कलावंतानं आपल्याच कलेविषयी काही म्हणणं वा लिहिणं म्हणजे स्वत:च स्वत:चं कौतुक करून घेणं होय. आणि असं करणं गैरच होय. पण कुठल्याही कलावंताच्या कलेच्या सृजनासंबंधी त्या कलावंताइतकं आतून दुसरं कोण लिहू शकणार? तो निर्मितीकारच त्यासंबंधात लिहू शकतो, हेही तितकंच खरं. म्हणूनच मी माझ्या ‘किरवंत’ या नाटकासंबंधी इथं लिहिणार आहे.
मला माहीत नाही, मराठी वा भारतीय वाङ्मयाचा इतिहास कधीपासून आणि कुणापासून सुरू होतो. पण तो जिथून कुठून आणि कुणापासूनही का सुरू होईना, ‘किरवंत’ म्हणजे स्मशानकर्मे करणाऱ्या ब्राह्मणाच्या व्यथा-वेदनेबद्दल त्यात कधीही लिहिलं गेलेलं नाही. त्यांच्या वेदनेला वाचा फोडणारी ही पहिलीच वाङ्मयकृती! स्वत:च स्वत:ची स्तुती करणाऱ्याला ‘तो एक मूर्ख’ असं म्हटलेलं आहे; पण ही उपाधी मला गैरलागू ठरेल अशी माझी खात्री आहे.
मनुष्याचा जन्मसोहळा साग्रसंगीत साजरा केला जातो, तसाच मृत्युसोहळाही! आपल्या आप्ताला स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून जवळचे नातेवाईक कोण आटापिटा करतात! एखाद्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही तर थेट दर्भाचा कावळा करून पिंडस्पर्श घडवून आणला जातो. हे घडवून आणणारी व्यक्ती म्हणजे ‘किरवंत’! मृत्यूपश्चात १३ दिवसांचे अंत्यविधी पार पाडण्याचं काम या ‘किरवंत’ ब्राह्मणाचं. ते एकदाचं पार पडलं, की हाच ‘देवतुल्य’ ब्राह्मण यजमानाच्या दृष्टीनं ‘अस्पृश्य’ ठरतो. या ब्राह्मणाच्या ‘अस्पृश्य’पणाची कथा आणि व्यथा म्हणजेच ‘किरवंत’ हे नाटक.
३३ वर्षे होऊन गेली हे नाटक लिहून. पण आजही कुणीतरी एखादा चुकार म्हणणारा भेटतोच, की ‘‘तुमचं ते ‘किरवंत’ नाटक ब्राह्मणांना बदनाम करण्यासाठी तुम्ही मुद्दाम लिहिलंत. काल्पनिक. ब्राह्मणांत असं काही नाहीए.’’ मी केवळ ऐकून घेतो. प्रतिवाद करत बसत नाही. मग तोच विचारतो, ‘‘कुठं भेटला तुम्हाला हा ‘किरवंत’? आणि ब्राह्मणांविषयी तुम्हाला इतकं सगळं कसं माहीत?’’
‘घोटभर पाणी’ ही माझी पहिलीच एकांकिका दणदणीत गाजू लागली होती. त्याचदरम्यान मी दुसरी एकांकिका ‘कुणाचे ओझे’ लिहिली होती. त्या एकांकिकेचा प्रयोग करी रोड येथील सुहास व्यवहारे करणार होता. ‘घोटभर पाणी’सारखंच यश याही एकांकिकेला लाभावं ही माझी इच्छा! म्हणून मी त्याला भेटायला एकदा त्याच्या घरी गेलो होतो. तर तो आपल्या चाळ सिस्टमच्या घरी दारातच अंगावरील शर्ट काढून बसला होता. मीही त्याच्या जवळ खालीच बसलो. तोवर त्याच्या आईनं मला पाणी दिलं. मी बोलून गेलो, ‘‘काय म्हणतात एकांकिकेच्या तालमी?’’ तो म्हणाला, ‘‘वेळच मिळत नाही.’’ मी म्हटलं, ‘‘का?’’ तर तो म्हणाला, ‘‘स्मशानात जावं लागतं. हा पाहा- आत्ताच आलो. अजून आंघोळ पण केली नाही.’’ ‘‘कशाला जातोस स्मशानात?’’ तर तो म्हणाला, ‘‘दोन दिवसांनी या, सगळं सांगतो.’’ मी ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी त्याच्या घरी गेलो. सोबत मित्र होता. आम्ही तिघंही गॅलरीत खालीच बसलो. मित्राची ओळख करून दिली, ‘‘हा सुधाकर कानडे. हं सांग, आता ते. तू स्मशानात का जातोस ते?’’ तो एकदम खवळलाच. म्हणाला, ‘‘मी नाही जात स्मशानात.’’ आणि तो एकदम गप्पच झाला. एक चकार शब्द बोलला नाही. पण त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता बोलायचं ते बोलत होतीच. आम्हीही मग काहीही न बोलता निघालो.
पण माझं मन अस्वस्थ नि चिंतामग्न झालं होतं. ‘‘स्मशानात जावं लागतं, हा पाहा आत्ताच आलो,’’ म्हणणारा हा- ‘‘मी नाही जात स्मशानात..’’ म्हणतो, म्हणजे नक्कीच काहीतरी इंगित असलं पाहिजे. मी माझ्या मित्राला- रामकृष्ण गाडगीळ याला फोन केला. म्हटलं, ‘‘कुणी स्मशानात जाणारा भटजी आहे का रे?’’ तो म्हणाला, ‘‘कोण गेलं?’’ मी सर्व जे घडलं ते सविस्तर सांगितलं आणि त्यानं माझी भेट मालाडच्या स्मशानभूमीत स्मशानकर्म करणाऱ्या अशोक जोशींशी घडवून आणली. आम्ही सारे स्मशानातच बसलो. ओळख वगैरे झाली. जोशींनी बोलायला सुरुवात केली. ‘‘स्मशानकर्म करणाऱ्याला ‘किरवंत’ म्हणतात कोकणात. मूळ शब्द ‘क्रियावंत.’ आपल्याकडे अस्पृश्यांचं समाजात जे स्थान, तेच याचंही. स्मशानकर्म असेल तर त्याला मोठय़ा प्रेमानं बोलावलं जातं. पण ते कर्म संपलं की कुणीच त्याला विचारत नाही..’’ जोशी खूप बोलत होते आणि माझ्याजवळचा टेपरेकॉर्डर ते सारं नोंदून घेत होता. ‘अंत्येष्टी संस्कार’, ‘गरुडपुराण’, ‘पिंड’, ‘दर्भाचा कावळा’, ‘धर्मसिंधू’, ‘निर्णयसिंधू’ हे ग्रंथ आणि काय काय.. पण माझ्या नजरेसमोर होता तो सुहासचा चेहरा. ‘‘मी नाही जात स्मशानात..’’ म्हणणारा. आपण स्मशानकर्म करतो हे माझ्यासोबत असणाऱ्या कानडेला कळू नये म्हणून त्यानं केलेला तो प्रयत्न. तो ब्राह्मण. ब्राह्मणत्व ही तर खुलेआम मिरवण्याची गोष्ट. पण हा ब्राह्मण असूनही ब्राह्मणांतही जातव्यवस्था असल्याचं निदर्शक असा हा प्रसंग. माणसाचं माणूसपणच हिरावून घेणारा!
मी अधिक खोलात जायचं ठरवलं. अशोक जोशींनी दिलेली माहिती किती सत्य? कोकणात या ब्राह्मणांना ‘किरवंत’ म्हणतात. म्हणून मग कोकणात जायचं ठरलं. सावंतवाडीला गेलो. कारण उदय तायशेटय़ेचे नातेवाईक तिथं राहत होते. सोबत आणखी एक मित्र. राजू चव्हाण. पोचलो सावंतवाडीला. दिवसभर ‘किरवंत’ शोधत फिरलो; पण कुणीच भेटला नाही. मग रात्रीच्या वेळी कुणीतरी आम्हाला सांगितलं, की एक भटजी आहेत, त्यांना भेटा. भेटलो. ते गोकर्णशास्त्री. त्यांना भेटीचं कारण सांगितलं. तर ते म्हणाले, ‘‘या विषयावर आजवर कुणीच काही लिहिलं नाही. तुम्ही कशाला या फंदात पडता?,’’ असं म्हणून त्यांनी आमच्याकडे दुर्लक्षच केलं. आणि आमच्या आधी त्यांच्याकडे आलेल्या दाम्पत्याशी ते बोलू लागले. पण आम्ही चिकाटी सोडली नाही. इकडचं तिकडचं बोलू लागलो. जी माहिती मिळेल ती टेप करू लागलो. त्रोटक, पण उपयुक्त माहिती मिळत गेली.
नंतर आम्ही त्यांच्या घरून बाहेर पडलो. रस्त्यात उदयच्या ओळखीचे एक गृहस्थ भेटले. ‘इकडे कुठे?’ आम्ही सत्य सांगितलं, तर ते गृहस्थ म्हणाले, ‘त्या ‘किरवंता’कडे?’ हे भटजीही सत्य लपवीत होते काय? माहीत नाही. पण त्यावर नाटक लिहून झालं. प्रयोग झाले. आधी राज्य नाटय़स्पर्धेत आणि मग व्यावसायिक रंगमंचावर. व्यावसायिक रंगमंचावर करण्यासाठी पात्रे आणि लोकेशन्स कमी केली. ते नंतर अनेक निर्मात्यांकडं दिलं. स्मशानावरचं नाटक.. कोण बघणार? ज्यांना आपण आधुनिक जाणीव असणारे दिग्दर्शक मानतो ते माझे समकालीन, किंवा थोडे ज्युनिअर ‘हे नाटक नको, दुसरं दे..’ म्हणू लागले. एक-दोघंजण म्हणाले, ‘असं कर, हे नाटक डॉ. लागूंकडे पाठव. तेच करू धजले तर!’
नाटक डॉ. श्रीराम लागूंकडे पाठवलं. शेवटचा प्रयत्न म्हणून! डॉ. लागूंना ते विलक्षण आवडलं. त्यांनी ते त्यांच्या ‘रूपवेध’ या संस्थेतर्फे ‘सुयोग’ या नाटय़संस्थेच्या मदतीनं व्यावसायिक रंगमंचावर सादर केलं. परंतु डॉक्टरांनी मला आधीच सांगितलं, की ‘आपण याचे पंचवीसेक प्रयोग करू.’ डॉ. लागू करताहेत म्हटल्यावर मी कशाला नाही म्हणतो? पण सत्तरएक प्रयोग झाले. नंतर ते सुधीर भटांनी बंद केलं. नाटक चालत नव्हतं म्हणून नाही, तर डॉ. लागू यांनी एका परिसंवादात बोलताना विनोदी नाटकांवर टीका केली म्हणून! टीका होती, ‘ढुंगणाला पाय लावणारी नाटकं’ आणि नाटक होतं सुधीर भटांचंच. मग नाटक चालू राहावं म्हणून अभिनेत्री सुहास जोशींच्या फार्महाऊसवर मीटिंग वगैरे झाली. पण भटांनी साफ नकार दिला. पण पुढं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक डॉ. लागूंनाच घेऊन त्यांनी केलं. आतलं राजकारण मला आजवर कळलेलं नाही. हे काहीसं विषयांतर झालं. परंतु मला प्रश्न पडला, की ‘डॉ. लागूंना कधीही जवळ उभं करणार नाही,’ म्हणणारे सुधीर भट लागूंनाच घेऊन पुलंचं ‘सुंदर मी होणार’ कसं करू शकतात? की ‘किरवंत’मध्ये ब्राह्मणांची बदनामी होते म्हणून ब्राह्मणांनीच तर नाही तक्रार केली सुधीरकडे? आणि डॉ. लागूंची विनोदी नाटकांवरची टीका हे केवळ निमित्त! किंवा असं तर नाही ना म्हणालं कुणी सुधीर भटांना, की ‘एका ब्राह्मणेतर नाटककाराचं नाटक- तेही ब्राह्मणांची बदनामी करणारं- तू का करतोस? बंद कर.’ आणि म्हणूनच कदाचित डॉ. लागू म्हणाले नाहीत ना, की ‘प्रेमानंद जन्मानं ब्राह्मण असता तर सगळे ब्राह्मण त्याला डोक्यावर घेऊन नाचले असते!’
माझी आणखीही एक वेदना आहे.. कलेचं कार्य आहे मानवी जीवनातील कुरूपता नष्ट करून ते सुंदर करणं! पण ‘किरवंत’ या नाटकानं मानवी मनातील कुरूपताच तेवढी दरवेळी का उफाळून येते?
अशोक जोशींनी दिलेली माहिती तपासून पाहण्यासाठी आम्ही सावंतवाडीला गेलो होतो. तिथल्या भटजींशी बोललो होतो. पण त्यांचा उल्लेख एका मुलाखतीत मी त्या रस्त्यात भेटलेल्या माणसाच्या सांगण्यामुळं ‘किरवंत’ असा केला होता. त्या मुलाखतीचा परिणाम इतका भयंकर व्हावा, की त्या गोकर्णभटजींना सावंतवाडीतून लोकांनी हाकलून द्यावं? ‘किरवंता’ची व्यथा-वेदना जगासमोर मांडून माझ्यातील सहृदय कलावंतानं चूक केली होती का?
भारतीय समाजातील जातव्यवस्था नष्ट होण्याऐवजी अधिकाधिक बळकट होत चाललेली पाहून आज मानवी वेदनेशी नातं सांगणारा माझ्यातील नाटककार कधीचाच मरून पडला आहे. नव्हे,
या समाजव्यवस्थेनंच त्याला मारून टाकलं आहे! अशा समाजात मी का जगतो आहे?
प्रेमानंद गज्वी