भानू काळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुटुंबात साहित्याची कसलीच परंपरा नसताना, पुरते शालेय शिक्षणही झाले नसताना केशवराव कोठावळे (२१ मे १९२३ ते ५ मे १९८३) यांनी मराठी साहित्यविश्वावर उमटवलेली नाममुद्रा आज इतक्या वर्षांनंतरही अगदी ठसठशीत आहे. मुंबईत गिरगावात औदुंबराच्या एका झाडाखाली फुटपाथवर पुस्तके विकण्यापासून ते पुण्याच्या नारायण पेठेतील औदुंबर आळीत उभ्या असलेल्या तीन मजली वास्तूपर्यंतचा त्यांचा प्रवास तसा बहुपरिचित आहे, पण तरीही त्याचा धावता आढावा घेताना थक्क व्हायला होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव हे त्यांचे मूळ गाव. वडील एक छोटे हॉटेल चालवत, पण ते फारसे चालत नव्हते. त्यामुळे केशवराव शिक्षणासाठी मुंबईत आले आणि मुगभाटात आजीकडे राहू लागले, पण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षक देत असलेली शिक्षा सहन करणे नाकारून आणि दप्तर वर्गातच सोडून रागारागाने बाहेर पडले. नंतर त्यांनी आजीचे घरही सोडले; खऱ्या अर्थाने रस्त्यावर आले. पोटासाठी हॉटेलात कपबशा विसळल्या, मवाली मुलांच्या संगतीत ब्लॅकमध्ये सिनेमाची तिकिटेही विकली, अनेक उद्योग केले, पण वर्गात मागे सोडलेली पुस्तके त्यांचा पिच्छा सोडणार नव्हती. लवकरच त्यांनी गिरगावात एका औदुंबराच्या झाडाखाली फुटपाथवर गोणपाट पसरून पुस्तके विकायला सुरुवात केली. रात्री तीच पुस्तके गोणपाटात भरून कुठल्या तरी जिन्याखाली पथारी पसरून झोपी जायचे. कधीकधी जवळच्याच मौज छापखान्यातही झोपण्यासाठी आसरा घ्यावा लागे. अशी तीन वर्षे काढल्यानंतर १५ जून १९४२ रोजी, एकोणिसाव्या वर्षी, गिरगाव नाक्यावर ‘मॅजेस्टिक बुक स्टॉल’ या भव्य नावाने एक चिमुकले दुकान उघडले; त्याच औदुंबराच्या छायेत, मॅजेस्टिक थेटरजवळ. जपानच्या बॉम्बहल्ल्याच्या भीतीने तेव्हा अनेक मुंबईकर मुंबई सोडून गेले होते. त्या पळापळीत ही जागा त्यांना मिळून गेली होती केवळ २५-३० रुपयांत. ती जागा इतर कोणी का घेतली नाही? याचे उत्तर ते एकच देत- केवळ दैवयोग!

केशवराव विकत ती पुस्तके बहुतेकदा रद्दीच्या दुकानांतून वजनाच्या हिशेबात मिळवलेली असत. त्याकाळी सेकंड-हँड पुस्तकांचा व्यापार जोरात होता, शाळकरी मुलेही जुनी पुस्तके सर्रास वापरत. आजही रद्दीच्या दुकानात काही साहित्यरत्ने अवचित हाती लागतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकाच्या तब्बल चार हजार प्रती अशाच एकदा केशवरावांच्या हाती लागल्या. त्याबद्दल स्वत: केशवरावांनी विस्ताराने लिहिले आहे (नवनीत, मे १९७२). ही घटना १९५४ सालची आहे. त्यांच्यापासून भांडून दुरावलेला आणि पाच-सहा वर्षे तोंडही न दाखवलेला वासुदेव दातार नावाचा जुना मित्र एकाएकी त्यांच्या दुकानात दाखल झाला. ‘वीरकर नावाच्या एक गृहस्थाकडे ‘माझी जन्मठेप’ पुस्तकाचा मोठा लॉट बरीच वर्षे पडून आहे, अगदी स्वस्तात मिळेल’ अशी बातमी त्याने दिली. दोघे लगोलग वीरकरांकडे गेले. वीरकर स्वत: पुस्तकविक्रेते नव्हते. एकाला दिलेल्या कर्जाऊ रकमेच्या बदल्यात ती पुस्तके त्यांच्याकडे आली होती; पण जंग जंग पछाडूनही ती विकली जात नव्हती. ‘चार हजार रुपये द्या, लॉट घेऊन जा’ वीरकर म्हणाले. केशवराव घरी गेले. पत्नी लक्ष्मीबाईंनी अडीअडचणीला उपयोगी पडतील म्हणून साठवलेल्या सोळाशे रुपयांतले पंधराशे रुपये घेतले, आगाऊ रक्कम म्हणून ते वीरकरांना नेऊन दिले आणि पुस्तके ताब्यात घेतली. थोडय़ाच दिवसांत उरलेले पैसेही फेडले. अवघ्या चार हजार रुपयांत चार हजार प्रती हाती आल्या. त्यांची थोडीफार डागडुगी करून, नवे वेष्टन चढवून त्यांनी ती पुस्तके भरपूर जाहिरात आणि मेलिंग करून विकायला काढली. पण पहिले तीन महिने एकही प्रत विकली गेली नाही. केशवराव अगदी खचून गेले. एका श्रेष्ठ लेखकाच्या श्रेष्ठ पुस्तकावरदेखील असा प्रसंग, वाचनसंस्कृती भरात असलेल्या त्या काळातही, ओढवावा ही घटना खूप खिन्न करणारी होती. पण नोव्हेंबरच्या २९ तारखेला एकाएकी ग्रह पालटले. रोजच्या रोज मनीऑर्डर्स येऊ लागल्या आणि सगळय़ा प्रती धडाधड संपल्या. अशक्य वाटणारे काम केशवरावांनी करून दाखवले होते. आपल्या लेखाच्या शेवटी केशवरावांनी लिहिले आहे, ‘‘त्या पुस्तकाने मला पैसा दिला एवढंच नव्हे तर दातारने न सांगितलेली एक मोठी गोष्ट दिली- ती म्हणजे आत्मविश्वास!’’

इतरांची पुस्तके विकता विकता स्वत:ही पुस्तके प्रकाशित करावी या विचाराने १९५२ साली त्यांनी ‘मॅजेस्टिक प्रकाशन’ सुरू केले होते- ‘विवाहानंतर’ या मालतीबाई दांडेकर यांच्या पुस्तकापासून. दुकानात येणारा माणूस कुठली पुस्तके विकत घेतो याकडे त्यांचे बारीक लक्ष असे. त्यामुळे ‘सत्तान्तर’, ‘स्मरणगाथा’, ‘मोगरा फुलला’, ‘चक्र’, ‘माहीमची खाडी’, ‘हत्या’, ‘वैखरी’, ‘आनंदीगोपाळ’, ‘मुंबई दिनांक’ यांसारख्या उत्तम साहित्यिक मूल्य असलेल्या पुस्तकांबरोबरच वाचकांना हवी होती अशी उपयुक्त पुस्तकेही त्यांनी काढली. उदाहरणार्थ, एस. जी. गुप्ते यांचे ‘मॅजेस्टिक इंग्लिश टीचर’. त्याचे लेखक होते प्रा. स. गं. मालशे. पण ‘लेखक म्हणून माझं नाव नको. माझी एस. जी. ही इनिशियल्स घेऊ आणि नाव गुप्त ठेवायचं म्हणून गुप्ते!’ असे त्यांचे म्हणणे होते. त्या पुस्तकाचा प्रचंड खप झाला; अजूनही त्याच्या आवृत्त्या निघत असतात. त्यांच्या ‘विकास पुस्तके’ मालिकेत पुढे ‘संभाषणकला’, ‘व्यवहारचतुर कसे व्हावे’, ‘सभेत कसे बोलावे’अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली. त्यातलेच एक म्हणजे श्रीपाद जोशींचे ‘कुठे कसे वागावे’ हे अप्रतिम पुस्तक.

आठ-दहा वर्षांचा असताना आईने वाढदिवसानिमित्त ते मला भेट दिले होते आणि मला ते खूप आवडले होते, पुन:पुन्हा मी ते वाचत असे. आजही मॅजेस्टिकच्या सुमारे दोन हजार प्रकाशनांतील वैविध्य लक्ष वेधून घेते. भरपूर खप असणारी विद्यार्थ्यांसाठीची क्रमिक पुस्तके मात्र त्यांनी का काढली नाहीत याचे कधीकधी नवल वाटते.

खूप गोष्टी योग असेल तेव्हाच घडतात, मुद्दाम ठरवून त्या घडत नाहीत हे केशवरावांचे एक अनुभवसिद्ध मत. पन्नासच्या दशकात असाच एक अनपेक्षित योग आला. शीतयुद्धाच्या त्या काळात भांडवलवादी अमेरिका आणि साम्यवादी रशिया तिसऱ्या जगात आपापल्या विचारधारांचा प्रसार करण्यासाठी खूप प्रयत्न करत असत. आपापल्या देशातील साहित्याचा स्थानिक भाषांत अनुवाद करून घेणे हा त्याचाच एक भाग. लेखक हे विचारवंत आणि म्हणून समाजावर खोलवर परिणाम करणारे मानले जात. सोव्हिएट प्रकाशने मोठय़ा प्रमाणावर लोकांपर्यंत पोचत होती. गॉर्की, डोस्टोवस्की, टॉलस्टॉय, चेकॉव्ह वगैरे रशियन लेखक त्यातूनच आम्हाला परिचित झाले. अमेरिकन्सदेखील याबाबत मागे नव्हते. युसिस (युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सव्‍‌र्हिस) ही मोठी संस्था त्यासाठी प्रयत्नशील होती. अनेक लेखकांना अमेरिकेचा किंवा रशियाचा फुकट दौरा करता आला. चित्रपट व्यवसायातही या शीतयुद्धाचे पडसाद उमटत होते; जुलमी सावकाराविरुद्ध पिचलेल्या कष्टकऱ्याने दिलेला लढा हा गल्ला जमवून देणारा हुकमी विषय होता. त्याच वेळी फुलब्राइट आणि रॉकफेलर स्कॉलर्स अमेरिकेत बघितलेल्या वैभवाचे, आमच्या बुद्धिमान तरुणांना भारून टाकणारे चित्रणही करत होते. युसिसमध्ये रमेश मंत्री, मंगेश पाडगावकर, जयवंत दळवी यांच्यासारखे नामांकित साहित्यिक वेळोवेळी नोकरीला होते. त्यांच्यातील दळवींकडे गाजलेल्या अमेरिकन पुस्तकांचा मराठी अनुवाद करून घेण्याचे काम १९५६ सालापासून होते. अनुवादासाठी युसिस देत असलेले पैसे तत्कालीन प्रकाशक देत असलेल्या पैशांपेक्षा खूपच अधिक होते. साहजिकच गंगाधर गाडगीळ, जी. ए. कुलकर्णी, विजय तेंडुलकर, शान्ता शेळके अशा अनेक प्रतिभाशाली साहित्यिकांनी युसिससाठी हे अनुवादाचे काम केले. वेगवेगळय़ा प्रकाशकांमार्फत युसिस ही पुस्तके प्रकाशित करून घेत असे व त्यांच्यातील अनेक पुस्तके दळवींशी असलेल्या स्नेहामुळे कोठावळेंकडे जात. यात भरपूर व्यावसायिक फायदा होत गेला.

गळय़ाभोवती रंगीत रुमाल, अंगावर बनियन  व अर्धी चड्डी आणि चार गुद्दे द्यायचे तर चार खायचे ही रीत असलेल्या फुटपाथवरच्या वर्तुळातून सुसंस्कृत पांढरपेशा माणसांच्या वर्तुळात केशवराव प्रकाशन व्यवसायामुळे आले आणि तो बदल त्यांना मनापासून भावला. एकलव्याप्रमाणे त्यांनी स्वत:चा विकास करून घेतला.

 बेचाळीस साली घेतलेल्या ३० चौरस फुटांच्या टीचभर जागेतून ६० फुटांच्या गोवर्धनदास बिल्डिंगमधील जागेत १९५६ मध्ये आणि १९६३ साली त्याहून बऱ्याच मोठय़ा अशा सुरतवाला बिल्डिंगमधील जागेत मॅजेस्टिकने आपला व्याप विस्तारला. केशवराव मितभाषी होते, पण सुरतवाला बिल्डिंगमध्ये जमू लागलेला लेखकांचा अड्डा त्यांना सुखावत असे. चहा आणि शेजारच्या कुलकण्र्याच्या हॉटेलातली भजी यांच्यासोबत नेहमीच गप्पा रंगत. आपल्या समूहाला ते ‘ग्रंथप्रेमी मंडळ’ म्हणत. त्यातूनच लेखकांच्या सहली काढायची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. पवईजवळ विहार लेकला गेलेल्या अशाच एका सहलीत ‘ललित’चा जन्म झाला. ‘ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार व ग्रंथसंग्रह यांना वाहिलेले मासिक’ हे ललितचे स्वरूप आजही कायम आहे.

त्यांच्यासारख्या प्रकाशकाचा लॉटरीसारख्या क्षेत्राशी संबंध येणे हा एक अकल्पित योगायोगच म्हणायचा; तसे घडायचे कुठलेही तार्किक कारण देता येणार नाही. महाराष्ट्र सरकारने १९६९ साली लॉटरी सुरू केल्यावर त्याची एजन्सी केशवरावांनी घेतली. तो खरे तर त्यांच्याहून बरेच लहान असलेल्या भावाचा- तुकारामअण्णा यांचाच पुढाकार होता. राम-लक्ष्मण अशीच त्यांची जोडी होती. वसंत देशमुख आणि मधु मंगेश कर्णिक या सरकारी नोकरीत असलेल्या साहित्यिक स्नेह्यांनी लॉटरीची सगळी योजना त्यांना समजावून सांगितली होती. ‘के. व्ही. कोठावळे’ असा शिक्का ते विकत असलेल्या लॉटरीच्या तिकिटावर असे व त्यामुळे ते नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचले. एक वैशिष्टय़ म्हणजे, असंख्य अंध व्यक्तींना त्यातून रोजगार मिळाला. त्यात अनेक मुलीही होत्या. ‘जो आमच्याबरोबर चालतो त्याचे भाग्य चालते’ हे केशवरावांनी तयार केलेले घोषवाक्य प्रचंड लोकप्रिय होते. साधारण १९८३-८४ सालापर्यंत हा व्यवसाय जोरात होता. त्यानंतर अन्य राज्यांच्या लॉटरीची तिकिटे महाराष्ट्रात विकायला सुरुवात झाली आणि तो कमी होत गेला.

यशासारखे दुसरे यश नाही म्हणतात. मॅजेस्टिकची कमान सातत्याने चढती राहिली. पुण्यातही बाजीराव रोडवर १९५९ साली त्यांनी दुकान घेतले आणि पुढे १९७० साली तर नारायण पेठेतील औदुंबर आळीत सध्याची तीन मजली इमारत बांधली. तेथील दोन दालनांना गो. नी. दांडेकर आणि जयवंत दळवी यांची नावे दिली. १९७३ साली मॅजेस्टिक गप्पा सुरू झाल्या आणि लवकरच साहित्यिक वर्तुळात त्या खूप लोकप्रिय झाल्या. दीनानाथ दलाल यांनी स्थापन केलेले ‘दीपावली’ १९७७ पासून केशवरावांनी ताब्यात घेतले. गिरगावातल्या औदुंबरापासून पुण्यातल्या औदुंबराकडे झालेली ही वाटचाल म्हणजे मराठी साहित्याच्या वसंत ऋतूची कहाणी आहे.

आमची पहिली भेट झाली एप्रिल १९७८ मध्ये. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कादंबऱ्या मराठीत लिहिल्या जाव्यात म्हणून त्यांनी कादंबरी स्पर्धा जाहीर केली होती व त्यात माझी ‘तिसरी चांदणी’ कादंबरी पुरस्कारप्राप्त ठरली. स. गं. मालशे परीक्षक होते. पुरस्काराची तीन हजार ही रक्कम त्या काळात घसघशीत होती. त्या संदर्भातच आमची ती भेट होती. ऑपेरा हाऊस येथील हिरे विक्रेत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रसाद चेंबर्समध्ये. त्या इमारतीत कार्यालय घेणे ही मराठी प्रकाशकासाठी फारच मोठी उडी होती. अन्य कुठल्याच मराठी प्रकाशकाने असे धाडस केले नव्हते. पुढे त्यांच्या नावाने मॅजेस्टिकने ठेवलेले ११,१११ रुपयांचे केशवराव कोठावळे पारितोषिक माझ्या ‘बदलता भारत’ पुस्तकाला मिळाले ही त्यांच्या संदर्भातली आणखी एक व्यक्तिगत आठवण.

केशवराव गणपतीचे निस्सीम भक्त होते. दैवयोगावर त्यांचा अढळ विश्वास होता. आपल्या हाताला यश आहे ही त्यांची श्रद्धा होती. आर्थिकदृष्टय़ा सहज शक्य होते तरी पहिला परदेशप्रवासही त्यांनी १९७६ साली, म्हणजे आयुष्यात खूप उशिराच केला.

१९८३ साली ‘ललित’ मासिकाला वीस वर्षे, मॅजेस्टिक बुक स्टॉलला चाळीस वर्षे आणि केशवरावांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण होत होती. त्यानिमित्ताने मुंबईत दहा दिवसांचा भव्य साहित्योत्सव भरवण्यात येणार होता. उद्घाटक पु. ल. देशपांडे असणार होते. लक्ष्मणशास्त्री जोशी, श्रीराम लागू, ना. धों. महानोर, माधव गडकरी वगैरे अनेक दिग्गज सहभागी होणार होते. लेखकांनी केलेला एका प्रकाशकाचा हा आगळा सत्कार असणार होता. जून महिन्यात कोठावळे गौरव अंक काढायचीही जवळच्या मित्रांची इच्छा होती. दुर्दैवाने आपल्या साठाव्या वाढदिवसाच्या केवळ दोन आठवडे आधी केशवरावांचे निधन झाले. गौरव अंक पुढे श्रद्धांजली अंक म्हणून प्रसिद्ध झाला. केशवरावांचा नितांत विश्वास असलेला दैवयोग हा प्रकार खूप विचित्र असतो हेच खरे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. bhanukale@gmail.com