गेल्या रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीत अरुण साधू यांनी लिहिलेल्या ‘मराठीत प्रगल्भ राजकीय कादंबऱ्या का नाहीत?’ या लेखातील मतांचा खणखणीत प्रतिवाद करणारा लेख..
‘मराठी साहित्यातील एक विचारवंत लेखक, विचारवंत पत्रकार, सव्यसाची संपादक, मोजकं पण कसदार, सर्जनशील लेखन करून विख्यात पावलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अरुण साधू हे होत!’ असं नेहमी म्हटलं जातं. ते खरंच तसे असावेत असं वाटावं, किमान तसा दाट संशय यावा, इतपत तेही आपली प्रतिमा जपून होते.
गेल्या रविवारच्या (२७ एप्रिल) ‘लोकरंग’मध्ये ‘मराठीत प्रगल्भ राजकीय कादंबऱ्या का नाहीत?’ हा त्यांचा शब्दांकित लेख वाचेपर्यंत माझ्या मनातला अरुण साधू यांच्याबद्दलचा कथित संशय टिकून होता. मात्र, तो लेख वाचल्यावर साधू यांच्याविषयी संपूर्ण भ्रमनिरास झाला.
या लेखाच्या शिरोभागी जो प्रश्न विचारला आहे, त्यातील शेवटच्या प्रश्नाचे उत्तर साधूंचा लेख वाचताच वाचकाला मिळते. त्यातला एक भाग असा की, ‘मला ‘लोकसत्ता’ने बोलायला सांगितले आहे.’ त्याचा एकूण सूर ‘मराठी साहित्यात राजकीय कादंबऱ्या नाहीत, कारण मी त्या वास्तवाकडे जसं पाहत आलो आहे, माझी जी सूक्ष्म दृष्टी आहे, तशी ती इतरांकडे नाही. मराठीत खराखुरा राजकीय कादंबरीकार (कदाचित नव्हे, तर नक्कीच!) मी एकटा आहे’ असा स्पष्टपणे जाणवावा असा आत्मस्तुतीचा आहे. (हे थोडंसं मोदींच्या आत्मस्तुतीच्या वळणाने जाणारं आहे, असंही एखाद्याला वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.) मात्र अगदीच तसा आरोप होऊ नये म्हणून चार-दोन नामवंत लेखकांना राजकीय भान असल्याचं प्रमाणपत्र ते देतात.
साधूंचा लेख वाचल्यावर आणि त्यातली एकापेक्षा एक सवंग विधाने वाचल्यावर या संवेदनशील माणसाला झाले आहे तरी काय असा प्रश्न पडतो. मला तरी तो पडला. मुख्य म्हणजे या संपूर्ण लेखात स्वत: साधू राजकीय कादंबरी कशाला म्हणतात, कादंबरीमध्ये कोणते आणि किती प्रमाणात गुण असले तर ती राजकीय कादंबरी होते, राजकीय कादंबरीची अत्यावश्यक, अपर्याप्त अशी व्यवच्छेदक लक्षणे कोणती, याची कसलीही मांडणी न करता किंवा आदर्श राजकीय कादंबरीचा एखादाही नमुनादर्श (स्वत:च्या सगळ्या कादंबऱ्या बाजूला सारून) समोर न आणता (अपवाद फक्त ‘वॉर अँड पीस’चा) साधू ‘राजकीय कादंबरी’ या जॉनरची, या कादंबरीप्रकाराची पोकळ, पोरकट आणि प्रसंगी बाष्कळ चर्चा करत राहतात. अरुण साधू हे या संपूर्ण लेखात ‘राजकारण’ या विषयाबद्दल आणि ‘राजकीय कादंबरी’ या प्रकाराबद्दल जी विधाने करतात, त्यात तर्कशुद्धता, नेमकेपणा आणि पारदर्शकता अजिबातच अनुभवाला येत नाही. ‘राजकीय कादंबरी’ची चर्चा करत असताना साधू ‘राजकीय’तेची चौकट इतकी विस्तारतात, की त्यात प्रत्येकच लेखनकृतीचा समावेश होऊ शकेल. साधूंची व्याख्या नको तितकी सर्वसमावेशक आहे. ती स्वीकारायची तर पु. शि. रेगे यांच्या कादंबऱ्या या कदाचित सर्वोत्तम राजकीय कादंबऱ्या ठरतील. प्रत्येक संबंधात राजकारण असतं आणि प्रत्येक क्षेत्रातही राजकारण असतं, हे जरी खरं असलं तरी तो प्रस्तुत लेखापुरता तरी साधूंचा विषय नव्हे. साधू करत असलेली किंवा त्यांच्याकडून अपेक्षिली गेलेली चर्चा ही सत्ताकारणाची, राज्यकारणाची आणि त्याच्याशी संबंध असणाऱ्या कादंबऱ्या यांची आहे. अरुण साधू त्यांच्याकडून ज्या विवेचनाची, मांडणीची, विश्लेषणाची अपेक्षा करावी, ते न करता ते निर्थक गोष्टींची उठाठेव करत राहतात. साधू यांनी आपल्या विवेचनासाठी जे दाखले दिले आहेत
(उदा. ब्राह्मणांचे अन्न) ते तर चक्क तर्कदुष्ट आहेत. पूर्वी लिहिणारा वर्ग ब्राह्मणांचा होता आणि त्यांचं खाणं पिचपिचीत होतं, म्हणून त्यांचं साहित्य तसं होतं असं म्हणणं किंवा नंतर ब्राह्मणांचं खाणं विस्तारलं वा बदललं म्हणून साहित्यात बदल झाला असं म्हणणं हे फारच पोरकट ठरणारं आहे. शिवाय एखाद्या समाजाची किंवा त्यातील एका घटकाची खानपान संस्कृती बदलली की त्याचं साहित्य बदलतं असं म्हणणं हे अतिव्याप्त विधान आहे. समजा, साधूंच्या म्हणण्यात तथ्य आहे असं मानलं तर आजचं मराठी साहित्य केव्हाच ‘ग्लोबल’ व्हायला हवं होतं. पण ते तसं झालेलं नाही, हे उघड सत्य आहे.
अरुण साधू यांनी ‘सत्ताकारण म्हणजेच राजकारण’ असा एक ठाम समज का करून घेतला आहे, ते कळत नाही. त्यांना ‘राज्यकारण’ हा राजकारणाचा भाग वाटत नाही की काय, असा प्रश्न पडतो. त्यांची एकूण सारी मांडणीच गोंधळाची वाटते. मराठी साहित्यात राजकीय संदर्भ असलेल्या, सामाजिक-राजकीय वास्तवाला गाभाभूत महत्त्व असलेल्या अनेक गोष्टी आहेत. राजकारण, सत्ताकारण, राज्यकारण यांचे अनेक अर्थपूर्ण आकार आपल्याला कथा-कादंबरी-नाटक अशा प्रमुख साहित्यनिर्मितीत दिसतात. पण त्यांची दखल साधू घेत नाहीत. साधू ती दखल घेण्याचं हेतुपूर्वक टाळून नेमाडे-पठारे यांचाच केवळ उल्लेख करतात. पूर्वसुरींचा जो वेध या संदर्भात साधू घेतात, तो तर त्या- त्या लेखकांवर अन्याय करणारा आहे. माडखोलकर, डॉ. केतकर, अगदी ना. सी. फडके आणि वि. स. खांडेकर यांच्या आणि सावरकर, काकासाहेब कालेलकर यांच्या लेखनाची चिकित्सा करताना त्यांच्या काळाचे आणि त्या काळातील साहित्य- संस्कृतीचे भान आपल्याला राखलेच पाहिजे. पण साधूंना सगळेच पातळ, पचपचीत आणि हास्यास्पद वाटते. स्वत:च्या सगळ्या कादंबऱ्या राजकीय आहेत असा दावा ज्या वाचकांचा हवाला देत साधू करतात, तोच हवाला ते इतरांच्या संदर्भात दिला गेला की तो हास्यास्पद ठरवत नाकारतात. त्यांना प्रमाणपत्र देणाऱ्या वाचकांनी इतरांना तसे प्रमाणपत्र देऊ नये असं ते अप्रत्यक्षपणे सुचवत आहेत. साधूंच्या या दुहेरी नीतीला काय म्हणावे? स्वत:च्या तथाकथित विश्लेषक चिकित्सेसाठी त्यांनी लोकमान्य टिळक, गांधी, नेताजी यांचे जे दाखले दिले आहेत ते तर ‘अप्रगल्भ’ या सदरात मोडणारेच आहेत. त्यांनी या मंडळींच्या राजकारणाची छाया मराठी कादंबरी- साहित्यात कशी दिसते, ते पुन्हा एकदा पाहावे. मात्र त्यासाठी त्यांना त्यांचा तुच्छतावादी दृष्टिकोन सोडावा लागेल. त्याला त्यांची तयारी असेल का? तसे झाले तर त्यांना विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ या १९३९ मधील कादंबरीचा नव्याने विचार करावा लागेल. साधू म्हणतात तेवढी ‘रणांगण’ ही क्षुल्लक कलाकृती नाही.
साधू हे फक्त माइलस्टोन ठरलेल्या कादंबऱ्याच वाचत असल्याने त्यांच्या विधानांकडे किती लक्ष द्यावे, हा प्रश्नच आहे. त्यांना नेमाडे-पठारे आठवतात, पण विलास सारंग आणि भाऊ पाध्ये आठवत नाहीत, यातच साधू ‘बायस्ड’ असल्याचे लक्षात येते. मला वाटते की, साधूंनी फारसे वाचलेलेच नाही. विशेषत: नव्वदीनंतरचे साहित्य त्यांच्या खिजगणतीतही नाही. तसे ते असते तर त्यांना विजय तेंडुलकर यांची ‘कादंबरी दोन’, दीनानाथ मनोहर यांची ‘रोबोट’, रवींद्र शोभणे यांची ‘पडघम’ या कादंबऱ्यांच्या बरोबरीने जी. के. ऐनापुरे, कृष्णात खोत, राजन गवस, कैलास दौंड, महेंद्र कदम, भानू काळे, दिलीप कुलकर्णी, बाबाराव मुसळे, भालचंद्र देशपांडे, अशोक कोळी (ही यादी अजून कितीही लांबू शकते.) यांच्या कादंबरी-साहित्याचा विचार करावा लागला असता.
आज जे साहित्य साधू हिशेबातही धरत नाहीत, त्या साहित्यात गाव-तालुका-जिल्हा-शहर या सर्व स्तरावरचे राजकारण आणि राज्यकारण भरपूर प्रमाणात उतरले आहे. या लेखकांना देशीय संदर्भाचे भान आहेच, पण आंतरराष्ट्रीय भानही आहे. मार्केट इकॉनॉमी आणि मार्केट पॉलिटिक्स यांच्यासह सर्व स्तरावरील राजकारणाचे आणि त्यातील नीति-अनीतीचे पुरेसे भान या लेखकांना आहे. हे साहित्य आणि त्यांचे निर्माते अर्थातच अरुण साधू आणि त्यांच्यासारख्या मखरात विराजमान झालेल्या साहित्यश्रेष्ठांची आणि त्यांच्या मान्यतेची वाट न पाहता पुढे सरकते आहे. आता वेळ आहे ती अरुण साधू आणि कंपनीने हे साहित्य वाचण्याची. ते समजून घेण्याची. तसे झाले तर पुढच्या खेपेला अरुण साधू यांना इच्छा असल्यास थोडी तरी न्यायाची मांडणी करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा