आमची ‘समन्वय’ नावाची संस्था त्यावेळी नवीन होती. काही एकांकिका स्पर्धामध्ये बक्षिसं मिळवून नंतर त्या धुंदीतून आम्ही बाहेर आलो होतो. तेंडुलकरांच्या वर्तमानपत्रातील स्तंभावर आधारित ‘कोवळी उन्हे’ आणि अरुण साधूंच्या कथेवर आधारित ‘त्याच्या प्रखर सामाजिक जाणिवांचे निखारे’ हे दीर्घाक आम्ही केले होते. आमचं अर्थकारण सोपं होतं. पुण्यातल्या स्नेहसदनमध्ये प्रयोग लावायचा आणि पेपरात सिंगल कॉलम जाहिरात द्यायची. दोन हॅलोजन, दोन स्पॉट आणि साऊंड सिस्टीम भाडय़ाने आणायची. खर्च हा एवढाच. प्रवेश मूल्य ऐच्छिक असायचं आणि आम्ही हॅट कलेक्शन करायचो. म्हणजे प्रेक्षक बाहेर पडताना आमचा कार्यकर्ता दाराशी परडी घेऊन उभा राहायचा. काही जवळच राहणारी वृद्ध मंडळी प्रत्येक प्रयोगाला यायची आणि आठ आणे, रुपया त्या परडीत टाकून जायची. स्नेहसदनचे फादर जॉर्ज फार प्रेमळ होते. जर त्या दिवशी पैसे कमी जमले, तर ते भाडय़ात सूट द्यायचे. त्या ख्रिश्चन प्रार्थनास्थळात प्रयोग करताना आम्हाला आतून खूप शांत वाटायचं. आणि समीप रंगभूमीचा तो अनुभव प्रेक्षकांनाही भावायचा. आम्हालाही मस्त झिंग चढली होती. आणि इथे कुठला नवीन प्रयोग करता येईल याच्या आम्ही सतत शोधात असायचो.
याच काळात एक नवंकोरं नाटक समोर आलं.. राजीव नाईक यांचं ‘साठेचं काय करायचं?’ राजीव त्यावेळी पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकवायचा. मी तातडीने जाऊन त्याच्या तोंडून नाटक ऐकलं. खूप दिवसांनी नव्या नाटकात इतके नेमके, टोकदार संवाद ऐकायला मिळाले. राजीव वाचनही उत्तम करतो. त्यामुळे त्या नाटकातला अभय प्रभावीपणे माझ्यासमोर उभा राहिला. अभय नावाच्या अ‍ॅडवाल्याची ही वर्तुळाकार गोष्ट. त्याला साठे नावाच्या आर्ट फिल्ममेकरविषयी मत्सर वाटतो. तो त्याची भडास आपली बायको- सलमासमोर व्यक्त करतो. ती कधी त्याची समजूत काढते, कधी त्याला चिमटे काढते. काही वेळा कानउघाडणी करते. अभयला फक्त तिचे भय आहे. त्या अर्थाने ती त्याचा ‘कॉन्शन्स’ आहे. त्यांच्यातील संवादांची मालिका म्हणजे नाटक. नाटकातील प्रत्येक प्रसंग अभयच्या या मत्सराभोवतीच फिरतो. गोष्ट गोल फिरून पुन्हा त्याच जागेवर येते. अभय सलमाला एका प्रसंगात म्हणतोही, ‘आपल्या गप्पांना सुरुवात- मध्य- शेवट असं काही नसतंच.. सुरुवात, मध्य की परत सुरुवात!’
हे या नाटकाचं वेगळेपण होतं. राजीवने पूर्वी याचं नाव ‘हा एका लग्नाचा इतिहास नाही’ असंही ठेवलं होतं असं आठवतं. नाटकातील सलमा-अभयचं लग्न झालं आहे. तरी नाटक त्यांच्या धर्माविषयी भांडत बसत नाही. मला हे आवडलं होतं. कारण अशी चौकटींमध्ये बंदिस्त न होणारी जोडपी मी अवतीभोवती पाहत होतो. विशेषत: शहरांमध्ये. पण दिग्दर्शक म्हणून मला चिंता वाटत होती ती ही, की हे सारखे एकाच समेवर येणारे प्रसंग प्रेक्षकांना पकडून ठेवतील का? म्हणजे पहिले चार-पाच प्रसंग झाले की लोकांना ते एकसुरी तर वाटणार नाही ना, अशी मला शंका होती. अर्थात ते करून पाहिल्यावरच कळणार होतं. आणि ते करायचं असं आम्ही ठरवलं. मी जरी माझी शंका बोलून दाखवली नाही, तरी राजीवला ती कळलीच. आणि त्यावरून तो बराच काळ मला चिडवायचा- ‘‘दिग्दर्शकालाच खात्री नव्हती नाटकाची!’’
निखिल रत्नपारखीने अभयची भूमिका करायची असं ठरलं. त्याचा खूप फायदा झाला नाटकाला. निखिलच्या जाडगुल्या, गोड व्यक्तिमत्त्वामुळे नाटकातील अभय सारखा चीडचीड करून, फ्रस्ट्रेट होऊनही लव्हेबल वाटायचा. सलमासाठी आम्ही नटी शोधत होतो. त्याचवेळी अमृता सुभाष दिल्लीवरून एनएसडीचा कोर्स पूर्ण करून आली होती. पण ती खूपच लहान दिसायची. आणि शिवाय ती फार चुलबुली होती. सलमाचं पोक्त काम कसं करू शकेल, असं वाटायचं. पण शेवटी तिच्याच वाटय़ाला सलमाची भूमिका आली. नंतर जयंत पवारांनी पेपरमध्ये ‘साठे..’ची समीक्षा करताना लिहिलं- ‘लहान चणीची अमृता अभिनयातून मोठी होत जाते..’
या नाटकाच्या तालमींच्या काळात आम्ही दिवसभर एकत्र असायचो. मला वाटतं, या बेहिशेबी मैत्रीच्या वातावरणात एक झिंग असते आणि ती नकळत नाटकात उतरते. दिवसभर त्याच विचारांच्या आसपास असल्याने नाटक अंगात भिनतं आणि खेळीमेळीतच आपसूक एकसंध बनतं. आमच्या तालमीचं वेळापत्रक फार मजेशीर होतं. सकाळी निखिलच्या घरी जमायचं. चहा-कॉफी, गप्पा होईपर्यंत जेवणाची वेळ व्हायची. मग निखिलच्या आईच्या हातचं चविष्ट जेवण. मग झोप. उठल्यावर पुन्हा चहा-कॉफी घेऊन कसंबसं एखादं रीडिंग. अमृता आणि निखिल दोघंही आरशात स्वत:चं प्रतिबिंब पाहत रीडिंग करायचे. दोघं आपापसात लहान मुलासारखं भांडायचे. हसायचे. मग हा खेळखंडोबा उरकून अंधार पडायच्या सुमारास माझ्या घरातील गच्चीवर आम्ही पोहोचायचो. तिथे रात्री खरी तालीम व्हायची.
नाटक बसवताना दोघांची आतली लय बोलून नक्की केली. दोनच जणांचं नाटक असल्यामुळे त्यातलं बोलणं आणि विराम फार महत्त्वाचे होते. अमृताची अंतर्गत लय जास्त होती. मी तिला सुचवलं- सलमाची आतली लय पकडण्यासाठी तिचा दिवस कसा जात असेल, हे डोळ्यासमोर आण. ती कुंडीतल्या झाडांना पाणी कशी घालत असेल- इथपासून ती मुलांना कशी शिकवत असेल- हे इमॅजिन कर. अशा बोलण्यातूनच पात्राचा सूर सापडतो. अमृताला आठवलं- तिची लीनामामी शिक्षिका होती आणि तिची आतली लय सलमासारखी होती. तिने त्यातून प्रेरणा घेऊन सलमा फुलवली. आणि एवढंच नाही, तर लीनामामीच्या साडय़ाच तिनं प्रयोगात वापरल्या. निखिलचा अभय बसवताना आम्ही ‘अमेदिस’ या फिल्मविषयी बोलल्याचं आठवतं. त्यातला सॅलरीही मोझार्टवर पराकोटीचा जळतो. पण कुठल्याही मत्सराच्या तळाशी भीती असते. निखिलनेही अभयची चीडचीड वरवरची न ठेवता त्याचा ट्रॅजिक अंतरात्मा नेमका पकडला. आपण मीडिऑकोर आहोत, या न्यूनगंडाने तो जेव्हा केविलवाणा व्हायचा तेव्हा त्याची नजर बरंच बोलून जायची. दोन चांगले कलाकार मिळाल्याने सलमा- अभय ही पात्रं न राहता हाडामांसाची माणसं झाली.. नाटकातील पुनरावृत्तीची रचना एकसुरी न होता अर्थवाही झाली. त्यांच्या जगण्यातील ठणकणारी कळ प्रवाही झाली आणि प्रेक्षकापर्यंत पोहोचली.
कम्पोझिशन करताना अमृताला एका जागी स्थिर थांबायला सांगितलं आणि निखिलला तिच्याभोवती भिरभिरायला सांगितलं. त्यातून दोघांची वेगवेगळी मन:स्थिती आणि अंतर्गत लय चांगली व्यक्त झाली. अमृता आणि निखिल दोघं चांगले मित्र असल्याने त्यांची केमिस्ट्री छान होती. मोकळेपणा होता. त्यामुळे नाटकातील नवरा-बायक ोच्या बरोबरीच्या नात्यात ते फिट्ट बसले. नाटकात ते एका नाजूक प्रसंगात मिठी मारायचे. गाढ. बराच वेळ ते एकमेकांच्या मिठीत असायचे. न बोलता. प्रेक्षक अगदीच त्यांच्या जवळ खाली मांडी घालून बसलेले असायचे. एक प्रेक्षक यामुळे अवघडला. नाटक झाल्यावर अमृताला त्याने हलक्याने सांगितले, ‘अहो, अशी मिठी मारत जाऊ नका. तुमच्या नवऱ्याला काय वाटेल?’ अमृताने ‘माझा नवराच दिग्दर्शक आहे,’ असं सांगितल्यावर तो हताशपणे निघून गेला.
नाटकातील अभिनय रिअ‍ॅलिस्टिक पद्धतीचा होता. सेटची गरजही रिअ‍ॅलिस्टिक होती. पण तो खूप लावता येणार नव्हता, कारण आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते. आणि आम्ही स्नेहसदनच्या छोटय़ा हॉलमध्ये प्रयोग करत असल्यामुळे तिथल्या मुळातल्याच विटांच्या भिंती नाटकातील अभय-सलमाच्या घरासाठी छान जाणार होत्या. पण नंतरही जेव्हा आम्ही मोठय़ा थिएटरमध्ये या नाटकाचे प्रयोग केले तेव्हा पैसे असूनही आम्ही भारंभार सेट लावला नाही.. सजेस्टिव्हच ठेवला. नाटकात ही मजा असते. थोडय़ाच गोष्टी नेमक्या मांडल्या तरी पुरेशा असतात. या मिनिमॅलिस्मचा पुरेपूर वापर आम्ही केला. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रेक्षक अभय- सलमाचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायला लागले.
नाटकाचा सूर आणि फोकस बरोबर लागला पाहिजे, हे दुबेजींबरोबर केलेल्या तालमीत छान कळलं. आम्ही सगळेच दुबेजींच्या शिबिरात भेटलो होतो. त्यामुळे नवीन नाटक बसवताना त्यांनी एकदा पाहून त्याबद्दल काही सूचना कराव्यात असं आम्हाला वाटत होतं. त्याप्रमाणे मुंबईला खास त्यांना तालीम दाखवण्यासाठी साहित्य सहवासमधल्या त्यांच्या घरी गेलो. दुबेजींनी फक्त पहिली दहा-पंधरा मिनिटांची तालीम पाहिली. मग त्यांच्या शैलीत ‘बस करो..’ म्हणाले. मग त्यांनी दोन-तीन सूचना दिल्या. अमृताला साडी नेसून गात एण्ट्री घ्यायला सांगितली. या गाण्याचा अमृताला फार फायदा झाला. तिला शांत लय पकडण्यासाठी या गाण्याचा उपयोग करता आला. नाटकाचा पहिला सूर त्यामुळे बरोब्बर लागायचा. निखिलसाठी त्यांनी अफलातून सूचना केली. त्यांनी   त्याला साठेला हवेत एकाच ठिकाणी इमॅजिन करायला सांगितलं. निखिल प्रेक्षकांकडे तोंड करून वरच्या उजव्या बाजूला साठे आहे असं समजून बोलायचा. हा साठेचा फोकस दिल्यामुळे त्याच्या सगळ्या हालचाली त्या इमॅजिनरी साठेला उद्देशून व्हायला लागल्या. तो फोकस इतका महत्त्वाचा होता, की निखिल त्या दिशेला पाहायला लागला की प्रेक्षकांतून हलकीशी खसखस ऐकू यायची. मला अजूनही दुबेजींच्या या सूचनेचं अप्रूप वाटतं. त्यामुळे नाटकाचा अनुभव गोळीबंद व्हायला मदत झाली.
स्नेहसदनमधला आमचा पहिला प्रयोग चांगलाच रंगला. प्रेक्षक राजीवच्या वाक्यांना गायनाच्या मैफिलीसारखे दाद देत होते. डॉ. लागूंनी तर प्रयोग झाल्यावर निखिलला आनंदाने हवेत उचलले! त्यानंतर बरेच प्रयोग झाले. आम्ही या नाटकाचे खूप दौरे केले. नाटकाची संस्था दौरे केल्यावरच घट्ट बांधली जाते, तसं आमचं ‘साठे..’मुळे झालं. अनेक नवे नाटकवाले मित्र मिळाले.
नाटकाचा विषय सगळ्या मंडळींना, विशेषत: तरुणांना फार भिडायचा. आजच्या स्पर्धेच्या युगात तर पुढे जाण्याची घाई असल्याने अनेकांना आपल्यातील ‘अभय’ आणि ज्याच्याशी आपण मनातून स्पर्धा करतो असे ‘साठे’ जाणवले.
एका प्रसंगात सलमा नुसती रडताना दाखवली आहे. अभय तिच्या शेजारी बसून ‘काय झालं रडायला?’ असं विचारतो. त्यावर ती म्हणते- ‘कारण कशाला हवं पण रडायला?’ हा प्रसंग अगदी छोटा.. जेमतेम तीन-चार मिनिटंच चालायचा. काहीजणांना त्याचा अर्थ पोहोचायचा नाही. पण ते सगळे पुरुष असायचे. सर्व स्त्रियांना तो प्रसंग बरोबर वाटायचा.
दोघांनाही नट म्हणून सगळ्यात आव्हानात्मक प्रसंग होता : जेव्हा अभय लाच द्यायला जाणार आहे आणि सलमापुढे येऊन त्याची कबुली देतो, तो. या संपूर्ण प्रसंगात अभय प्रेक्षकांकडे पाठ करून बोलतो. सलमा पूर्ण वेळ दिसते. पण तिच्या तोंडी एक शब्दही नाही. ज्या दिवशी तो प्रसंग बरोबर जमायचा त्या दिवशी ‘‘सोल्ड.. ब्लडी आत्मा सोल्ड! एस ओ एल डी सोल्ड!! ’’ असं निखिलने म्हटल्यावर अंगावर काटा यायचा. त्या प्रयोगानंतरची रात्र फार सुंदर जायची.
विजय तेंडुलकर प्रयोगाला आले आणि म्हणाले, ‘गंमतच आहे. लेखक, नट आणि दिग्दर्शक कुणाचंही लग्न झालेलं नाही आणि तरी एका जोडप्याचं नाटक ते ताकदीने करतात.’ त्यांना नाटक आवडल्याने ते ७५ व्या प्रयोगाला येणार होते, पण त्याचवेळी प्रिया तेंडुलकर गेल्या. मग आम्ही त्यांना येण्याचा आग्रह केला नाही. पण तरीही ते आले. ग्रीनरूममध्ये बसून त्यांनी प्रयोग ऐकला. प्रयोग झाल्यावर जेव्हा ते स्टेजवर आले तेव्हा प्रेक्षागृहात बसलेल्या सर्व नाटकप्रेमींनी श्वास रोखून धरला आणि त्यांचं छोटेखानी भाषण ऐकलं. भाषण संपल्यावर प्रेक्षागृहातून एक दीर्घ नि:श्वास ऐकू आला.. सर्व नाटकवाल्यांना एकत्र बांधणारा.
 संदेश कुलकर्णी -sandeshwrites@gmail.com