भानू काळ
मराठी भाषा आणि व्याकरणाच्या तज्ज्ञ असलेल्या यास्मिन शेख या २१ जूनला ९८ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. आपल्या प्रदीर्घ वाटचालीत त्या मराठी भाषेच्या समृद्धीसाठी अविरत कार्य करीत आलेल्या आहेत. त्यांच्या सुहृदाने रेखाटलेले त्यांचे हे व्यक्तिचित्र..
बऱ्याच वर्षांपूर्वीची ही घटना. त्याकाळी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी वर्गात उपस्थित असत आणि प्राध्यापकही मन लावून शिकवीत. विद्यार्थ्यांची चांगली जडणघडण व्हावी म्हणून त्यांच्या सहलीही निघत. एसआयईएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अशीच एक सहल घेऊन प्रा. यास्मिन शेख पंढरपूरला आल्या होत्या. स्वत: निरीश्वरवादी असलेले मराठी विभागप्रमुख श्री. पु. भागवतही सोबत होते. शेखबाईंनी भक्तिभावाने हात जोडले आणि विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवले. त्यांच्या दृष्टीने तो महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा होता आणि म्हणून साहजिकच त्यांचा आस्थाविषय होता. त्या प्रसंगाचे वर्णन करताना (‘अंतर्नाद’, जानेवारी २००७) शेखबाई लिहितात, ‘‘भक्तगणांच्या रांगेतून हळूहळू पुढे सरकत विठ्ठलाच्या मूर्तीसमोर भागवत उभे राहिले. मी त्यांच्या मागेच होते. कसे कुणास ठाऊक, मी एकदम म्हटले, ‘भागवत, विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवा.’ त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिले. मला वाटले, ते तसेच पुढे सरकतील. पण त्यांनी विठ्ठलाच्या पायावर डोके टेकले. मला ते दृश्य विलक्षण वाटले. मनात विचार आला, मी त्यांना तसे का सांगितले? काही कळेना. मंदिरातून बाहेर पडल्यावरही ते काही बोलेनात. गप्पगप्पच होते. न राहवून मी म्हटलं, ‘ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम इत्यादी संतांनी जिथं मस्तक टेकलं, तिथं आपणही नतमस्तक व्हायला हवं.’ त्यांनी नुसती मान हलवली.’’
यास्मिन शेख जन्माने ज्यू. हा समाज अतिशय प्रतिभावान. जगातली ज्यूंची लोकसंख्या पाव टक्कादेखील नाही; पण आजवरच्या नोबेलविजेत्यांपैकी सुमारे २० टक्के हे ज्यू आहेत. दोन हजार वर्षांपूर्वी परदेशी आक्रमकांनी ज्यूंना पॅलेस्टाइनमधून हाकलून लावले. समुद्रातून भरकटत चाललेले त्यांचे एक जहाज कोकणात अलिबागजवळ खडकावर आपटून फुटले. त्यातले बहुतेक सगळे बुडालेच. पण सात जोडपी नागावजवळ किनाऱ्यावर कशीबशी पोहोचली. स्थानिक कोळी समाजाने त्यांना उदार आसरा दिला. काळाच्या ओघात या मूठभर ज्यूंची संख्या वाढत गेली. आपला धर्म त्यांनी जपला; पण स्थानिकांचे रीतिरिवाज व भाषा स्वीकारली. याच ज्यूंमधली एक मुलगी म्हणजे जेरुशा रूबेन.. लग्नानंतरच्या यास्मिन शेख.
त्यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात होते. फिरतीची नोकरी. तसे घर नाशिकला बांधलेले, पण उच्च शिक्षणासाठी कुटुंब पुण्यात. जेरुशा जात्याच खूप हुशार. प्रा. श्री. म. माटे यांची लाडकी विद्यार्थिनी. अस्सल पुणेरी मानल्या गेलेल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून १९४६ साली त्या बी. ए. झाल्या. केवळ मराठीतच नव्हे, तर सर्वच विषयांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून! नंतर काही आजारपणामुळे त्या पुण्याहून नाशिकला गेल्या होत्या. एम. ए.साठी पुस्तके कुठे मिळतील याची चौकशी करण्यासाठी वडिलांबरोबर त्या प्रसिद्ध नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या निवासस्थानी गेल्या. मुसळधार पावसात चिंब भिजलेल्या अवस्थेत. कानेटकरांना त्यांच्या कळकळीचे कौतुक वाटले. त्यांनी पुस्तके तर मिळवून दिलीच, शिवाय जेरुशाची अझिझ अहमद शेख या तेथील चित्रमंदिरात काम करणाऱ्या एका देखण्या, उमद्या मुस्लीम तरुणाशी ओळख करून दिली. सगळे त्यांना ‘डॅडी’ म्हणत. कानेटकरांच्याच पुढाकाराने पुढे १९५० साली दोघांचे लग्न झाले. ‘मिस जेरुशा रुबेन’ या ‘मिसेस यास्मिन शेख’ बनल्या. त्यांनी धर्म मात्र कधीच बदलला नाही. शेखबाई म्हणतात, ‘‘लग्नापूर्वी आणि लग्नानंतर आम्ही नाशिकला होतो. तिथे कधीही धर्मभेदामुळे आमच्या वाटय़ाला उद्वेगजनक अनुभव आले नाहीत. त्याकाळी जातीय तेढ आजच्याइतकी तीव्र नव्हती. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन इत्यादी एकमेकांच्या धर्मभावना जपण्याचे प्रयत्न करत. ‘परधर्मसहिष्णुता’ हा शब्द लोकांना त्याकाळी माहीतही नव्हता, पण त्यांच्या कृतीतून परधर्मसहिष्णुता व्यक्त होत असे. आजच्याप्रमाणे जातीयवादाला राजकीय गोटातून खतपाणी घातलं जात नव्हतं.’’
पुढे शेखबाईंनी दोन वर्षे औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात आणि त्यानंतर मुंबईच्या एस. आय. ई. एस. महाविद्यालयात असे एकूण २७ वर्षे मराठीचे अध्यापन केले. शेवटची सात वर्षे शेखबाई विभागप्रमुख होत्या. निवृत्तीनंतर दहा वर्षे त्या यूपीएससीच्या परीक्षार्थीना मराठी भाषाशास्त्र व व्याकरण शिकवीत असत. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्दलेखनकोश’ ही शेखबाईंची दोन्ही पुस्तके अभ्यासकांना खूप उपयुक्त ठरली आहेत. शेखबाईंचे भाषाविषयक विचार सुस्पष्ट आहेत. सध्या संकुचित अस्मितांना कुरवाळण्याचे दिवस आहेत. प्रमाणभाषेचा उपहास आणि वेगवेगळ्या स्थानिक बोलीभाषांचा हिरीरीने पुरस्कार करण्याचे दिवस आहेत. पण खरे सांगायचे तर प्रमाणभाषा की बोलीभाषा हा वाद फसवा आहे. कारण दोन्हींना आपापले स्वतंत्र स्थान आहेच. शेखबाई म्हणतात, ‘‘बोलीभाषांचे महत्त्व मला मान्य आहे. ललित साहित्याला त्यामुळे प्रादेशिक डूब मिळून एक सच्चेपणा, एक जिवंतपणा येतो. पण वैचारिक लेखनात व एरवीही जिथे निवेदन असेल तिथे प्रमाणभाषेचाच वापर हवा. नाही तर लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे, ते समस्त मराठीजनांना कसे कळणार? बोलीभाषेतील साधारण आशय संदर्भाने कळेलही, पण त्या आकलनात नेमकेपणा कसा येणार? प्रमाणभाषा जपली नाही तर भाषेच्या क्षेत्रात अनागोंदी माजेल.’’
व्याकरणाचे नियम पाळण्यावरही शेखबाई कटाक्षाने भर देतात हेदेखील आज खूपसे अप्रिय ठरले आहे. त्या म्हणतात, ‘‘शुद्धलेखनाचे व विशेषत: ऱ्हस्व-दीर्घाबद्दलचे काही नियम बदलायचे असतील तर त्यानुसार अधिकृतरीत्या नियमांमध्ये अवश्य बदल करा; पण जोवर तसे होत नाही तोवर सध्याचे शासनमान्य १८ नियम आपण पाळलेच पाहिजेत.’’ सोपे पर्यायी मराठी शब्द उपलब्ध असतानाही इंग्रजी शब्द वापरण्याला त्यांचा विरोध असतो. त्या म्हणतात, ‘‘मराठी भाषा समृद्ध आहे. तिच्यात नवनव्या संकल्पना व्यक्त करण्याची ताकद आहे. सर्वच परकीय शब्द काढून टाकावेत असे मला सुचवायचे नाही; पण त्यांच्या अतिरिक्त वापराने मराठीचे अपरिमित नुकसान होते आहे, हे नक्की. भाषा हा आपला सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे याची जाणीव आपण ठेवायला हवी.’’
निवृत्तीनंतर १९९६ साली शेख जोडपे पुण्यात स्थायिक झाले. एकदा महापालिकेचा एक कर्मचारी जनगणना करण्यासाठी त्यांच्या घरी आला. तो विचारत असलेल्या प्रश्नांमध्ये ‘‘तुमची मातृभाषा कोणती?’’ हा एक प्रश्न होता. ‘‘मराठी..’’ हे शेखबाईंनी दिलेले उत्तर त्याला पटत नव्हते. ‘‘तुमचे आडनाव शेख म्हटल्यावर मातृभाषा उर्दू लिहायला हवी,’’ असे त्याचे म्हणणे होते. दोन-तीन वेळा तोच प्रश्न त्याने विचारला. अर्थात शेखबाईंच्या आग्रहाप्रमाणे ‘मातृभाषा : मराठी’ अशीच नोंद त्याला शेवटी करावी लागली!
भाषिक वारसा जपण्यासाठी शेखबाई जशा दक्ष आहेत, तशाच त्या परधर्मसहिष्णुता हा आपला ऐतिहासिक वारसा जपण्याबाबतही तेवढय़ाच दक्ष आहेत. तसे पाहिले तर ‘शेख’ आडनावाचा त्यांना गेल्या काही वर्षांत खूपदा त्रास झाला. एक प्रसंग शेख दाम्पत्य पुण्यात फ्लॅट शोधत असतानाचा. एक फ्लॅट त्यांनी पसंत केला होता. प्राथमिक बोलणीही झाली. पण प्रत्यक्ष व्यवहार करण्यासाठी जेव्हा शेख जोडपे त्या बिल्डरच्या कार्यालयात गेले व त्यांचे आडनाव शेख आहे हे स्पष्ट झाले तेव्हा त्यांना- ‘‘सध्या फ्लॅट उपलब्धच नाहीत,’’ असे ऐकावे लागले होते! मात्र असे बरेच कडवट अनुभव गाठीशी असूनही शेखबाईंच्या मनात जराही कटुता नाही. कारण यासंदर्भातली त्यांची मते अगदी पक्की आहेत. त्या म्हणतात, ‘‘मला नेहमी वाटतं, धर्माची, जातीपातीची बंधनं माणसाने झुगारून द्यावीत. आपण कोणत्या धर्मात वा जातीत जन्माला येणार हे आपल्याला माहीत नसतं. ते आपण ठरवूही शकत नाही. आपण माणसं आहोत आणि माणुसकी हा आपला एकमेव धर्म आहे हे जर आपण मनापासून स्वीकारलं तर मानवी समाज किती सुखी होईल, नाही?’’ डॅडी शेख यांचे कुटुंब पुरोगामी विचारांचे होते. मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजातून एम. बी. बी. एस. झालेल्या त्यांच्या एक भगिनी झुबेदा या भारतातील पहिल्या मुस्लीम स्त्री-डॉक्टर. डॅडी वारले तेव्हा त्यांच्या अंतिम इच्छेनुसार शवाचे वैकुंठात दहन केले गेले होते, मुस्लीम परंपरेप्रमाणे दफन नव्हे; हेही येथे नमूद करायला हरकत नाही. अर्थात त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना महानगरपालिका अधिकाऱ्यांशी बराच वाद घालावा लागला होता.
मराठीप्रेम आणि परधर्मसहिष्णुता यांव्यतिरिक्त आवर्जून उल्लेख करायला हवा असा शेखबाईंचा तिसरा विशेष म्हणजे त्यांची कर्तव्यनिष्ठा. पाठाची लेखी पूर्वतयारी केल्याशिवाय त्या कधीही वर्गावर गेल्या नाहीत. ‘अंतर्नाद’ मासिकाच्या त्या व्याकरण सल्लागार होत्या. आणि विशेष म्हणजे यजमान हृदयविकाराने रुग्णालयात अतिदक्षता कक्षात असतानाही त्यांनी ‘अंतर्नाद’ची मुद्रिते तिथेच बसून तपासून दिली होती. साहित्य क्षेत्रात सगळ्याच पातळ्यांवर आज पाटय़ा टाकायची प्रवृत्ती बोकाळत आहे. अशा परिस्थितीत शेखबाईंची कर्तव्यतत्परता साहित्य क्षेत्रातील लेखकांपासून पुस्तक विक्रेत्यांपर्यंत सर्वानी अंगी बाणवली तर कुठल्याही शासकीय अनुदानाशिवायही मराठी साहित्य व्यवहार अधिक उंचावर जाईल. आजही दोन-तीन शब्दकोश नेहमीच त्यांच्या हाताशी असतात. एखाद्या शब्दाविषयी जरा जरी शंका आली तरी त्या कंटाळा न करता शब्दकोश काढून तो शब्द तपासतात. आणि हे सगळं त्या अनेक अपरिचित व्यक्तींच्या बाबतीतही करतात.. तेही अगदी हसतमुखाने. इतक्या वर्षांत त्यांच्या चेहऱ्यावर कधी वैताग वा कंटाळा बघितल्याचे मला तरी आठवत नाही.
‘अंतर्नाद’ मासिकाच्या शेवटच्या अंकाचे प्रकाशन झाले त्यावेळी ज्येष्ठ संशोधक आणि लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते शेखबाईंचा सत्कार केला होता. उत्तरादाखल केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या होत्या, ‘‘एक महत्त्वाची गोष्ट मला आज सांगायची आहे. भाषेला धर्म नसतो, जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. माझं माझ्या भाषेवर जिवापाड प्रेम आहे. मराठी भाषा फक्त हिंदूची नाही. महाराष्ट्रात जन्मलेल्या, येथे वास्तव्य करणाऱ्या सर्वाची ती आहे. मराठी भाषा जगवा, समृद्ध करा. जय महाराष्ट्र.. जय मराठी!’’
शेखबाई, जीवेत शरद: शतम्!
bhanukale@gmail.com