मागील लेखात आपण हरि नारायण आपटे यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. १८९० साली त्यांनी ‘करमणूक’ हे नियतकालिक सुरू केले आणि पुढील दोन दशकभरात मराठीतील महत्त्वाच्या कादंबऱ्याही लिहिल्या. याच सुमारास, म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात आणखी एका लेखकाचे नाव चर्चेत आले. ते होते-शंकर बाळकृष्ण दीक्षित. हरिभाऊंप्रमाणे दीक्षित यांनी कादंबऱ्या किंवा इतर विपुल स्फुट लेखन केले नसले तरी ज्योतिषशास्त्रावरील त्यांच्या दोन ग्रंथांमुळे त्यांचे नाव जागतिक स्तरावर घेतले गेले व जाते. त्यातील पहिला ग्रंथ होता- ‘ज्योतिर्विलास अथवा रात्रीची दोन घटका मौज’. १८९२ च्या सप्टेंबरमध्ये तो प्रसिद्ध झाला. या ग्रंथाविषयी लोकमान्य टिळकांनी अभिप्राय दिला होता, तो असा-
‘‘विश्वाची रचना, त्याचें अनंतत्व व तत्संबंधी कधींही न ढळणारे नियम यांबद्दलचे प्राचीन व अर्वाचीन ज्योतिष्यांचे विचार एकवटून सोप्या व मनोरंजक भाषेनें महाराष्ट्र वाचकांस समजून देण्याचें काम याप्रमाणें आजपर्यंत कोणींच केलें नव्हतें. इंग्रजींत ‘पॉप्युलर अस्ट्रॉनमी’ नामक ज्योति:शास्त्रावर ज्या नमुन्याचीं पुस्तकें होतात त्याच नमुन्यावर मराठींत हा ग्रंथ रचला आहे.’’
.. तर हे पुस्तक फलज्योतिषाची भलामण करणारे नसून आज ‘खगोलशास्त्र’ म्हणून आपण ज्या विद्याशाखेला ओळखतो तिचा तत्कालीन आढावा घेणारे आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत शं. बा. दीक्षित यांनी लिहिले आहे-
‘‘ज्योति:शास्त्राचीं लहान मोठीं बरींच पुस्तकें मराठींत असतां या ग्रंथाचे प्रयोजन काय असें सहज कोणी म्हणेल. त्यास एक तर मराठींत जीं पुस्तकें आहेत ती सर्व केवळ विद्यार्थ्यांकरितां लिहिलेलीं आहेत. ज्योति:शास्त्र हा विषयच स्वभावत: मनोहर आहे; तथापि तीं पुस्तकें सामान्य वाचकांस उपयोगी आणि मनोरंजक व्हावीं एवढय़ाच उद्देशानें लिहिलेलीं नसल्यामुळें तीं तशीं नसणें साहजिक आहे. दुसरें असें कीं, ज्योति:शास्त्र हें जागरूक शास्त्र आहे. व त्यासंबंधें नवे नवे शोध प्रत्यहीं लागत आहेत. मराठींतलीं पुस्तकें कोणत्या ना कोणत्या तरी इंग्लिश पुस्तकांची बहुधा निव्वळ भाषांतरें आहेत. त्यांचीं मूळ पुस्तकें कांहींचीं तर इ. सन १८५० किंवा १८६० च्या पूर्वीची व दोन-तिहींचीं बहुधा दहावीस वर्षांच्या पूर्वीचीं असल्यामुळें व त्यांचा मूळ उद्देश कमी व्यापक असल्यामुळें कालानुगामित्व आणि विषयवैचित्र्य हे गुण साहजिकच कमी असणें संभवतें. म्हणून सामान्यवाचकोपयोगित्व, मनोरंजकत्व, कालनुगामित्व आणि विषयवैचित्र्य हे गुण पुस्तकांत आणण्याचा उद्देश मुख्यत: धरून तशा प्रकारच्या अनेक पुस्तकांच्या अवलोकनानें हें पुस्तक रचिलें आहे.’’
या पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात दीक्षित यांनी आकाशात घडणाऱ्या घटना, बदल यांच्याविषयी इतिहासकालापासून असणारे समाजमानस सांगून पुढील भागात ग्रह, उल्का, धुमकेतू, ग्रहणे, तारका, पंचांग यांची माहिती दिली आहे. त्यातील ‘आकाशस्थ ज्योतींविषयीं लोक आजपर्यंत काय म्हणत आले?’ या प्रकरणातील हा भाग पाहा-
‘‘लोक काय म्हणणार? जें दिसतें तें म्हणणार, दुसरें काय? परंतु वस्तुमात्राची स्थिति जशी दिसते तशीच वास्तविक असते असा नियम नाहीं. कधीं कधीं चर्मचक्षूंस एक दिसतें, ज्ञानचक्षूंस दुसरें वाटतें. चर्मचक्षूंस जें दिसतें तेंच खरें असा प्रथम ग्रह होतो. परंतु कालांतरानें ज्ञानचक्षूंस वास्तवज्ञान होतें. पहाटेस उठून पहावें तों अंधकार जाऊन थोडा थोडा उजेड पडूं लागतो. पृथ्वी सपाट असून आकाशास लागलेली दिसते; तिच्या पूर्वबाजूस सूर्य उगवतो, आणि पश्चिमेस मावळतो. रात्रीं आकाशांत असंख्य तारा दिसतात. त्यांत चंद्र केव्हां तरी पूर्वेस उगवतो आणि पश्चिमेस मावळतो. तारांकडे कांही वेळ पहात बसलें तर त्या पूर्वेस उगवून पश्चिमेस मावळतात असें दिसतें. चंद्र एकादे दिवशीं सूर्यास्ताबरोबर पूर्वेस उगवला तर सकाळीं सूर्योदयाबरोबर मावळत नाहीं; कांहीं वेळानें मावळतो. अर्थात् नक्षत्रांत तो मागें पडतो असें दिसतें. अशाच दुसऱ्या कांहीं तारा मागें पडतात. इतकें हें ज्योति:शास्त्राचे आरंभीचें ज्ञान. हें होण्यासही मनुष्योत्पत्तीनंतर बराच काळ लोटला असला पाहिजे. वस्तुमात्राचें बराच काळ अवलोकन झालें, तिजविषयीं अनेक प्रकारचे अनुभव आले, म्हणजे त्याच्या स्थितिविषयीं कांहीं नियम दिसून येतात. आणि कालांतरानें अशा नियमांचें शास्त्र बनतें. परंतु त्यापूर्वी कल्पनातरंगांचें प्राबल्य असतें. वस्तूंचें अवलोकन झालें कीं पुरें, लागल्याच कल्पना चालूं लागतात. कल्पनेला पाय टेकण्यास थोडीशी जागा सांपडली कीं तिचें आकाशांत उड्डाण सुरू होतें. कधीं कधीं तर पाय ठेवण्यासही आधार नसला तरी तिच्या भराऱ्या चालू होतात. जगाच्या आरंभीं कल्पनेचें साम्राज्य असलें पाहिजे हें उघड आहे. सकाळीं पूर्वेस उगवलेला सूर्य संध्याकाळीं पश्चिमेस मावळतो. तो जातो कोठें? दुसरें दिवशीं तोच सूर्य उगवतोसें कशावरून? असें मनांत येणें साहजिकच आहे. एकाहून जास्त सूर्य होण्याचें मूळ हेंच. कोणी बारा सूर्य कल्पिले. कोणी सूर्यचंद्र दोन दोन आहेत असें मानिलें. याप्रमाणेंच सूर्याला सहस्र नेत्र प्राप्त झाले. तो रथांत बसतो, त्याला सात घोडे आहेत, अशा कल्पना निघाल्या. चंद्रावरचा डाग पाहून त्यावर कल्पना चालल्या. कोणी म्हणतो त्यानें हातांत ससा घेतला आहे; कोणी म्हणतो हरिण धरिला आहे; कोणी तर एक मनुष्य चंद्रावर नेऊन बसविला आहे. आणि आमच्या एका नामांकित रसिक कवीनें तर बिचाऱ्या चंद्रास नलाच्या घोडय़ाकडून लात मारविली आहे. चंद्र सुमारें सत्तावीस दिवसांत सर्व नक्षत्रांतून एकदां क्रमण करितो. एकेक नक्षत्राच्या तारांशी त्याचा सुमारें एकेक रात्र समागम असतो. यावरून चंद्राच्या सत्तावीस स्त्रिया झाल्या. रोहिणी तारेशीं त्याचा समागम होतो, तेव्हां तो कधीं कधीं तिच्या फारच जवळ असतो. आणि कधीं तर ती निराळी दिसत नाहीं, इतका दोघांचा एकजीव झालेला दिसतो. यावरून चंद्राची रोहिणीवर अत्यंत प्रीति सिद्ध झाली. आणि पुढें तर तो इतर भार्यापेक्षां रोहिणीवर जास्त प्रीति करितो, या असम वर्तनानें त्यास क्षयरोगही लागला. सांप्रत पृथ्वीवरील अत्यंत सुधारलेलें असें राष्ट्र घ्या किंवा अति निकृष्टावस्थेंत असलेलें एकादें राष्ट्र पहा, सर्व लोकांमध्यें सूर्यचंद्रतारांविषयीं अशा प्रकारच्या कांहीं ना कांहीं तरी कल्पना आणि दंतकथा आहेतच.
दीर्घकालपर्यंत कल्पनेचें साम्राज्य झाल्यावर शास्त्राचा प्रादुर्भाव झाला. त्याचें हळूहळू प्राबल्य होऊं लागलें. पुढें दोहोंचा अधिकार समान झाला. आणि कांहीं कालानें तर शास्त्रानें सत्ता बळकाविली. सांप्रतच्या कालास शास्त्रयुग म्हटलें तरी चालेल. तथापि या युगांतही कल्पनेचा अधिकार समूल नाहींसा झाला आहें असें नाहीं. कल्पनेची सत्ता सर्वकाल चालणारच. मानवी मनास अत्यल्पायासानें आनंदसमुद्रांत नेऊन सोडणारी कल्पना कशी नाहींशी होईल? ती पाहिजेच.. ज्योतिषज्ञानास शास्त्राचें स्वरूप येईपर्यंत आकाशांतील ज्योतिंविषयीं मनुष्याच्या कल्पना कसकशा होत्या हें सांगूं लागलों तर त्या कल्पनातरंगांनीं आणि दंतकथांनीं एक मोठा ग्रंथ भरेल.’’
या पुस्तकाच्या आधी दीक्षित यांची ‘विद्यार्थिबुद्धिवर्धिनी’ (१८७६), ‘सृष्टचमत्कार’ (१८८२) ही दोन पुस्तके प्रसिद्ध झाली होती. तर नंतर त्यांनी ‘सोपपत्तिक अंकगणित’ (१८९७), मॅक्सम्युल्लरच्या व्याख्यानांवर आधारित ‘धर्ममीमांसा’ (१८९५-९७), ‘भारतवर्षीय भूवर्णन’ (१८९९) ही पुस्तके लिहिली. याशिवाय कालमापनासाठी सायनवादाचा पुरस्कार करत त्यांनी विसाजीपंत लेले व जनार्दन बा. मोडक यांच्या समवेत तब्बल बारा वर्षे सायनपंचांग चालवले.
मूळचे रत्नागिरीतील मुरुडचे असलेल्या दीक्षित यांनी पुढे शिक्षकी पेशा स्वीकारला. मात्र समांतरपणे त्यांचा व्यासंग सुरूच होता. संस्कृत व गणितावरील प्रभुत्वामुळे ज्योतिषशास्त्रावरील त्यांचे लेखन महत्त्वपूर्ण ठरले. १८९६ साली त्यांनी लिहिलेला ‘भारतीय ज्योति:शास्त्र’ हा ग्रंथराज तर जगभरात नावाजला गेला. या ग्रंथात दीक्षित यांनी वेदकालापासून एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या भारतीय ज्योतिषशास्त्राच्या विकासाची मीमांसा केली आहे. पंचांगशास्त्र व ज्योतिषशास्त्रासंबंधी केलेल्या साधार मांडणीमुळे हा ग्रंथ विद्वन्मान्य ठरला. पाश्चात्त्य विद्वानांनीही त्याची दखल घेतली. या ग्रंथातील हा उतारा पाहा-
‘‘मनुष्यांचे व्यवहार चालण्यास साधनीभूत अशीं कालगणनेचीं स्वाभाविक मानें दिवस, मास, वर्ष, हीं आकाशांतील चमत्कारांवरच अवलंबून आहेत. शेतकी चालण्यास ॠतूंचें ज्ञान फार अवश्यक आहे, तेंही सूर्यावर अवलंबून आहे. पर्जन्य सूर्याच्या योगानेंच पडतो. भरतीओहोटी चंद्रामुळें होतें. ईश्वरीक्षोभही आकाशस्थ तेजांच्याच कांहीं स्थितिविशेषादिकांवरून ईश्वर पूर्वी सूचित करितो असें वाटतें. इत्यादि कारणांमुळें मनुष्याचें लक्ष्य त्याच्या उत्पत्तीपासूनच ज्योति:शास्त्राकडे लागलें असावें हें उघड आहे. त्याप्रमाणेंच चंद्रसूर्य अमुक स्थितिमध्यें असतां शेतकी इत्यादिकांचें अमुक काम करावें लागतें, तर त्यांतही तें अमुक स्थितिविशेषीं केलें असतां कल्याणकारक होईल; उदाहरणार्थ, चंद्राचा अमुक नक्षत्राशी योग असतां धान्य पेरलें तर पीक उत्तम येईल; अमुक नक्षत्रीं पेरलें असतां बुडेल; सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे वळतो त्या दिवशीं म्हणजे अयनसंक्रांतीच्या दिवशीं अमुक कर्मे केलीं असतां हिताहितप्रद होतील; विवाहादि कृत्यें अमुक वेळीं केली असतां मंगलकारक होतील; आकाशांत दोन ग्रह जवळ जवळ समोरासमोर आले असतां त्यांचें युद्ध झालें व त्यांच्या कमजास्त तेजस्वितेवरून त्यांतून अमुक पराभव पावला असें मानून त्यावरून पृथ्वीवरील अमुक राजाचा जयपराजय होईल; अमुक कृत्यें केलीं असतां ग्रहणें, उल्कापात, केतु, इत्यादिकांनी दर्शित झालेल्या अनिष्टांची शांति होईल, अशा प्रकारचे ग्रह प्राचीन काळापासूनच मनुष्याचे झाले असावे. तसेंच सामान्यत: सर्व जगाच्या व्यवहाराशीं व चांगल्यावाइटाशीं जर आकाशस्थ ज्योतींचा संबंध आहे तर व्यक्तिमात्राच्या जन्मांत होणाऱ्या गोष्टींशीं त्यांचा संबंध असेल; अमुक मनुष्य जन्मला तेव्हां चंद्र, सूर्य, व ग्रह अमुक स्थितींत होते, तर त्यावरून व त्यांच्या वेळोवेळींच्या स्थितींवरून त्याच्या जन्मांत त्यास अमुक अमुक सुखदु:खें होतील, अशा कल्पना कांहीं काळाने होणें साहजिक आहे.
वरील गोष्टींचे तीन प्रकार होतात. किती दिवसांनीं महिना होतो, किती महिन्यांचें वर्ष, वर्षांचे दिवस किती, सूर्याचें दक्षिणायन किंवा उदगयन अमुक दिवसांपासून किती दिवसांनी होईल, अमुक ग्रह अमुक दिवशीं कोठें असेल, ग्रहण कधी होईल, ह्य़ा गोष्टींचा संबंध गणिताशीं येतो. हा एक प्रकार. ग्रहणें, केतु, ग्रहयुद्धें इत्यादिकांपासून जगताच्या शुभाशुभाचें ज्ञान इत्यादि व अमुक दिवशीं विवाहादिक अमुक कृत्यें केलीं असतां तीं शुभाशुभ फलप्रद होतील इत्यादि, हा दुसरा प्रकार. व व्यक्तिविशेषाच्या जन्मस्थितीवरून व नेहमींच्या ग्रहस्थितीवरून त्याच्या जन्मांत त्यास होणारें सुखदु:ख हा तिसरा प्रकार. याप्रमाणें ज्योति:शास्त्राच्या ह्य़ा तीन शाखा (स्कंध) आहेत असें म्हणण्यास हरकत नाहीं.
आपल्या ज्योति:शास्त्राच्या प्राचीन व अर्वाचीन ग्रंथांत ज्योति:शास्त्राचे हेच तीन स्कंध मानलेले आहेत. पहिल्यास गणित, दुसऱ्यास संहिता, आणि तिसऱ्यास होरा किंवा जातक म्हणतात. गणितास सिद्धांत असेंही म्हणतात.’’
ज्योतिषशास्त्रावरील दीक्षित यांचे लेखन टाळून या विषयाचा अभ्यास होऊ शकत नाही, इतके ते मूलभूत आहे. आणि ते मूळ मराठीत लिहिले गेले याचा अभिमान वाटल्यावाचून राहात नाही. दीक्षित यांचे हे लेखन आजही उपलब्ध आहे, ते आपण आवर्जून वाचावे.
संकलन : प्रसाद हावळे
prasad.havale@expressindia.com