तसे पाहिले तर मुद्रण व्यवसाय आणि पत्रकारिता आरंभापासून बहुराष्ट्रीय राहिली आहे. त्यामुळे जागतिकीकरणाचा स्वीकार त्यांना सहज करता आला. एकेकाळी केवळ ब्राह्मण समाजाची मक्तेदारी असलेली पत्रकारिता जागतिकरणामुळे बहुजनांची झाली. जागतिकीकरणाने जातींचा मक्ता जसा मोडला तशी वर्गीय ऐक्याची शक्यता नष्ट केली. जागतिकीकरणामुळे सर्वात मोठे परिवर्तन ग्रामीण महाराष्ट्राने बघितले. साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, दैनिके यांची लाटच तिथे उसळली. थोडक्यात जागतिकीकरणामुळे बहुजन समाजाचा पत्रकारितेत मोठय़ा प्रमाणावर उद्धार झाला आहे.
संगणक आणि दूरध्वनी हे जागतिकीकरणाचे आधार भारतात प्रत्यक्ष जागतिकीकरण दाखल होण्यापूर्वी बहुतेक वृत्तपत्रांचेही आधार होऊन बसले होते. त्याचा आज साऱ्यांनाच विसर पडला आहे. यंत्राकरवी आणि हातांनी शिसाचा टंक जुळवून मजकूर तयार करण्याची कष्टपूर्ण, किचकट व कळकट पद्धत संपल्याचा नि:श्वास साऱ्या वृत्तपत्रसृष्टीने टाकला होता. त्यामुळे १९९१ नंतर राव-सिंह यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जागतिकीकरणासाठी खासगीकरण व तंत्रज्ञानात्मक उभारणी यांचा कार्यक्रम आखल्याचा विशेष ताप वृत्तपत्रांना झाला नाही. खासगी मालकीची वृत्तपत्रे, संगणक, ऑफसेट मुद्रण, स्वत:ची स्वतंत्र वितरण व्यवस्था (म्हणजे एस.टी., रेल्वे याहून वेगळी) यांच्या बळावर ताकदवान झाली होती. कागद, यंत्रे, सुटे भाग, कॅमेरे आदी साहित्यासाठी पावलोपावली सरकारी परवाने अन् परवानग्या यांवर विसंबण्याचा त्यांना तिटकारा येऊ लागला होता. साहजिकच बव्हंशी वृत्तपत्रांनी जागतिकीकरण नावाच्या तेव्हा अस्पष्ट असलेल्या गोष्टीला पािठबा देऊन टाकला होता. जे विरोध करत होते, ते तो कॅनडियन वा रशियन कागदावर, जर्मन ऑफसेट यंत्रांवर आणि मॅकिंटॉश व अॅपल यांच्या संगणकीय जुळणीवरच्या मजकुराद्वारे करत होते. एसटीडीच्या तबकडय़ा फिरवून भराभर बातम्या आदींचा पुरवठा करत होते. समाजवाद, कल्याणकारी अर्थव्यवस्था, विशेष सवलती, स्वस्त आणि अनुदानित पुरवठा, सरकारी छत्रछाया अशा गोष्टींचा अंमल गेल्यावर व्हायचे कसे याची अशी वृत्तपत्रे काळजीही करत होती. डंकेल प्रस्ताव, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, गॅट आदी आíथक परिवर्तनकारी शक्ती भारतीय समाजाची कशी वाट लावतील याचे प्रत्ययकारी चित्र सादर करत होती. मुद्रणव्यवसायात संगणक आल्यामुळे अक्षरजुळणी करणारे जुळारी अर्थात कंपोझिटर्स बेकार होतील, ही भीती त्यांच्या संघटनांनी जाहीर केलेली होती. परंतु संगणकाचे काम हात काळे न करणारे, वेगवान, सुबक आणि खर्च कमी करणारे असल्याचा प्रत्ययही अनेकांना येऊ लागला होता.
तेव्हाच्या वृत्तपत्रांत दोन भाग असत. एक संपादकीय आणि दुसरा जुळाऱ्यांचा. संपादकीयात ठळकपणे ब्राह्मण जातीचे प्राबल्य असे. जुळाऱ्यांमध्ये ब्राह्मण, मराठा, दलित, ओबीसी असा समाजघटक असे. म्हणजे बहुजन समाज माध्यम व्यवहारात महत्त्वाच्या ठिकाणी होता, मानाच्या नव्हता. नानासाहेब परुळेकरांनी ‘सकाळ’ची सातआठ वष्रे बाबासाहेब घोरपडे यांच्या संपादनाखाली दिली होती. घोरपडे मराठा होते. परुळेकरांचा हा धाडसी, पुरोगामी प्रयत्न ‘केसरी’च्या, ‘ज्ञानप्रकाश’च्या ब्राह्मणी पत्रकारितेला चांगलाच तडाखा देणारा ठरला. ‘सकाळ’ बहुजन समाजात रुळला. नानासाहेब गांधीवादी होते. मात्र ‘अमेरिका रिटन्र्ड’ असल्याने सुटाबुटात वावरायचे. बहुजनांचे कैवारी असणारे सुटाबुटात वावरणारे त्या काळी दोघेच मराठी पत्रकार होते, बाबासाहेब आंबेडकर व ना. भि. परुळेकर. विशेष म्हणजे कोलंबिया विद्यापीठात हे दोघेही आगेमागेच होते. मराठी पत्रकारितेमधील ब्राह्मणी प्राबल्य या दोघांच्या प्रयत्नांनी कमी झाले. दोहोंना अमेरिकेमधील सामाजिक-राजकीय-आíथक विचारांचा जवळून परिचय होता. एकाला सामाजिक गुलामगिरी उद्ध्वस्त करायची होती, तर दुसऱ्याला राजकीय पारतंत्र्य नष्ट करायचे होते. समाजवादी दोघेही नव्हते. दोघेही साम्यवादाचे विरोधक होते.
पत्रकारितेत ब्राह्मण असला तरी पत्रकारितेच्या अवतीभवती बहुजन समाज खूप होता. मुद्रण व्यवसायात मराठा जातीचे खूप लोक होते. छत्रपती शाहू व सयाजीराव यांच्या प्रेरणेने जी ब्राह्मणेतर पत्रकारिता सुरू झाली होती, तीसाठी छापखाना, कागद, टंक, शाई, यंत्रसामग्री, कुशल मनुष्यबळ लागे. तो व्यवसाय ब्राह्मणेतरांच्या बऱ्यापकी हातात होता. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी ब्राह्मणेतरांचे बरेच छापखाने होते. याचा दुसरा अर्थ असा की, एक समांतर पत्रकारिता महाराष्ट्रात वावरत होती. मात्र तिचा गाजावाजा आणि दखल दोन्ही नदारद होती. ब्राह्मणेतरांची कितीतरी साप्ताहिके अशा छापखान्यांमधून प्रकाशित होत. त्यांना ब्राह्मणी पत्रकारितेसारखे वलय मात्र नसे. वाचकवर्गाची संख्या कमी, त्यामुळे जाहिरातीही कमी. परिणामी, समाजावर आणि राज्यकर्त्यांवर वचक कमी असा या पत्रकारितेचा अवतार होता. तसे पाहिले तर मुद्रण व्यवसाय आणि पत्रकारिता आरंभापासून बहुराष्ट्रीय राहिली आहे. त्यामुळे जागतिकीकरणाचा स्वीकार त्यांना सहज करता आला. कागद, शाई, यंत्रे, रंग याबाबतीत निरनिराळे देश आघाडीवर असल्याने त्या देशांतील घडामोडींशी मराठी पत्रव्यवसायाला सतत जोडलेले असावे लागे. संगणकाचा वापर सुरू होताच ही जोडणी आणखी महत्त्वाची ठरली. वाचकांची संख्या वाढल्याने वेगवान व भरपूर क्षमता असणारी यंत्रे तसेच गतिमान व स्वच्छ सुबक जुळणी करणारे संगणक पत्रकारितेत दाखल झाले. साहजिकच या यंत्राधिष्ठित व्यवसायावर जगणारे अनेक ब्राह्मणेतर पत्रकारितेत दाखल झाले. जागतिकीकरणाने वणिक जातींचा मक्ता मोडण्यास प्रारंभ केला. कौशल्ये सर्व जातींत विखरून टाकली. नवी सहजसुलभ उत्पादन प्रक्रिया करणारी यंत्रे चालवणे ब्राह्मणेतरांनी शिकून घेतले. पत्रकारितेतही या कौशल्याच्या आधारावर प्रवेशणे सोपे झाले. विद्यापीठांमधील पत्रकारितेच्या प्रशिक्षण वर्गानीदेखील याच सुमारास लेखनकुशल, राजकारणाचा जाणकार, कायदा माहीत असलेला आणि समाजनिष्ठ तरुणवर्ग पुरवायला आरंभ केला होता. त्यात ब्राह्मणेतर युवावर्ग निम्मा होता. अमेरिकन व इंग्लिश पत्रकारितेच्या पायांवर उभी असलेली प्रशिक्षित पत्रकारिता म्हटली तर आंतरराष्ट्रीय होती. म्हणूनच तिचा जागतिकीकरणाचा प्रतिसादही त्या आधारावर सकारात्मक होता. संगणकांचे आगमन झाल्याबरोबर टंकजुळणी करणारे बेकार होणार होते. त्यातील काहींना संगणकांचे प्रशिक्षण देण्याचा व्यवस्थापनांचा कार्यक्रम होता. काहीजण त्या मार्गाने या व्यवसायात स्थिरावले. परंतु संगणकावर शिकून पत्रकारितेत आलेले व संगणकापुढे बेकार झालेले यांच्या जाती ब्राह्मणेतर असूनही त्यांचे वर्गीय ऐक्य कधी झाले नाही. जागतिकीकरणाने जातींचा मक्ता जसा मोडला तशी वर्गीय ऐक्याची शक्यता नष्ट केली. पत्रकारितेत- मराठी पत्रकारितेत- येणारे आवर्जून कनिष्ठवर्गीय व मध्यमवर्गीय असतात. श्रीमंतांपकी कधीच कोणी येत नाही. मात्र नोकरी हा सर्वाचाच उद्देश.
जागतिकीकरणाच्या आरंभकाळात भारतभर त्याविरोधात भरपूर चर्चा, परिसंवाद, निदर्शने, मोच्रे आदी प्रकार होत गेले. श्रमिक पत्रकारांच्या संघटनांना तसा वेगळा काही विचार नव्हता. संगणक व दूरध्वनी यांचा लाभ त्यांनाच खूप होत होता. आधुनिक यंत्रे (म्हणजे मनुष्यबळाची कपात करणारी, कमी माणसांकडून जास्त उत्पादन काढणारी आणि वाटेल तेवढा वेळ चालणारी) एकीकडे स्वत: वापरत असताना इतर उद्योगधंद्यांनी त्यांचा स्वीकार करू नये असे सांगणे त्यांना जमेना. त्यातच पत्रकारितेत नवा कुशल, नवशिक्षित, ऊर्जावान ब्राह्मणेतर समाजघटक दाखल होत होता. त्याच्या आवाजाला अन् महत्त्वाकांक्षांना केवढे तरी मोठे व्यासपीठ प्राप्त झालेले होते. हा ब्राह्मणेतर वर्गीय राजकारणापेक्षा जातीय-धार्मिक बाजूंवर जास्त लक्ष देणारा होता. त्या काळच्या अयोध्येच्या राममंदिराच्या मुद्दय़ाने पत्रकारितेमधील असंख्य नवोदित ब्राह्मणेतर युवक भारावून गेलेले होते. त्यांच्यावर डाव्या, मार्क्सवादी, वर्गीय विचारांचा पगडा पडू शकला नाही. जसे राजकारणातील िहदुत्व मध्यम जातींनी सावरून धरले होते (त्यांना मायावतींसारख्यांच्या पक्षाचीही साथ मिळाली) तसा पत्रकारितेतही मध्यम जातींचा शिरकाव या िहदुत्वाच्या देशभरातील प्रचाराचा परिणाम होता.
जागतिकीकरणाला धार्मिक राजकारणाची अशी काही जोड मिळाली की, भारतातील अनेक क्षेत्रे त्यातून ढवळून निघाली. मंडल आयोग, राजीव गांधींची हत्या, बाबरी मशीद, मुंबईचे बॉम्बस्फोट, दंगली यांचा परिणाम होऊन देशभर निर्माण झालेल्या धार्मिक वातावरणात जागतिकीकरणाचे दडपशाहीने प्रकटलेले रूप झाकोळून गेले होते. संगणकाला इंटरनेटची जोड मिळाली होती. पेजमेकरनंतर िवडोजने जन्म घेतला होता. बी.सी.एस., बी.सी.ए.च्या पदव्या जराशा स्वस्त झाल्या होत्या. सुमारे चार-सहा वष्रे रिकामपण भोगलेल्या या संगणकीय पदवीधरांना नोकऱ्या मिळू लागल्या होत्या. संगणक प्रशिक्षण संस्थेतून बाहेर पडून परत आत प्रशिक्षक म्हणून जाण्याचा मार्ग आता बंद पडायला आला होता. मल्टिमीडियाचे प्रशिक्षण देणाऱ्यांची गर्दी वाढू लागली होती. ब्राह्मण कसे वागतात यावर बारीक लक्ष ठेवणारे बहुजन या संगणक विश्वाची माहिती करून घेऊ लागले. दरम्यान, दूरदर्शनने खासगीकरणातून मालिका व अन्य कार्यक्रमांची निर्मिती सुरू करताच असंख्य कॅमेरामन, एडिटर, पॅनलिस्ट्स, साऊंड रेकॉर्डर, प्रॉडक्शन कंट्रोलर, मििक्सग स्पेशालिस्ट तयार होऊ लागले. मीडिया म्हणजे वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन यापेक्षाही भरपूर व विविध असे काही असते याचा पडताळा येत चालला. कारकुनी, कंत्राटदारी आणि निर्मितीचा स्वतंत्र व्यवसाय यांतील फरक मिटत चालला. ब्राह्मणांनी परदेशी नोकरी-व्यवसाय शोधले. ब्राह्मणेतरांना आणखीनच सोपे झाले. भारतात, प्रसिद्धी माध्यमांत कुशल मनुष्यबळ म्हणून तेही उपलब्ध झाले.
ब्राह्मणांखालोखाल जागतिकीकरणाचा फायदा घेऊन प्रसिद्धी माध्यमांत जे मध्यम जातीचे व मराठा-मारवाडी-जैन समाजाचे पत्रकार आले ते राजकारण आणि सरकार या दोन घटकांवर आधारलेले जीवन जगणारे नव्हते. आजही मराठा जातीचे पत्रकार पत्रकारितेत कमी दिसतात, त्याचे कारण सहकार-बँकिंग-शेती-शिक्षण या क्षेत्रांत त्यांचे असलेले वर्चस्व हेच आहे. खेरीज राजकारण हाही व्यवसाय पत्करणाऱ्यांची संख्या वाढली. वकिली, बांधकाम, एजन्सीज यांमध्येही त्यांना सत्तेच्या संपर्कामुळे रोजगार मिळाला. जागतिकीकरणात विक्रय, प्रचार, बांधकाम आणि वाहतूक ही क्षेत्रेही फैलावली. त्यांच्यापाशी पुरेसे भांडवल आणि पाठबळ आहे ते वरील व्यवसायात गेले. ज्यांच्यापाशी भांडवल, घराणे, मालमत्ता, जमीन आदी काही नव्हते, त्याच वर्गातील तरुण पत्रकारितेत शिरले. कौशल्य, कष्ट, कल्पकता यांना वाव देणारा व्यवसाय पत्रकारितेच्या रूपाने त्यांना दिसला. पत्रकारितेचा राजकारणाशी दाट संबंध. मंडल आयोगामुळे सत्ता लाभलेले नवसत्ताधारी आणि ३३ टक्क्यांमुळे राजकारणात आलेल्या महिला यांनाही माध्यमांमध्ये स्थान हवे होते. साहजिकच माध्यमे आणि हा नवा राज्यकर्ता वर्ग यांच्यात सुमधुर संबंध सुरू झाले. संपादक आणि त्या पातळीवरील जबाबदार पत्रकार सोडले तर जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण या त्रयीबाबत उर्वरित पत्रकार चकारही तोंडावाटे काढत नव्हता. त्याला फायदा जाणवत होता. पर्याय उपलब्ध झाले होते. मुद्रित माध्यमासोबत टीव्ही, वेब, मॅगझीन, शेती-क्रीडा-चित्रपट-उद्योग आदी विशेषीकृत प्रकाशने यात नोकऱ्या तयार होत होत्या. जनसंपर्क, जाहिरात, प्रतिमानिर्मिती, माहिती सल्ला, स्वयंसेवी संस्था, अशी पूर्णपणे नवी सेवाक्षेत्रे जागतिकीकरणाने समोर आणून ठेवली. त्यांचाही स्वीकार ब्राह्मणांप्रमाणे ब्राह्मणेतरांनी केला.
सर्वात मोठे परिवर्तन ग्रामीण महाराष्ट्राने बघितले. साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, दैनिके यांची लाटच तिथे उसळली. तंत्रज्ञानाने प्रकाशन व्यवसाय व मुद्रण प्रक्रिया इतकी सुलभ, स्वस्त आणि आटोपशीर करून ठेवली की, जिल्ह्य़ांच्या ठिकाणी सहजच पाच-सात दैनिके, डझनभर साप्ताहिके छापली जाऊ लागली. जागतिकीकरणाने निर्मिलेली सेवाउद्योगांची अर्थव्यवस्था या पत्रकारितेची खाण ठरली. कागद, शाई, संगणक आदी आधारभूत घटक स्वस्त झाले. माहिती तंत्रज्ञानाच्या युगाने काळ जसा ‘घटवला’ तसा अवकाशही ‘लहान’ केला. पत्रकारिता करायची म्हणजे प्रचंड भांडवली गुंतवणूक, मोठी इमारत, भरपूर कर्मचारी, सुसज्ज यंत्रे असा कारभार ग्रामीण महाराष्ट्रात कोठेच दिसेना. एखाद्या दुकानासारखे वृत्तपत्राच्या कार्यालयाचे स्वरूप झाले. भर बाजारात मोक्याच्या जागी वृत्तपत्रांची कार्यालये दिसू लागली. छपाई, वितरण दूर कोठेतरी आणि छोटय़ाशा दुकानवजा जागेत, वार्तासंकलन, वृत्तलेखन, अक्षरजुळणी व जाहिरात स्वीकृती होऊ लागली. अवघा संपर्क दूरसंपर्क! ही ग्रामीण पत्रकारिता (स्वतंत्र अथवा आवृत्तीची) ब्राह्मणेतर बहुजनांनीच उभी केलेली आहे. ब्राह्मणांची तेथील संख्या एखाद्या मुठीत मावेल एवढीच. कोणत्याही जिल्हा, तालुका पत्रकार संघाच्या यादीवरून नजर टाका. ९५ टक्के नावे बहुजन आढळतील. काहीजण मालक असतील, तर काही बातमीदार म्हणून मोठय़ा वृत्तपत्रांचे प्रतिनिधी असतील. हँडीकॅम घेतलेले काही स्ट्रींजरदेखील तेथे असतील. व्हिडीओग्राफीबरोबर त्यांची बातमीदारीही चालू असते. छोटे कॅमेरे, सेलफोनमधील कॅमेरे यांचा वापर करणारेही ग्रामीण भागात वाढले आहेत. जागतिकीकरणाला ग्राहकाची गरज असते. ग्राहक खिळवून ठेवणारे माध्यम म्हणजे टी.व्ही. तो व्यवसाय केबल टी.व्ही.मुळे भारतात फैलावला. या केबलच्या व्यवसायातही बहुजनांची मक्तेदारी निर्माण झाली. जसे वृत्तपत्रांच्या अवतीभवती बहुजन व्यावसायिक होते, तशी चित्रवाणीच्या व्यवसायातही बहुजनांनी मुद्रा उमटवली. आजमितीला दिसते असे की, चारही खासगी वाहिन्यांचे आणि सह्य़ाद्री वाहिनीचेही कॅमेरामन ब्राह्मणेतर आहेत.