स्वातंत्र्योत्तर काळातील नाटकांचा धांडोळा घेऊन कुणी त्या- त्या वेळच्या राजकीय, सामाजिक घटनांचं चित्र काढण्याचा प्रयत्न करील तर त्याला यश येण्याची शक्यता सुतराम नाही. आपली बहुसंख्य नाटकं  वास्तववादी असतात. वास्तवाचं ती प्रभावी चित्रण करू पाहतात. पण आजचं नाटक म्हणजे काय? नाटक पौराणिक वा ऐतिहासिक नाही म्हणून त्याला ‘सामाजिक’ म्हणायचं. राजकीय वा सामाजिक संदर्भ यायला, महत्त्वाच्या घटनांचे उल्लेख यायला नाटक विशिष्ट पद्धतीचं- राजकीय वा समस्याप्रधानच असायला हवं असं कुठे आहे? ज्या वातावरणात नाटककारांची पात्रे वावरतात, वागतात, भावभावनांचे खेळ खेळतात, त्याचा त्यांच्या मनोवृत्तीवर काहीतरी परिणाम होणार की नाही? संयुक्त महाराष्ट्र चळवळ, बाबरी मशिदीचे पतन, खरलांजी प्रकरण, भोपाळ वायू दुर्घटना, गोध्रा हत्याकांड.. इतक्या वर्षांत यापैकी कुठल्याही घटनेचा आपल्या नाटकातल्या पात्रांकडून ओझरता, जाता जाताही उल्लेख झालेला नाही. कुटुंबातील पात्रे या किंवा अशाच पर्यावरणात आपल्या समस्यांना सामोरे जातात ना? जगण्याशी संलग्न अशा अनेक घटना वा कृतींपासून (काही अपवाद वगळता) शतयोजने आपले नाटक दूर असते. कारण नाटककारच मुळी या सगळय़ापासून अलिप्त राहू पाहतो. तो नाटकासाठी स्वत:चे असे एक वेगळे वास्तव तयार करतो. ज्या वास्तवात फक्त त्यानेच निर्माण केलेल्या घटनांचे वा कृतीचे ठसे उमटत राहतात. त्यामुळे नाटक कुठल्या काळात घडले, त्यावेळी परिस्थिती काय होती, याची फिकीर करण्याचे त्याला कारण उरत नाही आणि प्रेक्षकांचेही त्यावाचून काही अडत नाही.
केव्हातरी असे एखादे अपवादात्मक नाटक येते- जे राजकीय नसते वा समस्याप्रधानही नसते; पण विशिष्ट काळाचा छेद घेऊन त्या काळातली माणसं, त्यांची सामाजिकता, त्यांची मूल्ये याबाबतचे चित्र स्पष्ट उभे करते. नाटय़ाची किंचितही हानी न करता!
असे एक नाटक म्हणजे व्यंकटेश माडगूळकरलिखित ‘तू वेडा कुंभार’! पुण्याच्या पी. डी. ए. या संस्थेने १९६४ सालच्या राज्य नाटय़स्पर्धेत हे नाटक सादर केले. सवरेत्कृष्ट निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य व वैयक्तिक अभिनय याकरता अनुक्रमे पी. डी. ए., भालबा केळकर, व्यंकटेश माडगूळकर, श्रीधर राजगुरू, डॉ. जब्बार पटेल, श्रीराम खरे आणि सेवा चौहान यांना या नाटकासाठी पारितोषिके मिळाली होती.
घरासमोर कुंभाराचं चाक पाराला उभं करून ठेवलं आहे. नाटकाच्या नावाप्रमाणेच ‘तू वेडा कुंभार’ अर्थात् रांजणवाडीच्या वेडय़ा कुंभाराची- इजाप्पाची ही गोष्ट! बळकट देहाचा, पापभीरू, सद्गुणी इजाप्पा! त्याच्या घरासमोरून रस्ता जातो. बायकोची आठवण लिंबाच्या झाडाने मागे उरलेली. त्याच्या आजोबानंच अंगणात छोटंसं देऊळ बांधलेलं आहे. मातीची गाडगी-मडकी करीत इजाप्पा गुजराण करतोय. बलुत्यावर जगतोय. पिढीजात कुंभाराचा धंदा. मुलगा भोजा. तो मात्र बापाला न शोभणारा. अंगापिंडानं आणि स्वभावानंसुद्धा! त्याचं लग्न होऊन चार वर्षे झालीत, पण भोजाला अजून मूल नाही. तो कसला कामधंदाही करीत नाही. बापही त्याला काही बोलत नाही. कसा बोलणार? लहानपणी रागाच्या भरात भोजाला त्यानं फेकला होता. मरता मरता भोजा वाचला. तेव्हापासून पोराला अधिक-उणं काही बोलायचं नाही, हे त्यानं ठरवून टाकलंय.
गावात सव्र्हिस मोटार येते आणि गावाचं रूपच पालटायला लागतं. मोटार इजाप्पाच्या घराच्या बाजूलाच उभी राहते. भोजा आता मोटारीला ‘शिटा’ मिळवायच्या उद्योगात. मोटारीची एजंटगिरी करण्यात तो खूश आहे. मोटार ड्रायव्हर सखारामशी तो दोस्ती करतो. घरी बोलावून बायको वंचाला त्याच्यासाठी चहापाणी करायला सांगतो. ड्रायव्हरची वंचावर नजर आहे. तो भोजाच्या डोक्यात चहाचं हॉटेल काढायचं खूळ भरवतो. खूप गिऱ्हाईक येईल, बक्कळ पैसा मिळेल असं सांगतो. इजाप्पा मोटारवाल्याच्या विरोधात आहे. तो म्हणतो, ‘तो आपल्या गावाला लुटतोय. ही लोखंडी अवदसा नको आपल्या दारात.’ ‘बैलाच्या गाडीला दारात जागा देतोस, मग मोटारीला का नाही?’ भोजाच्या या प्रतिप्रश्नाला इजाप्पाचं उत्तर आहे- ‘बैलाचा जीव आहे. तो नंदी आहे. देवाचा आहे.’ मोटार यंत्र आहे आणि माणूसही यंत्रच आहे. यंत्राला इजाप्पाच्या विश्वात जागा नाही. यंत्र राक्षस आहे अशी त्याची धारणा आहे. पण मुलगा भोजा आपला हट्ट सोडायला तयार नाही. घरच सोडून जातो म्हणतो. इजाप्पा गहिवरतो. तो नाइलाजाने भोजाला मूक संमती देतो. खणचोळीवाल्याकडून सखाराम ड्रायव्हर खण घेतो. ‘वयनीला दे’ म्हणून भोजाच्या हातात देतो. वंचा ड्रायव्हरचं ‘मढं पोचलं’ म्हणत तो खण फेकून देते. घुसमटलेला इजाप्पा सगळं काही गिळून मुकाटय़ाने बघत राहतो.
मोटारीचं चाक चालवीत सखाराम ड्रायव्हर इजाप्पाच्या अंगणात येतो. कुंभाराचं चाक बाजूला काढून ठेवतो. त्याच्याबरोबर बारक्या येतो. चाकातलं पंक्चर काढायचा उद्योग सुरू होतो. घाई करणाऱ्या शिटावाल्यांना थोपवून धरलं आहे. पंक्चर काढायला वयनीकडून घमेल्यातून पाणी मागितलं जातं. पंक्चर काढल्यावर जाता जाता ड्रायव्हर वयनीसाठी प्रसादाची पुडी देतो. तो खाल्ल्यास गुण येतो म्हणतात. मूल होतं. वंचा प्रसादाची पुडी ड्रायव्हरच्या हातातून घेत नाही. ओटय़ावर पुडी ठेवून सखाराम ड्रायव्हर जातो. इजाप्पाची चाहूल लागते तेव्हा झटकन् वंचा पुडी घेऊन आत जाते. इजाप्पाच्या हे लक्षात येतं. तो ड्रायव्हर कसा आहे सांगता येत नाही. तो प्रसाद घ्यायला सुनेला मनाई करतो. ‘सगळय़ांचा देव सारखाच!’ असं सांगून वंचा पुडी घेते. तिची मूल होण्याची मनस्वी इच्छा! इजाप्पाचं कुणी ऐकत नाही.
इजाप्पाचं कामाचं गाढव चोरीला जातं. तो सर्वत्र शोधून येतो. कुठेच गाढवाचा पत्ता लागत नाही. गावचा जोशी ढब्बू पैसा घेऊन गाढव उत्तरेच्या दिशेला गेल्याचं व ते परतणार नसल्याचं सांगतो. इतक्यात गावचा रामोशी बातमी आणतो. घरचाच माणूस दाव्यासकट गाढव घेऊन गेल्याचं सांगतो. त्या माणसाचं नाव सांगायची हिंमत मात्र त्याला होत नाही.
भोजा सामानाचा बोजा घेऊन येतो. हॉटेलला लागणारा माल गाढव विकून त्याने आणलाय. इतके दिवस गाढवावरून माल घेऊन जायचा, आता गाढव देऊन तो माल घेऊन आलाय. इजाप्पा सारं मुकाटय़ाने पाहत राहतो. हुत्याचं नव्हतं झाल्यालं पाहतो. घर पाडून मांडव उभा करण्यासारखंच होतं ते.
‘एवढा माल आणलात, मग माझ्यासाठी एक खण का आणला नाहीत?’ म्हणून वंचा विचारते. तेव्हा भोजा डायव्हरने दिलेल्या आणि वंचाने फेकून दिलेल्या खणाची आठवण काढतो. भोजाने बासनात बांधून ठेवलेला खण वंचा शोधायला जाते.
भोजा गाढव विकून माल आणण्यापर्यंतच थांबत नाही. अंगणातलं मारुतीचं देऊळ पाडायलाही माणूस बोलावतो. वाटेतल्या देवळामुळे घराच्या मागून मोटार घ्यावी लागते. ती अडचण दूर करण्यासाठी भोजाला देव हलवायचा आहे. घरापुढचं लिंबाचं झाडही तो पाडणार आहे. आज्यानं बांधलेलं देऊळ पाडायला इजाप्पा विरोध करतो. ‘विठोबाच्या देवळात पाणी गळायला लागलं तर देवळाची दुरुस्ती करतात, देऊळ हलवत नाहीत.’ असलं काही पटवून घेण्याच्या मन:स्थितीत भोजा नसतो. देवाचं हे पाप आपल्या शिरावर नको म्हणून बोलावलेला माणूस हातात कुदळ घ्यायला तयार नाही. अखेरीस भोजाच कुदळ घेतो. त्याला वंचा अडवते. भोजा ओरडतो, ‘तुझ्या भांगात कुदळ जाईल..’ म्हणतो. इजाप्पा मधे पडतो. वंचाला बाजूला करतो. आणि तोच भोजाच्या हातात कुदळ देतो. देवळावर कुदळ पडते. एकेक चिरा ढासळायला लागतो.
भोजानं हॉटेल उभं केलंय. इजाप्पाच्या घरासमोर दुसरं छप्पर उभं आहे. एका बाजूला टेबल-खुर्ची. डाव्या बाजूला शेव-भज्याच्या पराती ठेवलेलं कपाट. रॉकेलच्या डब्यावर फळय़ा टाकून बाकडी तयार केली आहेत. कपाटाच्या बाजूला पाण्याचे पिंप. त्याच्यावरच्या झाकणावर पेले. सगळीकडे चहाच्या कपबशा पसरलेल्या आहेत. ग्रामोफोनवर सिनेमाच्या गाण्याची रेकॉर्ड लागली आहे. सखाराम टेबलावर बसला आहे. वंचा ठुमकत चहा घेऊन येते. सखाराम तिला अर्धा चहा घेण्याचा आग्रह करतो. तिच्या अंगचटीला येतो. ती लाजत चहा घेते. मोटारीचा हॉर्न वाजतो. सखाराम निघतो. सूचक बोलतो. त्याच्या गळाला मासा लागतोय. रात्री चहा प्यायला येण्याचं कबूल करून तो निघतो. जाता जाता ‘तुमचं खरं-खोटं काय कळत नाही. नीट पारख होत नाही. आंधळय़ावानी चाचपडतोय,’ म्हणतो. त्यावर वंचा उत्तरते-‘चाचपडता चाचपडता एखाद्या वेळी लागंल घबाड हाताला. डोकं श्याप ठेवून मोटार हाना. नाहीतर मराल हकनाक आणि दुसऱ्यालाही माराल.’
वंचाची गावातली मैत्रीण यशोदा पाण्यासाठी येते. तिच्या आणि वंचाच्या बोलण्यावरून कळतं की, यशोदाचा नवरा तिला मारतो आणि तिचे लाडही करतो. वंचाचा भोजा तिला मारतही नाही आणि तिचे लाडही करीत नाही. अंगाला बोटदेखील लावत नाही. यशोदा पोटुशी आहे हे कळल्यावर वंचा तिला कागदात बांधून शेव देते व गुपचूप खायला सांगते.
गावातले गुंड हॉटेलामध्ये येतात. पैसे देत नाहीत. खाल्ल्यावर मांडून ठेवा म्हणून सांगतात. तेवढय़ात भोजा येतो. त्याची आणि गुंडांची मारामारी होते. हॉटेल उधळून लावून आणि भोजाला मार देऊन गुंड जातात. वंचाला दार बंद करून घरात बसावं लागतं. भोजा मार खाल्ल्या अवस्थेत पोलिसांना आणायला तालुक्याला जातो.
इजाप्पाला आता सूनही दूषणं द्यायला लागली आहे. ‘चार दांडगे लोक आले आणि त्यांनी धक्के मारले तुमच्या लेकाला. जीव नसल्यासारखा कोलमडून पडला तो. उलट दोन धक्के देनं झालं नाही त्याच्यानं. माझ्या अंगावर धावली मानसं तेव्हा गप्प उभा राहिला. नवरा समक्ष असताना दार लावून मला अंग बचवावं लागलं.’
इजाप्पा सगळं पाहून विषण्ण झालाय. या सगळय़ात आपल्या सुनेला खरोखरच सुख लागतंय का? हा त्याच्यापुढचा प्रश्न आहे. तो तिला म्हणतो, ‘रूपाचा उजेड पडावा अशी तू. तुझं मुख पुन्यवानाशिवाय कुणाला दिसत नव्हतं. तुझा डोईचा पदर झोपेतदेखील ढळला नव्हता. सगळं गाव नावाजत होतं ती लक्ष्मी आता गल्ल्यावर बसायला लागली. बारा गावच्या लोकांची उष्टी खापरं इसळू लागली. त्येंच्या हातात कपबशा देऊ लागली. कुनाचा हाताला हात लागला, कुनी काय वंगाळ बोललं तरी तिच्या हाताला चटका बसेना. तिला मळमळंना. सुख हाय यात? भल्या पहाटे उठून बाई तू या जाग्यावर सडा घालायचीस. रांगोळी काढायचीस. तिथं आज लोक पानाच्या पिचकाऱ्या थुकतात. विडय़ांची थोटकं टाकत्यात. ती रोज तू सावडतीस.’
अंधारून येते. ग्रामोफोनवर लावणीची रेकॉर्ड लागते. तिथं पडलेला सखारामचा गळपट्टा ती उचलते. गळय़ाभोवती घालून पाहते. चटकन् काढून टेबलावर ठेवते. दिवेलागणी होऊन बराच वेळ झालाय. अजून मोटार येत नाही. मधेच इजाप्पा येऊन कुदळ घेऊन जातो. ती मनाशीच म्हणते, ‘म्हातारा वढय़ाकाठी गुडघ्यात मान घालून बसायला गेला. मालक तालुक्याला गेलेत. एकटीच मी. किती वाट बघू? अशी अवघडून किती उभी राहू? उकळून उकळून आधण आटून चाललंय. जाळ वाया जातोय. भांडं जळायला लागलंय. या मोटारीला आज झालंय तरी काय?’
आणि मोटार येते. घरघर आवाज ऐकू येतो. प्रकाशाचा झोत गोल फिरतो. आवाज थांबतो. सखाराम येतो. दरवाजावरून ‘चहा मिळेल का?’ विचारतो. वंचा ‘तुमची काही वस्तू हरवलीय का?’ विचारते. ड्रायव्हर खुशीत उत्तर देतो. वंचाला चहा घेऊन बाहेर येण्याची तसदी नको म्हणून घरात जातो. इजाप्पा पाठमोरा येऊन उभा राहतो. वंचाचा चीत्कार ऐकू येतो. ‘अगं आई ग, सोडा, सोडा मला. बांगडी पिचली की..’ इजाप्पा धाडकन् आत जातो. धाडकन् आवाज आणि सखारामची किंकाळी ऐकू येते. पुन्हा आवाज येतात. वंचा भयंकर भेदरून बाहेर येते. थरथरत उभी राहते. सखाराम आत गुरासारखा ओरडतो. लोक जमा होतात. इजाप्पाच्या हातातली कुदळ काढून घेतात. रक्ताने माखलेला इजाप्पा मेलेले कुत्रे ओढून टाकावे तसा ड्रायव्हरला ओढून टाकतो. तो हालचाल करीत नाही. तो मेला आहे. वंचा (हंबरडा फोडून)- ‘मामंजी काय केलंत हे तुमी?’ इजाप्पा- ‘जे करायला पायजे हुतं तेच केलं मी. तू म्हणालीस नव्हं- तुमी गप्प का राहिला? तुम्ही का अडिवलं न्हाई? मी अडिवलं. माजं गर्तेत पडणारं घर मी अडिवलं. आता खेळ खलास झाला.’
त्याचवेळी भोजा पोलीस पार्टी घेऊन येतो. हॉटेलची झालेली दुर्दशा त्यांना दाखवण्यासाठी! पण ते इजाप्पाला पकडून नेतात. ‘जाऊ दे त्याला. आपल्या गुणानं त्येनं हे करून घेतलंय,’ असं भोजा म्हणतो खरा; पण शेवटी त्याला सारं असहय़ होतं. हुंदका दाटतो. दोन्ही हात कपाळावर मारून तो करुणपणे ओरडतो, ‘देवा पांडुरंगा, माझी सावली तू काढून घेतलीस! मी उघडा पडलो!’ (तो मान खाली घालतो.)
मूळ नाटक इथं संपत नाही. त्यात चौथा अंक आहे. दहा वर्षांची शिक्षा भोगून इजाप्पा आपल्या गावात परत आला आहे. पण आता गाव बदललं आहे. रांजणवाडीचं साखरवाडी झालंय. इजाप्पाच्या घराचं छप्पर जाऊन तिथं छोटं कौलारू घर आलंय. घराचा दरवाजा बंद आहे. लिंब होता त्या जागी विजेचा खांब आलाय. देऊळ होतं तिकडे पोस्टाची पेटी आहे. गावात साखरेचा कारखाना आलाय. सगळे कारखान्यात कामाला लागले आहेत. इजाप्पा प्रथम या गावाला ओळखतच नाही. त्याने पाणी मागितलं तर त्याला नळ दाखवला गेला. नळाला पाणी नव्हतं. ते संध्याकाळी येणार होतं. कुणीकडे चार जोंधळे भाकरीला मागायची सोय नव्हती. बलुतेदारी गेली होती. रेशनकार्ड आलं. अंगणात भोजाचा मुलगा लाकडी मोटारीशी खेळत होता. भोजा आणि वंचा कारखान्यात कामाला गेली होती. घराचा दरवाजा बंद होता. आपल्या नातवाला इजाप्पा कवटाळून घेतो. त्याचे डोळे डबडबतात. बंद घराच्या खिडकीतून दिसतं- पाळण्यात बाळ झोपलं आहे. ते रडायला लागतं. इजाप्पाचा जीव तळमळतो. घराला कुलूप. पोराला कसं घेणार? नातूच सांगतो, ‘रडून रडून थांबेल. आई दुपारी दूध पाजून गेलीय. ती येईल. मग आम्ही घरात जाऊ.’ इजाप्पा जमिनीवरची माती घेतो. हुंगतो. त्याला जुने दिवस आठवतात. ते सगळं नाहीसं झालेलं असतं. आपल्या नातवाला तो म्हणतो-‘बाळा, काय रे मिळवलं तुम्ही? मोटार आली. रेल्वे आली. ईज आली. बत्ती आली. नळ आला. आन् त्येच्या बदली काय दिलं? अब्रू दिली. इस्वास दिला. अभिमान दिला. माया दिली. अंगातलं बळ दिलं. आनंद दिला. दिला का न्हाई? भोपळा दिला आणि आवळा घेतला व्हय रे तुमी? गडय़ानूं, तुमी माझी मानसं न्हाई. हे गाव माझं न्हाई. हे घर माझं न्हाई. कारखाना मोठा नव्हता, मानूस मोठा होता. गाव मोठं होतं. घरदार, आई-बाप, मुले समदी मोठीच होती. बाळा, कारखाना मोठा झाला म्हणून मानूस लहान व्हावा का? माझं आता भरलंय. माझं आता सरलंय. पर मी आता परक्या गावात कसा मरू? मरायला माझं गाव बघायला पाहिजे. माझं घर बघितलं पायजे. आठवन ठेवा म्हाताऱ्याची.. ऱ्हायली तर.’
इजाप्पा जायला निघतो. तेव्हा नातू विचारतो, ‘जाणार कुठं?’ इजाप्पा- ‘कुठं जाणार? जातू माझ्या गावाकडे.’ नातू (रडत)- ‘जाऊ नका, जाऊ नका.’ (कारखान्याचा भोंगा वाजतो. त्यात नातवाचे शब्द विरून जातात. इजाप्पा हळूहळू निघून जातो. मुलगा रडत राहतो. पडदा पडतो.)
पुण्यात प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनतर्फे प्रा. भालबा केळकर दिग्दर्शित हे नाटक रंगमंचावर आलं तेव्हा त्याचं अन्वर्थक नाव ‘जाणार कुठं?’ असं होतं. १९६० साली या नाटकाचे काही प्रयोग केल्यानंतर १९६४ सालच्या राज्य नाटय़स्पर्धेत याच नाटकाचे पहिले तीन अंक ‘तू वेडा कुंभार’ या नावाने करण्यात आले. ‘चौथ्या अंकाचा विशेष प्रभाव पडत नाही, त्यामुळे तिसऱ्या अंकात उत्कर्षबिंदू गाठणारं नाटक चौथ्या अंकात उतरतं, असं मत पडल्यामुळे भालबांनी चौथा अंक रद्द करून तीन अंकी नाटक केलं,’ असं पी. डी. ए.च्या या नाटकात बारक्याचं काम करणाऱ्या आणि ध्वनिमुद्रणाची जबाबदारी पत्करणाऱ्या शशिकांत कुलकर्णी यांनी मला सांगितलं. राज्य नाटय़स्पर्धेत या प्रयोगाला सवरेत्कृष्ट निर्मितीचे पहिले पारितोषिक मिळाल्यावर तीन अंकांचा निर्णय पारितोषिक मिळवण्याच्या दृष्टीने योग्यच होता असं म्हणायला हरकत नाही. स्पर्धेच्या प्रयोगाला दिग्दर्शकाने कुंभाराच्या चाकाप्रमाणे चांगला वेग दिला होता यात शंकाच नाही. रचनेच्या दृष्टीनं इजाप्पा, भोजा, सखाराम ड्रायव्हर आणि वंचा या व्यक्तिरेखांचा हळूहळू चढत जाणारा आलेख नाटय़ात्मकतेला गती देत प्रेक्षकांना गुंतवून टाकतो.
इजाप्पा आणि भोजा या बाप-मुलामधील जनरेशन गॅप स्वाभाविकपणे उभी राहते. जुन्याला, पारंपरिकतेला कवटाळून बसणारा बाप आणि ते सर्व तोडून काढणारा मुलगा त्यांच्या कृती आणि वृत्तीतून समर्थपणे उभे राहतात. भोजाची उद्रेकी भाषा आणि इजाप्पाची भक्तिभावाची, मायेची भाषा यामुळे त्यांच्यातील विरोधाभास स्पष्ट होतो. पण वंचा आणि सखाराम ड्रायव्हर यांच्या संबंधांमध्ये हळुवार होणारा व अखेरचा आघाती बदल रचनाकौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. ड्रायव्हरची भूमिका करणाऱ्या श्रीराम खरे यांची नजर, वंचाशी अंगचटीला येण्यापर्यंत होणारी त्यांची वाटचाल, त्यांच्या हालचालीतून व बोलण्याच्या पद्धतीतून त्याच्या रंगेलपणाची मिळणारी पूर्वसूचना त्याच्या अंतिम कृत्यासाठी चांगली बैठक निर्माण करे. श्रीराम खरेंचा ड्रायव्हर आजही मला बराचसा आठवतो. वंचा झालेल्या सेवा चौहानने आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि हळुवारपणे तिच्यात होणाऱ्या बदलाच्या दर्शनाने बाजी जिंकली. तिसऱ्या अंकात येणाऱ्या मोटारीचा प्रकाशझोत साऱ्या रंगमंचभर फिरला तेव्हा प्रेक्षकांतून टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला. वंचाच्या आणि यशोदेच्या संवादातून भोजामध्ये काही पुरुषी कर्तृत्व नसल्याचे समजते. मारामारीच्या प्रसंगात बायकोच्या बाजूनेसुद्धा उभा राहायला तो हतबल ठरतो. या पाश्र्वभूमीवर वंचाची ड्रायव्हरबद्दलची असोशी समर्थनीय ठरते. सखाराम ड्रायव्हरनंतर आजही माझ्या चांगलाच लक्षात आहे तो हॉटेल उधळण्याचा प्रसंग! पाच-सात मिनिटांच्या या प्रसंगात भालबांच्या पाटलूच्या छोटय़ा भूमिकेने जो थरार निर्माण केला होता, तो कमालीचा अविस्मरणीय होता. अभिनय व दिग्दर्शनाचा तो एक प्रभावी तुकडा होता. वासुदेव पाळंदे हे तर पी. डी. ए.चे नाणावलेले नट! इजाप्पाच्या भूमिकेत त्यांनी आपली व्यथा धारदार केलीच; पण प्रमुख भूमिकेचा एक मानदंडही उभा केला. भोजा या उद्रेकी तरुणाच्या भूमिकेत डॉ. जब्बार पटेल होते. तेही श्रीराम खरेंबरोबरच वैयक्तिक अभिनयाच्या बक्षिसाचे मानकरी ठरले.
जगण्यातील प्रत्येक बदलाच्या वेळी उत्पन्न होणाऱ्या वातावरणाचा, परिस्थितीचा एक तिरपा छेद घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे नाटक आहे. यातलं रांजणगाव हे एक प्रातिनिधिक खेडं आहे. लिंबाचं झाड, देऊळ, कुंभाराचं चाक.. परंपरेची ही सर्व चिन्हं मातीत गाडली जाताहेत. बलुतेगिरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परिस्थिती बदलली तरी जुने लोक बदलायला तयार नाहीत. मूल्यांची घसरण त्यांच्याने पाहवत नाही. कुंभाराचं चाक जातं आणि मोटारीचं येतं. माणसाचं यंत्र होतं. त्या यंत्राबरोबर, औद्योगिकीकरणाबरोबर वाईट प्रवृत्तीही येतात. चंगळता येते. लालसा येते. या सगळय़ासमोर असहाय होणाऱ्या इजाप्पाची शोकांतिका म्हणजेच हे नाटक. स्पर्धेत परिणामासाठी म्हणून चौथा अंक रद्द केला गेला. त्यामुळे नाटकात प्रभावी गोष्टीलाच फक्त स्थान मिळालं. या नाटकाचं ‘मुळांचा शोध घ्यायला हवा!’ हे नाटय़ात्म विधान होतं, ते चौथा अंक गाळल्याने दृष्टीआड झालं. या नाटकाचा नायक पारंपरिकतेच्या बाजूने उभा आहे, म्हणून हे नाटक प्रतिगामी ठरत नाही. ते पारंपरिकतेचं समर्थनही करीत नाही.
प्रत्येक संक्रमणावस्थेत मागल्या पिढीची काय मनोधारणा असते, याचं वस्तुनिष्ठ दर्शन म्हणजेच हे नाटक! बदलत्या वातावरणातही आपली मुळं वेगळय़ा स्वरूपात का होईना, रुजवायला हवीत- यासाठी इजाप्पा शोध घेत निघाला आहे. तो भांबावला आहे. कुठच्या दिशेला जायचं, ते त्याला समजत नाही. त्याचं गाव हरवलं आहे. आता कुठे
जाणार तो?