मागील लेखात आपण गोडसे भटजींच्या ‘माझा प्रवास’विषयी जाणून घेतले. ‘माझा प्रवास’चे लेखन १८८३ मध्ये झाले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी मुंबईत ‘बॉम्बे हायस्कूल’ नावाची शाळा सुरू झाली. ती सुरू केली होती राजारामशास्त्री भागवत यांनी. मात्र आपली शिक्षणविषयक ध्येये या शाळेत पूर्ण होत नसल्याचे ध्यानात येताच, पुढे दोन वर्षांनी, १८८६ साली त्यांनी स्वजबाबदारीवर ‘मराठा हायस्कूल’ ही नवी शाळा सुरू केली. ती शाळा नावारूपाला यावी म्हणून भागवतांनी खूप मेहनत घेतली. शाळेसाठी इतिहास, चरित्रे व व्याकरण या विषयांची पुस्तके त्यांनी स्वत: तयार केली. या शाळेचे अनेक विद्यार्थी पुढील काळात नामवंत झाले. शाळेच्या कामात व्यग्र असतानाच भागवतांचा वाचनव्यासंग सुरू होताच, आणि सोबत अखंड लेखनही. त्यातील त्यांचे महत्त्वाचे लेखन म्हणजे ‘विविधज्ञानविस्तार’मधील ‘मऱ्हाठय़ांसंबंधाने चार उद्गार’ ही त्यांची लेखमाला. १८८५ मध्ये प्रसिद्ध झालेली ही लेखमाला दोन वर्षांनी पुस्तकरूपात प्रकाशित झाली. या पुस्तकात भागवतांनी महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी समाजाचा इतिहास आणि स्थितिगतीचा रोखठोक परामर्श घेतला आहे. या लेखनाविषयी भागवतांनी प्रस्तावनेत लिहिले आहे-

‘‘या विषयाच्या बाबतीत मी काही विशेष परिश्रम केला किंवा पुष्कळ वर्ष सतत उद्योग चालवला असे कोणीही समजण्याची जरुरी नाही. पूर्वीचा काळ उत्कर्षांचा कसा होता, हे मराठय़ांनी विसरता कामा नये. राजप्रकरणी व धर्मप्रकरणी पूर्वजांनी केलेले जे मोठे मोठे उद्योग आपणास प्राचीन लेखात प्रत्यक्ष दिसतात किंवा भाषादिक साधनसामग्री हाती घेतल्यास तत्क्षणी व्यक्त होतात, ते एव्हाच्या महाराष्ट्र मात्रानी- जसे ब्राह्मणांनी तसे अतिशुद्रान्त ब्राह्मणेतरांनी- सारखा अभिमान बाळगण्याजोगे आहेत. जितके आपण कालपुरुषाने कोरलेल्या इतिहासरुपी लेण्यात विचार करीत खोल शिरू, तितका आपणास या विषयाच्या संबंधानें जास्त प्रकाश मिळून आपल्या बुद्धिनेत्रास जसे काय सिद्धांजन मिळाल्यामुळेच पूर्वीच्या अपूर्व व लोकोत्तर घडामोडींचे चित्र सहज पहाण्यास मिळेल व ज्यांनी या सर्व घडामोडी घडवून आणिल्या त्यांच्याविषयी आपली पूज्यबुद्धी अधिकाधिक दृढ होईल; इतकेच नाही आपल्या पूर्वजांच्या सदुदाहरणाचे चित्र जेव्हा तेव्हा पुढे राहिल्याने ते हळूहळू आमच्या मनोमय आरशात चांगले प्रतिबिंबून, दुर्निवार भासणाऱ्या मोठय़ा मोठय़ा संकटांच्या समयी आमच्या आंगी नि:संशय विशेष अवसान व धैर्य येईल. तरी केवळ भूतकाळास घेऊन चालल्यास, आमच्या हातून काही निष्पन्न व्हावयाचे नाही. भूतकाळाची व वर्तमानकाळाची व्रजलेपाने पडलेली सांगड जेव्हा घालून दिली जाईल, तेव्हाच महाराष्ट्र-मंडळ कृतकृत्य होईल व बरीच खरी स्वप्ने आमच्या लोकास पडतील.’’

पुस्तकाच्या पहिल्या भागात प्राचीन व मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे निरूपण मांडून, दुसऱ्या भागात अर्वाचीन काळाविषयी धर्म, भाषा व सामाजिक स्थितीचा धांडोळा घेत आपले विचार भागवतांनी निर्भीडपणे मांडले आहेत. त्यातील मराठी भाषेच्या विकासाचे वर्णन करणारा हा काही भाग पाहा-

‘‘मऱ्हाटे कितीही इंग्रजी झाली व ती कितीही दिवस चालली तरी आपल्या भाषेस ह्मणून कधीही विसरणार नाहीत. शालिवाहन वंशापासून तर भाषा न विसरण्याचा गुण त्यांच्यामध्ये अगदी मुरलेला दिसतो. कधीही खरोखरी एकत्र स्वस्थ न बसणे हा मऱ्हाठय़ांचा, जसा सोन्याचा पिवळेपणा तसा, एक आंगचा धर्म आहे. जे लोक होतकरू असतात व या भूपृष्ठावरून आपला उठाव कोणीही करू शकू नये ह्मणून एकसारखे जपत असतात, त्या सर्वामध्ये हा आंगचा धर्म आहे. जे लोक एकत्र स्वस्थ बसत नाहीत त्यास पसरता पसरता स्वेच्छेने किंवा यदृच्छेने अनेक लोकाबरोबर व्यवहार करावे लागतात, व जिवंत झऱ्याच्या पाण्याची वाहता वाहता जशी त्या त्या प्रकारच्या जमिनी बरोबर योग होऊन रूचि पालटते, तशी त्यांच्या भाषेची ढबही थोडी बहुत बदलते, हे खरे आहे; तरी स्वरूप पाहून बदलत नाही. शालिवाहनाच्या वेळची प्राचीन मऱ्हाठी व अर्वाचीन मऱ्हाठी या भाषा विचाराअंती अंतरत: एकच ठरतात. आतील वृत्ती एक असता बाहेरील वृत्ती निराळी दिसते त्याचे कारण, जसजशी गरज पडली व सवड सापडली तसतसे, जशी त्यांच्यात देशातील महानदी गोदावरी क्षुद्र नद्यांस व ओढय़ांस आत ओढून स्वमय करून सोडिते त्याप्रमाणे, मऱ्हाठय़ांच्या भाषेने कित्येक स्थलविशेषातील क्षुद्र भाषास व महाभाषातील शब्दास आपणामध्ये ओढून घेतले, हे. कोणतीही महाभाषापद पावलेली भाषा घ्या. जोपर्यंत ती जिवंत असते तोपर्यंत, जसा या आपल्या सचेतन शरीरलतिकेस तसा, तिच्यात हळूहळू आपणास नकळत पालट झाल्याशिवाय रहात नाही; व अशा रीतीने पालट होणे हेच भाषेच्या जिवंतपणाचे मुख्य लक्षण. ज्ञानेश्वरीत फारसी शब्द मुळीच नाहीत. या काळाच्या पूर्वी सुमारे अडीचशे किंवा तीनशे वर्षे, शालिवाहन वंशाच्या पाठी ब्राह्मणांच्या योगाने आलेली संस्कृत भाषा व प्राचीन मऱ्हाठी या दोन भाषा मिळून, अर्वाचीन मऱ्हाठीचे स्वरूप ओतले. पुढे अविंधांची मुसळधार महाराष्ट्र मंडळावर कोसळली, तेव्हा फारसी भाषेने मऱ्हाठीच्या वृत्तीत पुष्कळ पालट केला, हा पालट किती झाला हे पहाणे असल्यास थोरल्या राजारामाच्या वेळचे कृष्णाजी अनंत सभासदाने केलेले शिवचरित्र हातात घ्यावे. महाराष्ट्र देशात शेकडो वर्षे सत्ता सगळी पेशवाई होईपर्यंत देशावरच्या लोकांच्या हाती होती. ती पेशवाईने कोकणातल्या लोकांच्या हाती आणिली व त्यामुळे कोकणातल्या लोकांचे महाराष्ट्र देशात पिकले. एव्हा महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची व पुस्तकांची मऱ्हाठी प्राय: कोकणी मऱ्हाठी असते. ही कोकणी छाया मऱ्हाठीवर पडली ती आता कायम झाली. इंग्रजी भाषेचा अम्मल हल्ली मऱ्हाठीवर किती बसला आहे, हे तर आपण प्रत्यक्ष पहातो. तेव्हा क्षणभर जरी अशी कल्पना केली की रूस लोकांनी आमच्या प्रिय महाराष्ट्र देशाचे आक्रमण केले किंवा आह्मा मऱ्हाठय़ासच अनेक अचिंत्य कारणांनी परागंदा व्हावे लागले, तरी फार झाले तर भाराभर रूस शब्दास आह्मी आत ओढू किंवा ज्या देशात वसाहत करू त्या देशातील भाषेच्या योगाने आमच्या मऱ्हाठीची बाह्य़ वृत्ति पालटेल. पण पारशाप्रमाणे आह्मी आमच्या प्रिय मऱ्हाठी भाषेस कधीही विसरणार नाही.’’

मराठय़ांच्या इतिहासाविषयीच्या पुस्तकांमध्ये भागवतांचे हे पुस्तक न टाळता येण्यासारखे आहे. रूढार्थाने ते इतिहासकार नसले तरी इतिहासाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी निश्चितच स्वतंत्र होती. आपल्या समकाळाचा विवेक राखत त्यांनी इतिहासविषयक लेखन केले आहे. त्यामुळेच ‘हिंदुस्थानचा छोटा इतिहास’ (१८८७), ‘शिवछत्रपतींचे चरित्र’ (१८९२), ‘शिवछत्रपतींच्या चरित्रांतील कित्येक मुद्दे’ (१८९३), ‘संभाजीचें चरित्र’ (१८९६) ही त्यांची पुस्तके छोटेखानी असली तरी महत्त्वाची ठरतात. इतिहासविषयक लेखनाबरोबरच धर्म व वेदविषयक लेखनही त्यांनी केले आहे. त्या वेळच्या ‘केरळ कोकिळ’, ‘विविधज्ञानविस्तार’, ‘इंदुप्रकाश’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘पुणे वैभव’ अशा अनेक नियतकालिकांतून त्यांचे विपुल लेखन प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी तत्त्वज्ञानापासून कथा-काव्यापर्यंत, विज्ञानापासून ज्योतिषापर्यंत, संस्कृतीपासून भाषेपर्यंत अशा विविध विषयांवर लिहिले आहे. ‘विविधज्ञानविस्तार’च्या डिसेंबर-१८९८च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखातील हा काही भाग पाहा-

‘‘पूर्वीचे क्षत्रिय मांसमासळी खात होते, दारूही पीत होते. लढाईस जाण्याचे पूर्वी क्षत्रियांचें वीरपण म्हणजे दारू पिणें पहिल्यानें होत असे. जर ब्राह्मणांच्याही स्त्री पितरांस ‘सुरा’ लागत असे, तर, ब्राह्मणांच्या बायका तरी दारू पिणाऱ्या ठरूं पाहतात. एके बाजूस ब्राह्मण दुसरे बाजूस क्षत्रिय वैश्य यांच्यामध्यें खाण्यापिण्याचे अंतर होतेंसें म्हणण्यासमजण्यास अलीकडच्याही स्मार्त सारस्वतांत आधार नाहीं; तर तो पलीकडच्या स्मार्त सारस्वतांत कोठून असणार? अध्यापन, प्रतिग्रह, याजन- हीं तीन कर्मे मात्र ब्राह्मणांस जास्त होतीं, एऱ्हवीं ते व क्षत्रिय वैश्य यांच्यामध्यें आणखी दुसरा भेद आढळत नाहीं. पण श्राद्धयज्ञांतलीही हिंसा ज्या दिवशीं किंवा ज्या काळीं बंद करण्यांत आली, तेव्हांपासून ब्राह्मण नांवानें ब्राह्मण पण करणीनें पक्के बौद्ध किंवा पाखंडी बनले; अर्थातच मांसमासळी खाणें आणि दारू पिणें हें अनाचाराचे लक्षण ठरवण्यात आलें आणि असला अनाचार करणाऱ्या लोकांचें युग पूर्वीचे समजून चालू युग आचाराचें समजण्याचा सम्प्रदाय पडला. ‘भट सांगेल ती अंवस’ ही म्हण किती तरी सार्थ आहे. काळोखाच्या युगांत ज्या भटांच्या हातीं समाजाची कळ आली, त्यांचें अध्ययन व ज्ञान हीं तितपतच होतीं. जसा ‘आंधळ्यांमध्यें काणा राजा’ तसा समाजामध्यें आचारविचाराच्या संबंधानें भट पुढारी झाला. मांसमासळीशीं किंवा दारूशीं संबंध न ठेवणारा भट ब्राह्मण म्हणवून स्वत:स सोंवळा आणि मांसमासळीशीं किंवा दारूशीं संबंध ठेवणारास ओंवळा समजूं लागला. अर्थातच या प्रकारचा ओंवळेपणा हें सोंवळ्या भटाच्या दृष्टीनें शूद्राचें लक्षण ठरलें. अशा प्रकारची सामाजिक घडामोड झाल्यानंतर किंवा चालली असतां शिवाजी जन्मला. आजचे ब्राह्मणही त्यांच्या काळोखी मनूमधल्या पूर्वजांप्रमाणें नांवानें जरी ब्राह्मण म्हणवीत असले, तरी करणीनें पक्के बौद्ध किंवा पाखंडी बनलेले आहेत. त्यांस काळोखी मनूमध्यें पडलेल्या रूढीपुढें दुसरें कांहीं दिसत नसते व नकोही आहे. त्यांस श्रुति नको, स्मृति नको, पुराण नको- रूढीच्या पलीकडे आणखी कांहीं नको. यांच्या खुळचट रूढीच्या आड शास्त्र आलेलें दिसलें म्हणजे यांच्या आंगाचा तिळपापड होतो. ‘न मांसभक्षणे दोषो न मद्ये’ म्हटलें कीं या सोंवळेम्मन्य पक्क्या पाखंडय़ांनीं तोंड सोडलें. हेच सोंवळम्मन्य पक्के पाखंडी मराठी क्षत्रिय वैश्यांची मुंज करण्यास तयार नसतात, आणि आंतून त्यास हीन मानून त्यांचा द्वेष करतात. कोठें ही गेलें, तरी पळसास पानें तीन; यांस सुरेख इंग्रजी शिक्षण मिळालेलें असलें तरी हे पक्के पाखंडी ते पाखंडी.

आज रूढीचें पक्के पाखंड नको आहे, शास्त्राची बिनतोड जोत हवी आहे. रूढीचें पाखंड आज फिक्के पडलें आहे ज्यांस ब्राह्मणी धर्माचा आणि शास्त्राचा अभिमान असेल, त्यांनीं आतां बऱ्याच निश्चयानें हातभार लावला पाहिजे. रूढीचा काळ गेला. आजचा दिवस रूढीचा खास नव्हे. आम्हांस आज श्रुति हवी आहे, स्मृति हवी आहे, पुराण हवें आहे.. सगळें शास्त्र हवें आहे. शास्त्राची ज्योत जितकी पेटेल तितका उजेड अधिक पडेल. तर मग नको काय? अलबत आहे. रूढि नको आहे. रूढिचा काळोख नको आहे. आजपर्यंत काळोख पुष्कळ झाला. आतां शास्त्राचा शांतपणें व पोक्तपणें अर्थ हवा आहे. हें सगळें काम इंग्रजी असल्यामुळें व इंग्रजी शिक्षणाचा उजेड पुष्कळ ब्राह्मणांच्याही हृदय खिंडींत पडल्यामुळें आज बरेंच हलकें झालें आहे. तर सरते शेवटी- इदं याचे मदुक्तानि विचारयत सादरम्’’

भागवतांच्या हयातीत त्यांची चाळीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यातील जवळजवळ सर्वच आज उपलब्ध आहेत. दुर्गाबाई भागवत यांनी संपादित केलेले व वरदा प्रकाशनाने प्रकाशित केलेले राजारामशास्त्रींच्या निवडक साहित्याचे सहा खंड तर वाचकांनी आवर्जून वाचायला हवेत. त्यातून राजारामशास्त्रींच्या लेखनाची सारी वैशिष्टय़े पाहायला मिळतात.

वाङ्मय अभ्यासक गं. दे . खानोलकर यांनी राजारामशास्त्रींच्या लेखनाविषयी त्यांच्या ‘मराठी वाङ्मयसेवक- खंड ४’मध्ये लिहिले आहे-

‘‘भागवतांचे समाजसुधारणाविषयक लेखन वाचलें असतां त्यांतील विचार शास्त्रशुद्धतेपेक्षां मानवतेलाच प्राधान्यानें अनुसरत असलेले आढळतात, कित्येकदा सहानुभूतीचा अतिरेकही झाल्याचा भास होतो. ते स्वत:ला विवेकवादी मानीत असले, तरी कित्येकदा ते पूर्वग्रहांच्या व भावनेच्या आहारी गेलेले आढळतात. पण समाजकल्याणासंबंधींची त्यांच्यांतील तळमळ व उत्कटता त्यांच्याबद्दल एकप्रकारचा सहानुभाव व आदर उत्पन्न करतात. टिळक-आगरकरांच्या काळांत आपला स्वतंत्र बाणा राखून अनेक विषयांवर कित्येकदां भिन्न वा प्रक्षोभक मत व्यक्त करणारा स्वाध्यायनिरत वैचारिक आंदोलक म्हणून मराठी वाङ्मयांत शास्त्रीबोवांचे स्थान महत्त्वाचें आहे.’’

संकलन : प्रसाद हावळे

prasad.havale@expressindia.com