मुक्ता चैतन्य
भारतात इंग्रजी भाषा वापरणाऱ्यांची संख्या लोकसंख्येच्या फक्त १० टक्के इतकी आहे. तर जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक लागतो. अलीकडे आपल्याला मराठी भाषा नामशेष होतेय का/ होईल का.. वगैरे प्रश्न पडू लागले आहेत आणि आता ‘मराठी भाषा संपली’ या गृहीतकावर चर्चा, वाद आणि मांडणी सुरू झालेली आहे. पण त्याचवेळी आभासी जगात जन्माला आलेल्या निरनिराळय़ा व्यासपीठांवर मराठी जोमाने वाढतानाही दिसते आहे.
मग मराठी भाषा संपली म्हणावी की नाही?
मुद्दा फक्त मराठी भाषेचा नाही. भारतीय स्थानिक भाषा आभासी जगात हातपाय पसरून बहरताना दिसत आहेत. २००७ मध्ये गुगलने पहिल्यांदा हिंदी भाषेत मजकूर भाषांतरित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यापाठोपाठ फेसबुकवर २००९ मध्ये हिंदी आलं. आणि २०१४ मध्ये इतर तेरा भारतीय भाषांमध्ये फेसबुक उपलब्ध झालं. ट्विटरने २०११ मध्ये हिंदी फीड्स उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली. हिंदीपाठोपाठ इतरही भारतीय भाषा या प्लॅटफॉम्र्सवर दिसायला लागल्या. शेअर चॅटसारखं समाजमाध्यम तर पहिल्यापासून भारतीय भाषांमध्येच आहे. मला आठवतंय, पूर्वी मराठीत फेसबुकवर काही लिहायचं तर ते वेगळं टाइप करून मग फेसबुकच्या वॉलवर पोस्ट करावं लागत असे. गुगल इंडिक आल्यावर आणि स्मार्ट फोनमध्ये झपाटय़ाने झालेल्या बदलांमुळे या प्रक्रियेतले अनेक अडथळे दूर झाले आणि हळूहळू समाजमाध्यमांवर स्थानिक/ मातृभाषेत लिहिणं सोपं झालं. इतकंच नाही तर मार्क झकरबर्गने नुकत्याच केलेल्या फेसबुक लाइव्हमध्ये म्हटलं आहे की, मेटावर्सच्या काही अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जगभरातल्या शेकडो भाषांना ऑनलाइन जगात आणणं. ज्या भाषा आज आभासी जगात उपलब्ध नाहीत अशा शेकडो भाषांकडे फेसबुकचं लक्ष यापुढे असणार आहे. आणि हे करत असताना एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तो म्हणजे, सध्या कुठल्याही भाषेला दुसऱ्या भाषेत भाषांतरित करायचे असल्यास इंग्रजीला वळसा घातल्याशिवाय ते शक्य होत नाही. पण आता मेटावर्स जी आखणी करतोय त्यात इंग्रजीतून भाषांतराला पूर्णपणे वगळून थेट एका भाषेतून दुसऱ्या भाषेत मजकूर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे; ज्याला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड ते देणार आहेत. त्याचप्रमाणे युनिव्हर्सल स्पीच transletor असाही एक प्रकल्प फेसबुक घेऊन येतंय, कुणालाही कुठल्याही भाषेत संवाद साधता आला पाहिजे यादृष्टीने हे प्रयत्न आहेत. अर्थातच यात अधिकाधिक ग्राहक वाढवत नेणे हा मुद्दा आहेच, पण हा एक महत्त्वपूर्ण बदल आहे, ज्यामुळे आभासी जगातला भाषांचा वापर आणि त्याचे स्वरूप झपाटय़ाने बदलेल. माणसांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषेचा अडथळा उरणार नाही.
आज फेसबुक आणि व्हॉट्सअपवर स्थानिक/ मातृभाषा आणि महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी मोठय़ा प्रमाणावर वापरली जातेच, पण ट्विटर आणि LinkedIn सारख्या पूर्णपणे इंग्रजाळलेल्या समाजमाध्यमांवर आता मराठी मस्त रुळली आहे. या प्लॅटफॉर्मवर कालपर्यंत मराठीत लिहिणं डाऊन मार्केट समजलं जात होतं. लोकांना मराठीत लिहिण्याची लाज वाटत असे, कुणी लिहिलंच तर त्यांना नावं ठेवली जात, मराठीत लिहिणं कमीपणाचं होतं; त्यामुळे ही दोन्ही समाजमाध्यमं एका विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित होती. मराठीत व्यक्त होऊ बघणारा मोठा वर्ग या माध्यमांपासून दूर होता. पण भाषेची ही दरी हळूहळू कमी झाली.
मुळात समाजमाध्यमे ही ग्राहकाभिमुख असतात. ती ग्राहकांच्या गरजांवर चालतात. इंग्रजी लिहू, वाचू, समजू आणि बोलू शकणाऱ्या मूठभर लोकांच्या पलीकडच्या मोठय़ा ग्राहकवर्गापर्यंत पोचायचं असेल तर इंग्रजीचा अडसर दूर करून ज्या त्या ग्राहकाच्या भाषेत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणं ही बाजारपेठीय गरज होती. त्याचवेळी गावपातळीपर्यंत इंटरनेट आणि स्मार्टफोनचा प्रसार झाला. इंटरनेट आणि वेगवेगळी अॅप्स वापरण्यातलं नवखं अप्रूप संपल्यावर माणसांना व्यक्त होण्यासाठी त्यांच्या भाषेची गरज निर्माण झाली आणि रोमन मराठीत लिहिण्यापेक्षा देवनागरी लिपी उपलब्ध करून दिली, तर आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक ग्राहक आपल्या प्लॅटफॉम्र्सचा वापर करतील हा पूर्णपणे व्यावसायिक विचार समाजमाध्यमांनी केला. पण त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे स्थानिक/ मातृभाषा नष्ट होणार का, या शंकेभोवतीचा धुरळा हळूहळू बसायला लागला. आणि आज समाजमाध्यमांवर मराठीचा बोलबाला आहे.
निरनिराळय़ा समाजमाध्यमांवर अनेक लोक आवर्जून त्यांच्या मातृभाषेत लिहू लागली आहेत, मराठीत व्यक्त होऊ लागली आहेत. आज फेसबुकसारख्या समाजमाध्यमाने ब्लॉगिंगचं रूप घेतलं आहे. अनेक माणसं इतर ब्लॉगिंग साइट्सवर जाऊन लिहिण्यापेक्षा फेसबुक वॉलचाच वापर ब्लॉगसारखा करताना दिसतात. मराठी युटय़ुबर्स झपाटय़ाने वाढतायेत. यात पाककलेपासून संस्कृतीपर्यंत अनेक विषय मराठीतून मांडले जात आहेत. गडकिल्ल्यांची माहिती असो, राजकारण असो, अर्थकारण असो, समाज आणि मानसशास्त्र असो किंवा अजून कुठलाही विषय, आज प्रत्येक गोष्ट मराठीमध्ये उपलब्ध झाली आहे. निरनिराळे ऑडिओ प्लॅटफॉम्र्स मराठीत रुळले आणि रुजले आहेत. इतकंच कशाला, पण अनेक हॉलीवूड चित्रपट मराठीत डब होऊन ओटीटी प्लॅटफॉम्र्सवर उपलब्ध होऊ लागले आहेत. ऑडिओ बुक्स आणि ईबुक्सच्या जगातही मराठी हळूहळू स्थिरस्थावर होताना दिसते आहे.
गुगल आणि KPMG यांनी २०१७ मध्ये एक सर्वेक्षण केलं होतं, त्यानुसार समाजमाध्यमांवर इंग्रजी भाषा वापरणारे फक्त ३ टक्के उरतील असा अंदाज व्यक्त केला गेला होता. तो आता खरा होताना दिसतो आहे. त्यातही महामारीनंतर हे प्रमाण अधिकच झपाटय़ानं वाढलं आहे. घराघरांत अडकून पडलेल्या माणसांनी आभासी जगात इंग्रजीच्या आश्रयाला न जाता मराठीतल्या आशयाला प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे. आज ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणारी अॅप्ससुद्धा ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन इंग्रजीला पर्याय म्हणून मराठीसह अनेक स्थानिक भारतीय भाषा उपलब्ध करून देत आहेत. मातृभाषेतल्या जाहिरातींना समाजमाध्यमांवर इंग्रजीपेक्षा कितीतरी पट अधिक प्रतिसाद मिळतो, असं लक्षात आल्यानंतर मोठमोठय़ा कंपन्या आणि ब्रॅण्ड्सनीही त्यांचा मोर्चा भारतीय भाषांकडे वळवलेला दिसून येतो आहे. समाजमाध्यमांवर हे भाषिक बदल झाले ते इंग्रजी न येणारा ग्राहक वर्ग मोठय़ाप्रमाणावर वाढत गेल्यामुळे. आपण एरवी मराठी भाषा वापरणाऱ्यांची संख्या कमी झाली म्हणून सातत्याने ओरड करत असतो, पण खरंच वस्तुस्थिती तशी आहे का? की मराठी माणसांचा मराठी भाषा वापराचा परीघ वाढला आहे आणि निरनिराळय़ा माध्यमांचा वापर ते करू लागले आहेत? हेही एकदा तपासून बघायला हवं. मराठी भाषा मरणासन्न होतेय, अशी ओरड करताना आपण फक्त शहरी भागांतल्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मराठी माणसांकडेच बघत असतो का, तसं असेल तर समाजमाध्यम आणि आभासी जगात जे मराठीचं वारं वाहू लागलं आहे ते कशामुळे?
मुळात व्यक्त होण्यासाठी, एखादा विषय समजून घेण्यासाठी सामान्य माणसांना त्यांच्या घरात जी भाषा बोलली जाते तीच जवळची वाटते. मग ती मातृभाषा असेल/ स्थानिक भाषा असेल किंवा परिसर भाषा असेल. गेल्या अनेक वर्षांपासून आपण हायब्रीड जीवनशैलीकडे प्रवासाला सुरुवात केलेलीच होती, महामारीने त्याचा वेग प्रचंड वाढवला, त्यामुळे जर, हायब्रीड (म्हणजेच ऑनलाइन आणि ऑफलाइन एकत्रित) जीवनशैली जगावीच लागणार असेल तर माणसं त्यांच्या सोयीचीच भाषा निवडणार, वापरणार. हा बदल झपाटय़ाने होतोय.
या सगळय़ात ग्राहकांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या भाषेतला मजकूर/ व्हिडीओ/ ऑडिओ त्यांना मिळतोय, कारण हा मजकूर बनवणाऱ्यांमध्ये अनेक जण इंग्रजीपेक्षा मातृभाषेत अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकणारे आहेत. समाजमाध्यमं, त्यावर असणाऱ्या कंपन्यांच्या दृष्टीने नवा ग्राहकवर्ग निर्माण करणं आणि आहे तो टिकवणं, ग्राहकांची मनं जिंकून विश्वास संपादन करणं या प्रक्रिया स्थानिक भाषांमुळे सोप्या झाल्या आहेत. म्हणजेच दोन्ही बाजूने हा फायद्याचा मामला आहे.
जिथे ट्विटर आणि LinkedIn सारख्या माध्यमांना मराठीशी जुळवून घ्यावं लागलं, तिथे भविष्य मराठी आणि भारतीय भाषांचंच आहे. समाजमाध्यमांवर भारतीय भाषांचाच वापर सर्वाधिक होतो आहे आणि होणार आहे.
मराठी किंवा स्थानिक भाषा मारणार का? या प्रश्नाचं उत्तर- आता तरी, अजिबात नाही असंच आहे. उलट काळाच्या पडद्याआड गेलेल्या भाषांनाही कदाचित समाजमाध्यमांमुळे ऊर्जितावस्था येईल.
भाषा ही फक्त संवादाचं माध्यम असते. आणि जिथे संवाद करण्याची गरज असते, संवाद हवा असतो तिथे भाषा कधीच मरत नसते.
समाजमाध्यमांवर मातृभाषेत लिहिणारे दर वेळी स्वत:चं भाषाप्रेम व्यक्त करण्याच्या आणि त्याला अस्मितेची जोड देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ते भाषा वापरतात आणि पुढे जातात.
(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.) muktaachaitanya@gmail.com