अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- बाळाजी प्रभाकर मोडक!

मागील लेखात आपण ज. बा. मोडक व का. ना. साने यांनी सुरू केलेल्या ‘काव्येतिहाससंग्रह’ या मासिकाविषयी जाणून घेतले. या मासिकात मराठीतील काव्य व इतिहासविषयक दुर्मीळ लेखन संपादित करून मराठी वाचकांपर्यंत पोहोचवले जात होते. त्याच दरम्यान मराठीत विज्ञानविषयक लेखन करणारे बाळाजी प्रभाकर मोडक हे नावही चर्चेत आले होते. त्यांनी रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, जीवशास्त्र अशा विविध अभ्यासशाखांचा परिचय करून देणारी अनेक पुस्तके मराठीतून लिहिली. मूळचे रत्नागिरीचे असणारे मोडक सांगली, बेळगाव, पुणे अशा विविध ठिकाणी शिक्षण घेऊन कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. त्या सुमारास डॉ. कूक या इंग्रज अधिकाऱ्याकडे काही शिक्षकांना सप्रयोग रसायनशास्त्र शिकण्यासाठी पाठविण्यात आले, त्यांत बाळाजी मोडक हेही एक होते. डॉ. कूककडे रसायनशास्त्र शिकून कोल्हापुरास परत आल्यावर त्यांनी ‘रसायनशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला. ते साल होते १८७५. याआधी केरोपंत छत्रे यांचे ‘पदार्थविज्ञान’(१८५२ ) हे पुस्तक व डॉ. नारायण दाजी लाड यांच्या ‘रसायनशास्त्र’( १८६३) या ग्रंथात या विषयाचे विवेचन आले होते. परंतु ही दोन्ही पुस्तके इंग्रजी पुस्तकांच्या आधारे लिहिली गेली होती. बाळाजी मोडक यांचा ‘रसायनशास्त्र’ हा ग्रंथ मात्र त्या विषयावरील मराठीतील पहिला स्वतंत्र ग्रंथ होता. पुढे १८९२ मध्ये तो ‘रसायनशास्त्राची मूलतत्त्वे’ या नावाने पुन्हा प्रकाशित केला गेला. दरम्यान, मोडक यांची निरिंद्रीय व सेंद्रीय रसायनशास्त्रावरील पुस्तकेही प्रकाशित झाली. ‘सेंद्रीय रसायनशास्त्र’ या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत मोडक यांची शास्त्रीय विषयांवरील ग्रंथांमागील भूमिका विस्ताराने आली आहे. त्यातील हा काही भाग पाहा-

‘‘सेंद्रिय रसायनशास्त्रासारख्या गहन शास्त्रीय विषयावरील ग्रंथ वाचणार कोण व शास्त्रीय परिभाषा वापरणार कोण असा कित्येक प्रश्न करतील.. देशी भाषांच्या द्वारें उच्च शिक्षण मुख्यत्वें शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या पाठशाळा व विश्वविद्यालयें होईपर्यंत शास्त्रीय विषयावरील पुस्तकें वाचणारा वर्ग वाढणार नाहीं व शास्त्रीय पुस्तकेंही फारशी प्रसिद्ध होणार नाहींत हें मी कबूल करितों. याच कारणास्तव देशी भाषांत शास्त्रीय व दुसऱ्या उदात्त विषयांवर फारशीं पुस्तकें आजपर्यंत झालेलीं नाहींत. गेल्या पंचवीस तीस वर्षांत रसायनशास्त्र, सृष्टिशास्त्र, आरोग्यशास्त्र व यंत्रशास्त्र यांवर जीं काय थोडीं पुस्तकें मीं प्रसिद्ध केलीं; त्यांवांचून ज्ञानमंजूषामालेंतील थोडींशीं पुस्तकें व नुकतेंच प्रो. साठे यांनी प्रसिद्ध केलेलें रयासनशास्त्र यांशिवाय इतर फारशी पुस्तकें आढळत नाहींत.. शास्त्रीय गहन विषयावर देशी भाषांत कोणीं पुस्तकें लिहिलीं तर पूर्वी विद्याखात्याकडून चांगला आश्रय व उत्तेजन मिळे. मीं जीं कांहीं पुस्तकें प्रसिद्ध केलीं तीं त्या आश्रयानेंच केलीं. परंतु तो आश्रयही फार संकुचित झाला आहे. लोकाश्रय नाहीं व राजाश्रय नाहीं. शाळांत शास्त्रीय विषय देशी भाषांतून शिकवीत नसल्यानें लोकांस शास्त्रीय ज्ञानाची गोडी कमी. मग शास्त्रीय विषयांवर कशीं बुकें होणार? याचें मुख्य कारण शास्त्रीय विषयांचे लोकांमधील अज्ञान हेंच होय. शास्त्रीय विषयाच्या अध्ययनाचा अभाव हें या अज्ञानाचें मूळ होय. इकडील शिक्षणक्रमांत शास्त्रीय विषयांस योग्य स्थळ दिलेलें नाहीं. यामुळें चांगल्या शिकलेल्या लोकांचेंही शास्त्रीय विषयाविषयीं फार अज्ञान असतें. पाश्चात्य देशांतील शिक्षणक्रमांत शास्त्रीय विषयांस प्रमुख स्थळ असतें व तिकडे शिक्षण स्वभाषेच्या द्वारें देत असल्यानें शिक्षणाचा प्रसार जास्त होऊन निरनिराळ्या शास्त्रांचे अनेक नादी लोक निपजले व त्यांनीं कलाकौशल्यांत व व्यवहारांत लागणाऱ्या यंत्रांत व गोष्टींत अनेक शोध लावून सुधारणा केल्या.. परंतु शास्त्रीय शिक्षण नसल्यामुळें देशी धंद्यांच्या कृतींत व यंत्रांत कांहीं एक सुधारणा कोणास सुचवितां आली नाहीं. तेव्हां नवीन शोध कोठून लागणार?’’

शास्त्रीय विषयांबाबत लोकांमध्ये अनास्था का आहे, याविषयीचे विवेचनही मोडक यांनी प्रस्तावनेत केले आहे. ते लिहितात-

‘‘कॉलेजांत पूर्वी शास्त्रीय विषयांस मुळींच स्थळ नव्हतें. अवश्य विषयांत त्यांस जागा नव्हती. ऐच्छिक विषयांत शास्त्रीय विषय होते, परंतु ते शिकविण्यास प्रोफेसर नव्हते. सर रिचर्ड टेंपल मुंबईचे गव्हर्नर होते तेव्हां त्यांनीं ही उणीव भरून काढण्यास खटपट केली. विश्वविद्यालयांतील एका परिक्षेंत सृष्टिशास्त्राचा थोडासा भाग आवश्यक केला व कॉलेजांत हा शिकविण्यास अध्यापक नेमिलें. केवळ शास्त्रीय विषयांचें अध्ययन करून परीक्षा देतील त्यांस पदवी देऊं लागले व इंजिनियरिंग कॉलेजास सायन्स कॉलेज असें नांव देऊन तेथें जास्त शास्त्रीय विषय शिकविण्याची तजवीज केली. ही गोष्ट सन १८८० च्या सुमारास घडली. तेव्हांपासून गेल्या २५ वर्षांत शास्त्रीय विषयांकडे कोणाचें लक्षच गेलें नाहीं.. दिवसेंदिवस इंग्रजी भाषेचें स्तोम वाढविलें.. जिकडे तिकडे इंग्रजी बोलणारे, लिहिणारे व सरकारच्या न्यायी अन्यायी पद्धतीवर टीका करणारे शेकडो लोक निपजले. परंतु विश्वविद्यालयाची स्थापना होऊन आज जवळ जवळ पन्नास वर्षे होत आलीं, तरी कोणीं प्राणिशास्त्राच्या नादीं लागून हिंदुस्थानांत आढळणाऱ्या सर्व प्राण्यांचे वर्णन, वर्गीकरण केलें, अगर कोणी देशी वनस्पति गोळा करून त्यांचे गुण, धर्म, व त्यांतील उपयुक्त पदार्थ यांची माहिती करून घेण्याच्या मागें लागला, किंवा कोणी यंत्रशास्त्राच्या नादी लागून जीं शेंकडों यंत्रें परदेशाहून येतात त्यांचें ज्ञान करून घेऊन त्या नमुन्याचें एकादें नमुन्यादाखल कोणीं यंत्र केलें, किंवा येथील जुन्या यंत्रांत कोणीं सुधारणा सुचविली, अगर कोणी विद्युतच्छास्त्राचा अभ्यास करून त्या शास्त्राचा जो दिवसेंदिवस उपयोग वाढत चालला आहे त्याची संपूर्ण माहिती करून घेतली, अगर कोणी खनिज शास्त्राचा नादी होऊन म्यांगनीज, लोखंड, तांबें, सोनें वगैरे धातूंचे अशोधित धातु सांपडतात त्यांची परीक्षा करून व धातु गाळण्याचे प्रयोग करून कांहीं उपयोग केला, अगर भूगर्भशास्त्र किंवा रसायनशास्त्र याचा नाद कोणास आहे व कोणी रासायनिक शोध लाविले किंवा कोणी क्लप्ति काढल्या असें एकही उदाहरण सांपडावयाचें नाहीं. परंतु राष्ट्रीय सभा, प्रांतिक सभा, सार्वजनिक सभा, औद्योगिक परिषद इत्यादि सभा भरवून त्या ठिकाणीं हवी तितकी बडबड करणारे व मोठमोठे ठराव करणारे हवे तितके तयार झाले. तसेंच कायदेपंडितांचा तर ऊत येऊन गेला आहे. स्वदेशी चळवळीबद्दल व्याख्यानें व उपदेश करतील. पण एकादा जिन्नस करण्याचें नवीन यंत्र कोणीं काढिलें, किंवा जुन्यांत कांहीं सुधारणा केली किंवा इंग्रजी बुकांतून कांहीं कृति काढिली अशीं उदाहरणे फारशीं आढळत नाहींत. या सर्वाचे कारण शास्त्रीय शिक्षणाचा अभाव हें होय. या अज्ञानाचा सारा दोष राज्यकर्त्यांच्या माथीं आहे.’’

शास्त्रीय विषयांबद्दलच्या अनास्थेची कारणे सांगून मोडक यांनी हे विषय लोकांना समजण्यास सुलभ व्हावेत, त्यासाठी  हे विषय स्वभाषेतून अभ्यासता यावेत असा आग्रह धरला आहे-

‘‘शास्त्रीय विषयाच्या ज्ञानाची हल्लीं फार आवश्यकता भासूं लागली आहे. स्वदेशी चळवळींनें हल्लीं बरीच उसळ खाल्ली आहे. स्वदेशी जिन्नस वापरावयाचा बऱ्याच लोकांचा निश्चय आहे. परंतु हा निश्चय सिद्धीस जाण्यास स्वदेशी जिन्नस उत्पन्न करण्याचे कारखाने निघाले पाहिजेत. देशी गिरण्यांतील कापड स्वदेशी म्हणून आपण वापरतों. परंतु तें कापड काढण्यास लागणारी सर्व यंत्रें अद्याप परदेशीच आहेत. साबण, मेणबत्त्या, आगकाडय़ा वगैरे कांहीं जिन्नस येथें निपजतात. परंतु त्यांचीही सर्व उत्पत्ति देशी साधनांनीं होत नाहीं.. लोखंड, तांबें, पितळ, जस्त, कथिल वगैरे सर्व धातु परदेशांतून येतात. त्यांच्या खाणी येथें असून आम्हांस सुधारलेल्या रीतींनीं गाळतां येत नाहीं. शास्त्रीय विषयांचा फैलाव झाल्याशिवाय या गोष्टी सिद्धीस जाणार नाहींत..

स्वदेशी चळवळींत स्वदेशी भाषांस प्रमुख स्थळ मिळालें पाहिजे. स्वदेशी भाषांत ग्रंथरचना, स्वदेशी भाषांच्या द्वारें सर्व शिक्षण देणें व स्वदेशी भाषा सुधारणें या गोष्टी अवश्य आहेत.. हल्लींचीं विश्वविद्यालयें राष्ट्रीय नसून केवळ परराष्ट्रीय आहेत; कारण यांमध्यें राष्ट्रीय भाषांस मुळींच स्थळ नसून सर्व शिक्षण परराष्ट्रीय भाषांच्या द्वारें देतात. ही उणीव आजपर्यंत एतद्देशीय विद्वानांच्या कशी लक्षांत आली नाहीं व राष्ट्रीय सभेसारख्या संस्थांनीं इतर राजकीय मागण्याबरोबर ही मागणी कशी केली नाहीं, याचेंच आश्चर्य वाटतें..’’

मोडक यांनी रसायनशास्त्राबरोबरच पदार्थविज्ञानशास्त्र, यंत्रशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणिशास्त्र अशा शास्त्रीय विषयांवरील पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली. मुख्यत: शास्त्रीय लेखनासाठी मोडक यांची ओळख असली तरी त्यांनी इतिहासविषयक लेखनही केलेले आहे. शास्त्रीय विषयांच्या प्रसारासाठी ‘मराठी विद्यापीठा’ची योजनाही त्यांनी मांडली होती.

मराठीतील शास्त्रीय वाङ्मयाचे अध्वर्यु असलेल्या मोडक यांचे छोटेखानी चरित्र उपलब्ध आहे. ग. ब. मोडक यांनी १९३१ साली लिहिलेले हे ‘प्रो. बाळाजी प्रभाकर मोडक ह्य़ांचें चरित्र’ आवर्जून वाचायला हवे.

संकलन ; प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com