होते. पण तेवढय़ावर त्याचा नादान मुलगा तृप्त नसतो. भोजाला बापाचा धंदा पसंत नसतो. स्वत: कुचकामी असूनही तो स्वप्ने गोमटी पाहतो. संसारात त्याचे लक्ष नसते. बायको देखणी आणि सुलक्षणी असूनही!
खेडय़ात अचानक प्रवासी बससेवा सुरू होते. इतके दिवस अलिप्त असलेले गाव बाहेरच्या दुनियेशी जखडले जाते. बसबरोबर शहरी प्रलोभनं खेडय़ात घुसतात. पाहता पाहता निर्मळ दुधाचं नासकवणी होऊ लागतं. बसबरोबर येतो बसचा ड्रायव्हर. रंगेल, छाकटा, स्त्रीलंपट. कुंभाराची सून त्याला आवडते. पण ती त्याला धुडकावून लावते. तिचा नवरा मात्र त्याच्या आहारी जातो.
शहरी आक्रमणाविरुद्ध आक्रोश करणारे हे नाटक प्रथमपासूनच जबरदस्त पकड घेते. एकापेक्षा एक नाटय़पूर्ण घटना घडत जातात आणि एखाद्या चित्रपटाप्रमाणे कथानक उलगडत जाते. वासुदेव पाळंदे (पुढे माझ्या ‘कथा’ सिनेमातला घंटी वाजवत राहणारा चाळकरी.) याने आपला बोलका चेहरा वापरून अविस्मरणीय कुंभार घडवला. अरुणने त्याच्या मुलाचे काम केले आणि राम खरेने ड्रायव्हरचे. माझ्या मते, उत्तम कामे करूनही राम आणि अरुण आपापल्या भूमिकांमध्ये चपखल बसले नाहीत. राम डोक्यावर काळी टोपी, गळ्याभोवती ऐटबाज रुमाल आणि डोळ्यांत काजळ रेखून दिसला इरसाल; पण अंगी असलेला मूलभूत भलेपणा तो काही लपवू शकला नाही. त्यामुळे मवालीपणाचा त्याचा ‘आव’ हा शेवटपर्यंत आवच वाटत राहिला. याउलट, नेहमी अरेरावीकडे झुकणारा आपला अभिनयाचा बाज बदलून अरुणने उभा केलेला नगण्य नवरा मला फारसा पटला नाही. पण हे आपले माझे मत.
प्रयोग चांगला होऊनही नाटक फारसं चाललं नाही. कारण शेवटचा चौथा अंक प्रवचनवजा वाटत असे. त्यामुळे प्रेक्षक कंटाळत. पण पुढे राज्य नाटय़स्पर्धेसाठी थोडी काटछाट करून हेच नाटक सादर करावं असं सर्वानुमते ठरलं. आता छानसे समर्पक नावही मिळाले होते- ‘तू वेडा कुंभार’! ग. दि. माडगूळकरांच्या सुंदर गीताची ओळ. नाटकाला पारितोषिक तर मिळालेच; पण पुढे त्याचे शंभरएक प्रयोगही झाले.
या नाटकाशी माझा तसा प्रत्यक्ष संबंध आला नसूनही एवढे सविस्तर लिहिण्याचे कारण की, हे नाटक माझ्या मनावर खूप ठसले होते. त्यामधला नाटक आणि चित्रपट माध्यमांचा संयोग माझ्या प्रकृतीला खूप भावला होता. तेव्हा ‘नाटय़द्वयी’च्या मराठी ते हिंदी उपक्रमासाठी मी त्याची निवड केली.
नाटकाचे हिंदी भाषांतर तयार नव्हते. सुदेश स्याल हा आमचा मित्र आणि संस्थेचा एक कट्टर कार्यकर्ता. त्याने आमच्या दोन-तीन नाटकांचे दमदार भाषांतर केले होते. ओघवती बोलीभाषा ही त्याची खासियत होती. त्याला मराठी येत नव्हते. अरुण किंवा मी ‘आमच्या’ हिंदीमधून (वा इंग्रजीतून) त्याला वाक्याचा अर्थ सांगायचो, मग त्याने त्याचे भाषांतर करायचे- असा आमचा काहीसा द्राविडी प्राणायाम होता. पण तेव्हा वेळ किंवा उत्साह यांचा तुटवडा नसल्यामुळे उत्तम कार्यभाग साधणारी ही पद्धत आम्हाला मंजूर होती.
त्याला ‘वेडा कुंभार’चा मसुदा सांगत असताना तो सारखा ‘ए तो बिलकुल पंजाबी ए!’ म्हणू लागला. खरंच होतं ते. माडगूळकरांच्या या नाटकाची ऊर्मी आणि पंजाबी अभिव्यक्तीचा जोश यांची जातकुळी मला एकच वाटते. तोच ठेका. तीच लय. तेव्हा मातीचा सुगंध असलेले हे नाटक (बोलूनचालून कुंभाराच्या परसात घडलेले) पंजाबच्या एखाद्या खेडय़ात छान बहराला येईल अशी मला खात्री वाटली.
मुळात मला पंजाबी भाषेचे पहिल्यापासून आकर्षण आहे. ती एक अस्सल भाषा आहे. रोखठोक. सडेतोड. भाषेची लफ्फेदार आलंकारिक वळसेवळणे तिला मंजूर नाहीत. अर्थ समजल्याशी मतलब. हो. लडिवाळ प्रेमसंबोधने आणि शिवीगाळ या दोन बाबतीत मात्र तिचा कल्पनाविलास अफाट आहे. प्रेयसीला ‘सोणियो,’ ‘लाडोरानी,’ ‘माखणियो’ (मक्खनमयी) किंवा ‘मलई दे डोणियो’ म्हणून पुकारल्यावर प्रेयसी प्रसन्न का होणार नाही? बाकी प्रियतमेला ‘मलईचा द्रोण’ एक पंजाबीच म्हणू जाणे. बरं, आता पंजाबी शिवराळपणाचा मासला तर पाहा. ‘खसमनु खाण्या’ (जोडीदार भक्षण करणाऱ्या), ‘रुडपुड जाण्या’ (गटांगळ्या खात जाणाऱ्या) आणि सर्वात अर्थपूर्ण म्हणजे ‘रंडी छडण्या’ (विधवा सोडून जाणाऱ्या).. असो. चांगलं नाटकाबद्दल बोलताना मी शिवीगाळीवर का उतरले?
नव्या प्रकल्पाबद्दल आमची चर्चा चालू असताना एक विलक्षण योगायोग घडून आला. दिल्लीच्याच ‘अग्रदूत’ या संस्थेचा प्राण तलवार मला भेटला. हा तरुण, तडफदार उद्योजक नाटकवेडा होता. त्यापायी त्याने ही संस्था स्थापन केली होती. ‘अग्रदूत’साठी मी पु. लं.चं ‘विठ्ठल तो आला.. आला’ आणि वृंदावन दंडवतेचं ‘कुलवृत्तांत’ ही दोन नाटके हिंदीमधून प्रस्तुत केली होती. आता त्यांना एक पंजाबी नाटक बसवायचं होतं. ते मी बसवावं असा त्याचा आग्रह होता. ‘कसं शक्य आहे? मला पंजाबी कुठे बोलता येतं?,’ मी म्हटलं. यावर प्राण म्हणाला, ‘‘की फरक पैंदाए? पंजाबी समजतं ना! झालं तर मग. ठरलं!’’
मीही मनात म्हटलं, ‘भतेरे पापड बेले है. यह और सही.’
‘अग्रदूत’च्या सुरेंदर गुलाटींनी भाषांतराचे काम हाती घेतले. सुरळीतपणे चाललेले हे काम चोळीच्या खणापाशी येऊन अडले. नाटकामध्ये भोजाच्या बायकोवर डोळा असलेला बसड्रायव्हर तिला जत्रेमध्ये घेतलेला चोळीचा खण नजर करतो. तो ती त्वेषाने भिरकावते. शेवटच्या अंकात त्याच खणाची चोळी तिच्या अंगात दिसते. तर अशा या खणाचे नाटकात खूपच महत्त्व आहे. त्या खणाचे ‘स्थलांतर’ कसे करायचे? कुडत्याचे कापड, वेणीचा रेशमी गोंडा, नक्षीकाम केलेले जुते असे बरेच पर्याय चर्चिले गेले; पण कुणालाच ते पटले नाहीत. आणि मग एक नामी लेणे सुचले- ओढणी. स्त्रीचे प्रतीक! पंजाबी स्त्रीचे प्रतीक!!
पात्रयोजना ठरवताना ‘अग्रदूत’ आणि ‘नाटय़द्वयी’ यांची संयुक्त पुण्याई कामी आली. समर्थ आणि सुपरिचित कलाकारांची एक फळीच उभी राहिली. कुंभार- कुलभूषण खरबंदा. त्याचा मुलगा- कीमती आनंद (हा टी.व्ही. आणि पंजाबी रंगभूमीवर गाजलेला गुणी नट). त्याची बायको- सुधा चोपडा. आणि इरसाल ड्रायव्हर- सुदेश महान. सगळेच दिल्लीमधले जानेमाने कलाकार.
भाषांतर इतकं जिवंत होतं, की माडगूळकरांनी नाटक थेट पंजाबीत लिहिलं की काय, असा संभ्रम वाटावा. ‘चक्का चलदा ए’ (चाक फिरतं आहे!) हा मथळा सर्वानुमते मुक्रर झाला. हे ‘चाक’ द्वय़र्थी होते. कुंभाराचे- आणि खेरीज अटळ प्रगतीचे द्योतक.
हसतखेळत, थट्टामस्करी, मस्ती, दंगा करत आमच्या तालमी ‘पंजाबी’ ढंगाने सुरू झाल्या. शिस्त थोडी कमी; पण जोश भरपूर. अधूनमधून म्हणजे साधारण तीन-चार दिवसांनी एकदा तरी नट मंडळींच्यात खडाजंगी भांडण उसळत असे. एकजण दुसऱ्याचा उच्चार सुधारायला जाई. प्रत्येकजण हा पंजाबच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामधून आलेला. साहजिकच तो आपल्या मुलखाच्या मातीशी इमान राखून असे. ठिकठिकाणच्या बोलीभाषेत बराच फरक असे. त्यावरून हे वादंग माजायचे. अगदी ‘तू-तू, मैं-मैं’वर मंडळी उतरत. भांडण ओसरेपर्यंत तालीम थांबवावी लागे. मग पतियाळा, अमृतसर, लुधियाना, पठाणकोट, जलंदर यापैकी कुणा एकाची सरशी झाली की मगच गाडी परत रुळावर येई. तोपर्यंत मी गप्प कोपऱ्यात बसून असे. तेवढय़ापुरती निष्क्रिय दिग्दर्शिका. त्या टीमला मी पुणेरी ठसक्यात पंजाबी बोलायला थोडंच सांगू शकणार होते?
नाटक छान बसले आणि त्याचा प्रयोगही दणदणीत झाला. तमाम कलाकारांनी अप्रतिम अदाकारी केली. नशिबी खापरं-ठिकऱ्या उरलेल्या पाहून स्वत:च उद्ध्वस्त झालेला कुलभूषणचा कुंभार, नवऱ्याच्या कुचकामीपणामुळे परपुरुषाकडे आकर्षित झालेली सून सुधा चोपडा, हावरेपणाच्या नाना छटा दाखवणारा कीमती आनंदचा नामर्द नवरा आणि बेरकी ड्रायव्हर सुदेश महान (राम खरेप्रमाणे याच्या व्यक्तिरेखेत कुठेही चांगुलपणाचा पडसाद जाणवला नाही!).. सगळीच पात्रे स्टेजवर ठळकपणे उभी राहिली.
‘चक्का’मध्ये भरपूर गावकरी, बायाबापडय़ा, मुले होती. एका बाजाराच्या प्रवेशाआधी विनी आणि गौतम (वये ७ आणि ५) गाणे गात, शिवाशिवीच्या खेळण्याच्या मस्तीत स्टेजवर उधळत येत.
‘लुकछुक जाना, मकई दा दाणा, राजे दी बेटी
आई ऽऽ जे ऽऽ.. आ ऽऽ जा ऽऽ’
तेव्हाचे हे ‘बाल’मान्य गीत होते. थोडी वातावरणनिर्मिती! एकदा काही कारणाने गौतम रुसला. विंगेत घट्ट पाय रोवून उभा राहिला. त्यानं एंट्री घेतलीच नाही. मग एकटी विनीच स्टेजवर बागडून आली.
प्रवासी बसबरोबरच खेडय़ामध्ये आगंतुक विक्रेत्यांची ये-जा सुरू होते. अशा एका फुगे-भिरभिरेवाल्याकडून घेतलेला एका पोराचा फुगा ताबडतोब फुटतो. त्या पोराची आई चवताळून फुगेवाल्याच्या मागे धावते, अशी एक भूमिका होती. ती छोटीशी भूमिका मी केली. पाच-सहाच वाक्यं होती. खूप झटापट करूनही शेवटपर्यंत पंजाबी भाषेचा गोड लटका काही मला नीट जमला नाही. हा, मात्र माझ्या या छोटय़ा प्रवेशात एका ठिकाणी मात्र मी हमखास टाळी घेत असे.
या भूमिकेसाठी मी एक छानसा पंजाबी जोड- त्याला आवर्जून बायका ‘सूट’ म्हणतात- शिवला होता. नाडा हा प्रकार-मग तो सलवारीचा असो की इतर कशाचाही असो, आपण सहसा एक गरजेचा, पण शक्यतो लपवण्याचा प्रकार मानतो. पण हा नाडा मिरवण्यासाठी- चक्क एक आभूषण म्हणूनही वापरला जातो, हे मला ‘चक्का’च्या तालमीत प्रथमच कळलं. दर्शनी नाडा! सणासमारंभाला, लग्नकार्यामध्ये घालायचे खास ‘डिझाइनर’ नाडे असतात. रंगीबेरंगी, जरतारी, रेशीमगोफाचे, झुबकेदार- नाडय़ांच्या मीनाबाजारात हरतऱ्हेचे नमुने मिळतात. हे नाडे कुडत्याच्या खाली किमान सहा इंच लटकले पाहिजेत. नाही तर ते दिसणार कसे?
माझ्या सुटासाठी मी फारच झोकदार नाडा निवडला. त्याला लालचुटुक गोंडा होता आणि शिवाय एक नक्षीदार गोल बिलोरी आरसाही.
फुगेवाल्याच्या मागे मी रंगमंचावर तरातरा येत असे. आमचे जोरदार भांडण होई. एकमेकांकडे आमचे तोंड असल्यामुळे प्रेक्षकांना आमची एकच बाजू- Profile दिसे. अखेर फुगेवाल्याकडून एक आणा परत मिळाल्यावर मी आनंदाने गिरकी मारून प्रथमच प्रेक्षकांना ‘सामोरी’ जात असे. एक क्षणभराचा पॉझ आणि मग गडगडाटी हशा आणि टाळ्यांचा कडकडाट यांनी हॉल दणाणून जात असे. बरोबर सम पकडून वळले, की माझा गोंडेदार नाडा एक छानसा झोका घेई. बिलोरी आरसा क्षणभर लखक्कन चमकून जाई. पाठोपाठ प्रेक्षकांची प्रचंड दाद उसळत असे. अर्थात् ही दाद मला नसून माझ्या नाडय़ाला आहे याची मला नम्र जाणीवही होती.
नाटकाच्या यशाने प्राण तलवार मोहरून गेला. आपला प्रचंड व्यवसाय संभाळून तो कायम नाटकाला सर्वतोपरीने प्रोत्साहन देत राहिला. Confederation of Indian Industries या मान्यवर संस्थेचा पुढे तो अध्यक्ष झाला. काही वर्षांपूर्वी या उमद्या, तडफदार आणि हौशी नाटय़ाराधकाचे कॅन्सरने अकाली निधन झाले.
‘चक्का चलदा ए’च्या अनुभवामुळे एक अव्वल मराठी नाटक पंजाबी परिवेषात तितकेच अस्सल वाटू शकते याचा प्रत्यय आला. अमाप समाधान वाटले. भाषावार नाटय़रचनेच्या सीमा लवचिक असू शकतात, हे छान पटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा