अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- कृष्णराव अर्जुन केळूसकर!
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात लिहिते झालेल्या आणि पुढे मराठीतील महत्त्वाचे चरित्रलेखक म्हणून प्रसिद्ध पावलेल्या कृष्णराव अर्जुन केळूसकर यांच्या लेखनाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
केळूसकरांच्या लेखनाची सुरुवात झाली ती बडोदे सरकारच्या ‘राष्ट्रकथामाले’करिता लिहिलेल्या ‘फ्रान्सचा जुना इतिहास’ या १८९३ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाने. दरम्यान ‘सुबोधपत्रिके’तही विविध विषयांवर ते लिहू लागले होतेच. मुंबईच्या ‘गुरुवर्य केळूसकर गौरवमंडळा’ने १९३४ साली प्रकाशित केलेल्या ‘विचारसंग्रह’ या पुस्तकात यातील काही लेखन वाचायला मिळेल. मूळचे वेंगुल्र्यातील केळुस गावचे असणारे केळूसकर पुढे शिक्षणासाठी मुंबईला आले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलेल्या केळूसकरांना उच्चशिक्षण घेण्याची प्रचंड इच्छा होती, मात्र घरच्या गरिबीमुळे त्यांना लवकरच शिक्षण सोडून नोकरी पत्करावी लागली. सुरुवातीला डोंगरी भागातील इस्रायली शाळेत आणि नंतर विल्सन हायस्कूलमध्ये त्यांनी अध्यापन केले.
याच दरम्यान, १८९४ साली त्यांचे सुहृद लक्ष्मण पांडुरंग नागवेकर यांनी ‘अध्यात्मिक ज्ञानरत्नावली’ हे मासिक सुरू केले. त्याचे संपादकपद त्यांनी केळूसकरांकडे सोपविले. या मासिकातूनच पुढे केळूसकरांचे बरेचसे महत्त्वाचे लेखन प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी लिहिलेली भगवद्गीतेवरील टीका पुढे १९०२ साली ‘श्रीमद्भगवद्गीता- सान्वय पदबोध, सार्थ आणि सटीक’ या नावाने ग्रंथरूपात प्रसिद्ध झाली. या लेखमालिकेबरोबरच संत तुकाराम महाराजांवरील चरित्रपर लेखांची मालिकाही ते मासिकात लिहीत होते. ही मालिका १८९६ साली ‘तुकारामबावांचे चरित्र’ या शीर्षकाने पुस्तकरूपात आली. तुकाराम महाराजांवरील हा मराठीतील पहिला विस्तृत चरित्रग्रंथ. त्यातील हा उतारा पाहा-
‘‘ज्ञानदेवाच्या वेळापासून सुमारे पाचशे वर्षांच्या अवकाशात आमच्या या महाराष्ट्रामध्ये पुष्कळ संत निर्माण झाले. त्यांपैकी सुमारे पन्नास असामीची चरित्रे महीपतीने (ताहराबादकर) आपल्या ग्रंथात दिली आहेत. या संतमालिकेमध्ये ब्राह्मण व इतर बहुतेक सर्व उच्चनीच मानलेल्या जातींचे मनुष्य असून त्यात काही स्त्रियाही आहेत. फार काय; पण कित्येक मुसलमानांनीही आपल्या मूळ धर्माचा त्याग करून या आध्यात्मिक मार्गाचा अवलंब केला होता.. यावरून पाहता या काळी संतमंडळीत असा एक सिद्धांत स्थापित झाला होतासा दिसतो की, कोणी कोणत्याही जातीचा असला किंवा कितीही पढलेला किंवा न पढलेला असला, तरी त्याला ईश्वरभक्तीचा अत्युच्च मार्ग साध्य असून त्याने त्याचे अवलंबन करण्यास मुळीच प्रत्यवाय नाही. देवास सर्व माणसे सारखी असून त्यावर त्याची सारखीच कृपा आहे. स्त्री-पुरुष, पंडित-अपंडित, हिंदू-मुसलमान असा भेद देवाच्या घरी मुळीच नाही. हा बाह्य़ व कृत्रिम भेदभाव त्याच्या भक्तीस यत्किंचितही प्रत्यवायभूत होत नाही, कर्मठ ब्राह्मणांनी पुण्य व मोक्ष यांच्या प्राप्तीस जातिभेदाचा जबरदस्त अडथळा या काळापूर्वी घालून ठेविला होता. त्याचा उच्छेद ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम वगैरे संतांनी याप्रमाणे सर्वस्वी करून टाकला आणि मोक्षप्राप्तीचा सर्वात सुगम मार्ग जो भक्तीचा त्याचा पुरस्कार आपल्या आचरणाने व बोधाने सर्वत्र केला आणि त्यांचे प्रांजळपणाचे, निष्कपटपणाचे व अत्यंत शुद्ध आचरण, त्यांची परमेश्वराच्या ठायी नि:सीम निष्ठा व जनाला सन्मार्ग लावून देण्यासाठी त्यांनी पुष्कळ छळ व त्रास सोसून अहर्निश चालविलेली खटपट ही पाहिली म्हणजे ते अत्यंत शुद्ध हेतूने प्रवृत्त झाले होते असे म्हणावे लागते. त्यांच्या समकालीन पुराणप्रिय ब्राह्मणमंडळीने त्यांचा आपल्याकडून होईल तेवढा छळ केला; परंतु या महाशय साधुशिरोमणींच्या ठायी जी ज्ञानज्योती प्रदीप्त झाली ती या छलरूप प्रचंड झंझावाताने लवमात्र आंदोलनसुद्धा पावली नाही. तिच्या उज्ज्वल तेजाने त्यांनी आपला सन्मार्ग प्रकाशित करून अत्यंत सामान्य जनांसही तो स्पष्टपणे दिसे असा केला. त्यामुळे त्या मार्गाच्या अवलंबनाकडे त्यांची प्रबल प्रवृत्ती झाली.’’
पुढे १८९८ साली केळूसकर यांनी लिहिलेले गौतम बुद्धांचे चरित्र प्रकाशित झाले. हे चरित्रच डॉ. आंबेडकरांना प्रेरणा देणारे ठरले. त्यातील हा काही भाग पाहा-
‘‘.. उपनिषत्कालास आरंभ होऊन बुद्धाच्या आगमनापर्यंत स्वतंत्र विचार करणारे लोक पुष्कळ झाले होते. त्यांनी आपापल्या बुद्धीच्या व विचारशक्तीच्या मगदुराप्रमाणे निरनिराळे तत्त्वविचार व धर्मविचार स्वशिष्यांद्वारे त्या काळच्या लोकांत प्रचलित केले होते. उपनिषत्कालानंतर जे मोठमोठे तत्त्वविचार करणारे जन झाले ते बहुतेक असे म्हणत की, आपल्या विचारास उपनिषदांचा आधार आहे आणि हे त्याचे म्हणणे खोटे नसे. कारण उपनिषत्काली सर्व प्रकारचे धर्मविचार व तत्त्वविचार बीजरूपाने किंवा विस्तरत: होऊन चुकले होते. तेव्हा प्रत्येकाने आपल्या मताला उपनिषदग्रंथाचा आधार आहे असे प्रतिपादन करून स्वाभिमत विचारांकडे जनप्रवृत्ती करण्यास फारशी पंचाईत नसे. हल्ली जशी उपलब्ध असलेली सर्व उपनिषदे पाहिजे त्यास सामग्रे करून अवलोकन करावयास मिळणे शक्य झाले आहे तसा काहीच प्रकार पुरातन काळी नसल्यामुळे हा असा घोटाळा वारंवार होत असे. यामुळे परस्परविरोधात्मक मतांचा पुरस्कार व प्रसार, सर्वास पूज्य व मान्य असे जे उपनिषद ग्रंथ त्यांच्या आधाराने होत असे आणि या विरोधाची मीमांसा करणे त्या काळी बरेच अशक्य असल्यामुळे ‘धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनोयेन गत: स पंथ:’ अशी तोड सामान्य जनास काढावी लागत असे. याप्रमाणे जे वाटतील ते विचार जनात प्रसिद्ध करण्याची मोकळीक असल्यामुळे आर्यावर्तात त्याकाळी अनेक धर्मग्रंथ व तत्त्वविचारपद्धती निर्माण झाल्या. बौद्ध धर्म हा अशांपैकीच एक होय. बुद्धाचे म्हणणे असे की, चालू असलेले यज्ञयागादिकांचे शुष्क कर्मकांड केवळ निर्थक व अप्रयोजक असून, पुरातन व खरा कैवल्यप्रद जो धर्ममार्ग त्याकडे जनांची प्रवृत्ती होणे इष्ट आहे आणि सांप्रत जी बुद्ध धर्माची मूळची मते उपलब्ध आहेत त्यातील बहुतेकांस उपनिषदांचा आधार आहे. यावरून पाहता बुद्धमत हे काही तरी नवीनच बंड नसून आमच्या पुरातन अगणित धर्मविचारांपैकी व तत्त्वविचारांपैकी काहीकांचे मंडन करणारे होते असे म्हणावे लागते. तरी वेदाविषयी बुद्धाच्या मनात आदरबुद्धी मुळीच नव्हती.’’
गौतम बुद्ध व तुकाराम महाराज यांच्यावरील चरित्रग्रंथांबरोबरच केळूसकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचेही पहिले समग्र चरित्र- ‘क्षत्रियकुलावतंस छत्रपति शिवाजी महाराज यांचें चरित्र’- १९०७ साली प्रसिद्ध केले. केळूसकरांच्या विवेचक दृष्टीचा प्रत्यय आणून देणारा त्यातील हा उतारा पाहा-
‘‘..महाराजानीं जो एवढा लोकसंग्रह केला व त्याच्याकडून जें हें अपूर्व देशकार्य करविलें त्याच्या मुळाशीं भागवतधर्मप्रसाररूप कारण नसून केवळ महाराजांच्या अंगच्या अलौकिक करामतीचेंच तें फळ होय. त्याचें थोडेंसें श्रेय ह्य़ा भागवतधर्मास देणें ह्मणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करणें होय असें मोठय़ा कष्टानें ह्मणावें लागतें. खरें ह्मटलें असता संतमंडळीनें प्रचलित केलेल्या निवृत्तिमार्गामुळें महाराष्ट्रातील प्रवृत्तिमार्ग तीनशें वर्षे बहुतेक लोपल्यासारखा झाला होता असें ह्मणण्यास हरकत नाहीं. राम व रहिम एक ह्मणणारे, शांत, विरक्त, अहंताशून्य, उदासीन व परमार्थसाधनपर भगवद्भक्त संसार क्षणभंगुर मानून त्यातून मुक्त होण्याचीच उत्कट इच्छा अहर्निश करीत असत. त्यांला ऐहिक सुखदुखांचें मुळींच कांहीं वाटत नसे, व सर्व जनांस हाच उपदेश ते कंठरवानें करीत असत.. ही वैराग्यवृत्ति किंवा निवृत्तिपरता आमच्या लोकाच्या हाडींमासीं खिळली असल्यामुळें मुख्यत यवनाचा क्लेशप्रद अमल आमच्या महाराष्ट्रांत सतत तीनशें वर्षे सारखा चालू असता त्याला प्रतिकार करण्यास कोणीहि मराठा सरदार किंवा ब्राह्मण मुत्सद्दी पुढें सरसावला नाहीं. यवनानी तोंडावर टाकलेला लहानमोठा भाकरीचा तुकडा चघळीत बसण्यातच त्याला सौख्य वाटलें. भागवतधर्माचा दुंदुभि त्याच्या कर्णविवरात सारखा दुमदुमत होता. पण त्यामुळें त्याच्या ठायी स्वराज्यसाधनबुद्धि जागृत न होता उलट समाधानवृत्ति व उदासवृत्ति मात्र निसीम बाणली होती असें दिसतें. पुढे शिवाजीमहाराज स्वराज्यसंपादनाच्या उद्योगास प्रवृत्त झाले असता त्याचा हिरमोड करणारे व उत्साहभंग करणारे मराठे सरदार व ब्राह्मण मुत्सद्दी किती होते हें इतिहासज्ञांस सांगावयास नको.’’
केळूसकरांनी चरित्रलेखनाबरोबरच ‘जगत्वृत्त’, ‘दीनबंधू’, ‘इस्रायली पाक्षिक’ यांसारख्या नियतकालिकांतून विविध विषयांवर लिहिले. विवेकवादी वक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. १८९५ साली ठाणे वक्तृत्वोत्तेजक सभेच्या १५ व्या समारंभात केळूसकरांनी ‘सामाजिक सुधारणा’ या विषयावर वाचलेल्या निबंधातील पुढील उतारा आजही प्रस्तुत आहे-
‘‘सुधारक लोकांचें आणखी एक वैगुण्य असें सांगण्यासारखें आहे कीं, त्यांना ज्या कोणत्या बाबतींत सुधारणा करावयाची असते तिचा वाईटपणा व अप्रयोजकपणा सामान्य लोकांच्या नजरेस स्पष्टपणें व नि:पक्षपातपणें आणून देण्याचा प्रयत्न आजपर्यंत त्यांच्याकडून फारसा झालेला दिसत नाहीं. याप्रकरणीं कोणताही उद्दिष्ट हेतु सिद्धीस न्यावयाचा ह्मणजे त्यास लोकमत अनुकूळ पाहिजे. परंतु हें लोकमत तयार करणाच्या योग्यमार्गाचें अवलंबन सुधारणेच्छु लोकांकडून म्हणण्यासारखें होत नाहीं. सुधारणेच्या प्रत्येक बाबतीसंबंधानें आपलें व जुन्या लोकांचें काय म्हणणें आहे, तें नीट बारकाईनें केवळ सत्यप्रीतीनें व स्वदेशहितबुद्धीनें पाहून खऱ्याखोठय़ाचा शहानिशा करण्याचें काम सुधारकांकडून व्हावें तसें अजून झालेलें नाहीं. यामुळें लोकमतास योग्यप्रकारचें वळण मिळण्यास पुष्कळ हरकत येत आहे. सुधारणापक्षाच्या लोकांनीं वेळीं अवेळीं पाहिजे तसा जुन्या चालीरीतींचा निषेध करावा, आणि जुन्या लोकांनी त्या चालीरीतीच्या समर्थनार्थ पाहिजे तें बकावें, असा सध्यां प्रकार चालला आहे. एका पक्षाचें काय म्हणणें आहे तें दुसऱ्यास चांगलेसें न कळतां, दोघेही परस्परांवर मनास वाटेल तसा वाक् प्रहार करीत आहेत. यामुळें या अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधानें आज चोहोंकडे वितंडवाद माजून राहिला आहे. असा जिकडे तिकडे घोटाळा उत्पन्न झाल्याकारणानें सत्यज्ञानप्रसारास प्रत्यवाय घडून सुधारणेचा प्रसार खुंटला आहे. आणखी एक गोष्ट सुधारणापक्षांच्या लोकांकडून केव्हां केव्हां घडत असते. ती अर्थात् हीच कीं, आपणास अभिष्ट अशी सुधारणा जुन्या शास्त्रग्रंथांतूनसुद्धां विहित केलेली होती असें प्रतिपादन करण्याच्या भरांत कित्येक वचनांचा ओढूनताणून आपणास अनुकूळ असा अर्थ करण्याचा कित्येक सुधारक प्रयत्न करितात. यावरून जुन्या लोकांस असें वाटतें कीं, ह्य़ांचा पक्ष दुर्बल असून हे सत्याचा अपलाप करून साध्या लोकांच्या डोळ्यांत धूळ टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. यास्तव त्यांचें कोणतेंच म्हणणें जमेस धरूं नये. याप्रमाणें आपल्या अविचाराच्या वर्तनामुळें सुधारकांनीं जुन्या लोकांच्या मनांत आपणांविषयीं अविश्वास उत्पन्न केला आहे.’’
केळूसकरांनी छोटेखानी आत्मचरित्रही लिहिले आहे. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या केळूसकरांच्या चरित्रात ते वाचायला मिळते. कीर यांनी केळूसकरांचे वर्णन ‘ऋषितुल्य प्रज्ञावंत’ असे केले आहे. केळूसकरांचे सारे लेखन व कार्य पाहता ते यथार्थ आहे. केळूसकरांचे बहुतांश लेखन आज उपलब्ध असून ते आपण आवर्जून वाचावे.
संकलन प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com