ब्रॉडवेवरचं दि प्ले कंपनीचं ‘सखाराम बाइंडर’ मला प्रयोग म्हणून फारसं आवडलं नाही. ते निश्चितपणे अधिक परिणामकारक करता आलं असतं. मी नाटक पाहिल्यानंतर विजय तेंडुलकरांशी फोनवर बोललो, त्यांना माझं मत सांगितलं. त्यांचं मत निराळं होतं. त्यांना ते आवडलं होतं. ते म्हणाले, ‘मी नाटक लिहून संपवल्यावर ते माझं राहत नाही. त्याचा एक प्रयोग दिग्दर्शकाच्या मनात तयार होतो. प्रेक्षकांसमोर ते सादर केल्यावर त्यांच्या मनात आणखीन एक प्रयोग तयार होतो. असं असतं नाटक. त्यामुळे मला काय वाटतं, हे फारसं महत्त्वाचं नाही.’
इं डो-अमेरिकन आर्ट कौन्सिलने न्यूयॉर्कमध्ये २००४ साली विजय तेंडुलकर महोत्सव आयोजित केला होता. त्या महोत्सवात मी ‘सखाराम बाइंडर’चा प्रयोग पाहिला होता. मी मराठी आणि हिंदीत ‘सखाराम बाइंडर’ पाहिलं होतं. ते सादर करणारे सर्व भारतीय होते. आणि बघणारेही. न्यूयॉर्कचं ‘बाइंडर’ बघणारे प्रेक्षक भारतीय आणि अभारतीय असे दोन्ही होते. त्यामुळे अतिशय वेगळ्या वातावरणात मला तो ‘बाइंडर’चा प्रयोग बघायला मिळणार होता. विजय तेंडुलकरांच्या नाटकांचा महोत्सव ऑफ ब्रॉडवेवर सुरू होता. आणि त्याचा मला मनापासून आनंद झाला होता. नाटकाची तिकिटे मला तीन आठवडे आधी काढावी लागली होती. शिवाय प्रचंड गर्दी झाल्यामुळे त्यांना ठरलेल्या प्रयोगांपेक्षा सहा प्रयोग जास्त करावे लागले. दि प्ले कंपनी नावाच्या नाटय़संस्थेने ‘सखाराम’चा हा प्रयोग सादर केला होता. माझे अमेरिकेत राहणारे ज्येष्ठ मित्र अशोक कामेरकर आणि मी आम्ही दोघे प्रयोग बघायला गेलो. फिफ्टी नाइन इ फिफ्टी नाइन थिएटरला एका छोटेखानी नाटय़गृहात हा प्रयोग होता.
प्रेक्षागृहात शिरलो. साधारणपणे शंभर प्रेक्षक बसण्याची व्यवस्था नाटय़गृहात होती. स्टेजला मुख्य पडदा नव्हता. त्यामुळे रंगमंचावरचं सखारामचं घर दिसत होतं. नाटक सुरू होण्यापूर्वीच आम्हाला सखारामच्या घराची रचना समजली होती. हुबेहूब घरासारखं घर उभं केलं होतं. सखारामची खोली. मुख्य दरवाजा. मधला खांब. स्वयंपाकघर. स्टेज आणि प्रेक्षक यांच्यातलं अंतर कमी असल्यामुळे अतिशय इंटिमेंट अशा प्रकारचा नाटय़ानुभव घ्यायला प्रेक्षक तयार होते.
‘सखाराम’ माझ्या परिचयाचं, माझ्या आवडीचं नाटक. ‘सखाराम’मधली सर्व पात्रं अगदी डोक्यात फिट्ट बसलेली. निळूभाऊ फुले यांचं ‘सखाराम’चं काम बघून खूप र्वष झाली असली तरी मनात घर करून बसलेलं. लालन सारंग यांची चंपा तर लाजवाबच होती. नाटय़विषयक संस्कार होण्याच्या वयात पाहिलेला कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित केलेला ‘बाइंडर’चा प्रयोग, बाइंडरवर बंदी आल्यानंतर सारंगकाकांनी दिलेला लढा हे सारं ‘बाइंडरचे दिवस’ या पुस्तकाच्या रूपाने समोर आला होता. थोडक्यात काय, तर मराठी- किंबहुना भारतीय रंगभूमीच्या दृष्टीने ‘बाइंडर’ हा ऐतिहासिकदृष्टय़ा फार महत्त्वाचा टप्पा. त्या काळात बाइंडरने थक्क करणारा अनुभव दिला होता.
पण पुढे काही र्वष रंगभूमीवर काम केल्यानंतर लेखनदृष्टय़ा ‘बाइंडर’ किती उत्तम नाटक आहे, हे उलगडत गेलं. मी आता समोर बघणार होतो ते ‘बाइंडर’ एक तर इंग्रजीत होतं; आणि करणारी मंडळीही भारतीय नव्हती. कुमुदबेन मेहता आणि शांता गोखले यांचं हे भाषांतर होतं. भाषांतर फारच चांगलं होतं. मूळ नाटकाच्या लेखनाचा पोत उत्तम जपला होता.
प्रेक्षागृहातले दिवे बंद व्हायला लागले. रंगमंच उजळला. सखाराम लक्ष्मीला घेऊन आपल्या घरात आला..
‘बाइंडर’चं इंग्रजी भाषांतर मी वाचलं होतं. तरीही अगदी सुरवातीला सखाराम इंग्रजी बोलतोय हे अंगवळणी पडायला थोडा वेळ गेला. नाटकात गुंतायला त्यामुळे पाचएक मिनिटं लागली. मारिया मायलिफ नावाच्या बाईने दिग्दर्शन केलं होतं. मारिया मायलिफ ही ब्रॉडवेवरची नावाजलेली दिग्दर्शिका होती. त्यामुळे ‘सखाराम बाइंडर’कडे बघण्याचा तिचा एक वेगळाच दृष्टिकोन असणार याची खात्री होती. सखारामचं काम करणाऱ्या अभिनेत्याचं नाव होतं- बर्नार्ड व्हाइट. उंच, गोरा, तगडा अभिनेता. सखाराम नाटकाच्या सुरुवातीलाच लक्ष्मीला तो कसा आहे ते सांगतो. घरात राहायचं असेल तर बायको बनून राहावं लागेल असं सांगतो. एका बाजूला धमकीवजा सूचना देत, दुसऱ्या बाजूला स्पष्टवक्ता असल्याचं प्रमाण देत सखाराम बोलत असतो. सुरवातीला मला असं वाटत राहिलं की, व्हाइट हा अभिनेता सखारामची व्यक्तिरेखा ठसवण्यासाठी वाक्यातल्या प्रत्येक शब्दावर अनावश्यक जोर देत होता. पण नाटक जसजसं पुढे सरकायला लागलं तसतशी व्हाइटच्या या बोलण्याच्या पद्धतीची सवय व्हायला लागली आणि माझ्यासमोर वेगळा ‘बाइंडर’ उभा राहायला लागला. घरावरची आणि घरात येणाऱ्या बाईवरची मालकी सांगणारा, सेक्ससाठी हपापलेला, तरीही वेगळ्या प्रकारे बाईविषयी सहानुभूती असलेला सखाराम! तो साकारताना व्हाइट या अभिनेत्याने दोन वाक्यांच्या मधल्या जागा आपल्या शारीर अभिनयाने अधोरेखित केल्या होत्या. नाटक जसजसं पुढे सरकायला लागलं तसतसा इंग्रजी बोलणारा रांगडा सखाराम मला आवडायला लागला. भाषेचा अडसर दूर होऊन भावना माझ्यापर्यंत पोहोचायला लागल्या. रासवट जनावरासारखा भासावा असा सखाराम उभा करण्यासाठी दोन पायांत अंतर ठेवून उभं राहणं, थुंकणं, खाजवणं अशा गोष्टींचा वापर व्हाइटने केला होता.
देवभोळी लक्ष्मी अ‍ॅना जॉर्ज नावाच्या अभिनेत्रीने साकार केली होती. आपल्या आणि पाश्चिमात्य संस्कृतीत खूप फरक आहे. अ‍ॅना जॉर्ज खूप प्रयत्न करीत होती, पण तिच्या लक्ष्मीचं रूप साकारण्यात कुठंतरी कमतरता जाणवत होती. ती देवभोळी, साधी असण्याचा अभिनय करीत होती असं निदान मला तरी वाटत राहिलं. लक्ष्मीच्या धार्मिक असण्याचा सखारामला होणारा त्रास त्याच्या अभिनयातून दिसत होता. पण अ‍ॅना जॉर्जला देवभोळी असणं, धार्मिक असणं हे मनातून येतंय असं वाटत नव्हतं. लक्ष्मी माझ्यासमोर हाडामांसाचा होऊन उभीच राहीना.
तीच गत दाऊदचं काम करणाऱ्या अ‍ॅडम अ‍ॅलेक्सी या अभिनेत्याची. तो नुसती वाक्यं म्हणून जात होता असं वाटलं. तांत्रिकदृष्टय़ा हेही नाटक ब्रॉडवेवरच्या बऱ्याच नाटकांप्रमाणे चांगलं होतं. अँटनी इलरमान या नेपथ्यकाराने बारीकसारीक तपशिलांसह सखारामचं घर उभं केलं होतं. लक्ष्मीचं देवघर, स्वयंपाकघर, तिथली खिडकी, तिचं प्राणी-पक्ष्यांशी बोलणं- हे सर्व दाखवण्यासाठी रंगमंचाची केलेली विभागणी नाटय़परिणामात भर टाकत होती.
लक्ष्मी आणि सखारामच्या बाचाबाचीचा प्रसंग परिणामकारक झाला. लक्ष्मीला सखाराम घराबाहेर काढतो तो भागही व्हाइटने चांगला वठवला. पण जॉर्जबाई मात्र त्याही प्रसंगात निष्प्रभ. नाटकाचं व्हिज्युअल डिझाइन चांगलं होतं. पण कधी कधी मला ते डेकोरेटिव्ह वाटत राहिलं. त्यामुळे मधे मधे मी नाटकातून बाहेर येत होतो. माझ्या आजूबाजूचे प्रेक्षक मात्र गुंतून नाटक बघत होते. कारण ते त्या नाटकातल्या आंतरिक संघर्षांला प्रतिसाद देत होते. अमेरिकन प्रेक्षकाच्या सवयीच्या नाटकांपेक्षा हे नाटक खूपच वेगळं होतं.
प्रेक्षक प्रतिक्रियेवरून एक गोष्ट पुन्हा एकदा जाणवली. पटली. ती म्हणजे तेंडुलकर या नाटककाराच्या लेखनातली शक्ती. या लेखनशक्तीमुळेच सातासमुद्रापारचा प्रेक्षक ‘सखाराम बाइंडर’मध्ये गुंतला होता. तेंडुलकरांना नाटकाचे संवाद लिहिण्याची जबरदस्त हातोटी होती. मोजक्या संवादांमधून मोठा आशय पोहोचवण्याची त्यांची जी क्षमता होती, तिची ताकद मला अमेरिकन ‘बाइंडर’ बघताना नव्यानं जाणवली.
लक्ष्मीला घराबाहेर काढल्यानंतर सखाराम चंपाला घेऊन येतो. आपल्याला दोन स्त्री-व्यक्तिरेखांमधला कॉन्ट्रास्ट लक्षात येतो. चंपा लक्ष्मीपेक्षा संपूर्णपणे वेगळी आहे. तेंडुलकर या एकाच नाटकात दोन टोकाच्या स्त्री-व्यक्तिरेखा उभ्या करतात. तितक्याच ताकदीने. ‘सखाराम बाइंडर’मधला व्हॉयलन्स आणि सेक्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्यक्तिरेखांचा ते जो वापर करतात, तो अप्रतिम आहे. वास्तववादी नाटकातून अशा रूपकात्मक व्यक्तिरेखा उभ्या करून आपला आशय ते पोहोचवतात. इंग्रजी भाषांतरामधूनही तो पोहोचतो. लिखित संहितेला अधिक उंचीवर नेण्याचं काम दिग्दर्शक करीत असतो. पण या प्रयोगात मात्र मला तसं होताना दिसत नव्हतं.
चंपा आल्यानंतर ती स्त्रीशक्तीचं प्रदर्शन करते आणि सखाराम हतबुद्ध होतो. चंपा सेक्सी, हवीहवीशी वाटणारी, स्पष्टवक्ती बाई. सखारामचे नियम धाब्यावर बसवून आपल्या मनासारखं करणारी. व्यसनी. थोडक्यात काय, तर बाई करणार नाही अशा गोष्टी लीलया करणारी. चंपा आल्यानंतर सखारामची सत्ता तिच्याकडे जाते. सत्तेच्या खेळात ती सखारामवर मात करते. चंपाचं काम करणारी अभिनेत्री सरिता चौधरी. भारतीय संस्कृतीची थोडीफार माहिती तिला असावी. ती दिसली चंपा; पण तितकंच. स्त्रीशक्तीचं रूप असलेली चंपा साकारायला माझ्या दृष्टीने ती खूपच कमी पडली. मला ती आक्रस्ताळी वाटली. तिच्या अभिनयशैलीमुळे नाटय़परिणामात बाधा आली आणि नाटक माझ्यापासून लांब गेले. सखाराम आणि चंपाच्या शरीरसंबंधाचा प्रवेश आवश्यकतेपेक्षा जास्त उघडावाघडा झाला. इतका तडक करण्याची गरज नव्हती. यातून इतकंच सिद्ध झालं की, रंगमंचावर शरीरसंबंधाचे प्रवेश करण्यासाठी लागणारा मोकळेपणा त्या अभिनेत्रीकडे होता. बास! हा प्रवेश थोडा जास्त काळ चालला. त्यामुळे पुढील प्रवेश सुरू झाला तरी आधीच्या प्रवेशाचं सावट त्यावर राहिलं आणि नाटय़परिणाम हरवला.
मारिया मायलिफ या दिग्दर्शिकेने केलेली एक गोष्ट मला खूपच आवडली. चंपा लक्ष्मीला घरात परत घेते. लक्ष्मी घरची कामं करते. दोन स्त्रिया घरात एकत्र नांदतात. पण प्रश्न शेवटी लक्ष्मीच्या अस्तित्वाचा असतो. पहिल्या भागात खूपच चांगली वाटणारी लक्ष्मी स्वत:च्या अस्तित्वासाठी चंपाला अडकवते. परिस्थितीमुळे लक्ष्मी कारस्थानी बनते. आजपर्यंत मी पाहिलेल्या लक्ष्मीपेक्षा ही निराळी होती. नाटकाच्या शेवटाकडच्या भागात मला ती जास्त पटली. त्यामुळे नाटक अधिक रंजक झाले.
हे जरी मान्य केलं तरी दि प्ले कंपनीचं ‘सखाराम बाइंडर’ मला प्रयोग म्हणून फारसं आवडलं नाही. ते निश्चितपणे अधिक परिणामकारक करता आलं असतं. मी नाटक पाहिल्यानंतर विजय तेंडुलकरांशी फोनवर बोललो, त्यांना माझं मत सांगितलं. त्यांचं मत निराळं होतं. त्यांना ते आवडलं होतं. मी त्यांना लक्ष्मीच्या व्यक्तिरेखेचं इंटरप्रीटेशन मला आवडल्याचं सांगितलं. त्यांना विचारलं- त्यांच्या मनात काय होतं? तर ते म्हणाले, ‘मी नाटक लिहून संपवल्यावर ते माझं राहत नाही. त्याचा एक प्रयोग दिग्दर्शकाच्या मनात तयार होतो. प्रेक्षकांसमोर ते सादर केल्यावर त्यांच्या मनात आणखीन एक प्रयोग तयार होतो. असं असतं ंनाटक. त्यामुळे मला काय वाटतं, हे फारसं महत्त्वाचं नाही.’
अमेरिकेतील ‘व्हरायटी’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’ यांसारख्या वृत्तपत्रांतल्या टीकाकारांनी तेंडुलकरांची खूप स्तुती केली. सखाराम बाइंडरची जगण्याची जी सिस्टम आहे, ती त्या सर्व टीकाकारांना फार महत्त्वाची वाटली. सखारामचं जग तेंडुलकरांनी अतिशय समर्थपणे उभं केलं, असं काही टीकाकारांचं मत होतं. मला अत्यानंद झाला. भारतीय रंगभूमीवरचा एक श्रेष्ठ नाटककार जागतिक रंगभूमीवरसुद्धा गाजतोय याचा. विजय तेंडुलकरांच्या नाटकातला संघर्ष, त्यांच्या नाटकांची रचना, सक्षम व्यक्तिरेखा या सर्व घटकांमुळे अमेरिकेतल्या समीक्षकांनी आर्थर मिलर या जगन्मान्य नाटककारांशी त्यांची तुलना केली. अशा या श्रेष्ठ नाटककाराचा महोत्सव ब्रॉडवेवर होणं ही जागतिक रंगभूमीच्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची घटना आहे. अशा या श्रेष्ठ नाटककाराला माझा मानाचा मुजरा.
(समाप्त)

Story img Loader