नाटकाकरिता पुण्यातल्या विविध महाविद्यालयांतून आलेल्या युवक/ युवतींबरोबरची पहिली भेट संस्थेतल्या युवा कलाकारांनी आयोजित केली होती. काही गाणारे, काही नृत्य करणारे, काही अभिनयपारंगत.. अशी तरुणाईची मांदियाळी जमलेली. सुमारे २०-२५ युवक तर सुमारे तितक्याच युवती. ‘पडघम’ला रूढार्थाने कथा आहेही आणि नाहीही. समाजातील सत्ता गाजवणारी प्रस्थापित व्यवस्था. त्या सत्तेविरुद्ध बंडाचे निशाण फडकावत ती उलथून नवनिर्माणाची स्वप्न रंगवणारे युवा नेतृत्व आणि त्याला विविध रूपांनी दडपणारी आणि अंती त्याला आपल्यातच सामील करून घेणारी शक्तिशाली व्यवस्था. त्यातून पुन्हा नव्या असंतोषाचे फुटणारे धुमारे.. आणि पुन्हा नव्या युद्धाचे वाजणारे पडघम.
थिएटर अकादमीच्या परंपरेला अनुसरून हेही संगीत/ नृत्यप्रधान नाटक. ‘तीन पैशाचा तमाशा’चे प्रयोग करताना १०-१२ वादकांच्या उपलब्ध होण्याच्या मर्यादांमुळे प्रयोगसंख्येवर बंधन पडे. या नाटकाचा विषय युवाशक्तीचा आविष्कार असल्यामुळे पूर्व ध्वनिमुद्रित संगीताच्या साथीनं सर्व कलाकार प्रयोगात प्रत्यक्ष गातील यावर दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि संगीतकार असलेल्या माझं याचं एकमत झालं. पुन्हा हा पाश्र्वसंगीतावकाश पूर्व ध्वनिमुद्रित करणार असल्याने व्हायोलिन्स, स्याक्सोफोन, की फ्लूट, ट्रम्पेट,ओबो, सनई, क्ल्यरिओनेट, चेलो, बेस गिटार, स्पॅनिश गिटार, ट्वेल्व्ह स्ट्रिंग गिटार, व्हायब्रोफोन, स्वर्णमंडळ, हार्मोनियम, सिंथेसायझर, पियानो या वाद्यांबरोबरच ड्रमसेट, कोंगो, तुंबा, बोंगो, चंडा, पखवाज, ढोल, तबला, ढोलक, ढोलकी, डफ, दिमडी, घुंगरू, मंजिरी, टाळ हलगी, मादल, डूग्गी अशा विविध तालवाद्यांचाही अतिशय समृद्ध/ संतुलित असा प्रयोग करता येणार होता आणि तसाच तो झालाही..
अरुण साधूंनी या नाटकाच्या आरंभी एक प्रील्युड-ज्यात नाटकाच्या आशयाचे सूचन असते- लिहिले आहे-
आम्ही नवे पुढारी। आम्ही नवे विचारी
कोणी म्हणोत काही। आम्ही नवे शिपाई
भवितव्य या जगाचे। आहे मुठीत आमुच्या
सामथ्र्य अन् विजेचे। बाहुत वज्र आमुच्या
रूपरंग बदलून टाकू। आम्हीच या जगाचे
समूळ खांबखांब उखडू। किल्ले विद्यापीठांचे
उकलुन गुंतावळे। कंगाल राजकारणाचे
कोरी पुसून पाटी। देऊ धडे नवसंस्कृतीचे
देऊ उधळून सारे। हे डाव मांडलेले
खेळू नवीच खेळी। घालू नवे उखाणे
हे गाणं म्हणजे समग्र नाटकाचं जणू थीम साँगच. अरुण साधूंनी हे गाणं लिहिताना कुठेतरी ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ या कवी इक्बालच्या लोकप्रिय गीताचा छंद मनात धरला असावा.
त्यामुळेच बहुधा मीही त्याच स्वरांचा वापर करत नव्या चाली रचल्या आणि ‘ये गुलसिताँ हमारा’च्या मूळ अवरोही चालीत ‘आम्ही नवे शिपाई’ अशी सुरावट-पंडित रविशंकरजींच्या सुप्रसिद्ध चालीचं स्मरण करून देणारी- जाणीवपूर्वक योजली. त्यापाठोपाठ अथ्थकचा एक तोडा. (तकीट तकदिम तकतकीट)३ तकीट तकीट तकीट धा २. आणि मग ‘आम्ही नवे पुढारी’ हे धृवपद.. प्रत्येक अंतऱ्याची शेवटची ओळ ‘ये गुलसिताँ हमारा’ची आठवण करून देणारी. या प्रील्युडमध्ये बुद्धिवंत, राजकारणी, धर्माधिकारी यांच्यावर टिप्पणी होत असताना हिंदू, बौद्ध, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनांचा प्रयोग करायला संस्कृत ॠचा (राया भावे), बुद्धं शरणं गच्छामि-त्रिशरण मंत्र (समूहस्वर) आणि अजान (नीलेश गोसावी) गाणारे कलाकार मिळाले. चर्चमधली प्रार्थना मिळवायला मला माझ्या पियानो शिक्षिका श्रीमती सुन्नु डॉक्टर यांची फार मोठी मदत झाली.
न्य२रर माय गॉड टू दी. न्य२रर टू दी..
इव्हन दो इट बी अक्रोस.. द्याट रेझथ मी
ही प्रार्थना वृंदगानाच्या शैलीतून गायली जाताना सारे कलाकार थरारून जायचे.
हाताशी ३५-४० युवक/ युवतींचा गानवृंद लाभल्यानं मला एकसमयावच्छेदेकरून तीन संवादी सुरावटींतून उलगडणारी गाणी बांधताना फार आनंद मिळाला. लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, ललित संगीत, पॉप संगीत अशा विविध शैलींचा नाटय़पूर्ण प्रयोग करत एकापाठोपाठ एक गाणी बांधत गेलो. पहिल्या दीड-दोन महिन्यांच्या तालमीना पेटीवादक संगीतकार अस्मादिक आणि कलाकारांमधलाच पोरसवदा राहुल रानडे (आजचा तरुण संगीतकार राहुलदा रानडे) ढोलकीवर ठेका धरायला.
प्रथम घ्यावी डिग्री डिग्री डिग्री..
मग धरावी नोकरी नोकरी नोकरी..
असं सारी तरुणाई गात असताना बेरकी मंत्री आणि त्यांचा सेक्रेटरी यांच्या उपस्थितीत काळ्या झग्यातले उपकुलगुरू उच्चासनावर उभे राहून सुपाने डिग्य्रांची पखरण करतात. कोरसमधली मुले आनंदातिशयाने स्लो मोशनमध्ये डिग्री वेचतात, तर तिकडे प्राध्यापकांची दिंडी (राग दुर्गा) पगारवाढ मागताना कामाचे तास कमी करायची मागणी करायला विसरत नाहीत. नरेंद्र कुलकर्णीच्या सुंदर गायनानं गाण्यातलं व्यंग उठून दिसे.
प्राध्यापकाची नोकरी करणे। सदा दिसावे बापुडवाणे॥धृ.॥
दिवसभर शिकवण्या करणे। फावल्या वेळात शिकवणे
तरी गात रहावे रडगाणे। कष्टांचे अन पगारवाढीचे
शिक्षण पद्धतीची वर्षीय रचना १०+२+३ असावी की ४+७+४ की ४+६+१+३ यांवर बुद्धिवंत, मंत्री, सेक्रेटरी आणि उपकुलगुरू यांचा वाद रंगत असताना युवासमूह त्यांच्या आधुनिक नृत्यशैलीत जोशपूर्ण नाचत गायचा-
एक दोन तीन चार। प्रकाशाचा वेग फार
सेकंदाला मैल दूर। एक लक्ष श्यांशी हजार
एक दोन तीन चार। शिक्षणाचा घोळ फार
पावलोपावली होती बदल। एक लक्ष श्यांशी हजार
एक दोन तीन चार। गरिबांची कींव फार
सगळे मिळून अश्रू ढाळू। एक लक्ष श्यांशी हजार
अशा तिरकस टिप्पणीसह सादर होणारं हे गाणं आणि त्यापाठोपाठ उपकुलगुरूंना/ मंत्र्यांना घेराव घालणारे विद्यार्थी त्यातून पोलीस.. धुमश्चक्री. अश्रुधूर.. गोंधळ कळसाला जाताना दृश्य संपे.
या नाटकातले तीन सूत्रधार- जाधव (श्रीरंग गोडबोले), व्हटकर (उमेश देशपांडे) आणि देशपांडे (चंद्रकांत काळे) हे पोलिसी यंत्रणेचे प्रतिनिधित्व करणारे. प्रास्ताविक करत पात्रांची ओळख करून दृश्य सुरू करून देणारे. दंगलीमधल्या विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल पोलिसी प्रतिक्रिया व्यक्त करणारं गाणं-
रोख होता पोलिसांवर दंगलीत परवाच्या
तुफान मारा केला त्यांनी दगड, विटा अन् बाटल्यांचा.
पोलीस बिचारे तसे निरूपद्रवी
ज्यांच्या हाती सत्ता त्यांचे राखणदार
श्रीरंग गोडबोले (जाधव) पोलीस कोरससह मोठय़ा जोशात पेश करायचा. तसेच हे सूत्रधार जाधव प्रसंगी कमिशनर भावेंचीही भूमिका निभावणारे. तर देशपांडे हे प्राध्यापक हर्षेची (जे पुढे मंत्री होतात) भूमिका साकार करणारे.. विद्यार्थीनेता म्हणून उदयाला येणारा प्रवीण नेर्लेकर (प्रसाद पुरंदरे) त्याची प्रेयसी अंजू (सुरेखा दिवेकर) त्यांच्या दृश्यापूर्वीचं- रोमँटिक पाश्र्वभूमी निर्मिणारं ‘ग्रंथालयात विद्यापीठाच्या’ हे वाल्ट्झच्या संथझुलत्या लयीतलं गाणं युवासमूह गाताना जणू ‘तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज’ रंगमंचावर प्रत्ययाला येई. पहिल्या अंकात प्राध्यापक हर्षे आणि
सौ. हर्षे यांची प्रत्येकी एक-अशी गाणी..
आजकालच्या या शिक्षणाला म्हणावं तरी काय?
आमच्या वेळी असं नव्हतं.. आमच्या वेळी असं नव्हतं..
अशा पालुपदाची.. चंद्रकांत काळे (प्रा. हर्षे) देस रागात नाटय़संगीताच्या शैलीतल्या या गाण्यात बहार आणत तर कल्पना देवळणकर (सौ. हर्षे) प्रभातकालीन चित्रगीताच्या शैलीतल्या गाण्यातला लडिवाळ भाव अधोरेखित करत..
इलेक्शनला उभे राहणाऱ्या प्रा. हर्षेच्या ‘इलेक्शन इलेक्शन इलेक्शन’ या गाण्यासह प्रचारास्तव मिरवणुकीच्या, सभांमधल्या भाषणाच्या दृश्यांपाठोपाठ पोलिसांकडून प्रवीण नेर्लेकरची होणारी उलटतपासणी आणि त्याच्या शारीरिक छळाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस कमिशनर भावे (श्रीरंग गोडबोले)-
आय हेट व्हायोलंस..॥धृ.॥
चोर खुनी अन् लुटारू। निष्पाप बिचारे पोटभरू
यांच्यापासून नसतो धोका। सत्तेला.. व्यवस्थेला
गरीब जनता पापभिरू। हीच सुरूंगाची दारू
सत्ताधीशांचे त्यांच्यापासून रक्षण। चौकटीच्या व्यवस्थेचे पोषण
हेच आमचं काम असतं
या गाण्यातून पोलिसी व्यवस्थेचं समर्थन करतात.
पोलिसी छळानंतर प्रवीण नेर्लेकर धडपडत साऱ्या मुलामुलींपुढे समोर येत मोठय़ा कष्टानं पुन्हा उभा राहतो तेव्हा साऱ्या तरुणाईद्वारा पोलिसांच्या निषेधाच्या आणि ‘प्रवीण नेर्लेकर झिंदाबाद’च्या घोषणा टिपेला पोहोचताना पहिला अंक संपतो…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा