अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- गोपाळ गणेश आगरकर!

मागील लेखात आपण लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’तील लिखाणाविषयी जाणून घेतले. ‘केसरी’च्या सुरुवातीपासून गोपाळ गणेश आगरकर हे त्याचे संपादक होते. त्यात कायदा व धर्मशास्त्रविषयक लिखाण टिळक करत, तर इतिहास, अर्थविषयक व सामाजिक विषयांवरील लेखन आगरकरांचे असे. तब्बल सात वर्षे ते या पत्राचे संपादक होते. विद्यार्थीदशेतच आगरकरांनी मिल, स्पेन्सर, गिबन, रुसो आदी विचारवंतांचे ग्रंथ अभ्यासले होते. त्यातून बुद्धिप्रामाण्यवाद, उदारमतवाद यांचे संस्कार त्यांच्यावर झाले. याचा प्रभाव त्यांच्या सामाजिक भूमिकांवर दिसून येतो. ‘केसरी’तील त्यांचे लेखनही या विचारांनी प्रभावित झालेले होते. मात्र ‘केसरी’च्या चालकमंडळींचा राजकीय प्रश्नांकडे अधिक ओढा असल्याने तिथे आगरकरांच्या संपादकीय लेखनावर मर्यादा येऊ लागल्या. त्यामुळे आगरकरांनी ‘केसरी’चे संपादकपद सोडले आणि १८८८ मध्ये सुधारकी विचारांच्या प्रसारासाठी ‘सुधारक’ हे पत्र सुरू केले.

आगरकर परंपरांकडे विवेकवादी दृष्टीतून पाहत. त्यामुळे एखादी परंपरा सध्याच्या काळात निरुपयोगी किंवा जाचक ठरत असल्यास तिचा त्याग करणेच योग्य, असे त्यांचे मत होते. प्रसंगी अशा रूढी-परंपरा कायद्याद्वारे नाहीशा कराव्यात, अशाही मताचे ते होते. हे विचार त्यांनी ‘सुधारक’मधील विविध लेखांतून मांडले आहेत. त्यातील ‘करून कां दाखवित नाहीं?’ या लेखातील हा उतारा पाहा –

‘‘हे सुधारक लोक अमुक गोष्ट चांगली, तमुक गोष्ट वाईट; अमक्या गोष्टीसाठीं कायदा करावा, तमकीसाठी मंडळी स्थापावी; अशी जी एकसारखी वटवट करीत असतात ती कशासाठीं? अमक्या अमक्या गोष्टी करण्यांत आपला व दुसऱ्याचा फायदा आहे, अशी त्यांची पक्की खात्री झाली असेल तर त्यांनीं त्या करून दाखविण्यास कां प्रवृत्त होऊं नये? असा प्रश्न वारंवार पुष्कळ लोक करीत असतात, व बोलण्याप्रमाणें सुधारकांचें आचरण नाहीं, तेव्हां त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यांत कांहीं अर्थ नाहीं, असा गर्वयुक्त प्रलाप करून, आपल्या कोत्या समजुतीनें आपलें समाधान करून घेत असतात! या अज्ञान जातींत तीन प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. एक, ज्यांना नवीन गोष्टींचें चांगलेपण कळण्याची अक्कलच नाहीं असे. असल्या लोकांच्या कानांपाशीं हवा तितका आक्रोश करा, प्रमाणें दाखवा, मारा, तोडा – काय पाहिजें तें करा, हे म्हणून कांहीं केलें तरी आपला ग्रह सोडावयाचे नाहींत! वयांत येईपर्यंत कसले बसले जे ग्रह झाले असतील ते यांची जन्माची पुंजी! तींत नवें जुनें कधींही व्हावयाचें नाहीं! यांचे ज्ञान अत्यंत स्वल्प असतांही यांना सर्वज्ञतेची फारच मोठी घमेंड असते, व नवीन विचारांचा व ज्ञानाचा तिरस्कार करण्यांत हे कोणासही हार जाण्यासारखे नसतात! सारांश, ओतीव लोखंडाप्रमाणें यांचे आचार व विचार असतात, व कोणाचाही यांच्याशीं सामना झाला असतां त्यापासून रागाच्या ठिणग्या पडण्याखेरीज दुसरा कोणताही परिणाम होत नाहीं. दुसऱ्या प्रकारांत समंजस पण भेकड असे लोक येतात. यांना चांगलें काय व वाईट काय, त्याज्य काय व संग्रहणीय काय हें समजत असतें; पण जें योग्य वाटत असेल तें बोलण्याचें किंवा करण्याचें धैर्य यांच्या अंगीं बिलकूल नसतें. ते लोकापवादाच्या ओझ्याखालीं दडपून गेलेले असतात. डोळे बांधलेला तेल्याचा बैल ज्याप्रमाणें घाण्यासभोंवतीं एकसारखा फेऱ्या घालीत असतो, त्याप्रमाणें हे पोटांत ज्ञान असूनही लोकलज्जेमुळें अंध होऊन पूर्वापार चालत आलेल्या रूढीचें व विचाराचें लोण पुढल्या पिढीपर्यंत पोंचवीत असतात. एकीकडे तुम्ही यांच्याशीं वाद करीत बसलां असलां, तर कदाचित् ते असें कबूल करतील कीं, तुमचें म्हणणें बरोबर आहे व तदनुसार लोकांचें वर्तन होऊं  लागल्यास, त्यांत त्यांचें कल्याण होण्याचा संभव आहे; पण असलें काम करण्यास आम्ही प्रवृत्त होणार नाहीं व असल्या गोष्टींचा उघडपणें स्वीकार करण्याचें धैर्य आमच्या अंगीं नाहीं, असें ते तुम्हांस साफ सांगतील. असले लोक बहुश: दुसऱ्यांच्या आचाराविषयीं व विचारांविषयीं उदासीन असतात; पण आणीबाणीचा प्रसंग आल्यास हे आपल्या विचारशक्तीस गुंडाळून ठेवून पहिल्या प्रकारच्या अज्ञान, अविचारी व आग्रही लोकांचें अनुगमन करतात! या दोहोंशिवाय सुधारणानिंदकांचा आणखी एक प्रकार आहे, तो मात्र अतिशय खडतर आहे, असें म्हणणें भाग आहे. यांतील लोक पहिल्याप्रमाणें मूढ नसतात व दुसऱ्याप्रमाणें भेकड नसतात. बरेंवाईट यांस कळत असतें व उचित दिसेल तें करण्याचें किंवा बोलण्याचें धैर्य यांचे अंगीं असत नाहीं, असें मानतां येत नाहीं. असें असतां सुधारणेस या लोकांकडून जितका अडथळा होतो, तितका दुसऱ्या कोणाकडूनही होत नाहीं. हा होण्याचें कारण यांची अमर्याद स्वार्थपरायणता. हिला तृप्त करण्यासाठीं हे काय करतील आणि काय करणार नाहींत, हें ब्रह्मदेवाला देखील सांगवणार नाहीं!.. त्यांची स्वार्थपरायणता पराकाष्ठेची व्यापक आहे. कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरी जर तीपासून त्यांचें कोणत्याही प्रकारचे यत्किंचित् नुकसान होण्याचा संभव असला तर ते ती हाणून पाडण्यासाठीं आकाशपाताळ एक करून सोडण्याचा प्रयत्न करतील!

.. समाज हा स्वाभाविकपणें ज्यास अनेक पैलू आहेत अशा खडय़ासारखा आहे. असला खडा खाणींतून नुकताच काढला असल्यास, विशिष्ट आकार, सफाई किंवा तेज यांपैकीं कोणतेच गुण त्यांत नसतात, पण कल्पक सुवर्णकार होत व समाज हा त्यांच्या हातीं दिलेला पैलूदार खडा होय. या खडय़ावर सरकारी साहाय्य, स्वत:चा प्रयत्न वगैरे हत्यारांनीं काम करून ते त्यास मोहकपणा आणितात. ज्या कामास ज्या वेळीं जें हत्यार पाहिजे असेल तें घेतलें पाहिजे. आज मित्तीस आमच्या समाजाची अशी दीनवाणी स्थिति झाली आहे कीं, प्रत्येक गोष्टींत आमच्या मनांत असो किंवा नसो, थोडेंबहुत सरकारचें साहाय्य घेतल्याशिवाय आमच्या हातून कांहीं होत नाहीं. कोणी लोकशिक्षणाचा पैलू घांसून वाटोळा करण्यासाठीं सरकारची मदत मागतात! कोणी सद्गुणांच्या पैलूवरील मदिरादि व्यसनांचा मळ उडविण्यासाठीं तेंच करतात! आम्ही आमच्याकडे घेतलेल्या पैलूस इतर पैलूंप्रमाणें चांगला आकार व सफाई आणण्यासाठीं तेंच करीत आहों!’’

‘सुधारक’मधील लेखनावर समाजातून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र तरीही आगरकरांनी सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणारे लेखन निर्भीडपणे सुरूच ठेवले. ‘मन सुधारकीं रंगलें अवघे जन सुधारक झाले’ असे त्यांनीच म्हणून ठेवले आहे. विधवांचे केशवपन, स्त्रियांचा पोशाख, स्त्री- शिक्षण, सोवळेओवळे, अंत्यविधी, मूर्तिपूजा, देवतांची उत्पत्ती अशा अनेक विषयांवर आगरकरांनी लिहिले. ‘आमचे दोष आम्हांस कधीं दिसूं लागतील?’ हा लेख त्याचे उत्तम उदाहरण ठरेल. त्यातील हा काही भाग-

‘‘अलीकडे देशाभिमान्यांची जी एक जात निघाली आहे, तिच्यापुढें इंग्रजांची किंवा दुसऱ्या कोणत्याही अर्वाचीन, युरोपिअन लोकांची उद्योगाबद्दल, ज्ञानाबद्दल, किंवा राज्यव्यवस्थेबद्दल प्रशंसा केली कीं, तिचें पित्त खवळून जातें! या जातवाल्यांना दुसऱ्याचा उत्कर्ष किंवा त्याची स्तुति साहण्याचें बिलकूल सामर्थ्य नाहीं! पण करतात काय बिचारे! सूर्याला सूर्य म्हटल्याखेरीज जसें गत्यंतर नाहीं, तसें युरोपिअन लोकांचें श्रेष्ठत्व या घटकेस तरी नाकबूल केल्यास आपलें हंसें झाल्यावांचून राहणार नाहीं, हें त्यांना पक्कें ठाऊक आहे! तेव्हां ते काय हिकमत करितात कीं नेटिव युरोपियनांची तुलना करण्याची वेळ आली कीं, ते आपल्या गतवैभवाचें गाणें गाऊं लागतात! इंग्रज लोक अंगाला रंग चोपडीत होते; इंग्रज लोक कच्चें मांस खात होते; इंग्रज लोक कातडी पांघरत होते; इंग्रज लोकांस लिहिण्याची कला ठाऊक नव्हती त्या वेळेस आम्ही मोठमोठाल्या हवेल्या बांधून रहात होतों; कापसाच्या किंवा लोकरीच्या धाग्यापासून मोठय़ा परिश्रमानें विणून तयार केलेलीं वस्त्रें वापरीत होतों; बैलांकडून जमीन नांगरून तींत नानाप्रकारचीं धान्यें, कंदमुळें, व फळें उत्पन्न करीत होतों; आणि रानटी लोकांप्रमाणें मांसावर अवलंबून न राहतां आपला बराच चरितार्थ वनस्पत्यांवर चालवीत होतों. यावरून मांसाहार आम्हीं अगदींच टाकला होता असें मात्र कोणी समजूं नये. ज्या गाईच्या संरक्षणासाठी सांप्रत काळीं जिकडे तिकडे ओरड होऊन राहिली आहे, व जें संरक्षण कित्येकांच्या मतें हिंदुमुसलमानांचा बेबनाव होण्यास बऱ्याच अंशीं कारण होत आहे, त्या गाईचा देखील आम्ही प्रसंगविशेषीं समाचार घेण्यास मागेंपुढें पहात नव्हतों! कोणी विशेष सलगीचा मित्र किंवा आप्त पाहुणा आला आणि बाजारांत हवा तसा जिन्नस न मिळाला म्हणजे लहानपणापासून चारा घालून व पाणी पाजून वाढविलेल्या गोऱ्याच्या अथवा कालवडीच्या मानेवर सुरी ठेवण्यास आम्हांस भीति वाटत नव्हती! आतां येवढें खरें आहे कीं हें गोमांस रानटी लोकांप्रमाणें आम्ही हिरवें कच्चें खात नव्हतों! तर सुधारलेल्या लोकांप्रमाणें त्यांत निरनिराळ्या तऱ्हेचे मसाले घालून त्याला नाना प्रकारच्या फोडण्या देऊन तें अत्यंत स्वादिष्ट करून खात होतों! मत्स्याशनही आम्हांस ठाऊक नव्हतें असें नाहीं! कोणत्या माशाची रसई कोणत्या रीतीनें करावी याबद्दल आम्हांपाशीं फार पुरातन नियम सांपडतात! मांसभक्षणानंतर उत्तम मद्यप्राशन केल्यास फार मौज होते म्हणून सांगतात! आमच्या पूर्वजांस ही मौजही ठाऊक नव्हती असें नाहीं! सोमरस हा मादक पेय असो अथवा नसो; त्याशिवाय दुसरीं कसलीं तरी मादक पेयें येथें वहिवाटींत होतीं अशाबद्दल जुन्या ग्रंथांत भरपूर आधार सांपडतो. याप्रमाणें आम्ही खाण्यापिण्याच्या कामांत अगदीं पुरातन कालीं सुद्धां पुरे पटाईत होऊन गेलों होतों.. यावरून काय दिसतें कीं, अलीकडच्या इंग्रज लोकांनी किंवा युरोपांतील दुसऱ्या कोणत्याही लोकांनी कितीही शेखी मिरवली तरी ज्या आम्हीं इतक्या पुरातन कालीं येवढीं मोठी सुधारणा करून बसलों त्या आमच्यापुढें त्यांची मात्रा बिलकुल चालावयाची नाहीं! न चालो बिचारी! पण या एककल्ली देशाभिमान्यांना आम्ही असें विचारितों कीं, बाबांनों, तुम्ही अशा प्रकारें गतवैभवाचें गाणें गाऊं लागलां म्हणजे तुमच्या पक्षाचें मंडन न होतां उलट मुंडण होतें!’’

‘केसरी’ व ‘सुधारक’ या पत्रांतील आगरकरांचे लेखन महत्त्वाचे आहेच; परंतु त्याव्यतिरिक्त त्यांनी अन्य लेखनही केले आहे. त्यात शेक्सपीअरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाचे त्यांनी ‘विकारविलसित’ या नावाने केलेले भाषांतर, ‘डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस’, ‘वाक्यमीमांसा आणि वाक्यांचें पृथक्करण’ या पुस्तकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने आगरकरांचे समग्र लेखन तीन खंडांत प्रसिद्ध केले आहे. म. गं. नातू व दि. य. देशपांडे यांनी त्यांचे संपादन केले आहे. ते आपण आवर्जून वाचावे.

संकलन प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com