१९७१ साली औदुंबरच्या सदानंद साहित्य मंडळाच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवी अनिल औदुंबरला आले असताना त्यांच्या त्या मुक्कामातील हृद्य क्षण टिपले आहेत- प्रख्यात ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी.. त्यांच्या उत्कट, भावश्रीमंत शैलीत!  
१९७१ ची रात्र.
शांत असलेले, अंधारात अधिकच दिसेनासे झालेले, काळ्या दगडी बांधणीचे भिलवडी रेल्वेस्टेशन.
कसलीच जाग नव्हती.
सिग्नल्सचे हिरवे-तांबडे दिवे. काळोखात तरंगत असल्यासारखे.
दोन चाळीसला जनता एक्स्प्रेस येणार होती. त्या बेतानं मी आणि माझा लहानगा भाऊ श्रीधर औदुंबरातून जीप घेऊन स्टेशनवर आलो. उद्याला, संक्रांतीला भरणाऱ्या आमच्या औदुंबरच्या सदानंद साहित्य मंडळाच्या संमेलनासाठी कवी अनिल अध्यक्ष म्हणून येणार होते. त्यांना घेऊन जाण्यासाठी आलो होतो.
अनिलांना मी पाहिलेलं नव्हतं. पण त्यांची छायाचित्रं मी पाहिलेली होती. त्यांचे ‘पेर्तेव्हा’, ‘सांगाती’ हे कवितासंग्रह मी आवडीनं वाचले होते. त्यांच्या ‘सत्यकथा’ मासिकातून प्रसिद्ध होत असलेल्या, मोह घालणाऱ्या लयीतल्या दहा-दहा ओळींच्या अवीट कविता मी वाचत होतो.
मी त्यांना पाहून ओळखेन या विश्वासानं त्यांना आणण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती आणि मी ती आनंदानं स्वीकारली होती. अनिलांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे यांचंही ‘मोळी’, ‘माध्यान्ह’, ‘चंद्रास्त’, ‘मराठी कादंबरी : पहिले शतक’ आदी लेखन मी वाचलेलं होतं.
आम्हाला पुष्कळ वेळ थांबावं लागलं.
गाडी दीड तास उशिरा पोचणार होती.
जवळजवळ गाडी यायला चार वाजणार होते.
आम्ही स्टेशनच्या इमारतीच्या बाहेर येऊन उभे राहिलो. वरती आकाश चांदण्यांनी लकाकत होतं. ते मुग्ध होऊन बघत होतो.
पहिला कोंबडा आरवला.
समोर पुष्कळ टांगेवाल्यांची घरं होती. त्यातले  नेवर्ती, तुकाराम असे काही टांगेवाले माहीत होते. पण त्यांचं जग झोपलेलं होतं. बाहेर बांधलेल्या घोडय़ांना आता जाग येत चालली होती. काहीतरी काहीतरी त्यांच्या हालचाली चालल्या होत्या. त्यांतलं एक घोडं अवचितच खिंकाळलं. त्याला काय झालं होतं, कोण जाणे. त्याच्या खिंकाळण्यानं अवतीभवतीचा परिसर थरकला. क्षणभरानं दुसरं एक घोडं खिंकाळलं. दोन घोडय़ांतला तो काहीतरी संवाद असावा.
प्राण्यांतले, पक्ष्यांतले संवाद आपल्याला आकळू येत नाहीत याचा विषाद मनात नेहमीप्रमाणं उतरत राहिला.
आणि दूरातून धडाडत येणाऱ्या गाडीचा आवाज जाणवू लागला. हळूहळू आवाज मंद करत गाडी स्टेशनात शिरली.
पहिल्या वर्गाच्या डब्यावर लक्ष देता देता उभ्या असलेल्या अनिलांना मी ओळखलंच. डब्याच्या दारात एका दाढीवाल्या गोऱ्यापान गृहस्थांशी बोलत उभे.
रूपेरी पांढरे केस. गोरटेले.
निळा-काळा सूट. पूर्वकालात ते न्यायाधीश होते.
विचारताच म्हणाले, ‘‘हो. हो. मी अनिलच.’’
जीपमधे बसल्यावर त्यांनी माझं नाव विचारलं.
‘‘नाव ऐकल्यासारखं वाटतं. लेखन करता काय?’’
मी ‘हो’ म्हटलं.
त्यांना म्हटलं, ‘‘हा माझा भाऊ. त्याला कविता फार आवडतात.
तुम्हाला पहिल्यांदा बघायचं म्हणून जागरण करून माझ्याबरोबर आलाय.’’
तो एवढासा. दहा-बारा वर्षांचा. शिडशिडीत. गोरा. रूपवान. अबोल.
अनिलांनी त्याच्याकडं बघून घेतलं.
म्हणाले, ‘‘मी याच्याएवढा असताना मला कवितेची गोडी लागली होती.’’
अनिल म्हणाले, ‘‘गाडीत झोप काही लागली नाही. मला दोन वाजायच्या पुढं नेहमी झोप लागते. पण दोन चाळीसला जनता एक्स्प्रेस भिलवडीला येणार म्हणून उचक्यानं जागा राहून राहिलो. गार्डला उठवायला सांगितलं होतं. तो कऱ्हाडला सांगत आला- गाडी दीड तास लेट असल्याचं.’’
मी त्यांना म्हटलं, औदुंबरला गेल्यावर त्यांनी थोडं झोपावं. उजाडायला उशीर असेल.
अंधूक अंधूक दिसत होतं.
पहाटेपूर्वीची पहाट होत होती वाटतं.
टार रोडवरनं आमची जीप धावत होती.
अनिल भवतालचा भूगोल विचारत होते.
सगळा पंधरा-वीस मिनिटांचा रस्ता होता.
खंडोबाची वाडी. माळवाडी गेली. ब्रह्मनाळची पांद. भिलवडीचा पूल. खाली कृष्णा वाहत होती. डाव्या हाताला भिलवडीचा प्रसिद्ध घाट. नदीत उतरायला लागलेला. खालून अगदी वरच्या उंच पायरीवर ठेवलेली सुपारी दिसावी अशी बांधणी. स्त्रियांना पाणी भरून नेणं सोपं व्हावं अशी रुंद पायऱ्यांची रचना.
पूल ओलांडला.
मळ्यांकाठची वस्ती आली.
पहाटेच्या थंड हवेत कोंबडे उंचावून ओरडू लागलेले. एक ओरडला की पाठोपाठ दुसरा. तिसरा.
अनिल म्हणाले, ‘‘यांची आरवण्याची स्पर्धा सुरू झालेली दिसते.’’
औदुंबरात पोचलो. कवी सुधांशु यांच्या घरी.
अनिलांनी अंग थोडंसं सैल केल्यावर सुधांशुंनी विचारलं, ‘‘चहा आणू दे ना?’’
‘‘वाऽ वा. आणा नं. पण यावेळी घरच्या माणसांना कशाला जागं करता?’’
‘‘हे करणं किती आनंदाचं आहे!’’ सुधांशु म्हणाले.
अनिल म्हणाले, ‘‘मी आता थोडी झोप घेतो.’’
पण बोलणी निघता निघता त्यांचा झोपायचा विचार मावळला. भिलवडीच्या घाटाच्या संदर्भात त्यांना त्यांनी पाहिलेले सुंदर घाट आठवले. अहल्याबाईंचं नाव निघालं.
‘‘आज कोठे नवीन घाट बांधले जातात का? बहुतेक कोठे नाहीत.’’
अनिलांनी पानाचं खानदानी साहित्य बाहेर काढलं.
‘‘रामटेकचं पान आता इतिहासजमा झालं. ती जातच मेली. बोअर नावाचा किडा असतो. वेल मांडवावर चढली आणि हजारभर पानं वर लागली, की हा किडा वेलीच्या खालून मूळच कातरतो..’’ अनिल म्हणाले.
पानांवरून संशोधनावर बोलण्यानं वळण घेतलं.
सुधांशु म्हणाले, ‘‘ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीविषयीच्या तुमच्या ‘किलरेस्कर’मधल्या लेखानं पुष्कळांची उत्सुकता वाढली आहे.’’
‘‘मला नाही वाटत, ते लोकांना इतक्या लवकर पटेल असं. काळ जावा लागेल. पण मी जिद्दीचा माणूस आहे. एखाद्या गोष्टीच्या पाठीमागं लागलो की ते सोडायचं नाही. आयुष्याची जी काय पाच-सात र्वष उरली असतील ती या कारणी लावायची.
‘‘संशोधन करायला नको. ती दृष्टीच नाही आपल्या लोकांकडे. माझा दृष्टिकोन आशावादी आहे.. सांकलिया यांचे आणि माझे पुरातत्त्व संशोधनाच्या संदर्भात अनेकदा मतभेद झाले आहेत. ही माणसं ज्याचा प्रत्यक्ष पुरावा हातात मिळत नाही ते घडलंच नाही असं म्हणतात. उदाहरणार्थ रामायणातल्या गोष्टी. ते म्हणतात, भारतापासून लंकेचं इतकं मोठं अंतर. त्यावर सेतू बांधणं शक्यच नव्हतं. यावर मी त्यांना, १८ व्या शतकात पोर्तुगीज जहाज भारत आणि सिलोन यांमधून येताना अडकत होतं, इतका तो भाग अरुंद होता, हा उल्लेख दाखवला.
‘‘ख्रिस्तपूर्व दोन हजार र्वष तरी रामायणाचा काळ असेल की नाही? त्यावेळी लंका आणि भारताचं टोक यांत आजच्याइतकं अंतर असेल का?
‘‘तसंच रामायणकालीन घरांसंबंधी. पाच- पाच मजली घरं त्याकाळी वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं शक्य नव्हती असं त्याचं म्हणणं. पण ही घरं संपूर्ण लाकडाची होती असं मला वाटतं. या घरांचं एक तंत्र असे असं मला वाटतं. उत्तम जुनं लाकूड परीक्षा करून घेऊन, ते खोल पाया काढून त्यात रोवलं जाई. पाणी लागेपर्यंत पाया काढला जाई; आणि तो मजबूत बांधून त्यावर घराचा डोलारा उभा केला जाई. मोर्डीला तुम्ही चला. आजही संपूर्ण लाकडाचे वाडे तुम्हाला मी दाखवीन. आज तुम्हाला रामायणकालीन वाडय़ांचे अवशेष काय मिळणार? जळून गेलेल्या लाकडांची राख!
‘‘मी सांकलियांना म्हटलं, ‘तुम्हाला तत्कालीन वाडय़ांचे अवशेष हवे असतील तर अशा पायासाठी खोदलेल्या विहिरी मिळताहेत का ते शोधा.’ सांकलियांना माझं म्हणणं तर्कशुद्ध वाटलं आहे.’’
अनिल पुढं म्हणाले, ‘‘संशोधनाच्या दिशा चुकताहेत असं मला पुष्कळदा वाटतं. व्हावं तसं संशोधन होत नाही. पुष्कळशा महत्त्वाच्या मूर्ती, पोथ्या, ग्रंथ अजून असंशोधित आहेत. ते अजून मिळतील असं वाटतं. पूर्वी परचक्र आलं की शहाण्या माणसांनी कोठे ना कोठे गोष्टी दडवल्या. आमच्याकडे मेहेकर या गावी एक मूर्ती नुकतीच सापडली. पद्मपुराणातल्या वर्णनाप्रमाणं ती हुबेहूब आहे. जुन्या गढीचा ढीग म्हणून तिच्याकडं पाहिलं जाई. त्या दिशेनं आरती करायचा प्रघात होता. पण ती का, कशासाठी, ते काही पिढय़ांनंतर लोक विसरून गेले. त्याचं संशोधन करावं असं कुणाला वाटलं नाही. योगायोगानं ती सापडली. तुमच्याकडे ‘गढी’ ही संस्था नाही. वऱ्हाडात त्या तुम्हाला दिसतील. पूर्वी पेंढारांचे हल्ले येत. हल्ला आला की उंच गढय़ांवर आपल्या चीजवस्तू घेऊन लोक जात. वर दगड ठेवलेले असत. ते पेंढारांना मारण्यासाठी.’’ मेहेकरच्याच ना. घ. देशपांडे यांच्या कवितेत गढीचा उल्लेख आहे तो मनात आठवत होता : काळ्या गढीच्या जुन्या ओसाड भिंतीकडे..
सुधांशु म्हणाले, ‘‘औदुंबरला इथं डोहात ‘सिद्धमठ’ आहे. नेहमी पाण्याखाली असलेला. उन्हाळ्यातही त्याच्यावर पाणी असतं. उन्हाळ्यात त्याच्या पाण्यातल्या चौथऱ्यावर उतरता येतं. पण खोल पाण्यात आत काय आहे कळत नाही. त्या सिद्धमठाच्या दिशेनं आम्ही काठावरून आरती म्हणतो.’’
अनिल म्हणाले, ‘‘त्याचं संशोधन करायला हवं. सिद्धमठाचा उल्लेख कुठं झाला आहे?’’
‘‘ ‘कृष्णामाहात्म्य’ ही संस्कृत हस्तलिखित पोथी मी पलीकडच्या आमणापूर या गावातून आणून वाचली होती. ती पोथी ‘गुरुचरित्रा’च्या आधीची. पाच-सहाशे वर्षांपूर्वीची आहे. अजून ती छापली गेलेली नाही.’’ सुधाशुंनी सांगितलं. ते पुढं म्हणाले, ‘‘पाच-सहाशे वर्षांपूर्वी कृष्णेचा प्रवाह सिद्धमठाच्या पलीकडून वाहत असावा. आता तो मठ पाण्यात गेला असावा.’’
अनिल म्हणाले, ‘‘संशोधनात अनेक अडचणी असतात. मी सातारच्या िखडीतल्या गणपतीचं संशोधन करावं म्हणतोय. तिथल्या मंडळींनी मान्य केलं, पण तिथल्या पुजाऱ्यांनी हरकत घेतलेली दिसतेय. बघू या, काय होतंय ते. मी पेरिस्कोपिक कॅमेरा मागवला आहे. आता ही हरकत उपस्थित झालीय. औरंगजेबच्या स्वारीच्या वेळी मूळ मूर्ती आत लपवली गेली; आणि बाहेरच्या भिंतीवर शेंदूर माखला गेला. त्याचाच गणपती झाला असावा. पूर्वीच्या मूर्ती रत्नजडित असत. कदाचित हीही मूर्ती तशी असेल. पाहायला हवे.
‘‘रत्नागिरीजवळ महाड रस्त्यावर गुळे नावाचं लहानसं गाव आहे. तिथंही असाच गणपती असावा असा कयास आहे. त्यासाठी गुळ्याच्या ग्रामस्थांनी मला बोलावलं आहे. मी त्यांना सांगितलं, तुमची सगळी तयारी असेल तर मी येतो. निदान आत काय आहे याचं निश्चित चित्र तरी तुम्हांस मिळेल की नाही?’
‘‘ज्ञानेश्वरमाऊलींच्या समाधीविषयी माझं हेच म्हणणं आहे. ज्ञानेश्वरमाऊलींचा मीही भाविक आहे. ‘अमृतानुभवा’चा मी सखोल अभ्यास केला आहे. ज्ञानेश्वरमाऊलीनं संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधीविषयी मला अजून वाचायला मिळालेलं नाही. माझ्या ओळखीतले एक गृहस्थ आहेत. अध्यात्मशास्त्राचं त्यांनी चांगलं वाचन केलं आहे. या समाधीविषयी त्यांनी वाचलं आहे. पण कोठे, ते त्यांना आठवत नाही. पण आठवून सांगतील. निरनिराळ्या संप्रदायांचे निरनिराळे साधनेचे, समाधीचे प्रकार असतात. ते सगळं एकटय़ाला वाचून शोधणं शक्य नसतं.
‘‘ज्ञानेश्वरमाऊली तिथून दैवी शक्तीनं अंतर्धान झालेली असली तर, तरी नामदेवांनी वर्णिलेलं समाधीच्या आतल्या भागाचं, तिथल्या ओटय़ाचं जरी छायाचित्र मिळालं तरी खूप नाही का? नामदेवांचे अभंग जे काल्पनिक मानतात- त्यांना उत्तर मिळेल की नाही? पाश्चात्त्य देशांत अशा संशोधनांना कोणी विरोध करत नाही.’’

बोलता बोलता उजाडत आलं.
अनिलांनी सकाळचं सगळं आवरायला सुरुवात केली.
खाणं झालं.
त्यांना नदीवर आंघोळ करायची होती.
नदीपलीकडं उभं असलेलं, तेराव्या शतकातलं हेमाडपंती भुवनेश्वरीचं मंदिर बघायचं होतं.
भुवनेश्वरीच्या देखण्या मूर्तीचं, मंदिराच्या हेमाडपंती रचनेचं, प्राकारात असलेल्या अन्नपूर्णेच्या दगडी शिल्पाचं, वेताळ, हनुमान आदी मूर्तीचं अनिलांना अप्रूप वाटत होतं.

Abhinav, Raosaheb Gurav , Raosaheb Gurav passed away, loksatta news, pune,
‘अभिनव’चे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव यांचे निधन
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Kannamwar is with Maharashtra because of Nehru says Chief Minister Devendra Fadnavis
नेहरूंमुळेच कन्नमवार महाराष्ट्रसोबत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
loksatta chavadi political drama in Maharashtra
चावडी: भुजबळ तेव्हा आणि आता
Loksatta lokrang Love Pictures Poet Relationship PWD Engineer
अन्यथा.. स्नेहचित्रे : अजंठ्याची पुसट रेषा…
Loksatta lokrang Publisher obsessed with words
शब्द-सुरांत रमलेला प्रकाशक
the last book store
बुकमार्क : ‘ऑनलाइन’च्या महापुरातून वाचलेले लव्हाळे…

त्यांच्याबरोबर सुधांशु, प्रसाद जोशी आदी मंडळाचे सदस्य असे आम्ही मंदिराची चढण उतरत नदीकडे चाललो. धनगावहून मंडळाचे उपाध्यक्ष, मराठीतले प्रसिद्ध ग्रामीण लेखक म. भा. भोसले येऊन आम्हाला मिळाले. अनिलांना पाण्यातल्या ‘सिद्धमठा’कडे जायचं होतं. तिकडं नाव घेतली. सिद्धमठाच्या चौथऱ्यावर आम्ही उतरलो. अनिलही उतरले. गुडघाभर पाणी होतं. सिद्धमठाची मर्यादा संपली की डोहाचं खोल पाणी सुरू होत होतं. पाण्यात असलेली ही प्राचीन मंदिराची जागा अनिलांना रहस्यमय वाटत राहिली. ‘‘हे काय आहे, ते शोधलं पाहिजे,’’ म्हणाले. पलीकडं नाव निघाली होती. काठाला औदुंबराचे- उंबराचे खूप वृक्ष होते. औदुंबराच्या झाडांनी वेढलेलं गाव म्हणून गावाचं नाव- औदुंबर. अनिलांनी उंबर या झाडाच्या किती जाती आहेत ते सांगितलं.
नंतर नावेतच म. भा. भोसले यांनी त्यांच्या ‘उघडय़ा जगात’ या कादंबरीचा विषय काढला. अनिलांना ते म्हणाले, ‘‘माझ्या या कादंबरीवर ‘जिवाचा सखा’ चित्रपट निघाला. अनेक वृत्तपत्रांनी या कादंबरीवर चांगले अभिप्राय छापले. ‘मौज’ साप्ताहिकानंही या कादंबरीची प्रशंसा केली. पण अलीकडंच कुसुमावतीबाई देशपांडे यांनी ‘सत्यकथा’ मासिकात दोन भागांत मराठीतल्या कादंबरी- लेखनाचा प्रदीर्घ आढावा घेतला आहे. त्यांनी अनेक उल्लेखनीय कादंबऱ्यांची नावे दिली आहेत. मात्र, माझ्या कादंबरीचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही. यासंदर्भात मी कुसुमावतीबाईंना पत्र लिहिलं. त्याची त्यांनी पोचही दिली नाही. नंतर ‘आमच्यासारख्या खेडय़ातल्या लेखकांना दुर्लक्षानं मारलं जातं,’ असे पत्र मी ‘मौज’ साप्ताहिकाला पाठवलं. ते पत्र त्यांनी छापलं. पण कुसुमावतीबाईंनी माझ्या लेखनाची कसलीच दखल घेऊ नये याचं मला वाईट वाटलं.’’
अनिल म्हणाले, ‘‘प्रत्येकाची वेगळी आवड-निवड असते. लेखकानं समीक्षकाच्या विशिष्ट दृष्टिकोनाचा एका मर्यादेपलीकडे विचार करू नये. आपली आपण वाट चालावी. कुसुमावतीबाईंनी तुमच्या लेखनाचा उल्लेख केला नाही तरी ते त्यांचं एकटीचं मत. तुमच्या कादंबरीची खूप वाहवा झाली आहे यात समाधान मानून आपलं लेखन करत राहावं, हे श्रेयस्कर. आणि कोणताही समीक्षक, हा लेखक खेडय़ातला म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. कुसुमावतीबाई तर नाहीतच नाही.’’
हळूहळू आम्ही मंडळाच्या कार्यालयात आलो. दुरून दुरून रसिक अनिलांना भेटायला येत होते.
सदानंद सामंत या औदुंबरातल्या प्रतिभावंत लेखकानं वाङ्मयाची, निरनिराळ्या कलांची आवड भोवतीच्या तरुणांत निर्माण केली. सुधांशु, म. भा. भोसले अशी नामवंत मंडळी त्यातूनच उदयास आली.
वडाखालचं आवार रसिकांनी भरून गेलं होतं.
आणि अनिलांच्या भाषणासाठी, कवितावाचनासाठी सगळे उत्सुक झाले होते.

Story img Loader