मागील लेखात आपण शंकर बाळकृष्ण दीक्षित यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. दीक्षित यांचे ‘ज्योतिर्विलास’ हे पुस्तक १८९२ मध्ये आले. पुढे दोन वर्षांनी, १८९४ च्या जानेवारीत पुण्यात विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी ‘भाषांतर’ हे मासिक सुरू केले. स्वदेश, स्वभाषा व स्वसंस्कृती यांचे संवर्धन करण्याच्या भूमिकेतून सुरू झालेल्या या मासिकाच्या उद्देशाविषयी राजवाडेंनी लिहिले होते-

‘‘.. आपल्या या महाराष्ट्राची भाषा इंग्रजी किंवा उर्दू होईल असा कित्येकांचा तर्क धांवतो; परंतु तो केवल भ्रमात्मक आहे. त्या भाषांची ठेवण, बांधणी, स्वरूप व रचना आपल्या ह्य़ा भाषेहून अगदीं भिन्न असल्यामुळें असा चमत्कार घडून येण्याचा बिलकूल संभव नाहीं. मराठी हीच आपली जन्माची भाषा राहणार. हिच्याच हयातींत आपण उदयास येऊं व हिच्याद्वारें इतर राष्ट्रांना कालांतरानें धाडसाचे धडे आपण शिकवूं. देशाचा, धर्माचा व आचारांचा खरा अभिमान जागृत राहण्यास बोलणें, चालणें, लिहिणें, शिकणें व विचार करणें मराठींत झालें पाहिजे. त्याशिवाय कर्तव्याचा पक्का व कायमचा ठसा आपल्या मनावर उमटावयाचा नाहीं. जगतावर जे विचार आज प्रचलित झालेले आहेत, ते सर्व मराठी भाषेंत उतरल्यास मात्र लोकांस ते यथास्थित समजतील असें आमचें ठाम मत आहे. हा हेतु सफल करण्याचे मार्ग दोन आहेत. स्वतंत्र लेख लिहिणें हा पहिला; व अन्य भाषांतील उत्कृष्ट विचारांचे तर्जुमें मराठींत करणें हा दुसरा. ह्य़ांपैकीं दुसऱ्याचें अवलंबन आम्हीं प्रस्तुतस्थलीं केलें आहे.

भाषांतरापासून अनेक फायदे होतात. भिन्न देशांत, भिन्न काळीं, ज्या भिन्न ग्रंथांच्या वाचनानें समाजावर महत्कार्ये घडलेलीं असतात, ते ग्रंथ जसेच्या तसे भाषांतर केले असतां स्वदेशांतील समाजावर तशीं किंवा त्यासारखीं कार्ये घडून येण्याचा साक्षात् किंवा परंपरया संभव असतो. तसेच उत्तमोत्तम ग्रंथ स्वभाषेंत आयतेच तयार होतात व स्वभाषेची सुसंपन्नता पाहून देशांतील लोकांस उत्तरोत्तर अभिमान वाटूं लागतो. परकी लोकांनाही आपल्या भाषेसंबंधीं धि:कारपूर्वक बोलण्याची पंचाईत पडते; व आपल्या देशाची व आपल्या भाषेची निंदा आपल्या तोंडावर जसजशी कमी होत जाते तसतसा आपल्यालाही आपल्या सामर्थ्यांचा कैवार घ्यावासा वाटतो. येणेप्रमाणें, एकदां अभिमान उत्पन्न झाला म्हणजे पुढील पिढींतील तरुण जनांच्या परिस्थितींत त्याचा सर्वत्र संबंध येऊन, राष्ट्रांतील प्रतिभा जागृत होते; आणि साहसाचीं व मर्दुमकीचीं कृत्यें करणारे पुरुष चोहोंकडे दृष्टीस पडतात.’’

हे मासिक पुढे केवळ ३७ महिनेच सुरू राहिले, तरी एवढय़ा काळात त्यात ‘प्लेटोकृत फीडो अथवा आत्म्याचे अमरत्व’, ‘साक्रेटिसाचें स्वमतसमर्थन’, ‘मिल्लकृत जनपदहितवाद’ आदी एकूण पंधरा पूर्ण ग्रंथ व  ‘शांकरभाष्य’, ‘रोमन पातशाहीचा ऱ्हास व नाश’, ‘आरिस्टाटलची राजनीति’ इत्यादी आठ ग्रंथ अपूर्ण स्वरूपात प्रसिद्ध झाले.

राजवाडे यांचा जन्म कुलाब्यातील वरसईचा. मात्र त्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य तीन-चार पिढय़ांपासून पुण्यातच होते. वडगाव, पुणे, मुंबई व पुन्हा पुणे अशा विविध ठिकाणी आर्थिक ओढगस्तीत त्यांचे शिक्षण झाले. नंतर काही काळ त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नोकरीही केली. या सर्व काळात त्यांचा व्यासंग सुरू होताच.

विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे निबंध, ‘काव्येतिहाससंग्रह’ हे मासिक व परशुरामपंत तात्या गोडबोले यांचे ‘नवनीत’ यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्या प्रभावातूनच त्यांनी इतिहासविषयक अस्सल साधने जमा करण्यास प्रारंभ केला. ‘भाषांतर’ मासिक सुरू असतानाच, १८९५-९६ च्या सुमारास राजवाडे यांचे वाई येथील विद्यार्थी- काकाराव पंडित यांना पानिपतच्या लढाईशी संबंध आलेल्या गोविंदपंत बुंदेल्याचा अस्सल पत्रव्यवहार मिळाला. ही बाब राजवाडे यांना कळताच, ते वाईला गेले व त्यांनी ते सर्व दफ्तर वाचून, त्यातील महत्त्वाची माहिती नकलून पुण्याला परतले. या अस्सल साधनांचा विस्तृत विवेचक प्रस्तावनेसह ‘मराठय़ांच्या इतिहासाचीं साधनें’ या शीर्षकाचा खंड त्यांनी प्रसिद्ध केला. या खंडामुळे एक इतिहास संशोधक म्हणून राजवाडे यांची ख्याती झाली. पुढील काळात अशी अस्सल साधने जमा करण्यासाठी त्यांनी देशभरात विविध ठिकाणी प्रवास केला. ठिकठिकाणची ऐतिहासिक कादगपत्रे जमा करणे, त्यांचे रक्षण करणे व त्यांचे संपादन करून ती प्रसिद्ध करणे हे काम त्यांनी पुढील जवळपास दोन दशकभर अपार निष्ठेने केले. त्यातून १८९८ ते १९१७ या काळात ‘मराठय़ांच्या इतिहासाचीं साधनें’चे २२ खंड प्रसिद्ध झाले. दरम्यान, त्यांनी पुढाकार घेऊन १९१० मध्ये पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापनाही केली. ‘राजवाडे लेखसंग्रह’च्या ‘ऐतिहासिक प्रस्तावना’ या पहिल्या भागात आलेला हा राजवाडे यांच्या इतिहासदृष्टीचा प्रत्यय देणारा उतारा पाहा-

‘‘मराठय़ांच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांनीं खालील कलमें लक्ष्यांत बाळगिली पाहिजेत.- १) कोणताहि पूर्वग्रह घेऊन इतिहास किंवा चरित्रें लिहावयास लागूं नये. आतांपर्यंत लिहिलेल्या बहुतेंक चरित्रांतून हो दोष ढळढळीत दिसून येतो. महादजी शिंदे, गोविंदपंत बुंदेले, परशरामभाऊ पटवर्धन, बापू गोखले, पहिला बाजीराव, वगैरे सर्व सेनानायक एकासारखे एक अप्रतिम योद्धे होते असा त्या त्या ग्रंथकारांचा सांगण्याचा झोंक असतो. आतां पहिल्या बाजीरावाच्या बरोबरीला ह्य़ांपैकीं एकहि योद्धा बसवितां येणार नाहीं हें उघड आहे. तसेंच बाजीरावाच्या खालोखाल महादजीच्या तोडीचा ह्य़ांत एकहि सेनापति नाहीं. परशरामभाऊ पटवर्धन दुय्यम प्रतीचा सेनानायक होता असें मला वाटतें. गोविंदपंत बुंदेले व बापू गोखले हे कनिष्ठ प्रतीचे सेनापति होत. हें कोणीहि समंजस मनुष्य कबूल करील. बापू गोखल्यानें तर कोण्या एका गोऱ्याचें सर्टिफिकेट घेऊन ठेविलें होतें! सर्टिफिकेटय़ा सेनापतीची किती किंमत करावयाची तें मुद्दाम फोड करून सांगितली पाहिजे असें नाहीं! हें सेनापतित्वासंबंधीं झालें. कित्येकांचा पूर्वग्रह मराठे सर्व प्रकारें श्रेष्ठ होते असें दाखविण्याचा असतो; कित्येकांचा ह्य़ाच्या उलट असतो. तेव्हां पूर्वग्रहांना टाळा देणें ही मुख्य गोष्ट होय. २) भरपूर अस्सल माहिती मिळाल्याशिवाय चरित्र किंवा इतिहासाचा भाग लिहिण्याचा खटाटोप करूं नये. ३) तशांतूनहि लिहावयाचा संकल्पच असेल तर आपल्याला माहिती कोणती नाहीं तें स्पष्ट लिहावें. अस्सल भरपूर लेखसंग्रह जवळ असल्यावांचून जो कोणी इतिहास लिहावयाला जाईल त्याला माहिती नाहीं असा शेरा पुष्कळच प्रसंगांसंबंधीं द्यावा लागेल. ४) अस्सल भरपूर माहितीवरून कांहीं सिद्धांत काढावयाचा तो काढावा. हें चवथें कलम पहिल्या कलमाचेंच एका प्रकारचें रूपांतर आहे अशी समजूत होण्याचा संभव आहे; परंतु तसा प्रकार नाहीं. पहिल्या कलमांत पूर्वग्रहप्रधान पद्धतीचा निर्देश केला आहे व ह्य़ा चवथ्या कलमांत पश्चाद्ग्रहप्रधानपद्धतीचा निर्देश केला आहे. पूर्वग्रह मनसोक्त काढिलेलाच असतो. पश्चाद्ग्रह अस्सल भरपूर आधारांतून जात्या जो निघेल तोच घ्यावयाचा असतो.’’

ऐतिहासिक साधनांच्या संशोधन-संपादनाबरोबरच राजवाडे यांनी इतर विविध विद्याशाखांमध्ये मुशाफिरी केली. त्यात समाजशास्त्र आणि भाषाशास्त्र ही दोन महत्त्वाची क्षेत्रे होती. ‘राधामाधवविलासचंपु’, ‘महिकावतीची बखर’, ‘ज्ञानेश्वरी’ यांच्या प्रस्तावना व ‘मराठी धातुकोश’, ‘नामादि शब्द-व्युत्पत्तिकोश’ यांतून त्यांचा या क्षेत्रातील आवाका दिसून येतो. याशिवाय त्यांनी वाङ्मयविषयक काही निबंधही लिहिले. ‘कादंबरी’ या १९०२ साली त्यांनी लिहिलेल्या निबंधातील हा काही भाग पाहा-

‘‘गेल्या ऐंशी वर्षांत महाराष्ट्रांत जे गद्य ग्रंथ झाले, त्यांत संख्येच्या मानानें कादंबऱ्यांना अग्रस्थान देणें जरूर आहे. युनाईटेड् स्टेट्स, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया, इटली वगैरे पश्चिमेकडील एकेका देशांत दर वर्षांच्या बारा महिन्यांत नाना प्रकारच्या कादंबऱ्यांचा जितका उद्भव होतो, तितक्याच्या निमपट देखील आपल्या ह्य़ा देशांत गेल्या सबंद ऐंशीं वर्षांत झाला नाहीं. अशी जरी आपल्या इकडील स्थिति आहे तत्रापि गेल्या ऐंशी वर्षांतील महाराष्ट्रांतील एकंदर सारस्वताचा बराच मोठा भाग कादंबरीमय असल्यामुळें, हा भाग केवळ दुर्लक्ष करण्यासारखा नाहीं हें उघड सिद्ध होतें. हें कादंबरीमय सारस्वत १) लहान गोष्टी, २) अद्भुत कथा व ३) वस्तुस्थित्यादर्शक कथानकें ह्य़ा तीन घटकांनीं बनलेलें आहे. पश्चिमेकडेहि ह्य़ा असल्या सारस्वताचे हे असेच तीन घटक असतात व ह्य़ा तीन घटकांच्या उद्भवाची ऐतिहासिक परंपराहि तिकडल्याप्रमाणेंच आपल्या इकडेहि तशीच असलेली दृष्टीस पडते. म्हणजे इसाब्नीति, बाळमित्र, पंचोपाख्यान, वेताळपंचविशी वगैरे लहान लहान गोष्टींचा प्रथम उदय झाला; नंतर मुक्तामाला, मंजुघोषा, विचित्रपुरी वगैरे अद्भुत कथा जन्मास आल्या; आणि शेवटीं अलीकडेस, आजकालच्या गोष्टी, पण लक्षांत कोण घेतो, जग हें असें आहे, नारायणराव आणि गोदावरी, शिरस्तेदार, वेणू, वाईकर भटजी वगैरे वस्तुस्थित्यादर्शक किंवा वास्तविक कथानकें लिहिलीं गेलीं. आपल्या इकडील कादंबरीची ही अशी तीन पाह्य़ऱ्यांची परंपरा आहे.

..आपण ज्याला अद्भुत व वास्तविक म्हणून मराठींत म्हणतों, त्यालाच युरोपांत Romantic व realistic  ह्य़ा नांवानें ओळखतात. समाज व संसार ह्य़ांच्यांत अद्भुत व वास्तविक ह्य़ांचें नाना प्रमाणांचें मिश्रण असतें. शुद्ध अद्भुत किंवा शुद्ध वास्तविक असें ह्य़ा जगांत कांहींच नाहीं. सर्व मिश्र असाच प्रकार आहे; आणि असा जर प्रकार आहे, तर निव्वळ शुद्ध वास्तविक कादंबरी लिहूं जाण्याचा आव घालणें केवळ थोतांड आहे; व थोतांड नसलें, तर चूक आहे. चित्रकर्माप्रमाणें कादंबरी-लेखन ही कला आहे आणि चित्रांत हुबेहुब वस्तू उठवून देणें हें जसें अशक्य असतें, पांढरे व काळें ह्य़ांचें मिश्रण करून नेत्रांना हुबेहुब वस्तू दिसली असा भ्रम पाडावयाचा असतो, तीच तऱ्हा कादंबरीचीहि असते. संसारातील किंवा समाजांतील जीं हरतऱ्हेचीं कृत्यें त्यापैकीं अनेकांचा लोप करून कांहीं तेवढीं प्रामुख्यानें, तीं मुळांत असतील त्यापेक्षां, जास्त ठळठळीत अशीं दाखवावयाचीं हेंच कादंबरीरचनेचें मुख्य रहस्य आहे. अनेक कृत्यांचा व गुणांचा लोप व अध्य हार आणि कांहींचें प्रदर्शन, हा सर्वत्र कादंबरीकारांचा मार्ग असतो. गुणांचें व कृत्यांचें वर्णन करण्यांत ठळठळीपणाचा, अतिशयाचा किंवा अतिशयोक्तीचा अवलंब कोणत्या प्रमाणानें करावा, ह्य़ासंबंधीं मात्र आद्भुतिकांत व वास्तविकांत फरक असतो. एक अतिशयोक्तीचा जास्त उपयोग करतो व दुसरा कमी करतो.. सारांश काय, कीं अद्भुत अशी एकहि कोटी ज्यांत नाहीं असा कादंबरीग्रंथ मिळणें प्राय: अशक्य आहे. आणि यदाकदाचित् मिळालाच तर तो भिकारांतला भिकार आहे असें खुशाल धरून चालावें. पृथ्वीला सोडून जसें मनुष्यत्व नाहीं, तसें अद्भुताला सोडून कादंबरीत्वहि नाहीं.’’

तब्बल तीन दशके अव्याहतपणे चाललेल्या राजवाडे यांच्या लेखनकार्याचा व्याप प्रचंड आहे. त्या सर्वाचा आढावा सदराच्या मर्यादित जागेत घेणे तसे कठीणच. परंतु ज्यांना राजवाडे यांच्या लेखनाविषयी आणखी जाणून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी राजवाडे यांचे जवळपास सर्वच लेखन आज उपलब्ध आहे. ते आपण आवर्जून वाचावेच, शिवाय गं. दे. खानोलकर, वा. वि. मेंडकी, भा. वा. भट यांनी लिहिलेली राजवाडे यांची चरित्रेही वाचावीत. हे सारे वाचले, पाहिले, जाणून घेतले, की ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर यांनी ‘संस्कृतीविकासप्रवर्तक’ असा राजवाडे यांचा केलेला गौरव सार्थ वाटू लागतो.

संकलन : प्रसाद हावळे

prasad.havale@expressindia.com