अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- जनार्दन बाळाजी मोडक / काशीनाथ नारायण साने!
मागील दोन लेखांमध्ये आपण ‘दीनबंधु’ पत्राच्या अनुषंगाने कृष्णराव भालेकर आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. ‘दीनबंधु’ची सुरुवात १८७७ साली भालेकरांनी केली आणि पुढे १८८० पासून ते लोखंडे यांनी सुरू ठेवले. याच काळात मराठीत आणखी एक महत्त्वाचे नियतकालिक सुरू झाले. ते होते – ‘काव्येतिहाससंग्रह’. जनार्दन बाळाजी मोडक व काशीनाथ नारायण साने या संपादकद्वयांनी १८७८ सालच्या जानेवारीत त्याची सुरुवात केली. पहिल्याच अंकाच्या प्रस्तावनेत मासिकाच्या उद्देशाविषयी त्यांनी लिहिले आहे –
‘‘काव्येतिहास-संग्रह या नांवाचें येत्या वर्षां पासून दर महिन्यास काढण्याचा आम्ही विचार केला आहे. यांत महाराष्ट्र कविता, संस्कृत कविता, व महाराष्ट्र इतिहास यांचा संग्रह करावयाचा आहे. पहिल्या सदराखालीं माजी ‘सर्वसंग्रहांत प्रसिद्ध न झालेलीं जितकीं मराठी काव्यें मिळतील तितकीं सर्व येतील; दुसऱ्यांत कलकत्ता, मुंबई वगैरे ठिकाणीं प्रसिद्ध झाल्याखेरीज जे जे अप्रसिद्ध संस्कृत काव्यग्रंथ उपलब्ध होतील त्यांचा संग्रह करावयाचा आहे; व तिसऱ्यांत जुन्या मराठी बखरी येणार आहेत.
वरील तिहीं प्रकारचा संग्रह करणे किती उपयोगाचे आहे, व सध्यांच्या काळीं तर तो किती आवश्यक होय, याविषयीं कोणाही सुज्ञ मनुष्याची खात्री करायाला पाहिजे असें नाहीं. लोकांच्या अनभिज्ञतेमुळें, अज्ञानामुळें व गैरसमजुतीमुळें आजपर्यंत लक्षावधि ग्रंथ वाण्यांच्या दुकांनीं गेले, व अद्याप दरवर्षी सहस्रावधि जात आहेत. असें होतां होतां वीस वर्षांत हस्तलिखित ग्रंथ म्हणून क्वचितच दृष्टीस पडेसा होईल. असें झालें असतां आपल्या देशाची केवढी भयंकर हानि होईल! शेकडों जुन्या संस्कृत कवींचीं व अर्वाचीन प्राकृत कवींचीं काव्यें, तसाच या देशाचा याच देशाचे लोकांनीं लिहून ठेवलेला अत्यंत विश्वसनीय इतिहास, हीं सर्व बुडत असतां त्यांस हात देणारा एकही आर्यभूमीचा सुपुत्र जर निघाला नाहीं तर यासारखी काळोखी तिच्या तोंडास आणखी कोणची लागावी?’’
मासिकात संस्कृत कविता, मराठी कविता व मराठी इतिहास असे तीन विभाग असत. यातील मराठी कविता ज. बा. मोडक व इतिहास विभाग का. ना. साने संपादित करत. तर संस्कृत कविता विष्णुशास्त्री चिपळूणकर संपादित करत. परंतु पुढे १८८१ साली विष्णुशास्त्रींनी संपादनाचे काम सोडले. त्यानंतर मराठी कवितांबरोबरच संस्कृत कवितांचा विभागही मोडकच सांभाळू लागले. मासिकासाठी जुन्या बखरी, प्राचीन काव्ये शोधून आणण्याचे काम शं. तु. शाळीग्राम यांच्याकडे सोपवलेले होते.
याच प्रस्तावनेत मराठी साहित्य संवर्धनासाठी झालेल्या तुरळक प्रयत्नांची दखलही संपादकांनी घेतली आहे. त्यातील हा काही भाग पाहा –
‘‘तर वरील उद्देश मनांत धरून वरील तिहींचा जिर्णोद्धार करण्याचें आम्हीं योजिलें आहे. हें काम एवढें महत्वाचें असतां आजपर्यंत त्याची हेळसांडच होत गेली ही मोठी दिलगिरीची गोष्ट आहे. सुमारें पंधरा वर्षांपूर्वी कैलासवाशी परशुरामपंत तात्या गोडबोले यांच्या साह्य़ानें रा. रा. माधव चंद्रोबा हे ‘सर्व संग्रह’ नामक मासिक पुस्तक मुंबईस काढीत असत. पण हें सहा सात वर्षे चालून बंद पडलें. सरकारनें आपला आश्रय काढून घेतांच वरील स्तुत्य उद्योगाचा निंमे आधार तुटल्यासारखा होऊन महाराष्ट्र कवितेची इमारत लवकरच खालीं बसली. तिचें काम जर आजपर्यंत चालतें तर वरील महाराष्ट्रकविताऽभिज्ञाच्या साह्य़ानें तें बहुतेक उत्तम प्रकारें शेवटास गेलें असतें. पण आमच्या देशाचें येवढें भाग्य कोठचें? संस्कृत कवितेची गोष्ट पाहिली तर ‘हर्षचरित’ ‘विक्रमांकचरित’ अशासारखी जुनीं व अप्रसिद्ध काव्यें कधीं दहा पांच वर्षांनीं एकाद्या पाश्चात्य पंडिताच्या हातून उजगारीस आलीं तर येतात, बाकी पुष्कळांची गति वणिग्गृही होते, व कांहींस मुंबईतल्या सारख्या मोठमोठय़ा पुस्तकालयांतून कारागृहवास पत्करावा लागतो. प्रसिद्धीचे मार्ग काय ते लोकाश्रय किंवा राजाश्रय हेच असल्यामुळें बाण बिल्हण अशांसारख्या महा कवींची ही ग्रहदशा सुटत नाहीं. नाहीं म्हणायाला आलीकडे एक मात्र बरीच अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे कीं, कलकत्त्यास पंडित जीवानंद विद्यासागर बी. ए. या किताबवाल्या गृहस्थांनीं प्राचीन ग्रंथकारांच्या सेवेची लाज न मानतां मोठय़ा उत्साहानें त्यांच्या कीर्तीचे उज्ज्वलन आरंभिले आहे, व लोकांकडूनही त्यांस कितपत आश्रय मिळतो याचें अनुमान ‘रघुवंश’ सारखें विस्तृत काव्य (आणि पुन: सटीक छांदार ठशांत छापलेलें व चांगला कागद घातलेलें अवघें दीड रुपयास त्यांस विकतां येतें यावरून होतें. तर वरचाच सदुद्योग इतर ठिकाणींही सुरू असणें अत्यंत इष्ट होय. आतां तिसरा विभाग जो एतद्देशीय इतिहास त्याची स्थिति तर वरच्या दोहोंहूनही अत्यंत शोचनीय आहे. एकंदर लोकांच्या व त्यांतून विद्वान म्हणविणारांच्या उपेक्षाबुद्धीस्तव आजपर्यंत जुन्या बखरींच्या संबंधानें कोणीं कांहींच खटपट केली नाहीं. कांहीं वर्षांपूर्वी ‘विविधज्ञानविस्तार’कर्त्यांनीं आपला मनोदय अशा संबंधानें प्रगट केला होता; व आलीकडे जमा केलेल्या संग्रहांपैकीं कांहीं ते मधून मधून पुस्तकद्वारें प्रसिद्धही करीत असतात, पण असला जुना संग्रह संपूर्ण प्रसिद्ध होण्यास निराळेंच पुस्तक असणें जरुर आहे हें उघड आहे.’’
तर असे हे निराळे मासिक सुरू झाले. त्यातून पुढील काळात ‘पेशव्यांची बखर’, ‘सभासद बखर’, ‘भाऊसाहेबांची बखर’ अशा लहान मोठय़ा २५ बखरी, सुमारे ५०० कागदपत्रे, मुक्तेश्वर, मोरोपंत, रामदास, वामन पंडित यांच्या काव्यरचना प्रसिद्ध करण्यात आल्या. यातील बरेच साहित्य नंतर पुस्तकरूपानेही प्रसिद्ध झाले.
पहिल्याच अंकापासून काव्येतिहाससंग्रहात ‘पेशव्यांची बखर’ प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली. त्याच्या प्रस्तावनेत संपादकांनी मराठी गद्याविषयी विवेचन केले आहे. त्यातील हा काही भाग –
‘‘ कविवर वामन, श्रीधर, मोरोपंत, इत्यादिकांचे कवित्वशक्तीनें आमच्या मराठी भाषेंतील पद्य ग्रंथांचें दुर्भिक्ष घालविलें. परंतु गद्य ग्रंथांस पूर्वी मान कमी असल्यामुळें किंबहुना मुळींच नसल्यामुळें गद्य पद्धतीचा प्रचार अर्थात् कुंठित झाला व तिला सरकारी व खाजगी हिशेब, यादी, पत्रें वगैरे मध्यें संकुचित होऊन बसावें लागलें. पुढें मराठी राज्याचा उत्कर्ष झाल्यावर निरनिराळ्या प्रतापी सरदारांच्या हकिगती लिहिण्याचा प्रसंग आला, तेव्हां लहान लहान टिपणें लोक करून ठेवावयास लागलें, व तदनंतर त्या टिपणांच्या आधारें मोठमोठय़ा बखरी रचिल्या. असा बखरी लिहिण्याचा प्रघात पडला. त्या ह्य़ा बखरीच काय त्या मराठी भाषेंतील जुने गद्य ग्रंथ होत. इंग्रजी झाल्यावर गद्य पुस्तकें लिहिण्याचा प्रघात पडण्यापूर्वी, ह्य़ाशिवाय दुसरे गद्य ग्रंथ होते, असें म्हणतां येत नाहीं. ह्य़ा जुन्या गद्य ग्रंथांत व आधुनिक गद्य पुस्तकांत भाषेच्या मानानें पाहिलें असतां महदंतर दिसून येतें. जुने लिहिण्याची शैली निराळी. त्यांतील शब्द साधे असून वाक्येंही लहान लहान असत. संस्कृत शब्दांचा भरणा कमी. मुसलमानी शब्दांची योजना जास्त. आलिकडच्या ग्रंथांविषयीं विशेष लिहिणें नको. वर सांगितलेल्या प्रकाराच्या उलट सर्व प्रकार सहज दृष्टीस येईल. तेव्हां मराठी भाषेंतील जुन्या गद्य ग्रंथांचे रक्षण न केल्यास पूर्वीची भाषा होती कशी, लोक बोलत होते कसे, शब्द योजना कशी होती, व वाक्यरचनेचा प्रकार कसा, इत्यादि भाषेसंबंधीं गोष्टी महाराष्ट्र भाषेंचें पूर्ण ज्ञान संपादनेच्छूंस कशा कळाव्या? दुसरी गोष्ट. आमची मराठी भाषा अद्याप सुधारली नाहीं. तींत शब्दभरणा अद्याप पुष्कळ होणें आहे. वाक्यरचनेचे प्रकारही तींत सर्व प्रकारचे आले नाहींत. ह्य़ाकरितां आलिकडील ग्रंथकार झटून एकीकडून संस्कृतांतील व दुसरे कडून इंग्रजींतील शब्द व भाषासरणी मराठींत आणूं पाहात आहेत. तर अशा वेळीं जे शब्द व जे भाषासरणीचे प्रकार महाराष्ट्रभाषेंत पूर्वी प्रचारांत असून आमच्या अज्ञानामुळें आम्हांस नाहींसे झाले आहेत किंवा होत आहेत, त्यांचा संग्रह भाषेंत केला असतां तसें करणें किती उपयोगी होईल? सुधारणेच्या शिखरास पोहोंचलेली जी इंग्रजी भाषा तिजलाही जुन्या ग्रंथांपासून पुष्टीकरण होत आहे व त्यामुळें तिला एक विलक्षण शोभाही येत आहे. इंग्रज लोकांत जुन्या ग्रंथांचें किती मोल आहे, हें पाहावयास लांब जाणें नको. प्रत्येक इंग्रजी पुस्तकालयांत- मग तें खाजगी असो कीं सार्वजनिक असो – जुन्या ग्रंथकारांचे ग्रंथ नाहीत असें कधींच होणें नाहीं; ह्य़ावरून व युनिव्हर्सिटीच्या परीक्षांस अशा ग्रंथांतील अमुक असलेच पाहिजेत असा त्यांमध्यें जो नियम आहे, ह्य़ावरून ही गोष्ट चांगली ध्यानीं येईल. ही गोष्ट उत्तम प्रकारें सुधारलेल्या इंग्रजी भाषेची झाली. आपल्या मराठी भाषेस तर ती स्थिति येण्यास अद्याप पुष्कळ काळ गेला पाहिजे. तेव्हां अशा उपयुक्त गद्य ग्रंथांचें संरक्षण करून त्यांचा संग्रह करण्याचें श्रेय आपणास यावयास नको काय?’’
काव्येतिहाससंग्रह ११ वर्षे सुरू राहून १८८९ मध्ये बंद पडले. या अकरा वर्षांच्या काळात मोडक व साने या संपादकद्वयीने आपल्या साक्षेपी संपादनाने काव्य व इतिहास यांच्याविषयी मराठीजनांत जिज्ञासा वाढविण्याचे काम निष्ठेने केले. काव्येतिहाससंग्रहाचे अंक आपणांस राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर वाचता येतील. विशेष म्हणजे याच संकेतस्थळावर आपणांस ज्ञानोदय, विविधज्ञानविस्तार, निबंधमाला या नियतकालिकांचेही अंक वाचायला मिळतील.
संकलन : प्रसाद हावळे – prasad.havale@expressindia.com