‘‘सोबत तुमच्या आहे मीही
काही दूपर्यंत, गडे हो, काही दूपर्यंत
परंतु पुढती नाही म्हणुनी, नसो खेद वा खंत..’’
कवी अनिलांच्या ह्य़ा ओळी माझ्या खूप आवडत्या आहेत. कारण खूप समंजस, समजूतदारपणे घेतलेला निरोप ह्य़ा ओळींतून अतिशय सुंदर व्यक्त झाला आहे. एकुणातच मानवी जीवनातील ‘निरोप’ हे असे अटळ वळण आहे की, ज्याला आपल्याला वारंवार सामोरं जावंच लागतं.. मानवी जीवन हे कितीही अद्वातद्वा प्रचंड मानलं तरी प्रत्यक्षात ते केवळ दोन साध्यासुध्या शब्दांत सामावलं आहे. भेट आणि वियोग.. मराठी भाषा (आणि वृत्तीही) नको इतकी परिपक्व आणि तटस्थ असल्याने ह्य़ा दोन शब्दांत जी कळ दडली आहे ती तीव्रपणे अनुभवायची असेल तर हिंदी- उर्दूचा आधार घ्यावा लागेल. ‘मिलना और बिछडना’’ हे सगळं आत्ता मनात यायचं कारण आजचा हा क्षण तसा एकाअर्थी आपल्या निरोपाचाच आहे. गेल्या वर्षी ध्यानीमनी नसताना सुरू झालेला हा प्रकट ‘स्वगत संवाद’ आता थांबणार आहे.. हा काही आपला कायमचा अलविदा नाही. पण तरीही लागलेली एक सुरेख ‘तंद्री’ भंग पावणार ही हूरहूर कशाला नाकारायची? त्यापेक्षा त्या हुरहुरीचाच ‘षड्ज’ करू या.. कारण जीवन वाहतच राहणार आहे आणि मुख्य म्हणजे कविता- सखीची वाटचालही चालूच राहणार आहे.
‘‘दिले नादां, तुझे हुवा क्या है?’’ ही ओळ माझी फार लाडकी आहे. ती मला सर्व कवी- कलाकार आणि संवेदनाशील रसिकांचं जीवन वाहतं ठेवणारी नांदी भासते. कारण तिच्यात काठोकाठ भरलेली अनामिक बेचैनी हीच सर्व आविष्कारांना प्रेरित करते हा माझा दृढ विश्वास आहे. कविता- सखीच्या वाटचालीच्या अगदी आरंभी ४० वर्षांपूर्वी व्यक्त झालेली ती काव्यपंक्ती आजही किंचितही शिळी झालेली नाही.. किंबहुना ती अधिकाधिक खोल आणि धारदार बनत अस्तित्वात एव्हाना पूर्ण मुरून गेली आहे.
‘‘थांबता ना थांबती ही वादळे रक्तातली
.. मस्तकी ना मावणारे वेड तू का घातले?
ह्य़ा अनाकलनीय बेचैनीतूनच कवीच्या कविता आजवर अखंड येत राहिल्या. कधी चुकार पक्ष्यांप्रमाणे एकेकटय़ा तर कधी समूहानेही.. ‘सखि, मंद झाल्या तारका’ त्यातूनच आली. ‘स्वतंत्रते भगवती’ची प्रेरणा तीच होती. शब्दधून आणि लय हे दोन्ही काव्यसमूह त्या भावकल्लोळातूनच आले.. माझ्या गाण्यांच्या वहीचा मूलस्रोत तीच होती.. आणि त्याच वाटेने अगदी अलीकडे काही वर्षांपूर्वी, कवितांचा छोटा थवा माझ्याकडे आला आणि ओझरती चुणूक दाखवून पाहता पाहता चटका लावून विरूनही गेला. आजही कवी स्वत:च्याही नकळत गेली १०/१२ वर्षे त्या अनुभवाची प्रतीक्षा करतो आहे.
‘‘एक दिवस असा येतो की सारा मोहरा फिरून जातो’’ असं एक कविवचन आहे. तो दिवस तसा होता. एका अनाकलनीय आणि अनामिक बेचैनीने सगळं अस्तित्व ढवळून निघालं होतं.. ती कुठल्याही लौकिक, व्यावहारिक किंवा भावनिक करणातून जन्मलेली बेचैनी निश्चित नव्हती. ती फक्त होती आणि होती. एवढंच सत्य होतं. संगीत, पुस्तकं ही एरवीची जादूची साधने तेव्हा निष्प्रभ झाली होती. गंमत म्हणजे अगदी जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींनादेखील तिचा सुगावाही नव्हता. ‘मोजलेली चाल आहे, मापलेला पंथ आहे’ हे सुरक्षित वर्तमान वरच्या थरावर बिनधास्त वाहत होतं आणि आत मात्र उलथापालथ.. सगळा दिवस तसाच गेला. रात्रही तशीच चालली होती. उशीवर डोकं टेकलं की डायरेक्ट टेक-ऑफ ही रोजची सवय आपली चाल जणू विसरून गेली होती.. रात्र, मध्यरात्र, उत्तररात्र..
‘‘काळोखाच्या काळजाला व्हावा उजेडाचा दंश’’ अशी ती साक्षात्कारी वेळ होती. कवी हलकेच उठला. कुणालाही चाहूल न देता हलकेच दार उघडून बाहेर पडला आणि निरुद्देश चालत राहिला.. एक आडबाजूचं छोटेखानी मैदान, मध्ये छोटं देऊळ, भोवती मोजकी तरुराजी.. तिथल्या एका बाकडय़ावर निवांत बैठक मारली.. आणि नकळे काय जादू झाली. जणू त्या नीरव आसमंतातून एक अबोल अव्यक्त शांतता चहू दिशांनी त्याच्या अस्तित्वात झिरपू लागली. पाहता पाहता त्या शांततेनं त्यांचं सगळं अस्तित्व काठोकाठ भरून गेलं.. आणि त्याच्या अंतरंगातून कवितांची लड अचानक उलगडू लागली.
निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरु सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप मिटती क्षणात आपोआप
त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळते क्षोभ, माया, मोह
त्याच्या संकीर्तनी मुरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य़
त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली
निळे नि सावळे मोकळे आभाळ
भिजते रंगांत सांजवेळी
सुदूर रुळते डोंगरांची माळ
मधेच गुलाल सांडलेली
जवळ नि दूर उभे तरुवर
सय पावसाची साठवूनी
श्वास ओलसर वाऱ्याचा मंदसा
मातीस सुगंधी आठवणी
दिठीची लेऊन नाजूक चौकट
चित्रमय जग उभे आहे अशब्द, नि:शब्द विश्वरूप मौन
भासते सचित्र बोलू पाहे
पाऊस चौफेर आंत नि बाहेर
पावसाचा उर दुभंगला
पाऊस कणात पाऊस क्षणात
पाऊस मनात ओसंडला
अंधार दाटतो पाऊस वाजतो
पाऊस भिजतो काळोखात
पावसाची सुप्त परतीची वाट
झाली पुरी लुप्त पावसात
पाऊस कोसळे चौखूर उधळे
घरटे आपुले शोधताहे
त्रिखंडात आज पावसाची गाज
पावसाचा षड्ज नादताहे
..
थांब ना जराशी ऐक ती चाहूल
वाजते पाऊल कुठेतरी
जरासा कान दे जरासे भान घे
तरंगे झुळूक वेणुपरी
यमुनेचे जळ आतूर वेल्हाळ
वेढते ओढाळ पाउलासी
भिजले वसन अंगा बिलगून
वेध घे कोण ये कोणापाशी
येईल सावळी लाट अनावर सर्वाग क्षणात भिजवेल
होशील केशरी पहाट साक्षात..
साक्षात तुझ्यात उजाडेल
..तनामनानं पिसासारखा हलका झालेला कवी ‘पुन्हा मूळ वाट पायाखाली’ म्हणत- गुणगुणत पूर्वायुष्य लपेटून पुढे चालू लागला.. अनेक कविता आणि गीतांचे पक्षी वेळोवेळी त्याच्या खांद्यावर, मनगटावर पुन्हा पूर्वीप्रमाणेच उतरू लागले. सिलसिला पुढे चालू झाला.
खूप दिवसांनी निखळ कविता आपल्यातून उगवल्या ह्य़ा आनंदात कवी निमग्न होता. ह्य़ा कवितांचं संगीताशी काही नातं जुळेल हे त्याच्या स्वप्नातही नव्हतं. पण त्या निखालस आत्ममग्न कवितात दडलेले गुप्त गीतपण अवचित वर उसळून येण्याचा योगही पुढे त्याला सामोरा व्हायचा होता. ह्य़ा आधीची उणीपुरी ४० र्वष. आपल्याहून ज्येष्ठ आणि समकालीन असलेल्या अनेक संगीतकार प्रतिभावंतांची मांदियाळी संगीताला घेऊन कवीची वाटचाल झोकात झाली होती.. पण ह्य़ा अनाहूत कवितांच्या निमित्ताने, शतकांच्या सीमारेषेवर नव्याने उगवणाऱ्या एका गुणी तरुण संगीतकाराचा हात त्याच्या हाती आला.. त्या सगळ्या कविता स्वरबद्ध झाल्या. प्रकाशातही आल्या. आज तो संगीतकार पूर्ण प्रकाशात ऐन उमेदीत आपली वाटचाल करतो आहे. त्याचं नाव सलील कुलकर्णी.
ह्य़ा छोटय़ाशा कविता समूहातील एक कविता सलीलनं कटाक्षानं बाजूला ठेवली होती.. आणि ह्य़ा कृतीचंही स्वत: कवीला खूप अप्रूप वाटलं होतं.. पण कला-विश्वाला कसलेही नियम बांधत नाहीत, हेच खरं.. कारण काही वर्षांच्या अवधीतच नव्याने संगीतकार होऊ पाहणारी एक अभ्यासू, व्यासंगी गुणी गायिका त्या कवितेला सामोरी गेली आणि ही स्वरापलीकडची वाटणारी कविताही स्वरांनी उजळून निघाली.. त्या व्यक्तीचं नाव, अपर्णा संत.
आपलं कवीपण केवळ शब्दांपुरतं सीमित न ठेवता, अनेक माध्यमांतून ते शोधू पाहणाऱ्या कवीच्या मनात आजही, त्या अनोख्या विदेही तंद्रीची ओढ अखंड जागी असते.. ओझरती चाहूल देऊन तृप्त झालेली कवितांची ती लड पुन्हा कधी उलगडेल ही त्याच्या मनाला लागलेली तहान, केवळ तोच जाणे.. त्या लडीतली ती शेवटची कविता हे त्याच्यासाठी एक चिरंतन संजीवक आश्वासन आहे..
दूर कुठेतरी पहाटतो सूर्य
काळोखाचे मन धवळते
घनदाट रानी चालत्या पाऊलां
पावलापुरते प्रकाशते
निराशेच्या डोही बुडालेली दिठी
आसवांची मिठी सोडविते
धूसर झालेले स्वप्नही नवीन
अनाम तेजाने झळाळते
रात्रीत काजळी दु:खांच्या वादळी
घेई कुणीतरी हाती हात
वेदनेच्या गर्भी हुंकारतो सूर्य
पडे कवडसा कवितेत
(समाप्त)