संगीत, नृत्य वा नाटकाच्या प्रथम श्रेणीच्या कार्यक्रमांसाठी सुसज्ज हॉल भाडय़ाने देणारी एक मान्यवर संस्था अशी अधिककरून NCPA  (राष्ट्रीय संगीत नाटक केंद्र) ची ओळख होती. दीपा गेहलोतसारखी नवी पिढी संचालन कार्यकारिणीवर आली आणि ही रूढ प्रतिमा बदलावी अशी तीव्र इच्छा संस्थेत व्यक्त केली जाऊ लागली. खूप वर्षांपूर्वी NCPA स्वत: नाटय़निर्मिती करीत असे. पण गेली वीस वर्षे हा उपक्रम बंद होता. तो पुन्हा सुरू करण्याचा संस्थेमध्ये निर्धार झाला, आणि त्यातच ‘आलबेल’चा प्रस्ताव दीपाने मांडला. तो मंजूर झाला. वास्तविक नाटक लिहिल्यानंतर लगेच मी ते एक-दोन निर्मात्यांना वाचायला दिलं होतं. ‘नाटक उत्तम आहे, पण त्यात एकही बाई नाही. त्यामुळे प्रेक्षक नाटकाला येणार नाहीत,’ असा शेरा मारून त्यांनी ते परत केलं होतं. तेव्हा NCPA सारखा दर्जेदार निर्माता नाटकाला मिळाल्याचा साहजिकच मला परम आनंद झाला.
 ‘आलबेल’
पात्रयोजना तर ठरलीच होती. बाकीची जुळवाजुळव सुरू झाली. ‘जास्वंदी’ हे माझे नाटक नव्याने सादर केले तेव्हा त्याचं अप्रतिम नेपथ्य सुनील देवळेकर यांनी केलं होतं. ‘आलबेल’ची तुरुंगाची कोठडी मी त्यांच्यावरच सोपवली. ‘जास्वंदी’च्या नटव्या, डौलदार घरानंतर कारागृहातलं एक रूक्ष दालन उभं करायचं, ही फारशी प्रलोभनकारक कामगिरी नव्हती. पण म्हणूनच तर ती आव्हानकारक होती. देवळेकरांनी हे काम आनंदानं पत्करलं. वास्तव कोठडी दाखवायची, तर आधी आपण ती पाहिली पाहिजे असा माझा आग्रह होता. नाहीतर प्रत्येक सिनेमात तुरुंगातल्या कोठडय़ा असतातच की! उद्धव कांबळे (इन्स्पेक्टर जनरल- प्रिझन्स, महाराष्ट्र) हे माझ्या ओळखीचे होते. दोन-चार वर्षांपूर्वी मी HIV AIDS प्रतिबंधक एक फिल्म बनवली होती- वर्ल्ड बँकेसाठी. ‘सुई’ नावाची. ‘संकल्प’ नावाची नशामुक्ती प्रचारक संस्था तेव्हा तुरुंगातल्या गर्दुल्यांसाठी एक सत्र चालवीत होती. वापरलेल्या सुया या नशातृप्तीसाठी पुन्हा कामी आणणं, हे किती घातक आहे, हे सांगणारी एक कानगोष्ट. या सत्राचं मी थोडंसं चित्रण खुद्द तुरुंगातच केलं होतं. तेव्हा कांबळेसाहेबांनी खूप मदत केली होती. ते एक सक्षम पोलीस अधिकारी तर होतेच; पण वाङ्मयप्रेमी आणि कलासक्तही होते. आता ‘आलबेल’च्या संदर्भात मी पुन्हा त्यांच्याकडे धाव घेतली. तुरुंगाची कोठडी आम्हाला प्रत्यक्ष पाह्यची होती आणि कैद्यांच्या वेळापत्रकाबद्दल सविस्तर माहितीही हवी होती. आर्थर रोडच्या मध्यवर्ती कारागृहाची आमची भेट मुक्रर करण्यात आली. कोठडी पाहण्याची मात्र बाहेरच्या व्यक्तीला मुभा नव्हती. तेव्हा त्याच्या तपशीलवार वर्णनावरच समाधान मानावे लागले. सुपरिटेंडेंट स्वाती साठे यांनी आमचे त्यांच्या ऑफिसात स्वागत केले. त्या तिथे तेव्हा प्रमुख अधिकारी होत्या. कडक युनिफॉर्ममधली एक रुबाबदार महिला अशा जबाबदारीच्या अधिकारपदावर पाहून माझी मान उंचावली. त्यांच्याकडे मिळालेल्या माहितीवरून माझ्या स्क्रिप्टमध्ये अनेक चुका असल्याचे ध्यानात आलं. कोठडीत लाकडी बाक कधीच नसतं. बाक फोडून, तोडून त्याच्या चिरफळय़ा करता येतात! सिमेंटचा बंकर कैद्याला मिळतो. भिंतींना खिळे कदापि असत नाहीत. खिळे उचकटून कैद्यांनी त्यांचा गैरवापर केला तर? तुरुंगाच्या आवारात कैद्याला हातकडय़ाही कधीच घालत नाहीत. गार्ड त्याला आपल्याबरोबर आणतो. ‘आलबेल’मधील बाप्पांची पहिली एंट्री हातकडय़ा घालून होती.. नाटय़पूर्ण! मी मनोमनी त्यांच्या हातकडय़ा तत्काळ उतरवून टाकल्या. कैद्यांची वर्दी, वळकटी, ताट, वाटी, चहाचे टमलर, इ. वस्तू आम्ही पाहिल्या. चित्रे काढली. या भेटीचा प्रचंड फायदा झाला. देवळेकरांनी सेटचा आराखडा बनवला.
नाटकामध्ये बरेचसे प्रसंग फ्लॅशबॅकमधून समोर येतात. गडद, गहिरे, नाटय़पूर्ण. जे मंचावर दाखवणं अशक्य किंवा अवघड होतं, ते डिजिटल व्हिडीओ चित्रतंत्राच्या साहाय्याने आम्ही पडद्यावर पेश केलं. एकूण सुमारे पाच-सहा प्रसंग आम्ही चित्रित केले. वेगवेगळ्या ठिकाणी. माझे स्नेही आणि सहकारी व कुशल छायाकार A.V. कनल यांचा कॅमेरा आणि कसब मदतीला सज्ज होते.
बाप्पा जेव्हा आश्रमशाळेत रमलेल्या आपल्या अंध मुलीचे वर्णन करतात तेव्हा पडद्यावर जणू आनंदोत्सव साजरा होतो. शाळेची सुरुवात भजनाने होते. वंदना खांडेकर (भोळे) – बाप्पांची बहीण माई- हिच्या सुरावटीने सजलेल्या प्रसन्न भजनाने पहाटेचं स्वागत होतं. मग मोकळ्या हवेत झाडाखाली वर्ग भरतात. सुट्टीमधल्या मुलींच्या खेळाचे एक मनोहर दृश्य आहे. ‘आंधळी कोशिंबीर’ चालू आहे. सगुणावर राज्य येते. एकजण तिच्या डोळ्यांवर रुमाल बांधू लागते. सगुणा हसून म्हणते, ‘हात वेडे! मला ग कशाला रुमाल?’
सुप्रसिद्ध समाजकार्यकर्त्यां शोभना रानडे यांच्या सौजन्याने त्यांच्या सासवडच्या ‘कस्तुरबा गांधी मेमोरिअल ट्रस्ट’ या संस्थेत आम्ही शूटिंग केले. फारच सुंदर परिसर आहे तो. आणि त्यांची संस्था अगदी सुसज्ज आहे. आमच्या आदिवासी पोरी पण शोभनाताईंच्याच कार्यकर्त्यांच्या सौजन्यामुळे मिळू शकल्या.
आमच्या फिल्म युनिटमध्ये पद्मजा लाखे ही एक अतिशय हरहुन्नरी मदतनीस होती. तिच्यावर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल. एवढी तिची विविध, चतुरस्र आणि बहुआयामी कामगिरी आहे. तिने एका छोटय़ा घरकुलाचा ताबा घेतला आणि त्याची संपूर्ण दर्शनी भिंत वारली चित्रांनी सुशोभित केली. भिंत जणू जिवंत झाली!
फ्लॅशबॅकचे दोन प्रवेश बाप्पांवरच्या खुनाच्या आरोपाबाबत आहेत. आश्रमशाळेशी संबंधित एक कुख्यात अधिकारी अंध सगुणाला खोलीत एकटी पाहून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. पण सुदैवाने ऐनवेळी बाप्पा तिथे पोचतात आणि त्या नीच इसमाचा खून करतात. या घटनेचे वर्णन बाप्पा करतात तेव्हा ते दृश्य पडद्यावर दिसते. ‘आलबेल’बद्दलच्या आधीच्या भागात त्याचे सविस्तर वर्णन दिले आहे. पण खरं तर याच इसमाच्या खुनाचा दुसरा- आणि खरा वृत्तान्त नाटकाच्या शेवटी शेवटी उघड होतो. वास्तविक खून सगुणाने केलेला असतो. आत्मसंरक्षणार्थ! तिला कोर्टकचेरीपासून वाचविण्यासाठी बाप्पा स्वत:वर आरोप घेतात. या दोन्ही आवृत्ती (खरी आणि खोटी) आम्ही पुण्याला चित्रित केल्या.
या शूटिंगनंतर दोस्त मंडळींनी माझी यथेच्छ टिंगल केली. (‘चला! तू पण आता एक ‘रेप सीन’ केलास. तेव्हा आता तू फिल्मी बिरादरीमध्ये अधिकृतरीत्या दाखल झालीस. अभिनंदन!’)
वीणा जामकरने अंध सगुणाची व्यथा अतिशय उत्कटपणे साकार केली. तसंच माधव अभ्यंकरांनी अवघ्या दोन मिनिटांच्या अवधीत चिरकाल लक्षात राहील असा खतरनाक खलनायक उभा केला.
सदाच्या कहाणीसाठीसुद्धा एक रंगतदार फिल्म क्लिप तयार करण्यात आली. त्याच्या नव्या सहजीवनाचा कॅलिडोस्कोप. एकापाठोपाठ बदलणारी हसरी दृश्ये.. धुंद क्षण.. आणि मग सदाचा दारुण भ्रमनिरास.. त्याने केलेली पत्नीची हत्या..
या व्हिडीओ चित्रणासाठी वंदना, वीणा, माधव अभ्यंकर, राजश्री सावंत (मधुरिमा) आणि गौतम जोगळेकर (बॉस) या कलाकारांनी छोटय़ा भूमिकांमधून मोठी कामगिरी केली.
नाटकाच्या पाश्र्वसंगीतासाठी मी K. C. लॉय या तरुण संगीतकाराला गाठलं. लॉय स्वत: मल्याळी आहे, पण मुंबईत बरीच वर्षे राहिल्यामुळे त्याला मराठीची चांगली जाण आहे. त्याने मराठी चित्रपटांना संगीत दिलं आहे. लॉयचं संगीत वेगळ्याच पठडीचं, वैशिष्टय़पूर्ण आहे.
एका प्रवेशात बाप्पा आपल्या दोघा सोबत्यांना एक रोमहर्षक कथा सांगतात. एका दिग्गज चित्रकाराची. चित्रकाराला कुंचला कायमचा खाली ठेवण्याआधी एक मास्टरपीस बनवायचा असतो. त्यासाठी तो विषय निवडतो- ‘बाल येशू आणि जुडासची भेट.’ पण या चित्रामधल्या दोन्ही प्रतिमा उतरवण्यासाठी त्याला त्यांच्या प्रतिमांशी तंतोतंत जुळणाऱ्या मॉडेल्सची नितांत गरज असते. निष्पाप, निरागस, तेजस्वी, बालयेशू आणि क्रूर, भेसूर, अमानुष जुडास.
एका अनाथाश्रमात त्याला बाल येशू सापडतो. पण जुडासचा शोध घेण्यात बरीच वर्षे जातात. अखेर असंख्य पाशवी खून केल्याबद्दल फाशीची सजा झालेल्या कुणा खुनी इसमामध्ये त्याला त्याचा जुडास दिसतो. चित्राचे काम सुरू होते. नशिबाचा खेळ असा की, नंतर तो निरागस मुलगा आणि तो अमानुष खुनी हे दोघे एकच व्यक्ती असल्याचे सिद्ध होते. परिस्थितीमुळे माणसाचे कुठवर परिवर्तन.. अध:पतन होऊ शकते, याचा एक दाखला. बाप्पांच्या गोष्टीला चित्रणाचा आधार नाही. लॉयने दिलेले संगीत मात्र आहे. चर्चमधला घनगंभीर ऑर्गन आणि अंत:करणाला भिडणारा ‘क्वायर’- समूह प्रार्थनागीत यांच्या मिश्र सुरावटीने चिंब झालेली ही विलक्षण गोष्ट ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात.
आमच्या तालमी दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये होत असत. नटांच्या नकला पाठ झाल्यावर आम्ही शक्यतो पहिल्या पानापासून सुरू करून मग क्रमाने शेवटपर्यंत जात असू. हेतू हा, की प्रत्येक पात्राला रुळायला वाव मिळावा. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या परस्पर स्नेहबंधाचा गोफ हळूहळू विणला जावा. नाटक जसजसे पुढे सरकते, तसतशी ही वीण घट्ट होत जाते.
एक प्रवेश. बाप्पा भकास बसून आहेत. त्यांच्या डोळ्यांत पाणी तरारते आहे.
सदा : (धीर करून) बाप्पा, काय झालं?
बाप्पा : आठवणी दाटून येतात रे. माईला मदत होईल म्हणून गेलो निंबोणीला.. आणि झालं काय भलतंच.. माझ्या सगुणाचं काय होणार?
सदा : बाप्पा.. तुमची हरकत नसेल तर.. तर मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे.
बाप्पा : (कमालीचा धक्का बसून) काय, म्हणतोस काय? शुद्धीवर आहेस ना तू?
सदा : पूर्णपणे.
बाप्पा : पाहता पाहता मजल फारच पुढे गेली रे तुझी. आताच तू शाळेत शिकवायचं म्हणत होतास. पाच मिनटांत बोहल्यावर चढायला निघालास?
सदा : पाच मिनटांत नाही, बाप्पा- बराच विचार केलाय मी.. आत्ताच माझ्या सगुणाचं काय होणार, म्हणालात तुम्ही.
बाप्पा : म्हणून तू सरसावलास? अरे, आंधळी असली तरी माझी मुलगी वाटेवर नाही पडली.. केलेल्या पापाबद्दल प्रायश्चित्त घ्यायचं आहे तुला. आणि तुझ्या यज्ञकर्मात माझ्या पोरीचा बळी देणार आहेस तू.
सदा : तिला सुखात ठेवायचा मानस होता माझा. मी तिची काळजी घेईन.
बाप्पा : फोटो पाहून इतका भारावलास? अरे, तू तिला भेटलासुद्धा नाहीस.
सदा : तुम्हाला भेटलो आहे. बस्स!
बाप्पा : आणि ती? तिचं काय?
सदा : तिचं अपहरण करायचा बेत नाही माझा. तिला भेटून तिचा विश्वास संपादन करीन.. सगळा ‘जर.. तर’चा मामला आहे.
भैरवच्या चिलखताला हळूहळू तडे जाऊ लागतात आणि आतला माणूस डोकावू लागतो. एकदा तर तो सदाला झुरळ मारताना अडवतो. ‘का त्याला मारता रे? त्यानं काय तुमचं घोडं मारलंय? अरे, जीव आहे त्याला पण!’ सदा आणि बाप्पा विस्मयचकित होऊन एकमेकांकडे पाहतात.
अखेर सुनावणीची वेळ येऊन ठेपते. भैरव आपली वर्दी उतरून आपला चकाकणारा झटॅक मोरपंखी शर्ट घालून गार्डबरोबर शीळ घालत जातो. स्वत:च्या निकालाबद्दल त्याला जरासुद्धा फिकीर नाही. ना कसला खेद, ना खंत. निकाल ऐकून तो परत येतो. बाप्पा आणि सदा निश्चल उभे आहेत.
भैरव : अरे, चेहरे पाडू नका यार.. उचला.. उचला.
सदा : काय ठरलं?
भैरव : आझादी! सुटका होणार आपली झेलातून.
सदा : आं? तुला तुरुंगातून सोडणार?
भैरव : अरे, या दगडी तुरुंगातून नाही, यार.. शरीराच्या झेलातून.. हां! बरगडय़ांचे गज फोडून पाखरू बाहेर पडणार.. उडून जाणार.. बाप्पा, चांगला डायलाग मारला का नाय? फिल्लममधल्यासारखा?
बाप्पा : म्हणजे तू- तू-
भैरव : लटकणार! सिक्सर!!
आणि तो आपली काल्पनिक बॅट जोरात फिरवून गिरकी मारतो. झप्कन काळोख होतो.
सदाच्या लग्नाची वार्ता कळल्यावर भैरव सुखावतो. सदाच्या हातावर काहीतरी ठेवतो.. ‘हे वेडिंग प्रेझेंट आपलं. सोन्याचा दात आहे माझा. धुतला आहे स्वच्छ. प्युव्वर गोल्ड आहे. विकलास तर चांगली किंमत येईल.’ ‘विकणार नाही मी..’ सदा भारावून म्हणतो.
अखेर भैरवची कोठडीमधून डेथ रोवर स्थलांतर करण्याची वेळ येऊन ठेपते. जाण्याआधी बाप्पांना तो एक गाणं म्हणायला सांगतो. मग बाप्पा आरती प्रभूंच्या चार ओळी सुरात गुंफून म्हणतात..
‘संपूर्ण मी तरु की,
आहे नगण्य पर्ण-
सांगेल राख माझी
गेल्यावरी जळून.’
भैरव कोठडीच्या दारात पोचतो, तोच दूर फटाके वाजू लागतात. हर्षभराने तो ओरडतो, ‘ऐकलंत? फटाके! म्हणजे इंडिया जीत गया.’ त्याच्या गूढ व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पदर तो निघून गेल्यावर उलगडतो. फाशीनंतर नेत्रदान करण्यासाठी त्याने अर्ज केला आहे.
नाटक छान बसत आलं. पण NCPA बरोबर म्हणावा तसा सुसंवाद साधत नव्हता. एकतर नाटय़निर्मिती हे त्यांचं प्रमुख कार्य नसल्यामुळे त्या प्रांतामधला- विशेषत: मराठी रंगभूमीचा त्यांचा अनुभव माफक होता. त्यांची संस्था मातब्बर आणि जुनी असल्यामुळे त्यांचा सगळा कारभार नियमबद्ध असे. कोणताही मामुली निर्णय घ्यायलाही कार्यकारिणीची परवानगी लागे. त्यामुळे मराठी नाटकवाल्यांच्या सवयीचा लवचिकपणा साहजिकच तिथे नव्हता. साधं उदाहरण द्यायचं तर एखाद्या थिएटरची तारीख अचानक उपलब्ध झाली, तर मराठी निर्माता ती पटकन् घेऊन मोकळा होईल. कमिटीचा ठराव होईपर्यंत वाट पाहिली तर तारीख हातची निसटून जाणार. मी स्वत: सतत तालमींत गुंतले असल्यामुळे वरचेवर NCPA मध्ये जाणे अवघड होते. मग ‘नाटय़संपदा’चे अध्वर्यु अनंत पणशीकर मदतीला धावून आले. ते स्वत: जाणकार आणि अनुभवी निर्माते होते. NCPAबरोबर वाटाघाटी चालू ठेवण्याचा जिम्मा त्यांनी उचलला. दोन्ही बाजूंनी प्रचंड अपेक्षा आणि जबर महत्त्वाकांक्षा होती यात शंका नाही. पण दोघांच्या विचारसरणीत आणि आचारप्रणालीत तफावत होती, हेच खरं.
पहिला प्रयोग NCPA च्या Experimental Theatre मध्ये ११ डिसेंबर २०११ रोजी झाला. दुसरा प्रयोगही दुसऱ्या दिवशी लगेच तिथेच झाला. दोन्ही प्रयोगांना अधिकांशी अमराठी प्रेक्षक होता. बहुतेककरून पारशी. त्यांनी दिलदारपणे प्रयोगांना छान दाद दिली. तांत्रिक बाजूंचे आणि कलाकारांचे भरपूर कौतुक केले. खरोखरच संचामधल्या सगळ्यांनी माझ्या नाटकाला पुरेपूर न्याय दिला. दुर्दैवाने न्याय नाही दिला तो प्रेक्षकांनी! विशेष म्हणजे पत्रकारांनीही नाटकाकडे पाठ फिरवली. या उदासीनतेचे मला साहजिकच वाईट वाटले. पण विस्मयही वाटला. गणित कुठे चुकलं? जाहिरात कमी पडली, की कैद्यांचा आणि तुरुंगाचा विषय नकोसा वाटला, की खरोखरच नाटकात बायका नाहीत म्हणून रसिकांना निरुत्साह वाटला (पण डी.व्ही.डी. चित्रणाद्वारे त्या पडद्यावर होत्याच की!)? अरुण थट्टेत म्हणत असे की, ‘नाटकाला मंडळी आली नाहीत की नाटकवाले काय वाटेल ती कारणं सांगून समर्थन करतात.’ क्रिकेट मॅच, टी.व्ही. वर एखादा लोकप्रिय कार्यक्रम, पाऊस, रिक्षा-टॅक्सी संप.. काहीही! काहीच नाही, तर ‘आज संकष्टी चतुर्थी नाही का? मग कसे येणार लोक?’ असो. नाटकाला आलेल्या प्रेक्षकांची उपस्थिती (खरं तर अनुपस्थिती!) पाहून मला दिल्लीला ‘यात्रिक’साठी केलेल्या ‘आयी बला को टाल तू’ या नाटकाची आठवण झाली. त्या प्रयोगाला मोजून सहाजण प्रेक्षागृहात होते आणि मंचावर होतो आम्ही आठजण. डिफेन्स पॅव्हिलियनच्या त्या थिएटरमध्ये नाही म्हणायला छतामध्ये वटवाघळं असायची. इथे तीही नाहीत! मी लिहिलेल्या सर्व नाटकांमध्ये ‘आलबेल’चा माझ्या दृष्टीने प्रथम क्रमांक लागतो. त्याच्यानंतर ‘माझा खेळ मांडू दे’ आणि ‘जास्वंदी’- विभागून. बाकीची सगळी also ran.
‘आलबेल’नंतर मी एक नवे नाटक लिहिले आहे.. ‘इवलेसे रोप’! या इवल्या रोपाचे वृक्षारोपण येत्या सप्टेंबरमध्ये दिल्लीला होणार आहे. हिंदीमधून ‘बिरवा’ या नावाने. रेखा देशपांडेने त्याचा फार सुरेख अनुवाद केला आहे. आणि राजेन्द्रनाथ ते दिग्दर्शित करणार आहे- आपल्या ‘अभियान’ या संस्थेसाठी.
पण ‘सय’ या लेखमालेमधून मी फक्त प्रयोग झालेल्या माझ्या नाटकांचाच परामर्श घेतलेला आहे. तेव्हा नाटय़क्षेत्रामधल्या माझ्या इथपर्यंतच्या कामगिरीवर आता पडदा पडला आहे असं म्हणायला हरकत नाही. चित्रपट, बालचित्रपट, लघुचित्रपट आणि टेलिव्हिजन या क्षेत्रांत केलेल्या उपद्व्यापांबद्दल अद्याप कथन करायचं आहे, या विचारानेच दडपून जायला होतं. तो प्रवास सुरू करण्याआधी थोडा श्वास घ्यावा असं प्रकर्षांनं वाटतं. थोडा विराम. मला आणि तुम्हालाही! तर वाचकहो, आपल्याकडे- मी थोडा अवधी मागते, आणि आपले सौजन्य जाणून आपला होकार गृहीत धरते.
तेव्हा आता घेऊ या- एक छोटासा ब्रेक!  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा