‘उठा उठा, प्रभात झाली। चिंता श्री विठ्ठल माऊली’ (भूपाळी) किंवा ‘नामा धन्य झाला/ नाम हेचि तारी/ लक्ष्मी तुझे पायतळी’ असे अभंग गात कीर्तनात दंगलेला नामदेव रंगवताना दिलीप अत्यंत तल्लीन होऊन गायचा. पण नाटकाच्या उत्कर्षबिंदूला नामाच्या अंगी भुताचा संचार झाल्यावर ‘अच्युता अनंता। श्रीधरा माधवा। देवा आदिदेवा पांडुरंगा’ आणि पाठोपाठ विकृत सुरावटीत मी बांधलेली ‘युगे अठ्ठावीस। विटेवरी उभा’ अशी विठ्ठलाची आरती गाताना दिलीप वेगळाच होऊन जाई. त्याचं गाणं.. त्याचा कायिक अभिनय.. क्या बात है! भुताच्या भूमिकेत सखाराम भावे, तर नाम्याची बायको ज्योती सुभाष!
‘विठ्ठला’च्याच दरम्यान आमचे स्नेही कै. बबनराव आचरेकर यांच्या ‘रंगतरंग’ या संस्थेकरता दिग्दर्शक दिलीप कोल्हटकरनं रत्नाकर मतकरीलिखित ‘तुमचे अमुचे गाणे’ हे संगीत नाटक मंचस्थ करायचं ठरवलं. त्याचं संगीत दिलीपनं माझ्यावर सोपवलं. ‘पडघम’सारखीच याही नाटकाची गाणी पूर्वध्वनिमुद्रित संगीतसाथीनं रंगमंचावर पात्रे प्रत्यक्ष गाणार होती. मध्यमवर्गाच्या समस्या मांडणाऱ्या या नाटकाचा नायक होता ‘महानिर्वाण’पासून माझी गाणी गाणारा गायक अभिनेता चंद्रकांत काळे. तर नायिकेच्या भूमिकेत अनुराधा रेगेसोबत ज्येष्ठ अभिनेत्री मालतीबाई पेंढारकर, बापू कामेरकर, अजित केळकर, मुकुंद फणसळकर, भारत बलवल्ली, सोनाली फडके, स्मिता विद्वांस, भारती शेवडे तसेच निवेदक आणि करपेमास्तरांच्या भूमिकेत खुद्द दिलीप कोल्हटकर अशी सगळी गाणारी मंडळी. ‘झुरळालाही असती पंख/ ती कशी असेल? / ते कधीच माझे नव्हते (अनुराधाबरोबर युगुलगीत)/ म्हणे सासू थोडे चटके’ अशी चंद्रकांत काळय़ांची गाणी. तर ‘महिन्या- दोन महिन्यामध्ये मला नोकरी लागेल/ ही नवलाई.. अपूर्वाई/ मला काही कळत नाही’ अशी अनुराधा रेगेची गाणी. याशिवाय ऑफिसातल्या सहकाऱ्यांची धमाल गाणी-‘बॉस आला बॉस/ ते लग्न झाले एकदाचे/ काकूबाई काकूबाई’ इत्यादी.
‘तुमचे अमुचे गाणे’मधील गाणी विख्यात वाद्यवृंद संयोजक अमर हळदीपूर यांनी अरेंज केली होती. अमरजींबरोबर काम करण्याचा माझा पहिला अनुभव. फोर्टातल्या आशीष दीक्षितांच्या लाइन इन स्टुडिओमध्ये रेकॉर्डिग झालं. फिल्म म्युझिक इंडस्ट्रीमधले नामचीन वादक वाजवायला होते. जवळजवळ १३-१४ गाणी या नाटकात होती. मालतीबाई पेंढारकरांकरिता एक गाणं मी झपतालात बांधलं होतं. अमरजींनी स्वत: व्हायोलिन हातात घेतलं आणि धा कि ट धी म। ता कि ट मी म अशा छंदातल्या पखवाजाबरोबर गाण्याची चाल, मधले संगीतखंडही अप्रतिम वाजवले. नंतर मला म्हणाले-‘आनंदजी, आम्हाला फिल्म म्युझिकमध्ये असं काही वाजवायची वेळ येत नाही. या गाण्यानं माझी परीक्षा घेतली.’
नाटक सुरू होताना पारंपरिक नांदी (‘तुम्हा तो शंकर सुखकर हो’) गाणाऱ्या सूत्रधाराला या नाटकाचा निवेदक बजावतो, की काळ बदललाय. त्यावर प्रतिवाद करणारा सूत्रधार (बापू कामेरकर)- अभिजात रागसंगीताची महती सांगताना बिलावल रागातली ‘मनहारवा रे.’ ही बंदिश गाऊ लागतो. उत्तरादाखल निवेदक आधुनिक वाद्यवृंदाच्या साथीत-
विसरा तुमच्या रागरागिण्या विसरा जुने तराणे
आता फिरली चाल बदलले तुमचे अमुचे गाणे
हे या नाटकांचे प्रील्युड सुरू करतो आणि सारे कलाकार त्याच्याबरोबर गाऊ लागतात..
‘विसरून गेलो.. किलबिल.. गुंजन..
झऱ्याबिऱ्यांची गाणी
अमुच्यासाठी केवळ गाती
छन छऽनऽ छन नन नन नाणी..’
‘तुमचे अमुचे गाणे’मध्ये आम्ही पहिल्यांदा कॉर्डलेस मायक्रोफोन्सचा प्रयोग केला. रंगमंचाच्या मध्यभागी ध्वनिमुद्रिकेचं गोलाकार डिझाइन असलेला फिरता फ्लोअर योजला होता. त्याचा संपूर्ण नाटकात दिलीपनं अतिशय कल्पकतेनं वापर केला. एकूणच दिलीप कोल्हटकरच्या उत्कृष्ट दिग्दर्शनानं नाटक फार रंगतदार झालं.
‘तुमचे अमुचे गाणे’नंतर सुमारे दोन महिन्यांनी अभिनेता-दिग्दर्शक विनय आपटेचा फोन आला. त्याच्या नव्या नाटकाचं संगीत दिग्दर्शन त्यानं माझ्यावर सोपवलं. ‘वेस्टसाइड स्टोरी’ या गाजलेल्या म्युझिकलचा मराठी अवतार म्हणजे विक्रम भागवतलिखित ‘अफलातून’! ऑगस्ट ८५ अखेरीस तालमी सुरू झाल्या. मुंबापुरीतल्या कॉलेजातली तरुणाई आणि अंडरवर्ल्डमधले दादा यांच्यातला संघर्ष आणि त्यात जाणारा निरपराध निष्पापांचा बळी. मुळात ‘वेस्टसाइड स्टोरी’ हे म्युझिकल खरं तर ‘रोमियो-ज्युलिएट’चीच गोष्ट सांगणारे. मच्छिंद्र कांबळींच्या श्रीभद्रकाली संस्थेची निर्मिती, विनयचं दिग्दर्शन आणि अभिनेत्यांची मांदियाळी. आता नावारूपाला आलेले महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुनील बर्वे, हृषिकेश देशपांडे, दिलीप गुजर यांसारखी मंडळी तर त्यात होतीच; पण दिलीप कुळकर्णी, चंदू पारखी, किशोर भट हे बुजुर्गही जोडीला होते. नेत्रा वेदक ही एकमेव स्त्री-कलाकार. या नाटकाच्या तालमी परळ रेल्वेस्टेशनच्या परिसरातल्या रेल्वे कर्मचारी वेल्फेअर हॉलमध्ये व्हायच्या. ‘पडघम’सारखीच जोशिली तरुणाई इथं एकवटल्यानं तालमी अतिशय ओसंडत्या ऊर्जेनं व्हायच्या. कसा वेळ जायचा, कळायचंच नाही.
‘एक गोष्ट सांगतो ऐका अफलातून पोरांची
अफलातून..अफलातून..’
असं ‘अफलातून’चं प्रील्युड साँग होतं. कॉलेजातल्या तरुणाईबरोबरच अंडरवर्ल्डची पोरंही गायची. याखेरीज ‘तुम्ही षंढ म्हणून तो गुंड/ न्यूज न्यूज ग्रेट न्यूज/ तुला काय वाटतं चाचा/ सगळं सगळं सडून गेलंय/ जेव्हा कोणी धरतील कॉलर तुमची/ नको सांगू हा कायदा’ अशी समूहाची गाणी.. तर नेत्रा वेदक या एकमेव स्त्रीकलाकाराकरता ‘तुझ्या माझ्या प्रेमाची जात’ हे अतिशय रोमँटिक गाणं. आणि फाल्तुनचाचा (किशोर भट) करिता ‘हा फाल्तूनचाचा समदी गोस्ट ऐकते’ हे कॉमेडी गाणं. नुसत्या हार्मोनियमवर मी गाण्यांच्या तालमी घेत होतो. लीऑन डिसुझा माझा म्युझिक अरेंजर. पुन्हा फोर्टातल्या आशीष दीक्षितच्या लाइन इन स्टुडिओमध्ये ‘अफलातून’ची १३-१४ गाणी/ गाणुली/ पाश्र्वसंगीत रेकॉर्ड करताना लीऑनच्या म्युझिक अरेंजमेंटला मनोमन सलाम करत राहिलो. तालमीत त्या ध्वनिमुद्रित संगीतसाथीत गाताना सारी तरुणाईच नव्हे, तर ज्येष्ठांतले दिलीप कुळकर्णी आणि फल्तूनचाचाच्या भूमिकेतले (गुजराती रंगभूमीवरचे अभिनेते) किशोर भटही झपाटून गेले. अंडरवर्ल्डच्या निळूदादाच्या (कै. चंदू पारखी) पंटर मंडळीकरिता मी गाणी संगीतबद्ध करताना लोकसंगीत, चित्रपटसंगीत या शैलींचा प्रयोग केला. तर कॉलेजमधल्या तरुणांकरिता पाश्चात्त्य रॉक-पॉप संगीतशैली अनुसरली. अभिनेता सुनील बर्वे तो वठवीत असलेल्या व्यक्तिरेखेचं दु:ख ‘ही काय साली जिंदगी झाली’ या गाण्यातून रुद्ध गळ्यानं मांडताना आपल्या देहबोलीतून बीअरधुंद अवस्थेत लडखडत्या चालीत त्याचं फुटून जाणं.. त्याचे घळघळा वाहणारे डोळे अशा काही बेमिसाल अंदाजात पेश करायचा! तीच गोष्ट पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेतल्या विनय आपटेच्या ‘जपा.. सांभाळा.. स्वत:ला’ या गाण्याची. जवळजवळ गद्य संवादाचंच मी गाण्यात रूपांतर केलं होतं. (‘तीन पैशाचा तमाशा’चा अनुभव इथं कामी आला.) फक्त पालुपदाची ओळ ‘जपा. सांभाळा.. स्वत:ला’ ही चालीत बांधली आणि शेवटचा अंतरा- जो छंदात होता. पण गद्य ओळींच्या पाठीमागे वाजणारा संगीतखंड गद्यातल्या भावनांना इतकं सुंदर अधोरेखित करी! सुनील- विनयच्या गाण्यांनंतरच्या काळोखात प्रेक्षकांची कडाडून टाळ्यांतून दाद मिळे. ‘अफलातून’ हा तरुणाईच्या जोशानं ओसंडणारा एक सुंदर अनुभव होता. आणि त्याचं श्रेय संगीत (आनंद मोडक) आणि नृत्य (नृत्यदिग्दर्शक अरुण चांदीवाले) यांचा विलक्षण सुंदर वापर करून जोशिला नाटय़प्रयोग रचणारे दिग्दर्शक विनय आपटेचं.
१९८५ सालातल्या प्रायोगिक-व्यावसायिक नाटकांचा आढावा घेताना ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहरांनी ‘पडघम’, ‘तुमचे अमुचे गाणे’ आणि ‘अफलातून’ या नाटकांच्या संगीताविषयी आवर्जून दखल घेतली होती. त्यांनी लिहिले होते की, ‘एक नव्या प्रकारचे संगीत नाटक आपल्या डोळ्यासमोर घडते आहे आणि त्याची दखल वेळीच घ्यायला हवी. ‘पडघम’, ‘तुमचे अमुचे गाणे’ आणि ‘अफलातून’ या नाटकाचे संगीत दिग्दर्शक आहेत आनंद मोडक. हे नवे मराठी संगीत नाटक भविष्यात नेमका काय आकार धारण करणार आहे, त्याचे भविष्य वर्तवणे शहाणपणाचे लक्षण नव्हे. पण जे विद्यमान नवे संगीत नाटक आकारास येत आहे, ते कुतूहलजनक आहे, एवढे म्हटले म्हणजे पुरे.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा