‘जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे
पक्व फळापरि
सहजपणाने गळले हो..’
बा. भ. बोरकरांची ही कविता. प्रतिभावंतांच्या प्रत्येक शब्दात, सुरात प्रतिभा जाणवते. ‘पक्व फळापरि’ म्हणताना मुळात प्रगल्भ होत जाण्याचा किती नेमका उल्लेख आला आहे. मीपण.. अहंकार गळून जायला हवा, कोणीतरी ठेचून जायला नको. आणि सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे ‘सहजपणाने’!
जगण्यामधली म्हटलं तर सर्वात सोपी आणि तरीही सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे ‘सहजपणा’! अगदी अडीच-तीन वर्षांच्या लहानग्याच्या चेहऱ्यावरचं हसू जितकं सहज आणि निर्हेतूक असतं, तसा ‘सहजपणा!’
ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात-
‘बाप रखुमादेवीवरु सहज नीटु झाला
हृदयी नटावला ब्रह्माकारे..’
इतकं सहज असेल जगणं.. स्वाभाविक असेल, तरच मग ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ असं म्हणता येतं.
कवींच्या, संगीतकारांच्या, गायकांच्या आविष्कारात हा ‘सहजपणा’ आला की मग सिद्ध करायची धडपड राहत नाही. एकदा बोलता बोलता यशवंत देव सर म्हणाले होते की, ठिपके काढून रांगोळी काढणारी काही कलाकार मंडळी असतात.. आणि काहीजण रांगोळी आणि रंग इतके ‘सहज’ फेकून पुढं जातात- आणि मागे पाहावं तर तिथं सुंदर चित्र उमटलेलं असतं. त्याची चर्चा करावी ती इतरांनी. पण तो कलाकार तेव्हा पुढच्या गावात पोहोचलेला असतो. याला म्हणायचं ‘सहजपणा’!
लतादीदींचं गाणं, सचिनची बॅटिंग, नसिरुद्दीन शाह यांचा अभिनय, पु.लं.चा विनोद हा तो ‘सहजपणा’! अपार कष्ट आणि खोल अभ्यासानंतरही हा येतो, किंवा तो असतोच काहीजणांमध्ये. जणू कुमारजींचं गाणं किंवा दीनानाथांची एखादी स्वराकृती!
आज या सहजपणाची आठवण आली ती या प्रतिभावंतांमुळे. दहा-दहाजणांची टीम बसवून मालिकेला, चित्रपटाला शीर्षक शोधत बसणाऱ्यांचा आजचा काळ! पण थोडं शांतपणे याकडे बघितलं तर सुभाषितं, म्हणी, सुंदर उद्गार हे सगळं सहज बोलता बोलता आलंय. अर्थात् तितक्याच प्रतिभावंतांकडून! केवळ मराठी कविता-गीतांमधल्या अशा ओळी आठवायच्या म्हटल्या तरी त्यांचं एक वेगळं पुस्तक होऊ शकेल. ‘दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव’पासून सुरू होणाऱ्या या ओळी.. ज्यांत एका अखंड ग्रंथाचं तत्त्वज्ञान सामावलंय. गदिमांच्या अशा ओळींना तर अभ्यासक्रमात स्थान द्यायला हवं असं मला मनापासून वाटतं.. ‘लळा, जिव्हाळा शब्दच खोटे’, ‘जग हे बंदिशाळा’, ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे’, ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’, ‘जिथे राबती हात तेथे हरी..’ प्रत्येक ओळीत एक कथा, एक विचार आणि चिरंतन तत्त्वज्ञान! काहीतरी खूप मोठं लिहायचंय असा अभिनिवेश न ठेवताच ‘मोठं’ काहीतरी लिहिलं जातं, याचा हा वस्तुपाठ.
चटपटीत दोन- दोन ओळी सुचण्यासाठी डोकं खाजवत बसणारे वेगळे, आणि मी सहज म्हणून लिहिलंय, त्यातल्या तुम्हाला हव्या त्या ओळी वाचा आणि आनंद घ्या, असं म्हणणारे वेगळे. हा सहजपणा आला तो संतकवींकडून. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, समर्थ रामदास, एकनाथ महाराज, संत चोखामेळा, संत गाडगेबाबा यांच्या विचारमंथनातून आलेलं लिखाण इतकं सहज आहे, की त्याची कळ्यांची फुलं व्हावीत इतकी सहज ‘सुभाषितं’ झाली.. ‘विचार’ झाले. ओळींचे ‘विचार’ होणं हे तर कवीचं सर्वोत्तम लक्षण!
ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील प्रत्येक ओळ म्हणजे जणू एकेक शिलालेख.. चिरकाल टिकणारा विचार!
‘जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात’
‘तया सत्कर्मी रती वाढो’
‘भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे’
‘दुरितांचे तिमिर जावो..’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा