जी.ए. आणि ग्रेस यांची प्रत्यक्ष कधीही भेट झाली नाही. परंतु या दोघांचेही मन एकमेकांविषयीच्या प्रेमाने आणि आदराने भरलेले होते. कवी ग्रेस यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त (२६ मार्च) जी.एं.च्या भगिनी नंदा पैठणकर यांनी या दोघांमधील उलगडलेला भावबंध..
अ लौकिक प्रतिभा लाभलेले, आधुनिक कवितेत स्वत:चा वेगळा आणि नावीन्यपूर्ण ठसा उमटवणारे कवी ग्रेस यांचं अवघं जीवन म्हणजे एक कविताच! त्यांनी स्वत:विषयी एका ठिकाणी म्हटलंय-‘मी हलेन अश्रूपुरता, मी निजेन स्वप्नाकाठी’.. शेवटपर्यंत त्यांनी आपलं काव्यप्रेषिताचं घोषवाक्य जपलं- Creativity is my life and its conviction is my character.’ एका बाबतीत मात्र मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजते. कारण जीएंच्या मनात ज्या कवी ग्रेसबद्दल आदराचं स्थान होतं त्यांचा सहवास, प्रेम मला मिळालं. विशेष म्हणजे प्रत्यक्षात ते दोघे कधीही भेटले नाहीत, पण मला मात्र या दोघा महान साहित्यिकांच्या सहवासाचं भाग्य लाभलं.
मला आठवतंय, २००० साली नाशिकच्या महेश आफळे (जीएंचा एक चाहता) यानं जीएंवर ‘कस्तुरीगंध’ नावाचा एक विशेषांक काढला होता. त्या अंकाच्या प्रकाशनासाठी त्यानं खास ग्रेसना आमंत्रित केलं होतं. मलाही निमंत्रण होतं. रामदास भटकळही होते. त्या विशेषांकाच्या प्रकाशनावेळी माझी आणि ग्रेस यांची पहिल्यांदा भेट झाली. आणि पहिल्याच भेटीत त्यांनी मला सांगितलं, ‘जीए म्हणजे माझं दैवत.’ त्यानंतर फोनवरून आमचं बोलणं होत असे. अगदी शेवटपर्यंत म्हणजे ते ‘दीनानाथ’मध्ये असेपर्यंत. त्यांचा फोन आला की ते पहिल्यांदा विचारायचे, ‘नंदाजी, कशा आहात तुम्ही? ‘लिटल’ कशी आहे? (माझ्या धाकटय़ा मुलीला जीए ‘लिटल’ म्हणायचे.) आज तिला डबा दिला का? भाजी कोणती केली होती. घरातले सगळे कसे आहेत?’ अनेकदा ते त्यांच्या मनातली एक सल बोलून दाखवत असत, ती त्यांना दुर्लक्षित कसं केलं गेलं याबद्दल. पण दुसऱ्याच क्षणी ते म्हणत, ‘जगानं मला दुर्लक्षित केलं, पण जीएंनी मला जसं समजून घेतलं, तसं इतर कोणीही समजून घेतलेलं नाही. म्हणूनच मी माझ्या घरात अगदी समोरच त्यांचा फोटो लावलेला आहे. दररोज सकाळी मी त्यांच्या फोटोला वंदन करतो आणि मग आमचा संवाद सुरू होतो.’
हा संवाद किती काळ चालू होता आणि पुढे किती काळ चालू राहणार आहे, याची प्रचिती २०१० साली ‘प्रिय जी.ए. सन्माना’च्या वेळी निमंत्रणपत्रिकेसाठी त्यांनीच दिलेल्या मजकुरावरून (जीएंना उद्देशून लिहिलेल्या) येते- ‘आता तुम्ही जिथं स्थायिक झाला आहात, तिथल्या पडशाळांतील जीवनधर्माची सृजनभाषा फक्त मला(च) कळतेय. प्रत्यक्षात आम्ही एकमेकांना जरी भेटलो नसलो तरी आता वरती मात्र एकमेकांच्या सान्निध्यात राहून बऱ्याच विषयांवर गप्पा मारणार आहोत.’
२०१० सालचा ‘प्रिय जी.ए. सन्मान’ स्वीकारण्यासंदर्भात विनंती करण्याकरिता मी त्यांना फोन केला; तेव्हा त्यांना किती आनंद झाला हे त्यांच्याच शब्दांवरून लक्षात येतं. ते म्हणाले होते, ‘जीएंच्या नावाचा सन्मान हे माझ्या आयुष्यातील पहिलं आणि शेवटचं एकमेवाद्वितीय पारितोषिक आहे.’ हा सन्मान स्वीकारण्याची त्यांची पद्धतही तितकीच अद्वितीय अशी होती. जीएंना उद्देशून त्यांनी निमंत्रणपत्रिकेत म्हटलं, ‘मला जो जीए सन्मान पुरस्काररूपाने देऊ करताहेत, त्याचा तुमच्या अनवट दु:खविभोर अभिरुचीचा, सृजनथक्क लहरी अभिषेक म्हणूनच स्वीकार करतोय.’
बरीच र्वष नागपूरला ते एकटेच होते. त्यांच्या दररोजच्या दिनक्रमाविषयी सांगताना ते म्हणायचे, ‘मी दररोज पहाटे बरोबर ४ वाजता पोहायला जातो आणि माझा हा क्रम पाऊस, थंडी, वाऱ्यातही चालू असतो. (सुरुवातीला ‘दीनानाथ’मध्ये असतानाही हॉस्पिटलशेजारील अपार्टमेंटच्या पोहण्याच्या तलावात जात) घरी आल्यावर सगळं आवरून ७ वाजेपर्यंत माझा कुकरही तयार होतो. त्यानंतर मात्र मी एकटा भूतासारखा बसून विचारांच्या, प्रश्नांच्या गदारोळात स्वत:ला सोडून देतो.’
ग्रेसना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांचं अभिनंदन करण्याकरिता मी हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्या वेळी ते म्हणाले, ‘मी दिल्लीला पुरस्कार स्वीकारायला जाणार आहे. (प्रकृती बरी नसतानाही ते गेलेही.) ते फक्त जीएंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी.’
एकदा असेच ते घरी जेवायला आले. जेवणं झाल्यावर आम्ही हॉलमध्ये बोलत बसलो असताना ते म्हणाले, ‘आज मी मुद्दाम येथे आलो आहे. माझी ठेव तुमच्याकडे ठेवायला द्यायची आहे; आणि मला खात्री आहे की ती तुमच्याकडेच सुरक्षित राहील.’ ती ठेव जेव्हा त्यांनी मला दाखवली तेव्हा मी क्षणभर स्तब्धच झाले आणि मन आनंदानं भरून गेलं. ग्रेस आणि जीए या दोघांवर तितकंच अतोनात प्रेम करणारे अरुण नाईक यांनी ग्रेसना भेट म्हणून दिलेल्या दोन गोष्टी त्यांनी मला दिल्या. ग्रेसची तीव्र इच्छा होती की, त्यांच्या स्वत:च्या गाडीतून मी आणि अरुण नाईक यांच्यासोबत बेळगावला जायचं आणि तिथल्या लोकमान्य ग्रंथालयात जे अप्रतिम असं ‘जी. ए. स्मृतिदालन’ आहे ते पाहायचं. पण त्यांची ती इच्छा तशीच राहून गेली. मी मात्र आता मनाशी पक्कं ठरवलं आहे की, त्यांची राहून गेलेली इच्छा पूर्ण करायची. मी या दोघांच्या स्मृती सोबत घेऊन बेळगावला जाणार आहे.
ग्रेसचं वागणं, बोलणं, राहणं (कपडय़ांची त्यांना विशेष आवड होती.) सगळंच अगदी असामान्य आणि जगावेगळं! त्यांचं भाषण म्हणजे नायगाराचा थक्क करणारा धबधबाच. घशावर रेडिएशन झाल्यावरही त्यांच्या आवाजात एवढा जोश कोठून यायचा, हे कळायचं नाही. कुठंही भाषणाला जाण्याच्या आधी त्यांना खूप टेन्शन यायचं आणि त्या वेळी ते फोन करायचे आणि ‘माझ्या पाठीशी राहा,’ असं म्हणायचे. एकदा एस.पी. कॉलेजमध्ये त्यांचं भाषण होतं. मला फोन करून मुद्दाम यायला सांगितलं होतं. मी गेलेही. ते स्टेजवर गेले आणि एकदम म्हणाले, ‘नंदाजी आल्या आहेत ना?’ मी हात वर करून आल्याचं सांगितलं तर त्यांनी मला स्टेजवर बोलावलं आणि सर्वासमोर नमस्कार केला. मी एकदम भांबावून गेले. (आधीही ते जेव्हा जेव्हा भेटायचे, त्या प्रत्येक वेळी नमस्कार करायचे.) मला मात्र फार संकोचल्यासारखं झालं. ते म्हणायचे, ‘तुम्ही जीएंच्या आतडय़ाच्या, त्यांच्या जवळच्या, म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो.’
भाषणासाठी ते कधी टिपणं काढत नसत. पण भाषणाला उभं राहिल्यावर अख्ख्या विश्वातले सगळे शब्द त्यात सामावलेले असत. इंग्रजी, मराठी, उर्दू भाषांतील शब्द त्यांच्या मुखातून आपण कधी बाहेर पडतो, याची वाट पाहात थांबायचे. ‘प्रिय जी.ए. सन्माना’वेळी त्यांनी केलेलं भाषण तर कायमच मनात कोरलं गेलं आहे. जीएंविषयी त्यांनी म्हटलं होतं की, ‘I have come here to salute my master friend, I should be able to salute him as per conviction of by dignity of creativity because creativity is my life and conviction is my character‘. ग्रेस आणि जीए या दोन नद्यांचा जणू संगम होऊन पाण्याचा विस्तृत असा प्रवाह वेगानं उंच कडय़ावरून खोल दरीत प्रचंड सामर्थ्यांनं पडावा, असं त्यांचं त्या वेळचं भाषण होतं.
त्यांच्या कार्यक्रमांच्या निमंत्रणपत्रिकाही खासच असायच्या. त्यात त्यांचा स्वत:चा फोटो, निमंत्रण का स्वीकारतो याविषयीचे त्यांचे मुक्तविचार कधीकधी कवितेद्वारे व्यक्त केलेले असायचे. ‘प्रिय जी.ए. सन्माना’वेळची निमंत्रणपत्रिका त्यांच्या मनाप्रमाणे व्हावी म्हणून मुद्दाम नागपूरहून विवेक रानडे यांच्याकडून तयार करून घेतली होती.
ग्रेस ११ डिसेंबर २०११च्या ‘प्रिय जी.ए. महोत्सवा’ला हॉस्पिटलमधून प्रकृती बरी नसतानाही आले होते. कोणी ओळखू नये म्हणून अगदी मागे बसले होते. शेवटी बेळगावच्या जीए स्मृतिदालनाची सीडी दाखवायच्या वेळी त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून ते परत चालले होते. जेव्हा त्यांना राघव वाडीकरनं सांगितलं की, बेळगावची सीडी आता दाखवणार आहेत, तेव्हा लगेच ते परत वर येऊन बसले आणि त्यांनी संपूर्ण सीडी पाहिली. निघताना त्यांनी लोकमान्य ग्रंथालयातील अशोक याळगी, उपाध्ये यांची भेट घेऊन स्मृतिदालनाविषयी त्यांचं विशेष कौतुक केलं. बेळगावला प्रत्यक्ष जाऊन, दालन पाहण्याची त्यांची इच्छा जरी अपूर्ण राहिलेली असली, तरी सीडी पाहून त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण करून घेतली असावी.
१० मे हा ग्रेस यांचा जन्मदिवस. १० मे २०१२ला ते ७५ वर्षांचे झाले असते. त्यांची पंचाहत्तरी साजरी व्हावी, असं आम्हा सगळ्यांनाच वाटत होतं, पण घडलं वेगळंच. २६ मार्चला ते दूरच्या प्रवासाला एकटे निघून गेले. पण शेवटपर्यंत त्यांनी अगदी धैर्यानं आपल्या प्रचंड मनोबलाच्या जोरावर कॅन्सरशी अगदी निर्धारानं झुंज दिली. जिथं जिथं जाण्याची इच्छा होती (आळंदी, नरसोबाची वाडी, मुंबई, कोल्हापूर, इ.) त्या ठिकाणी ते जाऊन आले. शेवटच्या काळात त्यांना नागपूरच्या घरी आपल्या मुलांसोबत राहायचं होतं, पण तसं घडलं नाही.
जी.एं.नाही धारवाड सोडायचं नव्हतं. मनाविरुद्धच ते पुण्यात आले. एकमेकांबद्दल प्रचंड प्रेम असणारे हे दोघे साहित्यिक शेवटी एकाच गावात यावेत आणि त्यांचा शेवटही सारख्याच आजाराने व्हावा, हाही एक योगायोगच म्हणायचा!
जी. ए.- ग्रेस : एक भावबंध
जी.ए. आणि ग्रेस यांची प्रत्यक्ष कधीही भेट झाली नाही. परंतु या दोघांचेही मन एकमेकांविषयीच्या प्रेमाने आणि आदराने भरलेले होते. कवी ग्रेस यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त (२६ मार्च) जी.एं.च्या भगिनी नंदा पैठणकर यांनी या दोघांमधील उलगडलेला भावबंध..अ लौकिक प्रतिभा लाभलेले, आधुनिक कवितेत …
आणखी वाचा
First published on: 24-03-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi poet grace first anniversary grace and g a