अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे!

मागील लेखात आपण राजारामशास्त्री भागवत यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. ‘मऱ्हाठय़ांसंबंधाने चार उद्गार’ हे त्यांचे पुस्तक १८८७ साली प्रकाशित झाले. त्यानंतर दोनच वर्षांनी मराठीतील आणखी एक महत्त्वाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. ते पुस्तक म्हणजे ‘मुंबईचा वृत्तांत’! बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे या लेखकद्वयांनी सिद्ध केलेले हे पुस्तक म्हणजे तत्कालीन मुंबईविषयी साद्यंत माहिती असणारा एक महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखकद्वयांनी लिहिले आहे-

‘‘कोणताही इतिहास लिहिणें आहे तर तो लिहिणारापाशीं अनेक साधनें असावीं लागतात. एक तर, ज्या देशाचा किंवा प्रांताचा इतिहास लिहावयाचा, त्याची पूर्ण माहिती ग्रंथकारास असली पाहिजे; तेथील अनेक वयोवृद्ध व अनुभवशीर अशा गृहस्थांचा त्याच्याशीं परिचय असला पाहिजे, व त्याने त्या कामीं साधनीभूत अशा अनेक ग्रंथांचें अवलोकन केलें पाहिजे. इत्यादि साधनांपैकीं आह्मापाशीं एकही पुरें साधन नसतां आम्हीं हें धाडसाचे आणि त्यांत मुंबईसारख्या वैभवशाली शहराचा वृत्तांत लिहिण्याचें काम हातीं कां घेतलें असा प्रश्न साहजिक उत्पन्न होईल. होय, प्रश्न अगदीं बरोबर आहे. आह्मींही पूर्ण जाणत आहों कीं, हें काम आमच्या शक्तीपलीकडे आहे हें खचीत तरी पण, यथाशक्ति प्रयत्न करून जी अल्पस्वल्प माहिती मिळविली ती तशीच दाबून न ठेवितां लोकांपुढें आणावी बरीवाईट कशी असेल ती त्यांचे ते पाहून घेतील; आणि आमचे दोष आह्मांस दाखवितील व तेणेंकरून दुसऱ्या कोणत्याही कामास हात घालण्यास आह्मांस उमेद देण्यास ते कारणीभूत होतील; एवढाच काय तो इतकें धाडस करण्याचा आमचा मुख्य उद्देश येथें असाही प्रश्न उद्भवण्याचा संभव आहे कीं, असल्या ग्रंथाचा उपयोग कोणता? तर, त्याचें उत्तर इतकेंच की, जर पुराणादि ग्रंथ आपल्या पूर्वजांनी लिहून ठेविले नसते तर, मागल्या काळांत कोणकोणत्या गोष्टी घडून गेल्या ह्य़ांचे अनुमान करण्यास आज आपणांपाशी कांहींच साधन राहिलें नसतें. आपल्या देशावर पूर्वी ज्या परकीयांनी अनेक स्वाऱ्या केल्या व त्यास धुळीस मिळविलें, अनेक वीरपुरुष होऊन गेले, अनेक साधुसंतांनीं ह्य़ा देशास आपल्या अस्तित्वानें पूत केलें इत्यादि गोष्टी जर इतिहास नसते तर आपणांस समजल्या असत्या काय?’’

वरील उद्देश समोर ठेवूनच ‘मुंबईचा वृत्तांत’ हे पुस्तक लिहिले गेले. त्या आधी मुंबईविषयी अशी माहिती देणारे मराठीतील पहिले पुस्तक १८६३ साली प्रकाशित झाले होते. गोविंद नारायण माडगावकर यांचे ‘मुंबईचें वर्णन’ हे ते पुस्तक. साहजिकच ‘मुंबईचा वृत्तांत’ लिहिताना माडगावकरांच्या या पुस्तकाचा आधार लेखकद्वयांनी घेतलाच, शिवाय ‘म्याक्लिन्स गाइड टु बॉम्बे’, ‘बुक ऑफ बॉम्बे’, ‘राऊंड अबाऊट बॉम्बे’, ‘इंडिया इन १८८०’, ‘मुंबईनो बहार- भाग १ ला’ आदी पुस्तकेही त्यांना संदर्भासाठी उपलब्ध होती, असे त्यांनी नमूद केले आहे. या साऱ्या अभ्यासातून लिहिल्या गेलेल्या ‘मुंबईचा वृत्तांत’मध्ये इ.स. १४०० पासून ते इ.स. १८८८ पर्यंतच्या कालखंडातील मुंबईचा इतिहास व लोकजीवनाची माहिती आली आहे. पुस्तकात सुरुवातीलाच ‘मुंबई’ या नावाच्या उत्पत्तीविषयी आलेली माहिती पाहा-

‘‘ह्य़ा बेटास फार प्राचीनकाळीं कोणतें नांव होतें ह्य़ाचा बरोबर शोध लागत नाहीं; तरी पण इ.स. १३१८ सालीं पहिला मुबारक बादशहा ह्य़ाची सत्ता ह्य़ा बेटावर होंती असें ह्मणतात; त्या वेळीं त्यानें आपलें नांव ह्य़ा बेटास दिले; ह्मणून मुबारख, ह्य़ावरून मुबारखपूर किंवा मुंबापूर असें नाव प्रचारांत आले असावें असा आमचा समज आहे, पुढें इ.स. १५३१ त ‘ऐला हा बोआ व्हिदा’ असे पोर्टुगिजांनी ह्य़ा बेटास नांव दिलेले वाचण्यांत येते. ह्य़ा नावांचा अर्थ ‘राहण्यास उत्तम स्थळ’ असा होतो. बंबाईम हेंही पण पोर्टुगिजांनींच मुंबईस नांव दिले होतें. ह्य़ा नांवाचा अर्थ बाम म्हणजे चांगले आणि बेहीआ ह्मणजे बंदर असा होतो. बोमेलो अथवा बांबेडक (बोंबील नांवाची मासळी) ह्य़ा शब्दांशीं आणि मुंबई ह्य़ा शब्दाशीं कांही संबंध असावा असेंही कित्येक ह्मणतात. आम्हांस हे ह्मणणे अंमळ सुयुक्तिक दिसतें. कारण ह्य़ा प्रकारचे मासे, मुंबई व तिच्या लगतच्या बंदरांखेरीज दुसरे कोठेही उत्पंन्न होत नाहींत असे ह्मणतात. टालमीनें मुंबईस ‘हेप्टेजिअन्’ आयलंडस् (सप्तद्वीप स्थळ) असें नांव दिलें होते, असाही लेख पाहण्यांत येतो. इसवी सनाच्या सोळाव्या शतकाच्या आरंभीं ह्य़ा बेटास ठाणें-मुंबई हें नांव होतें, असें यूल साहेब ह्मणतो. बाबरेसा साहेबाचें असें ह्मणणे आहे कीं, ह्य़ा नांवावरून पूर्वी सर्व कोंकणपट्टींतील राज्यांचा बोध होत असे. मुंबई किंवा मयांबू ह्य़ा नांवाशी माहिम ह्य़ा नांवाचा काही संबंध असावा असेंही कित्येक ह्मणतात. ब्रिग साहेब असें ह्मणतो कीं, पूर्वी ह्य़ा बेटाच्या कांही भागास माहिम व कांही भागास मुंबई असें ह्मणत. हें नांव येथील मुंबादेवीपासून मिळाले असावें असाही ह्य़ा साहेबाचा तर्क आहे. अंडरसन साहेब ह्मणतो- पूर्वी ह्य़ा सर्व बेटास माहिम हेंच नांव होते. तसेच, कर्नल साईक्स साहेब असे ह्मणतो कीं, मुंबई हें एक पार्वतीचें नांव आहे. कारण तिने मुम् नांवाचा राक्षक ह्य़ा बेटावर मारला होता ह्मणून ह्य़ा बेटास मुंबई हे नांव मिळालें.’’

१८८९ च्या फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकातील माहिती सात भाग व एक परिशिष्ट अशी विभागली गेली आहे. पहिल्या व दुसऱ्या भागात मुंबईची प्राचीन माहिती व इतिहास देऊन उर्वरित पाच भागांत अनुक्रमे मुंबईची लोकसंख्या, व्यापार, सरकार आणि उत्पन्न, शहराचे वर्णन, प्रसिद्ध इमारती आदी माहिती आली आहे. तर परिशिष्टात मुंबईतील शाळा-कॉलेजे, रस्त्यांची नावे, बँका, पुस्तकविक्रेते, वाचनालये, वर्तमानपत्रे, नियतकालिके आदींविषयीची अवांतर माहिती देण्यात आली आहे. मुंबईच्या आधुनिक जीवनाची लेखकद्वयांना असलेली जाण या साऱ्यातून दिसून येते. आधुनिकतेचा प्रत्यक्ष दैनंदिन जनजीवनाशी असलेला संबंध या पुस्तकाद्वारे अप्रत्यक्षरीत्या टिपला गेला आहे. समाजजीवनाविषयीची निरीक्षणं मांडताना बरीच नवी माहिती लेखकद्वयांनी पुस्तकात दिली आहे. मुंबईतील जातीजमातींविषयी पुस्तकात आलेली माहिती हे त्याचे एक उदाहरण. त्यातील हा काही भाग पाहा-

‘‘मुंबईतील मूळ जाती- पोर्टुगिजांचा अंमल सुरु होण्यापूर्वी खाली दिलेल्या पांच जातींची ह्य़ा बेटांत वस्ती होती. त्या जाती येणेप्रमाणें- १) ब्राह्मण (देशस्थ); २) सोमवंशी व सूर्यवंशी क्षत्रिय; ३) पाताणे परभू; ४) भंडारी; ५) मासे मारणारे कोळी मुंबईची मूळ वस्ती फक्त कोळी लोकांची. ह्य़ा संबंधी डाक्तर विलसन साहेबांचे असें ह्मणणें आहे की, – मुंबईचे मूळ रहिवाशी ह्मटले म्हणजे कोळी लोक हेच होत. ह्य़ा लोकांविषयी डाक्तर मजकूर अशी एक चमत्कारिक गोष्ट लिहितात कीं, पूर्वी फक्त ह्य़ाच लोकांपासून- मग ते कोणताही धंदा करीत असेले तरी – एक प्रकारचा कर (पोल टय़ाक्स) घेतला जात असे. ह्य़ा करास मराठींत ‘आगदेव’ म्हणत. ह्य़ा करासंबंधानें मशारनिल्हे साहेबांनीं एका इंग्रजी सरकारी दस्तैवजावरून लेख लिहिला आहे त्याचा मतलब असा आहे – ह्य़ा जातींतील प्रत्येक मुलगा १३ वर्षांचा झाला म्हणजे त्याजकडून सर्हु कराबद्दल सालिना एक रुपया; १४ वर्षांचा झाला कीं दोन रुपये; ह्य़ा प्रमाणे मुलगा १८ वर्षांचा होईतोंपर्यंत प्रत्येक वर्षांस एक रुपया अधिक असा कर घेतला जात असे. ह्य़ा वयापुढें ६-१-१३ इतका ठरींव कर घेतला जाई. अति वृद्धांस व १३ वर्षांच्या आंतील मुलांस कर नसे. इ.स. १८४२ त मुंबईत ९२२ आणि माहिमास १४१५ इतके कोळी होते. ह्य़ांत मुंबईचे कोळ्यांत १८ हून अधिक व माहिमचे कोळ्यांत १० हून अधिक जाती होत्या.

वर दिलेल्या जाती मुंबईत वसाहत करून राहिल्या होत्या व येथें वेळोवेळीं निरनिराळीं राज्यें होत गेलीं; तरी त्या वेळी ह्मणजे मुंबईच्या वसाहतीस जोर आला होता असें मुळींच झालें नाहीं; परंतु, पोर्टुगीजांचा अंमल ह्य़ा बेटावर बसल्या दिवसापासून थोडीशी ह्य़ा बेटाची व्यापाराच्या संबंधाने उच्च स्थिती होत गेली; त्यामुळें हळूहळू वस्ती वाढत जाऊन इंग्रजी अंमल झाल्या दिवसापासून तर, ती बरीच वाढत चालली. सुरतेचा व्यापार बंद होऊन मुंबईची भरभराटी झाल्यामुळें इ.स. १६४० चे सुमारास पारशी लोक सुरतेहून येऊन मुंबईत वसाहत करू लागले. इंग्रज लोकांनी पुणें घेतलें तेव्हांपासून ब्राह्मण व इतर दक्षणी लोक येथें येऊ लागले. घोडय़ांचा व्यापार चालू झाल्यामुळें आरब, कंदाहारी वगैरे लोक आणि फिरंग्याच्या कारकीर्दीपासून, किंबहुना इंग्रजी झाल्या दिवसापासून शिंपी लोक येथें येऊन राहूं लागले असें अनुमान होतें. सोनार लोक पोटरुगिजांचे कारकीर्दीपासून येथें आले असावे. इ.स. १५५० चे सुमारास शेणवी (सारस्वत ब्राह्मण) हे पोर्टुगिजांबरोबर ह्य़ा बेटांत आले. खत्री हे मूळचे चौल येथील राहणारे होते, तेही पोर्टुगिजांचे वेळी १६०० मध्यें आले. बेनीइस्रायल हे मूळचे आरबस्थान येथील राहणारे होते. तेथील राजाचे जुलैमामुळें इ. सनाच्या ६वे शतकांत ते हिंदुस्थानात आले व तेव्हापासून मुंबईत स्थायिक होऊन राहिले आहेत. यहुदी व बेनीइस्रायल हे एकच आहेत. मुसलमान लोक इ.स. १३०० च्या सुमारास आणि इ.स. १६९५ च्या सुमारास कामाठी लोक येथें आले असावे असें वाटतें. इ.स. १६७७ पासून वाणी लोक येथें येऊन राहूं लागले. असे मुंबईत अनेक जातींचे लोक आहेत व तेही अनेक देशांहून आले आहेत; तरी, त्यांच्यातील भेद पाहणारांच्या तेव्हांच लक्षांत येतो. असे अठरापगड जातीचे लोक अनेक वेळीं येऊन मुंबईत वसाहत करून राहिले आहेत..’’

माहिती-वर्णनपर पुस्तक असले तरी ‘मुंबईचा वृत्तांत’मधील भाषाशैली सौष्ठवपूर्ण व ठसकेबाज आहे. १९८० साली म. रा. साहित्य संस्कृती मंडळातर्फे बापूराव नाईक यांच्या विस्तृत व विवेचक प्रस्तावनेसह या पुस्तकाचे पुनर्मुद्रण करण्यात आले. मंडळाच्या संकेतस्थळावर ते आता पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. ते आपण आवर्जून वाचावे.

आचार्य व शिंगणे या लेखकद्वयांनी संयुक्तपणे लिहिलेले आणखी एक पुस्तक १८९३ मध्ये प्रसिद्ध झाले होते. लघुज्ञानकोशाच्या स्वरूपातील त्या पुस्तकाचे शीर्षक आहे- ‘माझे प्रिय पुस्तक अथवा व्यवहारदर्पण’. तर शिंगणे यांची स्वतंत्रपणे ‘यशवंत-विजया नाटिका’ (१८८७) व ‘कन्या-विक्रय-दुष्परिणाम’ (१८९४) ही दोन नाटके प्रकाशित झाली होती. असे असले तरी ‘मुंबईचा वृत्तांत’कर्ते हीच या लेखकद्वयांची खरी ओळख!

प्रसाद हावळे

prasad.havale@expressindia.com