lr05‘चाहूल’ हे माझ्यासाठी केवळ एक नाटक नाहीए, तर मनाच्या कप्प्यातली ती एक हळुवार जागा आहे. १३० प्रयोगांचं अल्पायुष्य लाभलेलं हे नाटक मला आयुष्यभर सोबत देईल अशी माझी ठाम समजूत आहे. नाटकातल्या विषयाच्या खोलात शिरताना आत उजेडाचा कोणताही कवडसा गवसला नाही, हे खरं.. उलट, हात काळोखातच बरबटले. पण निदान भ्रामक समजुतीत जगण्यापेक्षा डोळे त्या अंधाराला सरावले. या नाटकानं १७ वर्षांपूर्वी चंगळवादाची चाहूल घेण्याची संधी दिली. आज तीच जीवनशैली म्हणून जगताना तेव्हा अंधारात सरावलेले हे डोळे उपयोगी पडताहेत.. आणि पडणारेत. याच अर्थानं ‘चाहूल’नं मला नाटककाराच्याही आधी एक माणूस म्हणून जगण्याची, जगणं निरखण्याची, निरखून पारखण्याची दृष्टी दिली. त्यामुळे उद्या कोणत्याही विषयावर नवं नाटक लिहिताना, कोणत्याही स्थित्यंतराकडे बघताना- मग ते सामाजिक-राजकीय असो की नातेसंबंधातलं- मला ‘चाहूल’ची ही बायफोकल, प्रोग्रेसिव्ह लेन्स उपयोगी पडणार आहे.
‘चाहूल’ हे माझं मुख्य धारेतलं तिसरं नाटक. ‘ध्यानीमनी’नंतर ‘चाहूल’पर्यंत पोचायला तब्बल चार र्वष लागली! मी नाटककार म्हणून स्वत:वरचा विश्वासच पार गमावून बसलो होतो. औरंगाबादहून मुंबईत आल्यानंतर ‘चारचौघी’ पूर्ण करायला जेव्हा असाच वेळ लागला होता, तेव्हाही हीच अवस्था अनुभवली होती. त्यावेळी व्यावसायिक रंगभूमीवर नाटककार म्हणून मी निदान नवीन तरी होतो. ‘चाहूल’ला मात्र दोन तथाकथित ‘यशस्वी’ नाटकांची पाश्र्वभूमी होती. या यशाची तर मला भीती वाटत नव्हती? की माझ्याकडून निर्माण झालेल्या अपेक्षांना मी घाबरत होतो?
या चार वर्षांत आजूबाजूला काय घडत होतं? बाबरी मशीद पाडली गेली होती. मुंबईतल्या दोन भीषण दंगली अनुभवल्या होत्या. एकीकडे नमाज आणि महाआरत्यांची जुगलबंदी रंगत होती, तर दुसरीकडे आमच्या एका नाटककार मित्राला या तणावादरम्यान कडीकुलपात स्वतला कोंडून घ्यावं लागल्याचं ऐकून कासावीस व्हायला होत होतं. मग बॉम्बस्फोट मालिकेनं हादरवून सोडलं. सूड, क्रौर्य आणि िहसेची ही मानवनिर्मित अमानवी रूपं ढवळून काढत होती. त्यातच किल्लारीच्या भूकंपाच्या संकटाची भर पडली. तिथल्या मृत्यूच्या तांडवानं जितकं हेलावून सोडलं, तितकंच भूकंपानंतरच्या मदतीच्या ओघात स्वत:चे हात धुऊन घेणारी माणसं पाहून दचकायला झालं. भूकंपग्रस्त गावाला भेट द्यायला आलेल्या पाहुण्यांना आधी गोडाचं जेवण घालणाऱ्या सरपंचाचे किस्से ऐकून चक्रावलो! दंगल असो की भूकंप.. निसर्गनिर्मित संकट असो की मानवनिर्मित.. ते पेलायला ‘माणूस’ म्हणून आपण असमर्थ, दुबळे, अशक्त ठरत होतो. या दुबळेपणातूनच अध:पतनाचा एक उदास सूर उमटत होता..
जागतिकीकरणानं ‘सोयी’चं जगच तेवढं जवळ आलं होतं आणि गरजेचं, देवाणघेवाणीचं एक नवं युग जन्माला येत होतं. ज्यात प्रगतीसाठी तडजोड ही एक अटळ बाब बनली होती. यातूनच जागोजागी अधोगतीची बीजं पेरली जात होती. मोबाइल, पेजर, केबल, चॅनल्स संस्कृती अंगात भिनत होती. साधन आणि साध्य, गरज आणि चन यांमधल्या सीमारेषा झपाटय़ानं धूसर होत गेल्या आणि चंगळवादाची सूज बाळसं समजून आपण अंगावर मिरवू लागलो.
हा सारा अस्वस्थ भवताल तेव्हा मला माझ्या नव्या नाटकाचा आशय म्हणून खुणावू लागला आणि लग्नाला उणीपुरी पाच र्वष झालेले मकरंद-माधवी माझ्या डोळ्यासमोर आले. जे नुकतेच नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालेत. एका संध्याकाळी मकरंद अस्वस्थ मन:स्थितीत घरी आलाय. आपला राग तो ‘टूथपेस्ट’पासून ‘वर्तमानपत्रा’तल्या मजकुरापर्यंत सर्व गोष्टींवर व्यक्त करतोय. माधवी मात्र नव्या घराच्या सजावटीबद्दल बोलतेय. सुरुवातीला तिला मकरंदचं नेमकं काय बिनसलंय, ते कळत नाही. ती त्याला तसं प्रश्न विचारून हैराणही करते. ‘मकरंदच्या बॉसनं (मंडलिक) माधवीला एका रात्रीसाठी लोणावळ्याला बोलावलंय-’ असं अखेर टप्प्याटप्प्यानं मकरंद तिला सांगतो. यापुढे या मंडलिकनं केलेल्या मागणीच्या निमित्तानं त्या दोघांची होणारी मानसिक, भावनिक, बौद्धिक उलथापालथ या दोनच पात्रांच्या माध्यमातून मांडायचं ठरलं.
‘चाहूल’चा दीड अंकाचा पहिला खर्डा एका ओघात पूर्णही झाला. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (चंदू), प्रतीक्षा आणि माझ्या ‘जिगीषा’ ग्रुपसमोर वाचन झालं. स्पष्ट बोलण्याची आवड असलेल्या माझ्या सगळ्या मित्रमत्रिणींनी पहिल्या आणि दुसऱ्या अंकाचा सूरच जुळत नसल्याचं सांगितलं. दुसऱ्या अंकात नाटकाचा ‘फॉर्म’च बदललाय, हे सांगताना कुणी थोडीही दयामाया दाखवली नाही. झालं! आता मात्र उरलासुरला उत्साहही ओसरला. चंदूबरोबर पुन्हा नव्यानं चर्चा सुरू झाल्या. मित्रमंडळींच्या डोक्यातही ‘चाहूल’चा विषय मुरला होताच. ‘चाहूल’चा सूर सापडण्यासाठी आम्ही सगळेच झटत होतो..
हळूहळू लक्षात येऊ लागलं की, मी मधल्या काळातल्या भवतालापासून ‘चाहूल’मधल्या मकरंद-माधवीला एखाद्या जबाबदार पालकासारखं जणू दूर ठेवू पाहत होतो. त्यांना या अध:पतनाची झळ लागू नये यासाठी आटापिटा करत होतो. म्हणजेच पर्यायानं मी जणू माझे सामाजिक विचार, माझा स्त्रीवादी दृष्टिकोन त्यांच्यावर लादत होतो. माधवी-मकरंदच्या डोक्यावर धरलेले माझे हात त्यांना छत्रच काय, साधी सावली द्यायलाही पुरेसे नव्हते. काळानं देऊ केलेल्या नव्या भुकेच्या ज्वरानं त्यांचं सारं अंग आधीच तापलं होतं. आणि मग बजावलं स्वत:ला, की पुरे झालं आता आजूबाजूच्यांना दोष देणं! पुरुषप्रधान संस्कृती दोषी आहे; मी नाही. राजकारणी भ्रष्ट आहेत; मी नाही. डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक बेजबाबदार आहेत; मी नाही. हे असं किती दिवस आपण फक्त दुसऱ्यांच्या खांद्यावर दोष ढकलणार आहोत? अध:पतनाची जबाबदारी फक्त इतरांवर ढकलून भागणार नाही. त्याची मुळं स्वत:त- म्हणजेच आधी ‘माणसा’त शोधायला हवी! कारण काळाच्या रेटय़ाबरोबर स्थित्यंतरं ही घडणारच. प्रगती आणि अधोगती एकमेकांच्या गळ्यात गळे घालून मुक्तपणे संचारणारच! बदलांच्या प्रवाहातलं नेमकं काय घ्यायचं, हे शेवटी ठरवणारे आपणच असतो नं? इथेच जर आपण कमी पडत असू, दुबळे ठरत असू, मित्र-मत्रिणी, नवरा-बायकोच्या नात्यांतही सत्तास्पध्रेतला सावधपणा शिरू देत असू, तर त्याचं ‘पोस्टमार्टेम’ हे व्हायलाच हवं!
मग ठरवलं, माधवी-मकरंदवर आपलं मत न लादता त्यांना त्यांच्या मनासारखं; ते जसे आहेत तसंच वागू, बोलू द्यायचं. त्याशिवाय हे नाटक पुढेच सरकू शकणार नाही. एवढंच कशाला, त्याशिवाय हे नाटक ‘प्रामाणिक’ किंवा ’खरं’ तरी कसं होईल? इथे पहिल्यांदा तेंडुलकरांकडे असलेली पात्रांकडे तटस्थपणे, क्रूरपणे पाहण्याची शक्ती मला मिळावी असं वाटलं. हळुहळू खरे मकरंद-माधवी दिसायला लागले. डोक्यावर धरलेले हात अलगद बाजूला झाले आणि रेंगाळलेल्या नाटकानं अचानक गती घेतली. एकीकडे नाटकाला त्याचा योग्य मार्ग सापडल्याचा आनंद मनात होता, तर दुसरीकडे मकरंद-माधवी पथभ्रष्ट झाल्याचं दु:ख. ‘नो आयडियोलॉजी इज द ओन्ली आयडियोलॉजी’ हेच ब्रीदवाक्य मानणारे, पश्चात्तापाचं रूपांतरही चलाखीनं आत्मसमर्थनात करणारे, प्रसंगी एकमेकांवर उलटणारे, उसळणारे, कधी हळवे, कधी निबर असे हे नवरा-बायको होते, की युतीतल्या दोन पक्षांतले स्त्री-पुरुष राजकारणी? स्त्री-पुरुष म्हणून तरी त्यांचं कुठे असं वेगळं अस्तित्व होतं? उलट, स्त्रीत्व व पुरुषत्वाची अस्त्रंही ते सोयीच्या वेळीच बाहेर काढत होते.
आजच्या चंगळवादी प्रवृत्तीचा शोध घेताना मात्र स्त्री वा पुरुष असा भेद करून कुणा एकाकडे बघता येत नव्हतं. मकरंद-माधवीच्या ऱ्हासाचा अन्वयार्थ लावताना मला आपल्या स्त्रीवादी दृष्टिकोनाच्या पलीकडे जाण्याची गरज भासत होती. कारण एकीकडे मला तरी ते एका िलगातीत शोषणव्यवस्थेतले जोडीदार वाटत होते; जे यशाच्या व्यवसायातले भागीदार बनले होते. ‘स्त्रीत्व’ किंवा ‘पुरुषत्व’ हे इथे त्यांचं समसमान भागभांडवल होतं. बाकी बुद्धिमत्ता आणि अधिकाराच्या बाबतीत तर समानताच होती. त्यामुळे इथे कुणीच कुणावर अन्याय करण्याचा प्रश्नच नव्हता. मकरंदच्या आग्रहाला माधवी बळी पडण्याइतकी भाबडी राहिली नव्हती. किंवा फक्त माधवीच्या चनी वृत्तीमुळे मकरंद असहाय होण्याइतका बिच्चारा उरला नव्हता. ती दोघं जो काही निर्णय घेत होती तो पूर्णत: परस्परसंमती आणि सहमतीनंच. आंतरजातीय विवाह केला असला तरीही त्यांची गरजेची जात एकच होती.
इतके दिवस रेंगाळलेली संहिता अशी अचानक महिनाभरात हातात आली आणि ४ डिसेंबर ९७ ला पुन्हा एकदा सगळ्या मित्रांसमोर संपूर्ण ‘चाहूल’चं वाचन झालं. आठ-दहा महिन्यांपूर्वी केलेल्या वाचनात हरवलेला सूर या वाचनात सगळ्यांनाच गवसल्यासारखा वाटला. ‘चाहूल’मध्ये दोन्ही कलावंत ताकदीचे हवेत, याविषयी सर्वाचंच एकमत होतं. सिनेमांमध्ये आणि ‘नातं’ या दीर्घाकात आपला ठसा उमटवलेली सोनाली कुलकर्णी आणि प्रायोगिक नाटकांची, मालिकांची बळकट पाश्र्वभूमी असलेला तुषार दळवी यांनी आनंदानं होकार देऊन नाटकाची ही मागणी पूर्ण केली. दोघांनीही दीर्घकाळ स्मरणात राहील असा अभिनय केला. मोहन वाघांनीही पहिल्या वाचनातच नाटक ‘चंद्रलेखा’साठी स्वीकारलं. त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट होती. ‘हे नाटक एका विशिष्ट क्लासचं आहे. ते किती चालेल, माहीत नाही. पण तरीही ते वेगळं असल्यामुळे मला करायला आवडेल!’ मोहन वाघांच्या घरी झालेल्या वाचनालाच अनंत अमेंबल होते. तो पहिला माणूस होता- ज्यानं ग्रूपनंतर नाटकाचं इतकं सुरेख रसग्रहण, विश्लेषण केलं. त्यानं ‘चाहूल’ खऱ्या अर्थानं किती अंगावर घेतलं होतं ते पुढे त्यांच्या अंगावर येणाऱ्या पाश्र्वसंगीतातून जाणवलंच.
‘चाहूल’ची पाल्र्यातल्या एका फ्लॅटमध्ये दीड महिना कंबर कसून म्हणण्यापेक्षा बुद्धीला शीण येईपर्यंत तालीम झाली. चंदूनं पहिले दहा-पंधरा दिवस फक्त नाटकाच्या वाचनावरच भर दिला. वाचिक अभिनयावर मेहनत घेतली जात असताना प्रत्येक स्वरागणिक बदलत जाणाऱ्या आशयछटा ऐकताना मलाही माझं नाटक नव्यानं कळत होतं. मला आठवतं, एकदा तर चंदूनं तालमीत तुषारला ‘माधवी’ची भूमिका वाचायला लावली, तर सोनाली त्या दिवशी ‘मकरंद’ बनली होती. एकमेकांच्या भूमिका समजून घेण्यासाठी हा ‘मानसिक व्यायाम’ नक्कीच उपयोगी पडला.
‘चाहूल’च्या संहितेतच कुठेतरी नेपथ्य संकल्पना अंतर्भूत होती. मकरंद-माधवीच्या युक्तिवादांसाठी एक बंद विश्वच हवं होतं, तर दुसऱ्या स्तरावर बाहेरच्या जगाचं अस्तित्वही सतत जाणवायला हवं होतं. यातूनच मोहन वाघांच्या नेपथ्यरचनेत अवाढव्य खिडकीतून लखलखतं महानगर डोकावलं. यातला ‘लोखंडी पलंग’ म्हणजे केवळ प्रतीक नव्हतं, तर एक महत्त्वाचं अभिनय क्षेत्रच होतं. दारूच्या प्रसंगात या अभिनय क्षेत्राशी चंदूनं अत्यंत अर्थपूर्णरीत्या हालचाली निगडित केल्या.
नाटकाचं नाव ठरवताना ‘सोक्षमोक्ष’, ‘पाळंमुळं’, ‘सरभर’सारख्या अनेक नावांची भलीमोठी यादी निघाली होती. चार अक्षरी नाव दिलं तर ते मुद्दामच ‘चारचौघी’, ‘ध्यानीमनी’च्या रांगेत ओढूनताणून आणल्यासारखं वाटेल. आणि मोठं काव्यात्म नाव तर नकोसं वाटत होतं. शेवटी नेहमीप्रमाणेच चंदूला ‘चाहूल’ हे अत्यंत नेमकं व समर्पक नाव सुचलं.
अखेर प्रयोगाचा दिवस उजाडला. २५ जानेवारी ९८. शिवाजी मंदिर जवळजवळ भरलेलं होतं. युक्तिवाद, आरोप-प्रत्यारोपांचं हे दोन-पात्री नाटक एवढा मोठा जनसमुदाय एकत्र सहन करील? काही विक्षिप्त ‘कॉमेंट्स’ तर होणार नाहीत नं? आश्चर्य म्हणजे पहिली रांग ते बाल्कनीतल्या शेवटच्या रांगेपर्यंत नेमक्या जागी अचूक दाद देऊन मकरंद-माधवीचा वेडावाकडा आलेख प्रेक्षकांनी समजून घेतला होता. शेवटी पडदा पडताना एकही टाळी न वाजवण्याची खबरदारीही त्यांच्याकडून घेतली गेली होती.
..आता नाटक सगळ्यांचंच झालं होतं. प्रत्येकालाच त्याविषयी प्रतिक्रिया देण्याचं स्वातंत्र्य होतं. पहिल्या प्रयोगाला आलेले अमोल पालेकर, चित्रा पालेकर, शांता गोखले, रामदास भटकळ, मोहन गोखले हे सगळेच नुसतं ‘नाटक आवडलं’ म्हणून मोकळे झाले नाहीत, तर उत्तम विश्लेषण करून त्यांनी आपली प्रतिक्रिया ‘कमिट’ केली. ‘डायलॉगची आतषबाजी नसलेलं, काळजाचा ठाव घेणारे प्रसंग नसलेलं, प्रेक्षकांचा अनुनय करणाऱ्या ‘गिमिक्स’ नसलेलं, नेमका नाटय़ानुभव देणारं समर्थ नाटक!’ अशा शब्दांत अमोल पालेकरांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली होती. शांता गोखलेंनी ‘चाहूल इज अ स्टेप अहेड ऑफ ‘चारचौघी’ अ‍ॅण्ड ’ध्यानीमनी’,’ असं लिहून दिलासा दिलाच; पण त्याहीपेक्षा ‘मराठी रंगभूमीवर आजवर नतिकतेचा जो एक चिवट धागा होता तोच तू तोडलास..’ ही ग्रीनरूममध्ये त्यांनी दिलेली प्रतिक्रिया माझ्यासाठी अधिक महत्त्वाची होती. मोहन गोखलेनं तर ‘चाहूल’ला अनेकांना आग्रह करकरून पाठवलं. निखिल वागळे यांनी याला ‘राजकीय नाटक’ संबोधून ‘महानगर’चा ‘चाहूल’ला वाहिलेला पुरवणी दिवाळी अंकही काढला होता. दुबेजी नाटक पाहिल्यावर दोन-अडीच तास नाटकावर बोलत होते. त्यांना ‘डॉल्स हाऊस’ आठवत होतं. न्या. मृदुला भाटकर यांना ‘चाहूल’ बघताना त्यांच्याकडे येणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांची आत्मसमर्थन करण्याची अशीच पद्धत आठवली. ‘ऑर्गनच्या भात्यासारखं हे नाटक आकुंचन-प्रसरण पावत धरून ठेवतं,’ असं अमरिश पुरी म्हणाले.
‘शिवम्’ निर्मित ‘हेडस् या टेल्स’ या नावानं िहदीत नंदिता दास आणि सुशांत सिंग यांना घेऊन चंदूनं ‘चाहूल’चे प्रयोग केले. िहदी प्रयोगातही कलावंतांची तीच ताकद या नाटकाला मिळाली. शिवाय अनिल देशमुखनं ‘चाहूल’चं केलेलं िहदी भाषांतर हे तर मी िहदीतच मूळ नाटक लिहिलंय की काय, असं वाटण्याइतपत ‘सच्चं’ होतं. अमेरिकेत झालेला ‘चाहूल’चा प्रयोगही उत्तम झाल्याचं कळलं. ‘चाहूल’चं सगळ्यात मोठं यश म्हणजे एका लेखकाला त्यावरून चक्क दुसरं नाटक लिहावंसं वाटलं. तसंच नुकत्याच रंगभूमीवर घेतल्या गेलेल्या काही नाटकांच्या धांडोळ्यात माधवीला प्रश्न विचारण्यात आले. त्यातल्या मतांशी मी सहमत जरी नसलो, तरी एखाद्या नाटकातून दुसऱ्याचा जन्म होणं किंवा प्रतिप्रश्न विचारले जाणं, हेच मुळी मला ‘चाहूल’मधील आशयाचं आणि मराठी रंगभूमीचं सामथ्र्य वाटतं. मात्र, तरीही ‘चाहूल’चा शेवट गोड करण्याचा मोह मी तेव्हा आवरू शकलो. त्यासाठी मला दिग्दर्शक, कलावंत, प्रेक्षक, पाश्र्वसंगीतकार आणि निर्मात्याचा पािठबा मिळाला याचं आजही तितकंच अप्रुप वाटतं.
‘चारचौघी’प्रमाणेच ‘चाहूल’वरही अनेक परिसंवाद आयोजित झाले. लेखही लिहिले गेले. ज्यात काही मत-मतांतरंही होती. ‘नाटकात ‘मंडलिक’चं तिसरं पात्र का आणलं नाही?’ हा यापकी एक वारंवार विचारला जाणारा प्रश्न. वास्तविक ‘चाहूल’मध्ये तिसऱ्या पात्राची गरज भासणं म्हणजे रुढ संघर्षांची चौकट अपेक्षित धरणं. हे तीन-पात्री नाटक असतं तर ते ‘चाहूल’ नाटक राहिलंच नसतं. मंडलिकनं मकरंदकडे माधवीची मागणी करणं हे नाटकाचं फक्त निमित्त आहे. असा एखादा नतिक प्रश्न अचानक अंगावर कोसळल्यावर वैचारिक बठक पक्की नसेल तर चांगलं काय आणि वाईट काय, ते ठरवायला आपण कसे असमर्थ ठरतो, मंडलिकसारखी माणसं तुम्हाला जागोजागी भ्रष्ट करायला टपलेली आहेतच, तुम्ही त्यांना कसे प्रतिसाद देता, हा माझा विषय आहे. ‘मकरंद-माधवीच्या घरी एवढी सुबत्ता असताना त्यांना ही तडजोड करायची गरजच का वाटावी?’ असाही एक प्रश्न उपस्थित केला गेला. असं असतं तर चंगळवादाचा जन्मच झाला नसता. एक फ्लॅट किंवा एक गाडी असतानाही दुसरी, तिसरी, चौथी गाडी का घ्यावीशी वाटते? ‘इतक्या चांगल्या नाटकाचा शेवट हा असा ‘नकारात्मक’ का केला हो?’ म्हणजे शेवटी माधवीनं जायला नको होतं.. काहीजणांच्या प्रतिक्रियांचा सूर हा असा असायचा. वास्तविक माधवीचं जाणं हे माझ्यासाठी क्लेशदायक होतं. ती थांबली असती तर मलाही ते आवडलंच असतं. पण तिचं न थांबणं हीच त्यांच्या विचारप्रक्रियेची अटळ परिणती होती. शिवाय असा ‘डेड एंड’ दाखवणं टाळलं असतं तर, ‘चला, कितीही भांडोत, कितीही ढासळोत; शेवट तर गोड झाला नं!’ असं म्हणून आपण परिस्थितीतल्या कडवटपणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून मोकळे झालो असतो.
‘पण या परिस्थितीवर उपाय काय?’ असाही प्रश्न अनेकदा विचारला जातो. नाटकातून ‘रेडिमेड उपाय’ सांगण्याच्या वाटेला आज आमच्यापकी कुणीही नाटककार सहसा जाणार नाही. परिस्थितीचं निदान करणं, त्यावर अधिकाधिक प्रामाणिक आणि रोखठोक भाष्य करण्याचा प्रयत्न करणं, हे मात्र आमचं कर्तव्य वाटतं. उपाय ज्यानं त्यानं आपल्या ग्रहणशक्तीनुसार शोधायचा. ‘चाहूल’मधल्या मकरंद-माधवीच्या थरापर्यंत जाण्याआधीच स्वत:ला थांबवावंसं वाटलं, स्वत:कडे वेगळ्या दृष्टीनं बघावंसं वाटलं, मनात काही ‘खूणगाठ’ बांधावीशी वाटली, एखादं दीड हजाराचं खोटं हॉटेल बिल ऑफिसला लावताना किंवा एखादा दीड लाखाचा काळा व्यवहार करताना मन थोडं जरी कचरलं, तरीही ‘चाहूल’सारख्या नाटकाचं फलित अजून काय असणार? कारण आज स्वत:ची स्वत:ला लाज वाटणं यापेक्षा अधिक कोणती ‘जागृती’ असू शकणार? ‘नकारात्मक’ शेवट केल्याशिवाय ही ‘सकारात्मक लाज’ उत्पन्न होणार तरी कुठून? मकरंद-माधवीची ‘युती’ आणि भ्रष्टाचारासारख्या अनेक आजारांवरचं सर्वपक्षीय ‘सामंजस्य’ आज आपण प्रत्यक्ष अनुभवतोय. भवताल बदलण्याची प्रत्येकात ताकद असेलच असं नाही; पण ते समजण्याचं शहाणपण तरी बाळगायला काय हरकत आहे?
प्रशांत दळवी – pradalvi@gmail.com

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Story img Loader