हृषीकेश गुप्ते
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मराठी भाषेचं, त्या भाषेतील शब्दभांडार आणि अर्थन्यासाचं सर्वोत्तम भान असणारे जे मोजके लेखक आपल्याकडे होऊन गेले त्यात बाबुराव बागूलांचं स्थान अनन्यसाधारण आहे. बागूल जरी ‘जेव्हा मी जात चोरली होती’, ‘मरण स्वस्त होत आहे’ आणि ‘सूड’ अशा साहित्यकृतींसाठी परिचित असले, तरी त्यांच्या सर्वच कलाकृतींतून सशक्त कथानकांची चुणूक सहजीच जाणवते. बागूलांच्या कलाकृतींची ऊर्जा बागूलांच्या भाषेत, निवेदनात आणि आशयात दडलेली आहे. इथे आशय म्हणजे निव्वळ कथानकाच्या पर्यावरणाचा विषय नव्हे, निवेदन म्हणजे लेखकाचे प्रायोगिक/ नैसर्गिक संवादसाधन नव्हे; आणि भाषा म्हणजे फक्त अवगत असलेले शब्दभांडार नव्हे- हे नीट आकळून घेणे गरजेचे आहे. भाषेची सुघड मांडणी करत निरस निवेदनाची वाट हेतूपुरस्सर टाळणारे बाबुराव बागूल हे एक अत्यंत महत्त्वाचे लेखक होते. आजच्या सजग वाचकालाही मराठी साहित्यिक सूची तयार करताना ज्या त्वरेने पूर्वसूरींतील दळवी, पेंडसे, जीए, नेमाडे, यादव वा ढसाळ आठवतील, तितक्याच उत्स्फूर्तपणे बाबुराव बागूलांचे नाव स्मरेल याविषयी संदिग्धता आहे. बागूलांचे कथाविषय सहसा कष्टकरी आणि शोषित समाजाचं रेखाटन करत असले तरी त्यांच्या साहित्यकृती तत्कालीन शोषणविरोधी कथनात्म कलाकृतींपेक्षा वेगळय़ा उठून दिसतात. याचे मुख्य कारण बागूलांचा कल कोणत्याही एका विशिष्ट शोषणाकडे झुकलेला नसतो. जात-धर्म-वर्ग-वर्ण-लिंग अशा सर्वच शोषणांविरोधात बागूलांच्या लेखणीचा न्याय सम्यक आहे. माणसाने केलेल्या माणसाच्या पतनाची कथा बागूल ज्या आकांताने सांगतात ती तिडीक मराठीत खचितच कुणा साहित्यिकास साधली. नवनवीन इझममध्ये कथानकं बंदिस्त करून मराठी साहित्यात एक नवी वर्गव्यवस्था उभारली जात असताना बागूलांच्या ‘अघोरी’ या कादंबरीचे पुनरावलोकन क्रमप्राप्त ठरते. एकोणीसशे त्र्याऐंशी साली सर्वप्रथम प्रकाशित झालेली ही कादंबरी आजही मराठीतल्या सर्व इझम्सपासून वेगळी पडत आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेली आहे.
‘अघोरी’च्या कथानकाची सुरुवात एका अत्यंत अनवट वळणावर होते. गावातल्या मस्तवाल, तापट आणि तामसी पाटलाच्या घरात नुकतंच पुत्राचं लग्नकार्य पार पडलेलं आहे. लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळलेली पार्वती त्यांची सून म्हणून घरात आलेली आहे. या पार्वतीवर पाटलाची कन्येवत माया. पार्वतीवरच्या पाटलाच्या या मायेपोटीच पाटलीणबाईचे एकूण कुटुंबाकडे पाहण्याचे संदर्भ बदलतात आणि अशातच पाटलाच्या कुटुंबाकडे गावातल्या अघोरीबाबाची वक्रदृष्टी वळते.
पाटलाचं घर परंपरेनं चालत आलेली धार्मिक कर्मकांडं पाळत असलं तरी पाटील स्वत: मात्र त्या देवधर्मापेक्षा पूर्वजांच्या तलवारीवर म्हणजेच पराक्रमावर आणि त्या अनुषंगाने अंगाखांद्यात झिरपत आलेल्या वंशपरंपरागत मस्तवाल मद आणि अहंकारावर विश्वास ठेवणारा आहे. याउलट त्याचा पुत्र धर्मराज म्हणजेच धर्मा शांत प्रवृत्तीचा, देवाधर्मावर भाबडा विश्वास असणारा, गळय़ात तुळशीच्या माळा घालणारा, बापाच्या तामसी स्वभावाच्या अगदी उलट – सालस आणि सज्जन निपजलाय. बापाच्या तापट स्वभावापुढे त्याचा सालसपणा काहीसा निस्तेज भासतो. धर्माला बापाच्या तामसी स्वभावाचे भय आहे. पाटलालाही असा मृदू आणि शांत स्वभावाचा पुत्र फारसा पसंत नाही. पाटलाला वाटतं की, आपल्या पुत्रानेही आपल्यासारखंच येताजाता वाटेल त्याची चामडी लोळवण्याची िहमत बाळगणाऱ्या आग्यावेताळी स्वभावाचे व्हायला हवे होते. धर्माचे अगदी कालपरवा लग्न झालेले आहे. घरातली पारंपरिक पूजा आटोपली की, तो आपल्या पत्नीशी म्हणजेच बालपणीच्या मैत्रिणीशी पार्वतीशी पहिलावहिला शृंगार करायला आतुरलेला आहे.
पाटलाची पत्नी ठकूबाई, पाटलाच्या तापट स्वभावानं पिचलेली आहे. घरातच वाढलेल्या आणि आता आपल्या सुनेच्या म्हणजेच पार्वतीच्या नव्याने उदयास येऊ पाहणाऱ्या घरातल्या अस्तित्वाने काहीशी अस्वस्थ झालेली आहे. त्यातनंच आपल्या धन्याची म्हणजेच पाटलाची आपल्या नवपरिणीत सुनेवरची माया तिला आता खटकते आहे.
धर्माची पत्नी पार्वती सौंदर्यवती आहे. ती जरी पाटलांच्या घराभोवतालीच लहानाची मोठी झालेली असली, तरी आज धर्माशी लग्न झाल्यानंतर तिला या घरची सून ही नवी ओळख प्राप्त झालेली आहे. पार्वतीवर पाटलाची विलक्षण माया, अगदी लेकीवत. या मुलीला त्याने तिच्या बालपणापासून अंगाखांद्यावर खेळवलेले.
अशा प्रकारे बाबुराव बागूलांची ‘अघोरी’ पहिल्या काही पानांतच नात्यांचा व्यामिश्र गुंता समोर वाढून वाचकांचा ठाव घेते. एकुणातच या नव्या नात्यांच्या निर्मितीमुळे पाटलाच्या कुटुंबातील भावपरिपोषावर एक अधिकचा ताण येतो. तो ताण बागूलांची लेखणी अत्यंत सामर्थ्यांने पेलते. इथे उदाहरणादाखल सुनेच्या सौंदर्याचे वर्णन करताना पाटलीणबाईच्या मनातला सुनेसंबंधीचा वृश्चिकसंदेह विशद करणारा हा उतारा पाहू.
‘तिची लालभडक लुगडय़ातून उठून दिसणारी गोरीपान डौलदार आकृती, तिची पोटऱ्यांपर्यंत रुळणारी काळीभोर वेणी, चमकदार पुष्ट पोटऱ्या, त्या पोटऱ्यांची शोभा द्विगुणित करणारे तोडे, पायांत झंकारणाऱ्या जोडवी, फूलमासोळय़ा, तिचे गरोदर बाईप्रमाणे पोसलेले नितंब आणि टपोरे वक्षस्थळ पाहून ठकूबाई हादरून गेली. तिला वाटले, त्या नवतीच्या अन् रूपाच्या महापुरात भोळाभाबडा धर्मा गटांगळय़ा खात राहणार. या सुखाच्या राशीपासून धर्मा एक क्षणभरही दूर होऊ शकणार नाही. लहानपणापासून तो तिच्या हुकमात होता. तिला पाठंगुळी मारून फिरत होता. आता तर ती त्याच्या डोक्यावर बसणार. ती जहांबाज आहे. तो बावळट आहे अन् ती तर आता रंगाने, रूपाने जणू बहरून आली आहे. आता साधाभोळा धर्मा तिचा गुलाम होणार. सबंध गावाला मुतायला लावणारा आग्यावेताळ सासरा तिच्या मुठीत आहे. नवरापण मुठीत मावणारच आहे. आपले मात्र हाल होणार. तरुणपणी नवऱ्याने खेटराएवढीही किंमत दिली नाही. आता मुलाच्या राज्यातही किंमत राहणार नाही.’
संदेह, मद, मत्सर आणि अहंकाराच्या उंबऱ्यावर हेलकावे खाणाऱ्या पाटलीण आणि पाटलाच्या आयुष्यात गावाबाहेर राहणारा अघोरीबाबा प्रवेश घेतो. घरातल्या पूजेच्याच दिवशी अघोरी पाटलाच्या दारात उभा राहून पाटलाच्या नवपरिणीत सुनेची म्हणजेच पार्वतीची मागणी करतो आणि पाटलाच्या कुटुंबाच्या ऱ्हासाची सुरुवात होते. ऱ्हासाच्या उंबऱ्यात हेलकावे घेणारी कुटुंबे आणि त्या अनुषंगाने येणारी परंपरांची वाताहत हा विषय मराठी साहित्यास नवखा नाही; पण इथे पुढे होणारी पाटलाच्या कुटुंबाची वाताहत कथानकाला ज्या वेगाने कलाटणी देते, ध्यानीमनी नसताना कथानकाच्या केंद्रस्थानी ज्या पद्धतीने ‘अघोरी’ या पात्राचा प्रवेश करविते, त्यामुळे ही वाताहत अधिक गडद आणि ठाशीवपणे समोर येते.
दाखल्यादाखल अघोरीच्या आगमनावेळचे पाटील आणि त्याची पत्नी या दोघांच्याही मनोवस्थेचे वर्णन करणारे हे दोन उतारे पाहू.
‘दारातून समोर डोंगर दिसत होता. त्या डोंगरावर अघोरीबाबा राहत होता. गावातील एकूण एक माणूस अघोरीला घाबरून होता. अघोरीबाबाच्या जवळ बारा गाडय़ा विद्या आहे. त्याने नुसते पाहिले तर झाड जळते. त्याने नुसते एखाद्या बाईकडे पाहून मनात पाप आणले तर बाई तिथल्या तेथे लुगडे-चोळी सोडून बाबाकडे चालत जाते. बाबाला कोणाची चीड आली अन् ते नुसते थुंकले तर तो माणूस जागच्या जागी तडफडून प्राण सोडतो. रानावनातील सर्व भुतंखेतं बाबाच्या हुकमात आहेत. कोठल्याही वाघाला, लांडग्याला, िवचूकाटय़ाला, सापसर्पाला, आगीवायला बाबा हुकूम करू शकतात- बाबा असे भारी आहेत. बाबांना भेटावे काय? पार्वतीला वरचढ होण्याचा, तिला पायातली वहाण करण्याचा उपाय बाबांना विचारावा काय? अन् बाबा म्हणाले, उपाय सांगतो, पण तुला माझी भक्तीण व्हावं लागेल.. अन् बाबाची भक्तीण होणे म्हणजे नवऱ्याचं अथवा मुलाचं ‘भकान’ द्यावं लागंल.. सुनेवर ताबा मिळविण्यासाठी नवरा बळी देयाचा? मुलगा बळी देयाचा.’
वरील उतारा पाटलीणबाईच्या मनातील अघोरी या पात्राचा प्रक्षेप मांडतो, तर खालील उतारा पाटलाच्या मनातील अघोरी जिवंत करतो.
‘पाटील असा विचार करत असतानाच त्यांना नरकाची दुर्गंधी येऊ लागली. बायको पादली असावी असे त्यांना वाटले. त्यांना तिची चीड आली. पाटलाने बधिर झालेल्या डोळय़ाने दाराकडे पाहिले. बाहेरून नरकाची दुर्गंधी अधिक येत आहे आणि त्याचबरोबर घरात भराभर माश्या शिरू लागल्या आहेत आणि हळूहळू माश्यांचा आत येण्याचा वेग आणि संख्या वाढत जात ती इतकी वाढली की, पाटलाला भीतीच वाटू लागली. बाहेर एक काळाठिक्कर उंचच्या उंच सापळा उभा होता. त्या सापळय़ाला आगीपेक्षाही धगधगीत असे दोन डोळे होते. त्याच्या कपाळावर, नाकावर, गालावर नरकाचे पट्टे ओढलेले होते. त्याच्या कंबरेला एक दोरखंड बांधलेले होते. त्याच्या हातावर नरकाचा गोळा होता अन् त्यात बोट बुडवून तो मोठय़ा आवडीने नरक चोखीत होता. त्याचे ते नरक खाणे, त्याची ती काळजाचे पाणी पाणी करणारी भीषण नजर, तो समाधीतील प्रेताप्रमाणे त्याच्या कातडय़ाचा असलेला उंचच उंच सांगाडा. वीज पडून मेलेल्या माणसाच्या कातडीला येतो तसा रुक्ष, कठोर कोळशाचा काळेपणा, अंगावरले ते नरकाचे पट्टे अन् कंबरेची ती ओली हाडे, माश्यांचे ते त्याच्या शरीराभोवती फिरणारे मोहोळ पाहून पाटलाला एकाच वेळी भय वाटत होते, किळसेने अंगावर काटे फुटत होते, घृणेने पोटात ढवळून येत होते, वांत्या होऊ पाहत होत्या, काळीज धडधडत होते.’
‘अघोरी’ कादंबरी ही वरकरणी एका कुटुंबाच्या केंद्राभोवती घडत असली तरी पुढे जाताना ती गाव, गावातले अंतर्गत व्यवहार इत्यादी गोष्टींना आपल्या कवेत घेऊन वाहते. ‘अघोरी’च्या एकूण आशयाचे, पर्यावरणाचे एका शब्दात वर्णन करावयाचे झाल्यास – तो ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे, असे करावे लागेल. या ज्वालामुखीला शेवटची ढुशी देऊन त्याचा उद्रेक घडवून आणण्याचे काम अघोरी हे पात्र करते. बागूलांनी ‘अघोरी’ घडवताना साहित्यातील जवळपास सर्वच रसांचा साज आपल्या भाषेवर आणि निवेदनावर चढवलेला आहे. असे असले तरी प्रामुख्याने ‘अघोरी’मध्ये उठून दिसतो तो भय, बीभत्स आणि अद्भुत रस! अद्भुताच्या चौकटीत वास्तव जास्त ताकदीने पेलले जाते हे आजवरचा जागतिक साहित्याचा इतिहास ठाशीवपणे सांगतो. अद्भुत रस हा निव्वळ कथानकात वसत नसतो तर तो आशयाच्या गाभ्यात, कथानकाच्या पर्यावरणात, निवेदनाच्या तिरकस गुंत्यांत, पात्रांच्या वैचित्र्यात आणि रूपकांच्या नावीन्यात असा कुठूनही वाहत असतो. अद्भुत म्हणजे निव्वळ अतार्किकता नव्हे हे विशद करवून घेणे ही मराठी साहित्याची आजच्या काळाची निकडीची गरज आहे. बागूल त्यांच्या साहित्यकृतींतून सर्वच रस अत्यंत अप्रकटरीत्या वाचकासमोर आणतात. हे अद्भुत, भय आणि बीभत्स बागूलांनी पानापानांत, वाक्यागणिक पेरून ठेवलेले आहे आणि ही नेणिवेच्या पातळीवर झालेली अत्यंत समतोल आणि अप्रकट अशी पेरणी आहे. साहित्यातील सर्वच रसांचे अप्रकट सादरीकरण ही ‘अघोरी’मधील बागूलांची खासियत ठरते. भय, अद्भुत, शृंगार, बीभत्स असे एरवी साहित्यिक मूल्यमापनात कमअस्सल ठरवले जाणारे रस ‘अघोरी’मध्ये अनेक ठिकाणी निवेदनाची सांधेजुळवणी करतात त्याच वेळी अप्रकटरीत्या निवेदनाच्या पृष्ठभागाखालून वाहत वाचकांना एक अनोखा इंद्रियानुभव देतात. कोणत्याही कथानात्म साहित्यात निवेदनाची लय सांभाळणे हे त्या त्या साहित्यिकासाठी अत्यंत कसबाचे काम असते, इथे बागूलांना ते सहजीच साध्य होते. ‘अघोरी’ ही वास्तव-अवास्तव, मूर्त-अमूर्त आदींच्या सीमारेखांवरून यादृच्छिक ये-जा करत मानव्याला स्पर्श करते, म्हणूनच ती वैश्विक पातळीवरील मराठीतली श्रेष्ठ कादंबरी ठरते.
शिक्षण आणि व्यवसायाने केमिकल इंजिनीअर असणारे हृषीकेश गुप्ते गूढ आणि भयकथांचा प्रांत हाताळत पुढे आले. त्यानंतर मुख्य धारेच्या कथन साहित्यात लोकप्रिय बनले. चित्रपट दिग्दर्शक हीदेखील ओळख. ‘दंशकाल’ ही गाजलेली कादंबरी. ‘हाकामारी’, ‘घनगर्द’, ‘काळजुगारी’, ‘गोठण्यातल्या गोष्टी’ या महत्त्वाच्या कलाकृती.
gupterk@yahoo.in